September 27, 2023
Keadar Kalave Book Review by Dr Dnynadev Raut
Home » ग्रामीण साहित्याची वस्तूनिष्ठ मांडणी
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

ग्रामीण साहित्याची वस्तूनिष्ठ मांडणी

ग्रामीणता आणि ग्रामीण साहित्य संकल्पना, ग्रामीण साहित्य निर्मिती-स्थित्यंतरे, ग्रामीण साहित्याच्या प्रेरणेचं स्वरूप, साठोत्तरी साहित्य चळवळी व ग्रामीण साहित्य, ग्रामीण साहित्याची भाषा, ग्रामीण साहित्य समीक्षेची वाटचाल अशा छोट्या, सुटसुटीत सहा घटकातून काळवणे ग्रामीण साहित्याचं सुक्ष्म, नेटकं चिंतन मांडत जातात.

डॉ. ज्ञानदेव राऊत

लातूर

केदार काळवणे यांच्या ‘ग्रामीण साहित्य संकल्पना आणि समीक्षा’ या लक्षवेधी ग्रंथांने कुतुहलाची, चर्चेची दार खुली केली. अवघ्या दीडशे पृष्ठांच्या आत घोटीवपणे बांधलेला ग्रंथाचा रचनाबंध लेखकाच्या स्वतंत्र भूमिकेसह व्यक्त होत जातो. पूर्वीचं ग्रामीण साहित्य चळवळीच्या प्रवर्तकांनी, अभ्यासकांनी ‘ग्रामीण साहित्य’ ही संकल्पना विशद केली आहे. संशोधक, अभ्यासक व वाचकांसाठी हा ग्रंथ नव्याने कोणती मांडणी करू पाहतोय, देवू पाहतोय ? याच कुतूहल या ग्रंथाने नक्कीच जाग केलं आहे.

साहित्य विश्वात ग्रामीण साहित्य, दलित साहित्य, स्त्रीवादी साहित्य, आदिवासी साहित्य, जनसाहित्य, मुस्लिम साहित्य, जैन साहित्य, कामगार साहित्य, बाल साहित्य अशा साहित्याच्या वेगळ्या चुली असाव्यात का ? मराठी साहित्य हे भौगोलिक, लिंगवाचक, वर्गवादी, धर्मवादी, जातीयवादी व प्रचारकी कुंपणाचे बनते की, काय ? अशीही टीकाटिप्पणी कानावर पडत असते. ग्रामीण संवेदनशीलतेची मांडणी करणारे काही तथाकथित साहित्यिक स्वतःला ‘ग्रामीण साहित्यिक’ म्हणवून घेण्यास कमीपणा का मानत असतील. ग्रामीण संबोधल्या जाणाऱ्या साहित्याला कुणी देशीवादी साहित्य, कुणी कृषीजनांचं साहित्य, कुणी शेतकरी साहित्य म्हणतात. साहित्यातील नामकरण वादाचा, गटाचा हा वेगळा पेहराव काय साध्य करू पाहतोय ? अभ्यासक्रमाच्या पातळीवर ‘ग्रामीण साहित्य’ ही संकल्पना विद्यार्थ्यांना ‘संभ्रमित’ करणार नाही का ? अशा अनेकविध प्रश्नांचं कुतूहल संयत विश्लेषणाच्या बळावर डॉ. केदार काळवणे या तरूण अभ्यासकांनी या ग्रंथातून मांडले आहे.

महाविद्यालयीन, विद्यापीठीय विद्यार्थ्यांना लक्ष करून ग्रंथनिर्मितीचा काळवणे यांचा हेतू असलातरी त्यांची स्वतःची अशी काही साक्षेपी मते ग्रंथातून पदोपदी दिसून येतात. ग्रामीणता आणि ग्रामीण साहित्य संकल्पना, ग्रामीण साहित्य निर्मिती-स्थित्यंतरे, ग्रामीण साहित्याच्या प्रेरणेचं स्वरूप, साठोत्तरी साहित्य चळवळी व ग्रामीण साहित्य, ग्रामीण साहित्याची भाषा, ग्रामीण साहित्य समीक्षेची वाटचाल अशा छोट्या, सुटसुटीत सहा घटकातून काळवणे ग्रामीण साहित्याचं सुक्ष्म, नेटकं चिंतन मांडत जातात. अर्थात ही मांडणी करतांना ग्रामीण साहित्यावर साक्षेपी भाष्य करणारे आनंद यादव, रा. रं. बोराडे, नागनाथ कोत्तापल्ले, द.ता. भोसले, वासुदेव मुलाटे, चंद्रकुमार नलगे, भास्कर चंदनशिव, रवींद्र ठाकूर, कैलास सार्वेकर, श्रीराम गुंदेकर, मदन कुलकर्णी, गणेश देशमुख, मोहन पाटील, भास्कर शेळके, भीमराव वाघचौरे, ईश्वर नंदापुरे, प्रतिमा इंगोले, प्रल्हाद लुलेकर, कृष्णा इंगोले, वामन जाधव, सुधाकर शेलार, रमेश जाधव, महेश खरात, शोभा नाफडे, रेखा जगनाळे, रामचंद्र काळुंखे या पूर्वसुरी विषयी त्यांच्या लेखनीतून कृतज्ञता व्यक्त होते. या अभ्यासकांच्या साहित्याचा नेमका धांडोळा काळवणे घेतात.

ग्रामीण बोली भाषेचं निवेदनाच्या अनुषंगाने काळवणे यांचे विश्लेषण व्यक्तीशः मला खूप भावले. प्रदेशनिविष्ट भाषेच्या निमित्ताने आलेले मराठवाडा, विदर्भ, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र, कोकण भागातील कितीतरी भाषिक सोदाहरणं मांडणीतील वैविध्यता दर्शवून जातात. ग्रामीण साहित्याच्या वैचारिक अदिष्ठानाचं शोधनं महात्मा जोतिबा फुले, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, राजर्षी शाहू महाराज, महात्मा गांधी, कार्ल मार्क्स, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व शरद जोशी यांच्या विचार कार्यावर विसावलेलं असलं तरी ते कालखंडाच्या परिघात बांधल्या गेलं. मुळात साहित्याची प्रेरणा ही पिंडधर्मी असते. विशिष्ट एक विचार घेवून साहित्य लेखन शक्य नसते. कारण कोणताही विचार विशिष्ट कालखंडातच लक्षणीय ठरतो. म्हणून ग्रामीण साहित्य हे सांप्रदायिक तत्वज्ञानावर आधारलेले नसून ते लवचिक व प्रसरणशील असल्याची वस्तुनिष्ठ मांडणी केदार काळवणे करतात.

या ग्रंथाची मोलिकता दर्शविणारी डॉ. केशव तुपे यांची पाठराखण व डॉ. सुधाकर शेलार यांची अभ्यासपूर्ण, परखड प्रस्तावना पुस्तकास न्याय देणारी ठरली. डॉ. शेलार आपल्या प्रस्तावनेत वर्तमान साहित्य, समीक्षा व्यवहारावर भाष्य करतात, ‘ग्रामीण भागातून लिहिणाऱ्या लेखक-कवींचे पीक उदंड झाले आहे. त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप टाकणारी कौतुकपर समीक्षाही भरपूर लिहून झाली आहे. आता जरा या समीक्षेनेही परखड व्हायला हवे. काळ्याला काळे अन पांढऱ्याला पांढरे तरी म्हणायला हवे. अन्यथा सगळेच काळे, पांढरे म्हणून गणले जाऊ लागले तर पांढऱ्यालाही किंमत उरणार नाही. उपयोजित समीक्षा लिहिणारांनी ही बाब प्रकर्षाने लक्षात घेत अधिकाधिक वस्तुनिष्ठ, तार्किक, परखड व्हायला हवे तरच गुणवत्तापूर्ण लेखनाला न्याय मिळू शकेल’.

पुस्तकाचे नाव – ग्रामीण साहित्य संकल्पना आणि समीक्षा’
लेखक – केदार काळवणे
प्रकाशक – अक्षरवाङमय प्रकाशन, पुणे
किंमत – १२० रुपये

Related posts

झेंडूच्या फुलांचे औषधी गुणधर्म जाणून घ्या…

मखाना खाण्याचे फायदे…

चिमणी संवर्धनासाठी करा हे उपाय…

Leave a Comment