December 10, 2022
Book review of Sandeepchya Gosti by Vinayank Patil
Home » संदीपच्या गोष्टी- ऐकूया, वाचूया
मुक्त संवाद

संदीपच्या गोष्टी- ऐकूया, वाचूया

आज या संदीपच्या गोष्टी लिखित स्वरूपात आपल्या समोर आल्या असल्या तरी त्या त्याच्या तोंडून ऐकण्यात खरी मजा असणार आहे. माझ्या अनुभवात अशा काही मुलांनी सांगितलेल्या गोष्टी, गायलेली गाणी आहेत. त्यांचा उत्साह, त्यांची शैली, त्यांचे हावभाव काही औरच असतात. त्यांच्या डोळ्यांत तरळणारा मिश्किल भाव त्यांच्या आजूबाजूला बहरलेल्या रानफुलांसारखा प्रफुल्लित असतो.

डॉ. विनायक पाटील

सहाय्यक प्राध्यापक, कॉलेज ऑफ फॉरेस्ट्री,
दापोली

मित्रांनो, तुम्ही शाळेत मानवाच्या उत्क्रांतीचा अभ्यास केलाच असेल. कुशल मानव, ताठ कण्याचा मानव, शक्तिमान मानव, बुद्धिमान मानव अशा टप्प्यांनी मानवजात विकसित होत गेलेली आपल्याला माहीत आहे. त्यातून आजचा प्रगत बुद्धीचा मानव (Homo sapiens sapiens) अस्तित्वात आला. खरं तर त्यानंतरचा टप्पा म्हणजे गोष्टी सांगणारा मानव (Homo sapiens fabula) असा असायला हवा !

प्रत्यक्ष अनुभव आणि त्यात गुंफलेल्या कल्पना यांची सरमिसळ करून तयार होणाऱ्या अद्भुत, चमत्कृतीपूर्ण गोष्टी सांगणं आणि ऐकणं हा माणसाच्या समाजजीवनाचा अविभाज्य भाग आहे. समाजापासून दूर एकांतात राहायचं ठरवून गेलेल्या थोरो या तत्वज्ञानी पुरुषाला त्या एकांताच्या गोष्टी सांगून प्रसिद्धी मिळाली. तसाच काहीसा प्रयत्न करत असताना अलास्काच्या भयाण थंडीत गारठून मृत्यू पावलेल्या ख्रिस्तोफर मॅक्कँडलेस या तरुणाने तर आपल्या गोष्टी कुणीतरी वाचाव्या म्हणून गाडीच्या सडत चाललेल्या पत्र्यावर कोरून ठेवल्या होत्या. मग जे समाजाच्या सर्व अंगांचा, गुणावगुणांचा पुरेपूर आनंद घेत असतात त्यांच्यासाठी तर या गोष्टी म्हणजे रोजच्या जेवणाइतक्याच महत्त्वाच्या नाही का? या गोष्टी आपल्यासमोर पुस्तक, नाटक, सिनेमा इत्यादी माध्यमांतून सतत येत असतात.

श्रमिक सहयोग संस्थेने अलीकडेच प्रकाशित केलेल्या ‘संदीपच्या गोष्टी’ म्हणजे याच मालिकेतील एक नाविन्यपूर्ण प्रयोग. आणि हा प्रयोग ‘प्रयोगभूमी’ नावाच्या निवासी शाळेतून पुढे यावा यात नवल ते काय? वयाची बारा वर्षेही पूर्ण न झालेल्या संदीप निकम या मुलाच्या या गोष्टी. त्याने वेळोवेळी सांगितलेल्या गोष्टी लिहून काढून, संकलित करण्याचे काम त्याच्या शिक्षिका रेखा मोहिते यांनी अगदी जिव्हाळ्याने केलेलं आहे. प्रयोगभूमीचे कार्यवाह राजन इंदुलकर यांनी त्या काथोडी बोलीभाषेतील गोष्टी प्रमाण-मराठीत भाषांतरीत केल्या आहेत आणि पुस्तकाला मर्मस्पर्शी प्रस्तावना दिली आहे. तिच्यात आदिवासी समाजाच्या उर्जापूर्ण पण संघर्षमय, मुक्त पण अस्थिर, आनंदी पण शोषणग्रस्त जीवनाच्या सहजपणावर भाष्य करताना ‘जे निसर्गाचे ते त्याच्यात विलीन होत असते’ असं विधान ते करतात.

संदीप हा मोलमजुरी, मासेमारी, शिकार करणाऱ्या आदिवासी कुटुंबातील मुलगा. प्रयोगभूमीत आल्यावर तिथल्या काहीशा व्यवस्थित वातावरणात रुळताना त्याला अडचणी आल्या. मात्र लवकरच त्याने डोक्यात रुंजी घालणारे विचार एकत्र करून लहानलहान गोष्टी सांगायला सुरुवात केली. अगदी आग्रहाने. मुलं अनुभवांच्या, निरीक्षणाच्या बाबतीत स्पंजासारखी असतात. येणारा प्रत्येक अनुभव शोषून घ्यायला ते तयार असतात. जग समजून घेण्याची उर्मी त्यांना स्वस्थ बसू देत नाही. त्यातली काही मुलं नव्याने समजणाऱ्या जगाच्या गोष्टी सांगायला सुरुवात करतात. पण गोष्टी सांगणं ही एक कला आहे. प्रत्यक्ष किंवा काल्पनिक अनुभवांची आणि त्यांना पूरक अशा शब्दांची निवड, त्यांचा अनुक्रम, त्यातले टप्पे आणि थांबे, उत्सुकता ताणत नेण्याची हातोटी हे त्या कलेचे विशेष आहेत. ही कला अर्थातच सर्वांकडे नसते. तरी सांगण्यासारखी गोष्ट मात्र सर्वांकडे असतेच. त्या दृष्टीने म्हटलं तर या गोष्टी आहेत, म्हटलं तर संवाद. साहित्याची परखड आणि अवजड समीक्षा करण्याच्या काळात म्हणूनच हा एक अनोखा प्रयोग आहे: त्या मुलाला जी गोष्ट वाटते ती गोष्ट म्हणून मान्य करून त्याच्या क्षमतेला प्रोत्साहित करण्याचा.

संदीपच्या या गोष्टी वाचताना आपल्याला अनेक ठिकाणी अडखळायला होतं. पहिल्या गोष्टीच्या पहिल्याच ओळीत ‘हेरा’ शब्दाने आपण बुचकळ्यात पडतो. पण सोबत भाषांतर असल्यामुळे लवकरच आपल्याला नवनवे शब्द ओळखीचे होत जातात. आणि मग जेव्हा फिरून एकदा आपण त्या गोष्टी वाचतो तेव्हा त्यातली गंमत नव्याने कळते. त्याच्या ‘जत्रानी जादू’ नकळत आपल्यावर होते आणि आपण त्याच्या ‘सुंदर गाडीत’ बसून त्याच्या सहयाद्रीच्या कुशीतील जगाची सफर करून येतो. ‘दुसऱ्या नावा’ची गंमत वाचताना आपण आपली, इतरांची दुसरी नावे आठवून गालातल्या गालात हसतो. मगर, अजगर, डुक्कर अशा वन्यजीवांच्या इतक्या निकट सहवासात राहणाऱ्या लोकांची शिकारीची, हत्येची अपरिहार्यता आणि त्याच वेळी त्यांच्याप्रति असलेली कमालीची संवेदनशीलता समजून घ्यायला आपली समज अपुरी पडते.  

आज या संदीपच्या गोष्टी लिखित स्वरूपात आपल्या समोर आल्या असल्या तरी त्या त्याच्या तोंडून ऐकण्यात खरी मजा असणार आहे. माझ्या अनुभवात अशा काही मुलांनी सांगितलेल्या गोष्टी, गायलेली गाणी आहेत. त्यांचा उत्साह, त्यांची शैली, त्यांचे हावभाव काही औरच असतात. त्यांच्या डोळ्यांत तरळणारा मिश्किल भाव त्यांच्या आजूबाजूला बहरलेल्या रानफुलांसारखा प्रफुल्लित असतो. तो प्रत्यक्ष पाहण्यातला आनंद घ्यायचा असेल तर नक्कीच अशा वस्तीत किंवा शाळेत जाऊया. तिथे “गोट आईक वं” म्हणणारा एखादा संदीप आपल्याला नक्कीच भेटणार. त्याच्या गोष्टी ऐकुया. पण तूर्तास मात्र ‘संदीपच्या गोष्टी’ मिळवून वाचुया.

पुस्तकाचे नाव – संदीपच्या गोष्टी
प्रकाशक: श्रमिक सहयोग, सती, पोस्ट पिंपळी खुर्द, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी-415604
किंमत – रू. 100 (साध्या टपालाने रू. 130)
पुस्तकासाठी संपर्क – *पुणे*- भार्गव पवार 9421034967*मुंबई*- उल्का पुरोहित 8390885824, संतोष पुरोहित 9011220193, प्रकाश स.ग. 8605677038*नाशिक*- वसंत एकबोटे 9545556415*रत्नागिरी*- श्रुती सुर्वे 9422595129*चिपळूण*- अभिषेक तटकरी 9130515045

Related posts

मनोरंजन करणाऱ्या विविध ढंगांच्या कथा

माझी माय मध्ये स्त्री जीवनाच्या सुधारणेचा पुरस्कार

Saloni Art : ग्लास बाॅलचे थ्रीडी चित्र असे रेखाटा…

Leave a Comment