March 30, 2023
Architectural education from tourism article by Mahadev Pandit
Home » पर्यटनातून स्थापत्य शास्त्राचे शिक्षण
स्पर्धा परीक्षा

पर्यटनातून स्थापत्य शास्त्राचे शिक्षण

जागतिक पातळीवर स्थापत्य अभियंत्यांनी अहोरात्र मेहनत करून तसेच आपले पूर्ण कौशल्य व कल्पनाशक्तीपणाला लाऊन बांधकाम क्षेत्राची प्रगती केली आहे आणि ही प्रगती म्हणजेच बांधकाम क्षेत्राची गरूड झेप आहे. यातूनच नवीन शिकाऊ अभियंत्यांना नवीन प्रेरणा, कल्पनाशक्ती व उमेद मिळेल आणि भविष्यात आपल्या देशाचे नाव उच्चतम पातळीवर पोहचविण्यास मदत होईल यात तिळ मात्र देखील शंखा नाही,यासाठीच महाविद्यालयांनी, शैक्षणिक संस्थानी, प्राध्यापकांनी , बांधकाम क्षेत्रातील अग्रगण्य व्यावसायिकांनी तसेच समाजातील प्रतिष्ठीत व्यक्तींनी शैक्षणिक पर्यटनाच्या माध्यमातून महाविद्यालयातील शिकाऊ अभियंत्यांना त्यांच्या विषयांना अनुसरून उपलब्द असलेल्या पर्यटन स्थळांची सफर घडवून आणावी

महादेव ईश्वर पंडित
( लेखक स्थापत्य सल्लागार आहेत.)

अगदी प्राचीन कालापासून अन्न, वस्त्र, निवारा हा मूलभूत गरजांचा त्रिकोण मानवी जीवनात प्रचलितआहे. पण आजमितीला हा मुलभूत गरजांचा त्रिकोण पुर्णत्वाला नेण्यासाठी शिक्षण, वहातूक, आरोग्य व स्वंयशिस्त या अतिरिक्त्त चौकोनाची गरज भासते. प्रथम त्रिकोण व नंतर चौकोन जरी पूर्ण केला तरी जीवन आनंदीत व परिपुर्ण करण्यासाठी पर्यटन या आठव्या अतिरिक्त गरजेची अत्यंत निकड भासते आणि अश्याप्रकारे पर्यटन या अतिरिक्त व आवश्यक गरजेने मानवी जीवनाचा अष्ठकोन परिपुर्ण होतो.

मनुष्याला प्रेरणा व उत्साह देणारा त्याचप्रमाणे त्याच्या जीवनात अवर्णनीय आनंद देणारा क्षण म्हणजे पर्यटन. जगभरातील तसेच देशातील विविध पर्यटन स्थळांना त्यासाठी भेटी दिल्या जातात आणि अशी सर्व पर्यटन स्थळे बहूतांशी स्थापत्य शास्त्राचे उत्तम तसेच आदर्श नमुने आहेत. ती जगप्रसिद्ध पर्यटन स्थळे उभी करण्यात स्थापत्य अभियंत्याचा खूप मोठा वाटा आहे. त्या जगप्रसिद्ध पर्यटन स्थळाच्या मागे असणारी स्थापत्य अभियांत्रिकीच्या मोठ्या योगदानाची सर्व माहिती त्याठिकाणी भेट दिलेल्या सर्वच पर्यटकांना असतेच असे नाही पण ती सर्व माहिती खरोखर रंजक, ऐतिहासिक आणि अचंबित करायला लावणारी असते. ही सर्व सविस्तर आश्चर्यजनक शास्त्रीय माहिती स्थापत्य अभियांत्रिकी महाविद्यालयातील शिकाऊ अभियंत्यांना शैक्षणिक पर्यटनाच्या माध्यमातून प्रदान केली तर खरोखरच स्थापत्य अभियांत्रिकी शाखेत नक्कीच क्रांती घडेल.

आज पदवीधर स्थापत्य अभियंता होण्यासाठी जवळ जवळ आठ सत्रे आवश्यक आहेत आणि ह्या आठ सत्रातील प्रत्येक सत्राच्या सांगतेवेळी छोट्या छोट्या गृपच्या माध्यमातून विविध पर्यटन स्थळांना शैक्षणिक भेटी देऊन त्या भेटीचा अभियांत्रिकी माहिती वजा अहवाल तयार करायला सांगितला तर खरोखरच नव्या शिकाऊ अभियंत्यांना आठ सत्रामध्ये देशातील तसेच जगातील विविध प्रसिद्ध पर्यटन स्थळांची अभियांत्रिकी माहिती अगदी हातोहात मिळेल आणि त्यातून एक नवीन प्रेरणेचा व उमेदीचा अभियंता तयार होण्यास मदत होईल. शैक्षणिक पर्यटनातून एकूणच स्थापत्य शास्त्राविषयी सविस्तर ज्ञान, रंजक माहिती आणि संबंधित स्थळाविषयी असलेल्या आत्मीय जाणीवेचा खजाणाच शिकाऊ अभियंत्याला खुला होईल.

भारतातील स्टॅच्यू ॲाफ युनिटी, गोव्यातील झुवारी नदीवरील महत्वाकांक्षी प्रेक्षणीय गॅलरीसह केबल स्ट्रेच ब्रीज, चिनाब नदीवरील रेल्वे आर्च पुल, वरळी बांद्रा समुद्र सेतू, मुंबई- पुणे द्रूतगती मार्ग, मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग, कोकण रेल्वे प्रकल्प, भाक्रा नांगल धरण, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई महापालिका भवन तसेच मुंबई ट्रान्सहार्बर लिंक अश्या अनेक प्रसिद्ध पर्यटन व प्रकल्प स्थळांना भेटी देताना शिकाऊ अभियंत्यांना देशातील जुन्या जाणत्या अभियंत्याची कौशल्यपूर्ण व आदर्श कामगिरी लक्षात येईल त्याचप्रमाणे आपल्या देशाविषयी असणारा अभिमान नक्कीच द्विगुणीत होईल.

देशातील पर्यटन स्थळासह जगप्रसिद्ध पिरॅमिड ऑफ गिजा, चिनची भिंत, इटलीतील पिसाचा झुकलेला मनोरा, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी, मरिना सिटी, बुर्ज अल अरब, मिरॅकल गार्डन, युरो टनेल, हुव्हर डम, निसर्गाशी जवळीक साधणार मिलर हाउस, सी एन टॅावर, बगदाद-एकेकाळची स्मार्ट सिटी, क्लॅालांलपूरची एल आर टी, गगनचुंबी पेट्रोनास टॅावर, मिलाऊ-सर्वात उंच दरी पुल, बुर्ज खलिफा इत्यादी स्थळांना शैक्षणिक सहलीच्या माध्यमातून पर्यटन केले तर खरोखरच स्थापत्य अभियंत्यांना आपल्या करीयरसाठी निवडलेल्या स्थापत्य शाखेचा नक्कीच अभिमान वाटेल आणि त्याच्या अंगात एक जागतिक पातळीचा उच्च प्रतिचा व चांगल्या प्रतिमेचा अभियंता मुळांपासून रूजण्यास अतिशय मोठा हातभार लागेल. भारतातील तसेच जागतिक पातळीवरील सर्वोत्तम पर्यटन स्थळांची निर्मिती म्हणजे प्राचीन व आधुनिक काळातील बांधकाम क्षेत्रातील चमत्कारीक आश्चर्येच आहेत आणि याचा शिकाऊ अभियंत्यांना नक्कीच हेवा वाटेल.

जगप्रसिद्ध स्मारके तसेच उच्चतम प्रतिच्या सुविधा उभारण्यामागे नेमकी कोणती गृहितके मांडली असतील किंवा ती पर्यटन स्थळे निर्माण करण्यामागे कोणती उमेद व प्रेरणा असेल याची शिकाऊ अभियंत्यांना चौकशी करण्यासाठी चालना मिळेल आणि त्या चौकशीतून स्थापत्य शास्राची व्याप्ती तसेच सविस्तर शास्त्रीय माहितीचा चांगलाच उलगडा होईल आणि त्या सर्व माहितीचा तसेच शैक्षणिक पर्यटनाचा उपयोग रूक्ष वाटणाऱ्या बांधकाम शास्राला जिवंतपणा नक्कीच प्राप्त करून देईल. भारत देशासह जागतिक किर्तीची पर्यटन स्थळे बांधण्यासाठी हजारो लाखो हात राबले असतील. ती कामे किती वर्षे चालली असतील? त्या नियोजित प्रकल्पाची अंदाजीत किंमत किती असेल? आणि त्याच्याही पलिकडे ती पर्यटन स्थळे बांधण्यासाठी स्थापत्य क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ञांनी तसेच जागतिक किर्तीच्या कलाकारांनी आणि सल्लागारांनी आपले संबधित विषयाचे ज्ञाण कौशल्य व कल्पनाशक्ती कशी व कोणत्या प्रकारे वापरली असेल यांची इत्यंभूत माहिती इंटरनेटच्या तसेच अनेक पुस्तकांच्या माध्यमातून शिकाऊ अभियंत्यांना नक्कीच मिळवता येईल आणि जगभरातील अभियंत्याचा या स्थळांकडे पाहण्याचा दृष्टीकोनच बदलेल आणि त्याबरोबरच त्या वास्तूंचे पर्यटन महत्व वाढवेल.

भारतातील स्टॅच्यू ऑफ युनिटी या जगातील सर्वात उंच पुतळ्याची एकुण उंची १८२ मीटर असून त्याचा पाया २५ मीटर व पुतळा १६७ मीटर उंच आहे. प्रकल्पाची नियोजीत किंमत २२३२ कोटी रुपये इतकी होती पण पुतळ्याचे काम पूर्णत्वाला जाईपर्यंत अनेक आकस्मित अडथळ्यामुळे त्या प्रकल्पाचा खर्च रूपये ३००० कोटी इतका झाला या निरीक्षणावरून अंदाजित खर्च का वाढला ? याची तांत्रिक शहानिशा शिकाऊ अभियंते करतील आणि भविष्यात अनेक प्रतिष्ठित बांधकाम प्रकल्प फक्त आणि फक्त अंदाजित खर्चामध्ये कसा व्यवस्थित साकारायचा याचे ज्ञान शिकाऊ अभियंत्यांना पर्यटन स्थळांना तसेच अनेक प्रकल्प स्थळांना भेटी दिल्यानंतर नक्कीच लक्षात येईल आणि या अचुक ज्ञानाचा फायदा शासकीय पातळीवर साकारणाऱ्या अनेक प्रकल्पांना मिळेल.

देशासह जागतिक प्रसिद्ध पर्यटन स्थळांना शैक्षणिक भेट दिल्यानंतर शिकाऊ अभियंत्यांना त्याठिकाणी त्या प्रकल्पाचे वास्तूरचनाकर, संरचनाकार, कंत्राटदार, सल्लागार स्थापत्य अभियंते, प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार, नामवंत शिल्पकार, भुगर्भ सल्लागार इत्यादी जागतिक किर्तीच्या तज्ञांची नावे व माहिती मिळेल आणि कदाचित अश्या जागतिक किर्तीच्या स्थापत्य सल्लागारांचा आदर्श त्यांच्या अंर्तमनात कायमचा रुजेल आणि त्याचा उपयोग शिकाऊ अभियंत्यांना त्याच्या भावी व्यावसायिक जीवनात मिळेल.

जागतिक किर्तीचे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी बांधकाम साहित्य तसेच अनेक प्रकारचे मनुष्य बळ लागते. स्टॅच्यू ऑफ युनिटी हा प्रकल्प बांधताना जवळपास २५०० ते ३००० जनांचा हातभार लागलेला आहे. जागतिक किर्तीची पर्यटन स्थळे बांधताना अनेक प्रकारची नैसर्गिक व मनुष्य निर्मित अवघड आव्हाणे येत असतात आणि अशी अवघड आव्हाणे कश्या प्रकारे पेलायची आणि आव्हांणाना तांत्रिक पध्दतीने सामोरे जाऊन प्रकल्प नियोजित वेळेत कसा पुर्ण करायचा याची माहिती अभियंत्यांना मिळेल. स्टॅच्यू ऑफ युनिटी या स्मारकाचे वजन ६७००० मेट्रीक टन असल्यामुळे स्मारकाचा पाया जवळ जवळ २० मीटर खोल खोदला आहे, तसेच स्मारकाची उंची जास्त असल्यामुळे वारा व भुकंप इत्यादी नैसर्गिक आपत्तीपासून स्मारकाचे संरक्षण व्हावे यासाठी आवश्यक भुकंप विरोधी ताकद स्मारकात तयार करण्यासाठी योग्य व अचुक आर सी सी डिझाइन सादर करताना सल्लागारांनी आपले कौशल्य तसेच कल्पनाशक्ती पणाला लावलेली आहे याची पुर्ण कल्पना शिकाऊ अभियंत्यांना प्रकल्प भेटी दरम्यान येईल. या प्रकल्पासाठी जवळपास २२५०० मेट्रीक टन सिमेंट आणि १८५०० मेट्रीक टन लोखंड लागलेले आहे. त्याचप्रमाणे ह्या प्रकल्पासाठी सर्वात मजबूत व कणखर असे M 65 दर्जाचे कॉंक्रीट वापरले आहे, यावरूनच हे स्मारक भारताचे पोलादी पुरूष सरदार वल्लभभाई पटेलांचे आहे याचा उलगडा नक्कीच होईल.

स्टॅच्यू ऑफ युनिटी ह्या स्मारकाप्रमाणे अनेक प्रसिद्ध पर्यटन स्थळांची इत्यंभूत स्थापत्य व रंजक माहिती, त्याचे नियोजन, रचना, संरचना, बांधकाम तंत्रज्ञान तसेच व्यवस्थापन इत्यादी विषयाची शास्त्रीय माहिती शिकाऊ अभियंत्यांना पर्यटना दरम्यान खात्रीशीर मिळेल आणि या माहितीचा उपयोग त्यांना त्यांच्या व्यावसायिक जीवनात नक्कीच होईल. पर्यटन स्थळावरील पार्किंगव्यवस्था,पर्यटकांचे व्यवस्थापन, प्रसाधनगृहे, हॅाटेल व्यवस्था तसेच राहण्याची सुविधा, मार्केटींग करण्यासाठीच्या बाजारपेठा, आरोग्य व्यवस्था आणि पर्यटन स्थळांवरील लॅडस्केपींग व बागबगीचे इत्यादी प्रकल्पाची सुद्धा शिकाऊ अभियंत्यांना आगाऊ माहिती व ज्ञान मिळेल.

जागतिक पातळीवर स्थापत्य अभियंत्यांनी अहोरात्र मेहनत करून तसेच आपले पूर्ण कौशल्य व कल्पनाशक्तीपणाला लाऊन बांधकाम क्षेत्राची प्रगती केली आहे आणि ही प्रगती म्हणजेच बांधकाम क्षेत्राची गरूड झेप आहे. यातूनच नवीन शिकाऊ अभियंत्यांना नवीन प्रेरणा, कल्पनाशक्ती व उमेद मिळेल आणि भविष्यात आपल्या देशाचे नाव उच्चतम पातळीवर पोहचविण्यास मदत होईल यात तिळ मात्र देखील शंखा नाही,यासाठीच महाविद्यालयांनी, शैक्षणिक संस्थानी, प्राध्यापकांनी , बांधकाम क्षेत्रातील अग्रगण्य व्यावसायिकांनी तसेच समाजातील प्रतिष्ठीत व्यक्तींनी शैक्षणिक पर्यटनाच्या माध्यमातून महाविद्यालयातील शिकाऊ अभियंत्यांना त्यांच्या विषयांना अनुसरून उपलब्द असलेल्या पर्यटन स्थळांची सफर घडवून आणावी आणि विद्यार्थ्यांना बांधकाम शास्राच्या आश्चर्यजनक विविध प्रकल्प स्थळांच्या शास्त्रीय माहितीचा ग्रंथ उपलब्द करून पर्यटनातून शिक्षण आणि अभ्यास ह्या नव्या शैक्षणिक प्रणालीचा नवा अध्याय विद्यार्थ्यांना उपलब्द करण्याची व्यवस्था लवकरात लवकर आमलात आणावी. पर्यटनाच्या आनंद, सुख व प्रेरणा या तिहेरी फायद्यासह पर्यटक स्थापत्य अभियंत्यांना स्थापत्य शिक्षनाचा सुध्दा लाभ मिळेल.

Related posts

कळंबा तलाव ओव्हर फ्लो…

अनुवादाचे सांस्कृतिक महत्त्व

जयपूरचा ऐतिहासिक ठेवा…

Leave a Comment