पाणीही ज्याच्याशी संगती करते त्यात चैतन्य निर्माण करते. पेशीमध्ये फुगीरपणा आणते. पाणी आहे तोपर्यंत पेशीत जिवंतपणा राहतो. पाणी गेले की त्यातील जिवंतपणा नाहीसा होतो. शरीर हे या पेशींनीच तयार झाले आहे. यातील पाण्याचे कार्य ओळखायला हवे.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406
जैसें जीवनचि उदक । परी विषीं होय मारक ।
कां मिरयामांजीं तीख । ऊंसी गोड ।। 68 ।। ज्ञानेश्वरी अध्याय 17 वा
ओवीचा अर्थ – ज्याप्रमाणे पाणी हे स्वभावतः जगविणारेच आहे, पंरतु ते विषाशी युक्त झाले असता तें मारक होते. अथवा मिऱ्याशी युक्त झाले असता तिखट होते व उसाशी युक्त झाले असता गोड होते.
पाण्याशिवाय जीवसृष्टी जगूच शकत नाही. पाणी नाहीतर जीवच नाही. पृथ्वीवर पाणी आहे म्हणूनच तर तेथे जीवसृष्टी आहे. इतरत्र कोठेही पाणी नाही त्यामुळे इतर कोणत्याही ग्रहावर जीवसृष्टी नाही. पृथ्वीवर 70 टक्के भाग हा पाण्याने व्यापला आहे. पण हे सर्वच पाणी पिण्यायोग्य नाही. तसे असते तर शुद्ध पाण्याची टंचाई भासली नसती. समुद्राचे पाणी खारट आहे. ते आपण तोंडातही घेऊ शकत नाही. पण हा सागरच शुद्ध पाण्याचा पुरवठा करतो. सागरातील पाण्याचे बाष्पीभवन होते व तेच पाणी जमिनीवर पडते. ते शुद्ध असते. पाणी शुद्ध करण्याची ही नैसर्गिक पद्धती आहे. या नैसर्गिक प्रक्रियेमुळेच आज मानव जात जिवंत आहे. इतर जिवांना शुद्ध पाणी लागतेच असे नाही.
सागराच्या पोटातही अनेक जीव आहेत. ते कसे जगतात. त्याला तेच पाणी लागते. ते शुद्ध पाण्यात जगू शकत नाहीत. मानवास मात्र शुद्ध पाणी लागते. ही शुद्धता टिकवणे हे मानवाचे कर्तव्य आहे. पाण्यात मीठ मिसळले की ते खारट होते. तिखटात पाणी मिसळले की त्याची चव तिखट होते. पाण्यात साखर मिसळली की गोड होते. सर्वच ठिकाणी एकच पाणी आहे पण ज्या त्या पदार्थानुसार त्याची चव बदलली आहे. कारण शुद्ध पाण्याचा पीएच सात आहे. न्यूट्रल आहे. तो चवहीन आहे. आत्मा हासुद्धा चवहीन आहे. त्याला चव नाही. त्याला वास नाही.
आत्मा हा देहात आल्याने त्या देहानुसार तो दिसतो आहे. चिडक्या माणसाचा आत्मा चिडका वाटतो. शांत माणसाचा आत्मा शांत वाटतो. खेळकर माणसाचा आत्मा खेळकर वाटतो. माणसाच्या स्वभावानुसार त्याचा आत्मा तसा वाटतो. प्रत्यक्षात आत्मा हा एकच आहे. तो ज्या देहात मिसळला तसा त्याचा स्वभाव झाला असे भासते. प्रत्यक्षात हा आत्म्याचा स्वभाव नाही त्या देहाचा स्वभाव आहे. मिरची तिखट आहे. हा मिरचीचा गुणधर्म आहे. पाणी हे बेचवच आहे. मिरचीमध्ये मिसळल्याने ते तिखट वाटते. विषासोबत मिसळल्याने ते विषारी वाटते. प्रत्यक्षात त्याचे कार्य विषारी नाही. संगतीनुसार त्याचे कार्य बदलते. यासाठी संगत कोणाची करावी? संगत सर्वांशी करावी पण त्याच्यात मिसळू नये. तो वेगळा आहे, हे जाणावे.
तो स्वतंत्र आहे. हे जाणावे. देहात आत्मा आला आहे. तो देहापासून वेगळा आहे. आत्मा जसे देहात चैतन्य निर्माण करते. तसे पाणीही ज्याच्याशी संगती करते त्यात चैतन्य निर्माण करते. पेशीमध्ये फुगीरपणा आणते. पाणी आहे तोपर्यंत पेशीत जिवंतपणा राहतो. पाणी गेले की त्यातील जिवंतपणा नाहीसा होतो. शरीर हे या पेशींनीच तयार झाले आहे. यातील पाण्याचे कार्य ओळखायला हवे. शरीराला शुद्ध पाण्याची गरज असते. ही शुद्धता टिकवण्यासाठी प्रयत्न हवेत. जीवनातील पाण्याचे महत्त्व ओळखून पाण्याचे व्यवस्थापन करण्याची गरज आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.