आवाजाचा मनावर होणारा परिणाम कसा आहे, यावर त्या गोष्टी अवलंबून आहेत. मनाने ठरवले तो आवाज ऐकायचे नाही. तर ते शक्य आहे. मन सोऽहमवर स्थिर झाल्यानंतर आपोआप त्यात येणारे व्यत्यय हे दूर होतात. फक्त मनाला त्याची सवय व्हायला हवी. साधनेने हे सहज साधता येते.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे
मोबाईल – 9011087406
जयजय सर्व विसांवया । सोऽहंभावसुहावया ।
नाना लोक हेलावया । समुद्रा तूं ।। २ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १४ वा
ओवीचा अर्थ – तुम्ही सर्व जगास विश्रांतिस्थान आहोत. मी ब्रह्म आहे अशा भावनेस सेवन करविणारे ( तुम्ही आहांत ) तुम्ही अनेक लोकरूपी लाटाचे समुद्र आहोत, तुमचा जयजयकार असो.
पूर्वीच्या काळी साधनेसाठी शांत जागेचा शोध घेतला जायचा. अनेक साधुसंत यासाठी गुहेमध्ये राहायचे. जेथे आवाजाच्या कोणत्याही लहरी पोहोचत नाहीत अशा जागेची निवड केली जात असे. उद्देश हाच होता की साधना सुरू असताना एखादा आवाज झाला तर त्यामुळे साधना भंग होऊ नये. आता काळ बदलला आहे. नव्या पिढीला गुहेमध्ये जाऊन राहणे शक्य होणार नाही. काही नव्या पिढीतील संतांच्या समाधी मंदिरात ध्यान गुंफा आहेत. अशा ध्यान गुंफात काही ठराविक काळात साधनेच्या सुविधा उपलब्ध आहेत. सध्या सुरक्षेचा विचार करता चोवीस तास अशा गुंफा साधनेसाठी खुल्या ठेवणेही शक्य नाही. अनेक नको ते प्रकार अशा कक्षांमध्ये घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या नागरिकांवर विश्वास ठेवणे कठीण झाले आहे.
नव्यापिढीत अशा प्रकारामुळे आध्यात्मिक विचार रुजणे कठीण आहे. त्यातच नव्या पिढीच्या प्रत्येक शंकेचे निरसन करावे लागते. तरच ते विचार पटतात. शंका जरूर असाव्यात. त्यांचे निरसनही योग्य प्रकारे व्हायला हवे. साधना करताना धूप जाळावा, उदबत्ती लावावी, सुगंधी द्रव्ये शिंपडावीत. याची गरज काय? अशा शंका नवी पिढी विचारते. तसे साधनेसाठी या गोष्टींची काहीच गरज नाही. हे त्यांचे मत बरोबर आहे. पण हे का केले जात होते. याचाही अभ्यास होणे गरजेचे आहे.
सोऽहम साधना करताना श्वास नियंत्रित करायचा आहे. आत जाणारा प्राणवायू शुद्ध असावा यासाठी परिसराची स्वच्छता ही गरजेची आहे. साधनेच्या क्रियेत श्वसनशक्ती सुधारते. हवेत पसरलेले दूरच्या विविध वासांचे कणही सहजपणे ओळखले जातात. या वासाने साधनेत मनाची स्थिरता ढळू शकते. यासाठी शुद्ध हवा अधिक असावी. सुवासिकता अधिक असावी जेणेकरून याचा साधनेमध्ये व्यत्यय येऊ शकणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. पूर्वीच्या काळातील उदबत्ती किंवा धूपाची प्रत सध्या बाजारात असणाऱ्या धुपात नाही यामुळे तसे पाहता साधनेसाठी आता या गोष्टी निरुपयोगीही ठरत आहेत. काहींना यामध्ये साधना करताना ठसका लागतो.
एकंदरीत काय तर साधना करताना व्यत्यय येणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. मनाची स्थिरता साधण्यासाठी आवश्यक त्या उपायांना प्राध्यान्य द्यायला हवे. काहींना आवाजात झोप लागत नाही. पण काही मात्र कितीही मोठा आवाज होत असला तरी त्यांना पडल्या पडल्या झोप लागते. असे का? आवाजाचा मनावर होणारा परिणाम कसा आहे, यावर त्या गोष्टी अवलंबून आहेत. मनाने ठरवले तो आवाज ऐकायचे नाही. तर ते शक्य आहे. मन सोऽहमवर स्थिर झाल्यानंतर आपोआप त्यात येणारे व्यत्यय हे दूर होतात.
फक्त मनाला त्याची सवय व्हायला हवी. साधनेने हे सहज साधता येते. सद्गुरुंच्या कृपेने ही अनुभुती येते. कारण सद्गुरु हे सर्व व्यत्ययांना दूर सारणारे असे विश्रांती मिळवून देणारे स्थान आहे. अशा या गुरूंच्या सहवासात, त्यांच्या सोहमच्या स्वरात आपलाही सोहमचा स्वर मिसळून द्यायचा असतो व आपण सद्गुरुरुप व्हायचे असते.