July 25, 2024
Tips To Attract Tourist in Agro Tourism Article by Rajendra Ghorpade
Home » कृषी पर्यटनात पर्यटकांना असे करा आकर्षित…
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

कृषी पर्यटनात पर्यटकांना असे करा आकर्षित…

उत्पन्नाचा नवा स्त्रोत व शेतीपूरक व्यवसाय म्हणून आता कृषी पर्यटनाकडे पाहिले जाते. गेल्या वीस वर्षांत महाराष्ट्रात कृषी पर्यटन केंद्रांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कृषी पर्यटनात कोणत्या संधी, आव्हाने आहेत, पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी काय करता येणे शक्‍य आहे, यावर उपयुक्त अशा टिप्स…

राजेंद्र घोरपडे

श्री अथर्व प्रकाशन, कोल्हापूर
मोबाईल 8999732685, 9011087406
Email – rajghorpade1971@hotmail.com

बदलत्या जीवन शैलीमध्ये पर्यटनाचे महत्त्व वाढत आहे. सध्याच्या धावपळ, धकाधकीच्या जीवनशैलीत निवांतपणा गरजेचा झाला आहे. आठवड्याची सुट्टी शहरापासून दूर निवांत ठिकाणी घालविण्यावर भर दिला जात आहे. यातूनच ग्रामीण भागातील पर्यटनास महत्त्व प्राप्त झाले आहे. चैन म्हणून नव्हेतर गरज म्हणून आता पर्यटन केले जात आहे. यासाठी उत्पन्नाचा नवा स्त्रोत व शेतीपूरक व्यवसाय म्हणून आता कृषी पर्यटनाकडे पाहिले जाते. गेल्या वीस वर्षांत महाराष्ट्रात कृषी पर्यटन केंद्रांची संख्या झपाट्याने वाढत आहे. विशेषतः पुणे, ठाणे, कोकण, नागपूर, सातारा या भागात कृषी पर्यटन व्यवसाय वाढीस लागला आहे. भारत हा कृषी प्रधान देश आहे. ऑस्ट्रेलियासारख्या विकसित देशाच्या अर्थव्यवस्थेचा पाया कृषी पर्यटन आहे. त्यामुळे कृषी पर्यटनाचे महत्त्व विचारात घेऊन देशातील ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करणे शक्‍य आहे.

रोमन कालखंडात कल्पनेचा उदय

कृषी पर्यटनाचा प्रारंभ हा मुख्यतः रोमन कालखंडात झाल्याचे आढळते. निवृत्त सैनिकांना उपजीविकेचे साधन म्हणून कसण्यासाठी शेती दिली जात असे. हे सैनिक शेतीसह ग्रामीण भागात व्यापारासाठी येणाऱ्या लोकांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था करत असत. कालांतराने याकडे व्यवसाय म्हणून पाहीले जाऊ लागले. शहरातील लोक थकवा दूर करण्यासाठी ग्रामीण भागात येऊ लागले. यातूनच कृषी पर्यटन ही संकल्पना उदयास आली. शहरी लोक असे पर्यटन करणे पसंत करू लागले.

2005 नंतर महाराष्ट्रात कृषी पर्यटन विकास

शेतीचा काही भाग जाणीवपूर्वक पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करणे म्हणजे कृषी पर्यटन. भारतात सर्वप्रथम 1970च्या दरम्यान बारामती येथे कृषितज्ज्ञ अप्पासाहेब पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी कृषी पर्यटन विकास महामंडळाची स्थापना केली. पण राज्यात 2005 नंतर खऱ्या अर्थाने कृषी पर्यटनास चालना मिळाली. इंटरनेट आणि आयटीचा विकास झपाट्याने झाल्यानंतर आठवड्याची सुट्टी घालवण्यासाठी शहरातील नोकरदार लोक ग्रामीण भागात येऊ लागले. 2005 मध्ये फक्त दोनच कृषी पर्यटन केंद्रे होती. पण जसा शहरात औद्योगिक विकास झाला तसा ग्रामीण भागाकडे पर्यटन म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन वाढू लागला.

कृषी पर्यटनातून ग्रामीण विकास आणि ग्रामीण विकासातून महाराष्ट्राचा विकास हे उद्दिष्ट समोर ठेवून 2008 मध्ये महाराष्ट्र राज्य कृषी व ग्रामीण पर्यटन सहकारी महासंघाची (मार्ट) स्थापना करण्यात आली. त्यानंतर खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात कृषी पर्यटन ही नवी संकल्पना उदयाला आली. 2010 मध्ये राज्यात 80 कृषी पर्यटन केंद्रे कार्यरत होती. पडिक जमिनीचा विकास व उत्पन्नाचा नवा स्त्रोत म्हणून याकडे पाहीले गेले. ग्रामीण निसर्ग सौंदर्य व संस्कृती संवर्धनाच्या दृष्टीने पर्यटनास चालना देण्यात आली. त्यामुळे 2013 मध्ये राज्यात 125 केंद्रे सुरु झाली. आता 2019 मध्ये ही संख्या 300 च्यावर गेली आहे.

मार्टने भौगोलिक विचार करून कृषी पर्यटनाचे राज्यात सहा विभाग केले आहेत. त्यामुळे प्रत्येक विभागात पर्यटन केंद्रांना भेडसावणाऱ्या समस्या ह्या वेगळ्या आहेत. कृषी पर्यटन विकास महामंडळाच्या पाहणीनुसार 2014 मध्ये 4 लाख, 2015 मध्ये 5.3 लाख, 2016 मध्ये 7 लाख पर्यटकांनी कृषी पर्यटन केंद्रांना भेटी दिल्या आहेत. यातून 358 लाख रुपये उत्पन्न शेतकरी कुटुंबांना मिळाले.

महाराष्ट्रातील कृषी पर्यटनाचे सहा विभाग असे –

कोकण विभाग – मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
पुणे विभाग – पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर
नाशिक विभाग – नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदूरबार, जळगांव
औरंगाबाद विभाग – औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड
अमरावती विभाग – अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ
नागपूर विभाग – नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपुर, गडचिरोली.

कृषी पर्यटनातील आव्हाने आणि समस्या –

 1. कृषी पर्यटनासाठीचे शासनाचे धोरण अध्यापही कागदावरच आहे. कृषी पर्यटन केंद्र अशी स्वतःत्र शासन मान्यता नसल्याने या व्यवसायाच्या वाढीत अनेक अडथळे येतात.
 2. कृषी पर्यटनासाठी वीज, पाणी, रस्ता, वाहतुकीची सोय या मुख्य गरजा आहेत. शासनाने या सुविधा देण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. दुष्काळी पट्ट्यात पाण्याची कमतरता असल्याने तर कोकणातील अनेक दुर्गम भागात रस्ते, वाहतुकीची साधने नसल्याने पर्यटनाची केंद्रे उभारणे अशक्‍य झाले आहे; पण जेथे केंद्रे उभारणे शक्‍य आहे तेथे या प्राथमिक गरजा उपलब्ध करून देणे आवश्‍यक आहे.
 3. कृषी पर्यटन हे शेतीचा जोडधंदा म्हणून याकडे पाहिले जात नाही. अन्य व्यावसायिक धंद्याप्रमाणे यास नियम व अटी लावल्या जातात. हेच व्यवसाय वाढीस अडसर ठरत आहे. उदाहरणार्थ विजेचे बिल व्यावसायिक नियमाप्रमाणे आकारले जाते. मार्च ते मे व ऑक्‍टोंबर ते डिसेंबर असाच पर्यटन हंगाम असल्याने वर्षभर व्यावसायिक दराने वीजबिल भरावे लागते. त्यामुळे खर्चाच्या तुलनेत वार्षिक उत्पन्न मिळत नाही.
 4. परदेशी पर्यटकांना ग्रामीण भागात राहण्याची हौस असते. ग्रामीण संस्कृती पाहण्यासाठी असे पर्यटक कृषी पर्यटन केंद्रात येतात. पण ते आल्यानंतर संबंधित मालकास पी फॉर्म सादर करावा लागतो. ते आल्याची माहिती सरकारी दप्तरी द्यावी लागते. या माहितीचा हा फार्म भरण्यात ग्रामीण भागात अनेक अडचणी येतात. या फॉर्ममधील जाचक ठरणाऱ्या अटी दूर करण्याची गरज आहे.
 5. कृषी पर्यटनासाठी कर्ज देण्यास बॅंकाचा नकार असतो. उत्पन्नाचे ठोस साधन नसल्याने बॅंका तयार होत नाहीत. कर्ज पुरवठ्यात अनेक जाचक अटींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो. सवलती व अनुदानाचा लाभ व्हावा यासाठी जाचक अटी दूर कराव्यात.
 6. अमरावती विभागात फक्त दिवसा पर्यटक येतात. रात्री राहण्यासाठी पर्यटक येत नाहीत. त्यामुळे येथे पर्यटनास मर्यादा आहेत. त्यामुळे या विभागात पर्यटन केंद्रांची संख्याही खूपच कमी पाहायला मिळते.
 7. शेतीमधील अनेक उद्योग हे हंगामी आहेत. पर्यटकांना असे उद्योग आकर्षित करतात. कोकणात आबा प्रक्रिया, पश्‍चिम महाराष्ट्रात गुऱ्हाळघरे याचे आकर्षण पर्यटकांना असते; पण यातही अनेक अडचणी आहेत. उदाहणार्थ गुऱ्हाळ हे केवळ चार ते पाचच महिने असते. त्यातच अवेळी पाऊस पडला तर आठवडा – आठवडा गुऱ्हाळ बंद ठेवावे लागते. अशा कालावधीत काही पर्यटक आले तर त्यांना निराश होऊन परतावे लागते. अशा हंगामी व्यवसायामुळे कायमस्वरूपी पर्यटनाची जोड देण्यात मर्यादा आहेत.
 8. पर्यटन केंद्रांवर काही चुकांमुळे छोटे मोठे अपघात घडू शकतात. पर्यटकांना मधमाशा, किडे, साप, विंचू, कुत्रा आदी चावण्याचा धोका असतो. पाळीव प्राणी माणसाळलेले असतात असे नाही. त्यांच्यापासूनही धोका असतो. केंद्र गावापासून दूर व जंगल परिसरात असल्यास वन्यप्राण्यांपासून धोका होऊ शकतो. वाळलेले गवत, चारा, गंज्या केंद्राच्या परिसरात असते. काही पर्यटकांना सिगारेट ओढण्याचा नाद असतो. अशातून आग लागण्याचे, वणवा पेटण्याचे प्रकारही घडू शकतात. पर्यटक शहरी असतात त्यामुळे त्यांना या गोष्टींचा धोका लक्षात येत नाही. बऱ्याचदा केंद्रावर हुल्लडबाजीसाठी, दंगामस्तीसाठीच पर्यटक येत असतात. शेतात फिरत असताना मधमाशांच्या पोळ्यांना दगड मारणे असे प्रकारही घडू शकतात. यातून मोठी दुर्घटना घडण्याचा धोका अधिक असतो.
 9. पर्यटक शहरी असल्याने त्यांना खेड्यातील बऱ्याच गोष्टींचा अंदाज नसतो. तलाव, विहीर, नदी दिसली की त्यामध्ये पोहण्यासाठी उतरणे. उत्साहाच्या भरात नकळत अनेक चुका पर्यटकांकडून घडत असतात. झाडावर चढणे असे प्रकारही पर्यटकांकडून घडतात. झाडावर चढण्याचा सराव नसतो तसेच मजबूत फांद्याही भाराने मोडण्याचे प्रकार घडतात यामुळे पडून छोटे मोठे अपघात होऊ शकतात. पोहण्यासाठी उतरल्यानंतर दुर्घटना घडण्याचा धोकाही असतो. उत्साहाच्या भरात पर्यटकांकडून घडणाऱ्या अशा घटना, पर्यटकांच्या या विविध सवयीवर नियंत्रण ठेवण्यात अडचणी येतात.
 10. दुर्घटना घडल्यास तातडीने वैद्यकीय सेवा देणे अडचणीचे असते. ग्रामीण भागात दवाखाने, उपचार पद्धती तातडीने उपलब्ध होऊ शकत नाही. दळणवळणाचाही अभाव असतो. वाहनांची सुविधाही नसते.
 11. बऱ्याचदा मुलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मोठी गुंतवणूक करावी लागते. इतकी गुंतवणूक करून व्यवसाय झालाच नाही तर याचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागतो. त्यातच महसूलच्याही जाचक अटींना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागते.

कृषी पर्यटनातील संधी –

 1. गावामधील एक पर्यटन केंद्र कमीत कमी 40 लोकांना रोजगार मिळवून देते. ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीचे साधन म्हणून याकडे पाहायला हवे.
 2. व्यावसायिक वीज बिलापासून दूर राहण्यासाठी सौरऊर्जेचा पर्याय निवडता येणे शक्‍य आहे. पावसाळ्यातही चार्ज होणारे सोलर युनीट आता उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे वीज वापराचा अवाढव्य खर्च वाचविणे शक्‍य आहे.
 3. शेतीमध्ये एखादी संकल्पना राबविली असेल तर पर्यटक ती पाहण्यासाठी जरूर केंद्रास भेट देतात. त्या संकल्पनेतून, त्या प्रयोगातूनच आपल्या पर्यटन केंद्राची ओळख पर्यटकांना व्हायला हवी. एका एकरात 100 पिके हा प्रयोग कणेरी येथील सिद्धगिरी मठाने केला आहे. पारंपरिक बियाणे वापरून सेंद्रिय उत्पादन यामध्ये घेतले आहे. हा प्रयोग शेतकरी पर्यटन केंद्रावर करू शकतात. या प्रयोगातून पर्यटकाच्या आवडीनिवडीनुसार ताज्या भाजीपाल्याची भाजी, उसाचा रस, कंदमुळे, विविध कडधान्याची भाजी आपण देऊ शकू. विशेष म्हणजे या प्रयोगात सेंद्रिय उत्पादन घेतले जाते. तसेच पारंपारिक बियाण्याचा वापर केला जातो. यामुळे पर्यटनासह पारंपारिक बियाण्यांचे संवर्धन ही होऊ शकते. या सर्व पिकांची ओळखही पर्यटकांना करून देता येणे शक्‍य आहे. ताज्या भाजीपाल्याचा आस्वाद घेता आल्याने शहरी पर्यटकही निश्‍चितच आकर्षित होऊ शकतात.
 4. शेतीमधील कोणताही एखादा विषय निवडून तो विषय वैशिष्ट्यपूर्णरित्या विकसित करायचा. त्याचे प्रदर्शन, मांडणी योग्य प्रकारे करायची यातूनही कृषी पर्यटनास चांगले उत्पन्न मिळू शकते. उदाहरणार्थ शेतामध्ये आपण वाडा बांधला किंवा आहे ते घर विकसित केले. त्याच्या आजुबाजुला केळी, आंबा, हळद अशी बागायती विकसित करायची. तसेच त्यावरील प्रक्रिया उद्योगही सुरू करायचा व या उद्योगाचे प्रशिक्षण येणाऱ्या पर्यटकांसाठी उपलब्ध करून द्यायचे.
 5. कृषी पर्यटन केंद्राच्या परिसरातील पाहण्यासारखी ठिकाणे मंदीरे, डोंगर, पठारे यांची सैर पर्यटकांना घडवायची. ग्रामीण भागात पक्षी निरीक्षणाची सुविधा उपलब्ध करून देता येऊ शकते. पक्षी पर्यटन केंद्रात यावेत यासाठी पक्षांना खाद्य व पाणी साठे व घरटी याची सुविधा करायची. पक्षी संवर्धनासाठी योग्य उपाययोजना करून आपल्या परिसरात आढळणाऱ्या पक्ष्यांची माहिती सांगणारे फलक उभारून पर्यटकांना त्यांच्या सहवास घडवायचा.
 6. नक्षत्र गार्डन ही संकल्पनाही राबविता येणे शक्‍य आहे. 27 नक्षत्रे आणि देवता व त्यांचे वृक्ष अशी कल्पना मांडून उद्यान विकास प्रकल्प उभा करायचा. आवडत्या नक्षत्राच्या ठिकाणी, देवतेच्या ठिकाणी, वृक्षाच्या छायेत साधना, ध्यान-धारणा करण्याची संधी पर्यटकांना उपलब्ध करून देता येऊ शकते. तसेच बोटॅनिकल गार्डनमध्ये दुर्मिळ वृक्षाचे संवर्धन करून त्यांची तोंड ओळख पर्यटकांना करून देता येऊ शकते. अशा गोष्टी पर्यटकांना आकर्षित करतात.
 7. ग्रामीण संस्कृतीचा अनुभव पर्यटकांना घेता यावा असे उपक्रम, साधने उपलब्ध करून देता येऊ शकतात. उदाहरणार्थ या, राहा, स्वतःचे जेवण ग्रामीण पद्धतीने स्वतः करा. जात्यावर पीठ दळा, त्या पीठाच्या भाकरी चुलीवर करा. पाटा-वरवंट्याने मिरच्या वाटा व त्याचा खर्डा तयार करा, झुणका भाकरीचा आस्वाद घ्या. आमराईत, द्राक्षबागेत, फळबागेत स्वतःच्या हाताने फळे तोडा. त्याचा आस्वाद घ्या, गोठ्यामध्ये जनावरांना चारा घाला, जनावरांच्या अंगावर हात फिरवा, दुध काढा, ताजे दुध प्या, मक्‍याच्या शेतात जा आणि मका आणून तो भाजून खा. अशा सोयी पर्यटकांना देता येऊ शकतात.
 8. उन्हाळ्यात उकाडा असह्य होतो. अशा वेळी दुपारच्या वेळी शेतातील डेरेदार वृक्षाच्या सावलीत विसावा घेण्याचा आनंद पर्यटकांना देता येऊ शकतो. या झाडाखाली बांबू हाऊस किंवा गवताची झोपडी बांधून त्यामध्ये राहण्याचा आनंदही पर्यटकांना उपलब्ध करून देता येणे शक्‍य आहे. शहरातील उकाड्यात झोप लागत नाही पण दुपारच्यावेळी डेरेदार वृक्षाच्या सावलीत पडल्या पडल्या झोप लागते. असे निसर्गाचे अनुभव पर्यटकांना देऊन निसर्गाबद्दल त्यांची ओढ, जिव्हाळा वाढविणे शक्‍य आहे.
 9. पारंपरिक खेळ, मल्लखांब, साहसी खेळ, विटी दांडू, लेझीम, धनगरी नृत्य, आदिवासी नृत्य, लोकगीते, भजन, घोड सवारी, बैलगाडी सवारी, तलावात बोटींग, फिशिंग, आपपासच्या जगंलात, डोंगरमाथ्यावर पर्यटन, सूर्योदय पॉईंट, सूर्यास्त पॉईंट, चांदणे भोजन, निसर्गाच्या सानिध्यात सहवास अशा विविध सोयी पर्यटन वाढीसाठी करणे शक्‍य आहे.
 10. आपआपल्या भागातील ग्रामीण जीवन व जेवणाचा आस्वाद पर्यटकांसाठी आनंददायी ठरू शकतो. जेवणाच्या स्वादावरही पर्यटक आकर्षित होऊ शकतात.
 11. वर्षा पर्यटनाचीही जोड कृषी पर्यटनास देता येऊ शकते. कोकण तसेच पश्‍चिम घाटात चिखल पेरणी, धबधब्यात आंघोळ, डोंगरमाथ्यावर पर्यटन असे पर्याय पर्यटकांना उपलब्ध करून देता येऊ शकतात.

पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी हे शक्‍य –

 1. मराठवाडा, विदर्भात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी हुरडा पार्टी तर पुणे व नाशिक विभागात वांग्याच्या भरीत पार्टी होऊ शकते. कोकणात पावट्याच्या, भुईमुगाच्या शेंगाचा लोटा लावणे पद्धत आहे. या खाद्यपदार्थाची पार्टी जानेवारी ते मार्च दरम्यान होऊ शकते. कोकणात मार्चनंतर आंबा, फणस रानमेव्याचा हंगाम येतो या काळात आमरस पार्टी, रानमेवा पार्टी असे उपक्रम राबविणे शक्‍य आहे. विदर्भात संत्रा रस पार्टीचे आयोजनही शक्‍य आहे. पुण्यातील ग्रामीण भागात मासवडी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी मासवडीची पार्टी होऊ शकते. कोल्हापूरसह पश्‍चिम महाराष्ट्रात तांबडा-पांढरा रस्सा यांसह शाकाहारी रस्सा विशेषतः राधानगरी भागात दुधापासून बनवला जाणारा हा रस्सा अशा वैशिष्ट्यपूर्ण पदार्थांवर आधारित पार्टी होऊ शकते. एकंदरीत ज्या भागात जो खाद्यपदार्थ प्रचलित आहे त्या खाद्यपदार्थावरून पर्यटकांना आकर्षित केले जाऊ शकते.
 2. तसेच काही सण-उत्सव विचारात घेऊन त्या काळात खाद्य महोत्सव घेणे शक्‍य आहे. उदाहरणार्थ कोजागिरी पौर्णिमेला दूध पार्टी, होळीच्या वेळी पुरणपोळी पार्टी आदी, तसेच केळीचे उत्पादक शिकरण पार्टी, आंबा बागायतदार आमरस पार्टी आदी करू शकतात.
 3. कृषी पर्यटन केंद्रांत टोमॅटो, स्वीटकॉर्नचे घेऊन त्याचे विविध पदार्थ पर्यटकांसाठी उपलब्ध केले जाऊ शकतात. टोमॅटो सुप, स्वीटकॉर्न सूप असे पदार्थही पर्यटकांना उपलब्ध करून देता येऊ शकतात. विशेष म्हणजे हे पदार्थ शेतातच पिकवलेले असल्याने ताजे व त्वरित शिजवल्याने ते चविष्टही असतात. अशी विविध पिकांची उत्पादने घेऊन त्यांचे विविध पदार्थ पर्यटकांसाठी उपलब्ध करून दिल्यास आपल्या केंद्राची ओळख त्या पदार्थावरून होऊ शकते.
 4. कमी खर्चात लग्न समारंभ करणाऱ्यांसाठी कृषी पर्यटनात संधी उपलब्ध करून देता येणे शक्‍य आहे.

शेतीतील उत्पन्नास आलेली मर्यादा विचारात घेता शेतीपूरक व्यवसायांना चालणा देणे आता गरजेचे झाले आहे. नैसर्गिक डोंगर, दऱ्या खोऱ्यात वसलेली गावे, गड-किल्ल्यांचा परिसर, निसर्ग रम्य पठारे, वनसंपदा, सागरी किनारा, धार्मिक स्थळातील कलाकुसर अशी विविध संपन्नता लाभली आहे. यासाठीच महाराष्ट्रात कृषी पर्यटन वाढीसाठी भरपूर संधी आहेत. महाराष्ट्राची लोकसंख्या 11.24 कोटी आहे. त्यातले 45.2 टक्के लोक हे शहरांत राहतात. यातील 73 टक्के जनता ही ग्रामीण भागात पर्यटनास जाऊ इच्छिते. यामुळे कृषी पर्यटन व्यवसायास वाढीस भरपूर वाव आहे. अगदी थोड्या जागेत कमीत कमी गुंतवणुकीत शेतकरी पर्यटन उद्योग सुरू करू शकतो. कृषी पर्यटनामुळे कृषी आणि सेवा ही दोन क्षेत्रे एकमेकाशी जोडली जाऊ शकतात. शेतमाल उत्पादनांना बाजारपेठही मिळू शकते. यातून रोजगार, ग्रामीण विकास, संस्कृती संवर्धन होऊ शकेल. शहरातील पैसा ग्रामीण भागात येऊ लागल्याने विकासाचा समतोलही राखला जाईल.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

वायुरुपी श्री गुरुदेवाचा जयजयकार

ब्रह्म हा वायूचा श्वासोच्छवास

देशी अन् विदेशी गायीच्या दुधातील फरक

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading