काहून कवितासंग्रह गावच्या शेतीच्या मातीकडे घेऊन जातो. माझ्यासारख्या निमशहरी माणसाला पुन्हा त्या जगण्याची आठवण करून देतो. परिसाच्या शोधात शहरात आलेल्या माझ्यासारख्याला सुद्धा वाटू लागायला लागतं कि गावची मातीच बरी होती. जे आपल्याकडे आहे ते सोडून उगाच आपण मृगजळाच्या शोधात भरकटत चाललो आहोत का ?
निलेश देशमुख
संस्थापक- शाळा फाउंडेशन
शैक्षणिक समुपदेशक, व्याख्याते, कवी, गझलकार, लेखक
‘काहून'(वऱ्हाडी बोलीभाषा)…मनात काहूर निर्माण करणारा..
कविता संग्रह हातात पडला आणि कवी रवींद्र दळवींनी या कविता संग्रहाला प्रश्नार्थक नाव का दिले असेल याची उत्सुकता लागली. मुळात कवी मूळ विदर्भातील, त्यांचे बालपण वऱ्हाडच्या भूमितले, हि माती बालपणी जशी अंगाला लागलेली त्याचप्रमाणे बालपणातले संस्कार देखील याच मातीने दिले. त्यामुळे त्यांच्या कविता संग्रहातून वऱ्हाडाची भूमी डोळ्यासमोर जशीच्या तशी उभी करण्याची ताकद त्यांच्या लेखनात दिसून आली. काहून हा एक वऱ्हाडी शब्द आहे. यालाच आपण का बरं…? असं म्हणतो.
हा शब्द वऱ्हाडीबोलीभाषेत दोन अर्थाने वापरला जातो जसे, असं का बरं? किंवा एखाद्याची झालेली फजीती पाहूनही आपण, काहून….घेन्न वं. अश्या प्रकारची खोचक प्रतिक्रीयाही आपसूकपणे येणे हे बोलीभाषेत नैसर्गिकरीत्या घडते. या काव्यसंग्रहातील कविता वाचताना कवी शेतकऱ्याच्या, कष्टकऱ्याच्या शहरी आणि ग्रामीण जीवनाच्या व्यथा मांडताना दिसतो. कवी बऱ्याच कवितांमधून समुपदेशकाची भूमिका निभावतांना प्रकर्षाने जाणवतो. कास्तकाराचे जीवन मांडताना, नव्या पिढीतील शेतकऱ्याचा मुलगा वडीलाना सांगतो आहे, यात कवीने सुरुवात करतानाच ‘कालचा बाबू’ अशी केली आहे आणि खरा अर्थ यातच अंतर्भूत आहे. वऱ्हाडात ‘बाबू’ हे मुलांच सर्वसामान्य संबोधन असून बाबू हे लहान मुलासह घरातील कर्त्या मोठ्या मुलालाही म्हटले जाते. म्हणजे ज्याला आपण कालपर्यंत बाबू बाबू म्हणून लहान समजत होतो तो बाबू आता मोठा झाला आहे आणि तो मोठा होत असताना संपूर्ण परिवाराची एका पिढीपासून दूसऱ्या पिढिपर्यत शेतीत झालेली पडझड, परंपरागत शेती व्यवसायाची झालेली वाताहात पाहून आता तो शहाणा झाला आहे.आणि तो ठामपणे सांगतो आहे की,
‘कालचा बाबू आज आयकत नाही बापाचं
रोज सांगते मले कास्तकार नाही बनाचं
शेती बद्दल नव्या पिढीत एवढे नैराश्य का बरं आले असावे असा प्रश्न कवीला पडणे सहाजिक आहे. पुढे याचे उत्तरही कवी द्यायला विसरत नाही, कारण परिवारासह स्वत:च्या भविष्या बध्दलही चिंतीत असल्यामुळे तो म्हणतो;
‘असं नाई वं बाबा का मले समजत नाई
मेयनतीले तं तुमच्या जगात तोळ नाई
पन या घरादासाठी आता मले बाहीर पळाचं’
शेतीच्या दुरावस्थेच्या परिणानामाची व्याप्ती कवी ‘वावर’ या कवितेत आपल्या गहन शब्दसामर्थ्याने कारभारणीच्या सौभाग्याचं लेणं असलेल्या दागीण्या पर्यंत नेउन ठेवतो, तेव्हा त्यातील दाहकता वाचकाला अस्वस्थ केल्याशीवाय राहत नाही.
‘कस्यी येत नाई माह्यी दयामया वावराले
दरसाल लावते नजर फुटक्या मन्याले’ (वावर)
शेतकरी नेहमी दिवाळीला शहाणा होतो असं म्हणतात. त्याप्रमाणे तो दरवर्षी शेतातील माल निघाल्यावर म्हणत असतो, आता पुढल्या वर्षी हे करू, ते करू पण शेवटी काहीही केलं तरी त्याच्या नशिबात निराशाच येते आणि म्हणून या वेळी तो या ना त्या नावाने कुणाला तरी दोषी ठरवून कुटूंबासमोर वेळ निभाऊन नेतो. एका कवितेत तर कवी थेट मातीलाच नाकारतो आहे आणि आता तुझं माझ्याकडून काही करणं शक्यच होणार नाही अश्या भूमिकेत जातो, पण मग मातीला नाकारून करणार काय ? हा प्रश्न लगेच उभा राहतो.पुढे कवी ‘सांगून टाकनं बे’ या कवितेतून खरं आव्हान उभं करतो;
‘बदलामी कराच्या आंदी
दाखोनं तुह्यी हिम्मत माती बगर जगाची,
मंग सांगजो मले ताटातली भाकर
मॉलातली का मातीतली’?
याच मातीने जगवलं याच मातीने आजपर्यंत तारलं आहे. आणि जर तू मातीलाच दोष देत असेल तर या मातीविना जगण्याची धमक तू दाखव आणि सिध्द कर या मातीविना तुझं माझं सर्वांच जगणं.
‘काहून’ हा कवितासंग्रह फक्त शेती मातीचाच ठाव घेतो असं नाही तर कवीच्या मनातील हि ओल अगदी खोलपर्यंत जाऊन अनेक विचारांना जन्म देते. फेरफारीच्या नादाने स्वार्थापायी नात्यातील होत चाललेल्या दुराव्याचा अगदी अचूकपणे थेट काळजाचा ठाव घेतो.
‘फेरफारीच्या नादानं इसरू नोको नात्याले
जिव्हायाचा वास येत नसते रे कागदाले'(फेरफार)
यातच ‘दमकोंडी’ या कवितेतून तर प्रत्यक्ष ओस पडलेल्या पंढरीची स्थिती मांडताना एक विषाणू माणसासह देवालाही कैद करू शकतो याची जाणीव करून देतो. आणि पुढे यातूनच कार्तिकीच्या वारी पर्यंत हे भावभक्तीचे रिंगण पुन्हा सजू दे असा आशावादही कवी व्यक्त करतो. कारण ;
‘वारी नोती रे नुसती
अखाडीची येरझारं
जिवा-शिवाच्या भेटीची
सुगी पुरे सालभरं’
हीच विचारांची ओल, कवीच्या ‘वल’ या कवितेत गावाकडच्या मातीत विरून त्या मातीच्या वासाने नाकाला झिणझिण्या आणते याचा थेट प्रत्येय जीवनाशी येतो. आणि आयुष्याच्या भिंतीला लागलेली ओल अजूनही जात नाही आणि आयुष्याचे निघणारे पापोडे सरत नाही. गाव वेशीच्या गढ्या फक्त आता लीलावापुरत्या शिल्लक राहिल्या आहेत.
‘कवलाची शिरीमंती
खापरखुंड्या सांगते
गढीच्या मातीची पत
हर्राशीत खपते'(वल)
हे वास्तव नाकारता येणार नाही. गढीची माती विकून जीवन जगण्याची वेळ गावाकडच्या माणसांवर का आली असावी ‘काहून’ हा प्रश्न कवीच्या संवेदनशील मनाला पडणे साहजिक आहे.
परस्परातील संवाद सुसंवाद न ठरता जेव्हा त्याचे रुपांतर वितंडवादात होते तेव्हा कवी आत्यंतीक जिव्हाळ्याने आपल्या ‘बोल’ या कवितेतून मार्मिक भाष्य करतो; विशेष म्हणजे हि कविता वाचल्यावर मनाला पटते, अरे हो काळजी तर घ्यायला हवी होती.पण मग का नाही घेत पुन्हा ‘काहून’
येखांदा बोल अस्सा झोंबते मनाले
काई केल्या मन जुमानत नाई कोनाले
समजावनारे समजावतात
आपापल्या परीनं
पानी मातर वाह्यतं
आपल्याच दांडानं
रुजवातीच्या दाव्यानं
दमपूस होते जीव
भल्याभल्या दाखल्याची
करत नाई किव
बोल असा बोला
का साधाला जावा तोल
ल्हानसान बोलाचई
वाळून जावं मोल
बोलाच्या पयले
‘काहून ‘इच्यार नसन करत
फुकटातते शब्द मंग
इकतात घ्याले ‘काहून’
तरसत असन ….(बोल)
‘तन्नावा’ या कवितेत तर कवी एका बाजेच्या रुपकातून जीवनाचे तत्वज्ञान मांडून, वाडवडीलांकडून झालेले संस्कार शिस्त हे आपले संचित मानून पुढे जीवनाला मिळालेल्या आकार (तन्नाव्यामुळे) गढूळ वातावरणातही आपला विवेक जागृत ठेवण्यात मोलाची भुमिका बजावत असल्यामुळे तर आपणास भटकू देत नाही..
‘बाज इनतानी बाप माहा
सांगे हमेशा बात
ढील्ली राह्यली दोरी तं
हालते म्हने गात’
तन्नावून तन्नावू दुखे माह्या हात
तरी बुडा सोळे नाई इनल्या बगर खाट
म्हने … जीनगानी नसते बाबू
वदरवदरची नुसती भादरभादर
मोळून पळ्ळा ठावा का
फाटून जाते चादर
आत्ता आलं ध्यानात माह्या
तन्नावाचं गनित
तन्नावल्या बगर त
उजयत नाई सुदीक
बात जरी करे बाजीची
तरी करे रोखठोक
अशीच नाई बाज भाऊ
टिके मरेलोक …
अंधश्रद्धेवर आणि याच्या नावाखाली मुक्या जीवाचा जाणारा बळी ‘गोटेपुरान’ या कवितेमधून कवी आसूड ओढतांना दिसतो. यातून संत गाडगेबाबांच्या विचारांचा वसा आजही कवीच्या मनाला शिऊन जातो. एक गोटा कुठेतरी गावच्या पांदनीत निवांत पडलेला असताना उगाच त्याला कुणीतरी शेंदूर फासला आणि जीवन आणखी किचकट आणि दमकोंडी होईल असं उगाच बनवलं. यातून देवपण आलेल्या दगडाला देखील हे जीवन नकोसे झाले आहे असं दिसतं. पण कदाचित हे मांडताना कवीने जरी दगडाचा आणि देवाचा संदर्भ घेतला असेल तरी कवी यातून आजच्या समाजजीवनाची सर्वच क्षेत्रात चाललेली परफट मांडतो कि काय असं जाणवते. आपलं माणसाचं जीवन देखील या शेंदूर फासलेल्या दगडासारखं झालं आहे. अज्ञानी माणूस नेहमी सुखी असतो, जसा जसा तो वैचारिक आणि संवेदनशील होत जातो तेंव्हा त्याची अवस्था त्या दगडासारखी होत जाते, साहित्यातही असचं होत असेल का.? उगाच मिळणारे पुरस्कार,ठरवून घेतलेले पारितोषिक, आणि व्यासपीठावरचे हार तुरे त्या शेंदुरासारखे तर नसावे? मग यातून आपण पूर्वी जे लिहायचो, जगायचो, जे जीवन लेखणीतून मांडायचो ते कितीतरी निखळ होते. असं तर कवीला म्हणायचे नसेल?
यात मला कायम आवडणारी कविता अर्थात ‘शयरवासीन’, हि कविता वाचण्यापेक्षा ऐकण्याची मजा निराळीच. एखाद्या खेड्यातील गावगाड्यातील मुलगी जेंव्हा लग्न होऊन शहरात येते तेंव्हा तिला माहेरची आठवण तिथल्या संस्कृतीची आठवण येते आणि मापाने दुध मोजून घेणारी ती शहरात आलेली मुलगी म्हणते,
‘माह्या माहेरच्या दारी उभ्या खंडीभर गाई,
दूद-दुभत्याची कोना काई नवाईचं नाई.
इथं शयरात बापा नीरा ज्याले त्याले घाई
इकताच्या थ्या दह्याले रई लागताच नाई’
खरं म्हणजे मुलगी सुखात रहावी म्हणून शहरात दिली. पण गावाकडची सर या शहराले नाही याचे वास्तव हि कविता त्याच ताकतीने दाखवून देते.
दुसरीकडे गावही आता पुर्वीचे गाव राहीले नसल्याची खंत,कवी पुढी ओळीतून मांडतो.
‘हारपली मानूसकी मानसं झाली फरार
हारोल्या गावाची आता कुठ लिहू तकरार’
काहून या कविता संग्रहातील एकुण चार भागात (आखर, दमकोंडी, तरास,संचित) विभागलेल्या अश्या एक ना अनेक कविता आपले स्वतःचे एक वेगळे अस्तीत्व निर्माण करतात. प्रत्येक कवितेची एक वेगळी छबी आहे. बोलीभाषेतील कवितेत अभावाने आढळणारा मुक्तछंद हा प्रकार त्याच्या उत्कट परिणामासह लयीत साकारताना दिसतो. अनेक ठिकाणी कवितेत जाणीवपुर्वक केलेले भाषीक प्रयोग, हे बोलीभाषा जतन करण्याचे काम करतात. वऱ्हाडीबोलीभाषेत बोलताना शब्दयुग्मकांचा नैसर्गिक वापर ते तितक्याच स्वाभाविकपणे अस्सल वऱ्हाडी बाज राखत आपल्या ‘जानूनबुजून कवितागिविता’ या कवितेत करतात.
आता हेच पाह्यनं
नटूनथटून चळली होती ना रे तूर यंदा
उदीमाच्या बोहल्यावर
अवकान्यानं वतलाना इस्तूगिस्तू
भरोश्याच्या फुलागिलाईवर
ओयखीपायखीनं बांदाले पुरत नाई रे भाऊ
इमान अलत्याभलत्याच्या दावनीले
जोळजाळीचा खुराक मानतगिनत नसते
कवितागिविताईच्या तब्येतीगिब्येतीले
यातून वाचकाला कवितेची वेगळीच अनुभूती देवून जाते. अभंग, अष्टाक्षरी या प्रकारातही अनेक विषयांच्या खोलात शिरून बोलीभाषेचं शाब्दीक सामर्थ प्रत्ययास येते. आजकाल कविता संग्रहाला अपवादाने आढळणारी प्रा. डॉ. सुनिल पखाले यांची दीर्घ प्रस्तावना आणि शेवटी दिलेले वऱ्हाडीतील शब्दार्थ, वऱ्हाडा बाहेरील वाचकाला कवितेच्या जवळ घेऊन जातात. हे एक वेगळे वैशिष्ट्य म्हणावे. प्रख्यात चित्रकार साहित्यिक मा. सुनील यावलीकरांचे मुखपृष्ठ हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय होवू शकतो इतके ते प्रत्ययकारी आहे. तांत्रिक दृष्टया अंतरंगातील सजावट मांडणी छपाई संग्रहाच्या श्रिमंतीत भर घालते. ख्यातनाम वऱ्हाडी साहित्यिक पुष्पराज गावंडे यांची घागर मे सागर अशी काव्यात्मक पाठराखण तर संग्रहाची जमेची बाजू म्हणता येईल.
काहून कवितासंग्रह गावच्या शेतीच्या मातीकडे घेऊन जातो. माझ्यासारख्या निमशहरी माणसाला पुन्हा त्या जगण्याची आठवण करून देतो. परिसाच्या शोधात शहरात आलेल्या माझ्यासारख्याला सुद्धा वाटू लागायला लागतं कि गावची मातीच बरी होती. जे आपल्याकडे आहे ते सोडून उगाच आपण मृगजळाच्या शोधात भरकटत चाललो आहोत का?
अगदी संग्रहाला साजेसं असं बोलकं मुखपृष्ठ पाहून, पुन्हा त्या हिरव्या आमराईत जायची अनावर ओढ निर्माण होते. पण ती आमराई अजूनही तशीच पहिल्यासारखी राहिली असेल का? कि ती देखील बदलत्या काळात सभोवताल वाळलेल्या शुष्क गवतासारखी झाली असेल आपल्यासारखीच? स्वतःच्या मनात ‘काहूर’ निर्माण करणारा ‘काहून’ हा संग्रह एक ना अनेक प्रश्न मनाला विचारायला भाग पडतो. आणि मग स्वत:चं मनच मनाला विचारायला लागतं “काहून” ज्यांची उत्तरे अनेक ठिकाणी कवी देण्याचा प्रयत्न करतो.काही उत्तरापर्यंत वाचकाला नेऊन ठेवतो.अंतर्मुख करून जाणीव जागृती करतो आणि काही ठिकाणी प्रश्न-उत्तरात, मुखपृष्ठातील झाडाखाली बसल्या प्रमाणे स्वत:त हरवून जातो आणि जे कविचं होतं तेच वाचकाचेही, हेच या संग्रहाचे बलस्थान म्हणावे….!
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.