February 5, 2023
Concentration on Bramha article by rajendra ghorpade
Home » ब्रह्माशी ऐक्य साधन्यासाठी…
विश्वाचे आर्त

ब्रह्माशी ऐक्य साधन्यासाठी…

साधनेला बसल्यानंतर असे व्यत्यय, अस्थिरता ही वारंवार येत असते. पण आपण साधनेला का बसलो आहोत ? कशासाठी आपण साधना करत आहोत ? याचा विचार करून आपण आपले साध्य गाठण्यासाठी मनाला त्याकडे ओढायचे असते. म्हणजेच मन साधनेत रमवण्याचा प्रयत्न करायचा असतो.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406

पैं स्वरुपसमरसें । तयाही गा जालें तैसें ।
तेथ किंधर्म हें कैसें । तेणे देह ।। 314 ।। ज्ञानेश्वरी अध्याय 14 वा

ओवीचा अर्थ – अर्जुना, ब्रह्माशी ऐक्य पावल्यामुळे त्या पुरूषाचिही तशी स्थिती झाली आहे. तशा स्थितीत देहाचे धर्म काय आहेत व देह कसा आहे हे तो जाणत नाही.

मी ब्रह्म आहे. ही ओळख झाल्यानंतर तसेच ब्रह्माशी ऐक्य पावल्यानंतर विचारात अनेक बदल घडतात. साधना करताना आपणाला अनेक वेदना होत असतात. सारखी चलबिचलता सुरु असते. कधी मन भरकटते. तर कधी देहाला वेदना होतात त्यामुळे मनाची स्थिरता ढळते. पण साधनेतून आपण असमाधानी व्हायचे नसते. असे व्यत्यय हे नित्य येतच असतात. यातूनच मनाचा समतोल राखायचा असतो. मनाला राग येणार नाही. द्वेषाचा विचार मनात उत्पन्न होणार नाही. याची काळजी घ्यायची असते. यासाठी पुन्हा पुन्हा मन साधनेवर केंद्रित करायचे असते. मन साधनेत रमवायचे असते. सोहमचा स्वर मनात विचार साठवायचा असतो.

साधनेला बसल्यानंतर असे व्यत्यय, अस्थिरता ही वारंवार येत असते. पण आपण साधनेला का बसलो आहोत ? कशासाठी आपण साधना करत आहोत ? याचा विचार करून आपण आपले साध्य गाठण्यासाठी मनाला त्याकडे ओढायचे असते. म्हणजेच मन साधनेत रमवण्याचा प्रयत्न करायचा असतो. दृढनिश्चयाने साधना करायची असते. साधनेत मन गुंतवण्याचा वारंवार प्रयत्न करायचा असतो. मन तेथून हटणार नाही यासाठी मनाने शरीरात होणाऱ्या हालचालींवर लक्ष द्यायचे असते. होणाऱ्या वेदना सहन करत मन पुढे नेण्याचा प्रयत्न करायचा असतो. वेदनेच्या ठिकाणी मन न गुंतवता पुढे जायचे असते.

मस्तकापासून पायाच्या बोटांपर्यंत मन शरीराच्या प्रत्येक भागातून फिरवायचे असते. तेथून पुन्हा मस्तकापर्यंत यायचे असते. शरीरात होणाऱ्या वेदना सहन करत मन त्यात न गुंतवता मनाला त्याची सवय लावायची असते. मनाच्या या क्रियेतून मनाची एकाग्रता वाढते. मन वेदनेत न गुंतता साधनेकडे वळते. म्हणजेच देहाच्या होणाऱ्या वेदनातून मन बाहेर पडते. म्हणजेच देह कसा आहे याची जाणिव त्याला राहात नाही. हळूहळू ही क्रिया होत असताना ते ब्रह्माशी एकरूप होऊन जाते.

देहाला वेदना होत असूनही त्या जाणवत नाहीत किंवा मन त्यात गुंतत नाही. मनातून या वेदना निघून गेल्याने देहाला तो जाणतच नाही. केवळ मी ब्रह्म आहे हा विचार त्याच्या मनात दृढ होतो. खऱ्या अर्थाने त्याला स्वरुपाची ओळख होते. स्वरुपाशी त्याचे ऐक्य होते. मठ फुटल्यावर मठातील आकाश मुळ आकाशाही एकरूप होते तसे तो त्या स्वरुपाशी एकरूप होऊन जातो. स्वरुपाची ओळख झाल्यानंतर मनातील सर्व दैत्व दूर होते. स्वरूपाची ओेळख करून घेण्याचा प्रयत्न साधनेत नित्य करायला हवा. ही ओळख एकदा झाली की पुन्हा त्याचा विसर पडत नाही. आत्मज्ञानाच्या अनुभुतीतूनच ब्रह्मसंपन्नता प्राप्त होते.

Related posts

मनशुद्धी कशाने होते ?

प्रेमात सन्मानाची अपेक्षा कशाला ?

मनुष्यजातीच्या स्वभावातच भक्ती !

Leave a Comment