अद्दल !
या जगात जशास तसं वागावं लागतं अन्यथा तुमचा निभाव लागणं कठीण असतं. आंबा विक्रेत्याच्या सुपीक डोक्यातून ग्राहकाला अद्दल घडविण्याची सुचलेली कल्पना भन्नाटच म्हणावी लागेल. कोकणातील माणसं ‘ इरसाल ’ असतात असं म्हणतात, ते काही उगाच नव्हे.जे. डी. पराडकर 9890086086
आपल्या मनाविरुद्ध अथवा अनपेक्षित असे काही घडले, तर समोरच्या व्यक्तीला धडा शिकवण्याचे विचार मनात येतात. संयम संपला की मनावर रागाचा जोर चढतो. अनेकदा आपण करतोय ती कृती बरोबर आहे अथवा नाही ? याचा विचारही केला जात नाही. एखाद्या व्यक्तीला अद्दल घडवायचे मनात आले, किती कृती पूर्ण होईपर्यंत मन स्वस्थ बसत नाही. अद्दल घडवण्याच्या निर्णयाप्रत व्यक्ती केव्हा पोहोचते ? याचाही विचार करणे खूप महत्त्वाचे असते. सातत्याने एखाद्या व्यक्तीला त्याची कोणतीही चुकी नसताना नाहक त्रास दिला गेला, तर अशी व्यक्ती समोरच्याचा बदला किंवा त्याला अद्दल घडवण्याच्या तयारीला लागते. मुद्दामहून एखाद्या व्यक्तीला त्रास देणे, हे देखील अयोग्य आहे. काही वेळा स्वभावाचा, परिस्थितीचा गैरफायदा उठवून त्रास दिला जातो. अशावेळी समोरची व्यक्ती हातबल असते. एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसाठी काही चांगले काम करीत असेल, तर ते समजून न घेता दुसऱ्या व्यक्तीने नाहक त्याची बदनामी केली, तर मग मनात अद्दल घडविण्याचे विचार येऊ लागतात. अर्थात संयम आणि सहनशक्ती संपली, की माणूस अशाच दुसऱ्या काहीतरी संकल्पनांचा आधार घेतो. सध्याच्या काळात तर, धडा शिकविणे, अद्दल घडवणे, बघून घेणे असे शब्द ऐकू येण्याचे प्रकार वारंवार घडत असतात. आज मी तुम्हाला ‘ अद्दल ’ या प्रक्रियेचा वापर करत एका आंबा व्यापाऱ्याने खोडसाळपणा करणाऱ्या ग्राहकाला कसा धडा शिकवला ? म्हणजेच कशी अद्दल घडवली याचा ऐकलेला एक किस्सा सांगणार आहे. मला तर या आंबा व्यापाऱ्याच्या प्रामाणिकपणाचे प्रथम कौतुक वाटले आणि नंतर त्याने ग्राहकाला जी अद्दल घडवली, ती ऐकून त्याच्या हुशारीला दाद द्यावीशी वाटली. हा किस्सा खूप वर्षांपूर्वी घडलेला आहे. तो ऐकल्यानंतर मात्र मला त्यावर लिहिल्याशिवाय चैन पडेना. एखाद्याच्या प्रामाणिकपणावर नाहक शिंतोडे उडवले, तर तो कोणत्या थराला जाऊ शकतो ? हेच मला यातून शिकायला मिळाले.
दुर्गम भागामध्ये राहणाऱ्या एका आंबा व्यापाऱ्याच्या बागेत २५ – ३० आंब्याची झाडे, पंधरा-वीस फणसाची झाडे, शंभर एक सुपारीची झाडे, काही केळी, कोकम अशा विविध प्रकारच्या फळ झाडांनी त्यांची बाग समृद्ध होती. नैसर्गिक स्त्रोतांचे उताराने आलेले पाणी या बागेला लावले जायचे. हंगामानुसार येणाऱ्या फळांवरच या कुटुंबाची गुजराण होई. घरची परिस्थिती श्रीमंत नसली, तरी खाऊन पिऊन सुखी होती. दाराजवळ दररोज दोन-तीन माणसं कामासाठी येत. सारं कुटुंब स्वभावानं तसे स्वाभिमानी. कोणाच्या आल्यात नाही कोणाच्या गेल्यात नाही. गावात या घराला मोठा मान असल्याने दररोज दारापुढे येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्या खूप मोठी होती. वेळेला घरात बारा – पंधरा माणसे जेवायला असत. घरातल्या माणसांचे स्वभाव वेगवेगळ्या पद्धतीचे. पुरुष वर्गात बरेचसे तामसी आणि कोपिष्ट म्हणून ओळखले जात. गोठ्यात सात आठ जनावरे होती. यातील निम्मी दुभती असल्याने घरात ताका – दह्याची, तुपाची चंगळ होती . शेती मुबलक असल्याने तांदळाचा प्रश्न नव्हता. भात पिका व्यतिरिक्त अन्य वेळी या शेतीमध्ये विविध प्रकारची कडधान्ये पालेभाज्या, भुईमूग अशा प्रकारची उत्पन्न घेतली जात. या दुर्गम गावातून बाजारपेठेत यायचे म्हणजे पायपीट करण्याशिवाय अन्य कोणताही पर्याय नव्हता. चार प्रकारच्या वस्तू विक्रीसाठी आणायच्या, तर त्या डोक्यावर ओझं घेऊन वाहतूक करतच आणाव्या लागत . यासाठी नेहमीच वाहतुकीसाठी सोबत एखादे गडी माणूस ठेवावे लागे.
बागेत असणारी आंब्याची झाडे, एक झाड वगळता एकापेक्षा एक मधुर चवीची होती. एकाच झाडाचा आंबा गंधाला अप्रतिम, रंग तर डोळ्यात भरेल असा, गंध घेताच खाण्याचा मोह व्हावा असा. मात्र जर किंचितसा जरी चोखला, तर हातातील आंबा खाली टाकून माणूस दूरवर पळत सुटेल इतकी चव आंबट ! माणूस जसा वरून दिसतो तसाच आतून असतो, असे नव्हे . मग फळांच्या बाबतीतही हा नियम लागू होतो. बागेत एका आंब्याची चव इतकी मधुर होती, की घरामध्ये असणारा एक वयोवृद्ध आणि स्वभावाने नाकझाड्या माणूस देखील या आंब्याची स्तुती करायचा. अशा स्वभावाच्या माणसानी एखाद्या गोष्टीवर शिक्कामोर्तब केले, तर ते प्रमाण मानले जाते. बागेतील या मधुर चवीच्या आंब्याला बाजारपेठेत मोठी मागणी असे. आंबे काढून झाले कि, ते कच्चे असल्याने त्याची अढी घालावी लागे. साधारण आंबा तयार झाला, की मग तो विक्रीसाठी नेला जायचा. घरापासून बाजारपेठ खूप दूर अंतरावर असल्याने टोपलीत आंबे घेऊन बरोबर एक माणूस घ्यावा लागे. एक दिवशी सकाळी बागेतील हा मधुर चवीचा आंबा अढीतून काढून टोपलीत भरला. त्यावर वरून टॉवेल टाकला गेला. सोबत असणाऱ्या माणसाच्या डोक्यावर आंब्याची ही टोपली दिली गेली. आंब्याची विक्री करण्यासाठी घर मालकांचा मुलगा सोबत होता. डोक्यावर टोपली घेतलेला माणूस पाहिला, की सहाजिकच याने काही विक्रीसाठी आणले आहे असा समज होऊन जायचा. दीड तासाची पायपीट करून गडी माणसासह मालकांचा मुलगा बाजारपेठेत दाखल झाला. त्याला पाहिल्यानंतरच अनेक जणांनी हाका मारून त्यांच्याकडून आंबे घेतले. आता टोपलीत शेवटचे ५० आंबे शिल्लक राहिले होते.
पेठेतून पुढे पुढे चालत असताना एका माणसाने त्यांना आंब्यासाठी हाक मारली. आंब्याचा वास घेऊन पाहिला, एवढेच नव्हे, तर एक आंबा स्वतः खाऊन चवीची खात्री केली . आंबा रायवळ असल्याने त्याचा दरही काही फार नव्हता. दराविषयीचे बोलणं झालं आणि सर्व ५० आंबे त्यांनी घेऊन टाकले. सोबत आणलेले सर्वच आंबे वेळेत संपल्याने उर्वरित कामे वेगाने आटोपून मालकांचा मुलगा गडी माणसांसह परत घरची वाट चालू लागला. त्याने शेवटी ५० आंबे घेतले होते, त्यांच्या मुलांनी आंब्याची चव मधुर असल्याने सर्व आंबे दोन दिवसातच फस्त केले. घरातील आंबे संपल्यामुळे हा ग्राहक आंबे विक्रेत्याला परत आंबे घेण्यासाठी शोधत होता. मात्र दोन चार दिवस हा आंबा व्यापारी बाजारपेठेकडे फिरकलेला नव्हता. चार दिवसानंतर आंबा व्यापाऱ्याची आणि त्या ग्राहकाची भेट झाली. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या आणि आज आंबे आणले नाहीत का ? असे त्यांनी विचारले. आंबे अढीत घातलेले आहेत, तयार झाले, की घेऊन येइन असे त्या आंबा विक्रेत्याने प्रामाणिकपणे सांगितले. यावर या आंबा विक्रेत्याच्या प्रामाणिकपणावर शिंतोडे उडविणारे विधान करत तो ग्राहक म्हणाला, चार दिवसापूर्वी तुझ्याकडून ५० आंबे घेतले. घरी नेले तर काय, मुलं आंबा तोंडात घेत, जरासा चोखत आणि आंबट लागला म्हणून फेकून देत. असे सर्वच्या सर्व आंबे नाईलाजाने फेकून द्यावे लागले. हे ऐकल्यानंतर सदर ग्राहक मुद्दामहून आपल्याजवळ खोटं बोलत असल्याबद्दल आंबा विक्रेत्याला खूप वाईट वाटले .
हा ग्राहक एवढ्यावरच न थांबता आंबा विक्रेत्याला म्हणाला, जर यापेक्षा मधुर चवीचा आंबा असेल, तर माझ्यासाठी १०० आंबे घेऊन ये. हे ऐकल्यानंतर या तरुण आंबा विक्रेत्याच्या डोक्यात ‘ अद्दल ’ हा शब्द घोळू लागला. बाजारपेठेतून परत घरी जात असताना प्रत्येक पाऊल टाकताना त्याच्या डोक्यात अद्दल या शब्दाची व्याप्ती वाढू लागली. आता काय करायचे ? याचे नियोजन त्याने आपल्या मनाशी पक्के केले. मधुर चवीचा आंबा दिल्यानंतर स्वतः त्याची चव घेऊन खात्री करुनच आंबे खरेदी केलेले असताना उगाचच फळाला नाव ठेवल्याबद्दल आता या माणसाला चांगला धडा शिकवायचा, असा पक्का निर्धार या तरुण आंबा विक्रेत्याने केला. दुसऱ्या दिवशी सकाळी बागेतील अन्य आंबे काढण्यासाठी गडी आला. त्याला दिवसभराच्या कामाचे नियोजन सांगितल्यानंतर, आधी या अत्यंत आंबट चवीच्या आंब्याचे शंभर आंबे काढण्याचे फर्मान त्याला मालकांच्या मुलाने सोडले. गडी म्हणाला , मी आंबे काढतो, पण हे आंबे घेणार कोण ? त्यावर एक छद्मी हास्य करत, मालकांचा मुलगा म्हणाला, त्याची काळजी तू नको करू. अत्यंत आंबट चवीच्या आंब्याचे १०० आंबे काढून झाल्यानंतर गडी त्या झाडावरून खाली उतरला. मालकाच्या मुलाने मग ते आंबे स्वच्छ धुतले आणि त्या सर्व आंब्यांची स्वतंत्र अढी घालून ठेवली. रंग उत्तम , गंध उत्तम , आकार उत्तम असणाऱ्या या अत्यंत आंबट चवीचे आंबे पिकण्याची वाट पाहत राहिला. पाच-सहा दिवस गेले आणि अढीतील या आंब्याने आपलं रूपडं पालटलं.
एक दिवशी सकाळी पिकलेले हे शंभर आंबे करंडी मध्ये भरले, त्यावर टॉवेल टाकून आंबा विक्रेता तरुण गड्याला घेऊन बाजारपेठेत दाखल झाला. आज आंब्याची मागणी ठरलेली असल्याने त्याने गेल्या वेळेला ज्या ग्राहकाला मधुर आंबा दिला होता त्याच्याकडे नेऊन सर्व आंबे दिले. या चोखंदळ ग्राहकाने करंडीतील एक आंबा उचलला आणि त्याचा रंग पाहून गंधासाठी नाकाला लावला. आकार, रंग आणि गंध सर्व काही उत्तम असल्याने गतवेळप्रमाणे चव न घेताच या ग्राहकाने सर्व आंबे घेऊन त्याचे ठरलेले मूल्य देखील देऊन टाकले. आज आपली मुले गेल्या वेळ प्रमाणे उत्तम आंबा खाणार या आनंदात त्या ग्राहकाने सर्व आंबे घरी नेले. आंबे पिकलेले असल्याने ते पाहताच घरातील सर्व मुलांनी त्यावर अक्षरशः धाड टाकली . आंब्याचा रंग पाहता क्षणी तो खावा असा असल्याने प्रत्येकाने हातात दोन दोन आंबे घेऊन ते चोखण्यास सुरुवात केली. मात्र काही क्षणातच एखादी इंगळी डसावी असा आरडा ओरड करत हातातील आंबे फेकून मुले तोंड धुवायला न्हाणी घराकडे धावली. हातात आंबा घेईपर्यंत सगळं काही व्यवस्थित होतं आणि अचानक मुलांना काय झालं ? याची खात्री करण्यासाठी पालकांनी मुलांकडे चौकशी केली. यावर मुलांचं एकच उत्तर होतं, आज आणलेला आंबा खाऊन पहा मग तुम्हाला कळेल. पालकांनी देखील खात्री करण्यासाठी एक आंबा चोखायला सुरुवात केली आणि त्यांची देखील मुलांसारखीच अवस्था झाली. एखादा पदार्थ आंबट किती असू शकतो ? याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा आंबा होता. गत वेळी मधुर चवीच्या आंब्याला आपण नाव ठेवली आणि खोटं बोललो म्हणून यावेळी आंबा विक्रेत्याने आपली खोड मोडली असल्याचे या ग्राहकाच्या चांगलेच लक्षात आले.
आठवडाभरानंतर हा तरुण आंबा विक्रेता काही कामानिमित्त बाजारपेठेत आला होता. मागील वेळी शंभर आंबे खरेदी करणाऱ्या ग्राहकाजवळ योगायोगाने त्याची भेट झाली. काहीसे तावातावाने या ग्राहकाने आंबा विक्रेत्याला फैलावर घ्यायला सुरुवात केली. ग्राहकाचे सर्व म्हणणे ऐकून घेतल्यानंतर शांतपणे आंबा विक्रेता म्हणाला, पहिल्यावेळी तुम्हाला आमच्या बागेतील सर्वात मधुर असणाऱ्या झाडाचे आंबे दिले होते. या फळा इतकी अप्रतिम चव आमच्या बागेतील अन्य आंब्याला नाही. आपण स्वतःही एक फळ खाऊन खात्री केली होती. असं असताना आपण, मुलं आंबा तोंडाला लावत आणि फेकून देत , असं खोटं सांगितलंत. आपण खोटं बोलताय, हे मला कळत होतं. मात्र आपल्याला अद्दल घडवण्यासाठी मी संधीची वाट पाहत होतो. आपण आणखी शंभर आंबे आणून दे असं सांगून, अद्दल घडविण्याची आयती संधी मला उपलब्ध करून दिलीत. त्यानंतर आमच्या बागेत सर्वाधिक आंबट असणाऱ्या झाडाची शंभर फळं मुद्दामून उतरवून मी आपल्याला आणून दिली. आपण जर सुरुवातीला खोटं बोलला नसतात, तर मी आपल्याला अशी अद्दल घडवली नसती, असे सांगण्याचे धाडस या आंबा विक्रेत्याने दाखवले. चांगल्याला नेहमी चांगले म्हणावे. आम्ही विक्रेते जरी गरजू असलो, तरी ग्राहकाच्या माथी कमी दर्जाचा अथवा घाणेरडा माल मारण्याची मानसिकता कधीही ठेवत नाही. यावेळी आपण माझ्याजवळ असे वागलात, परत दुसऱ्या जवळ असे कधीही वागू नका, असा धडा देण्याचा प्रयत्न मी माझ्या वागणुकीतून आपल्याला दिला आहे असेही या आंबा विक्रेत्याने या ग्राहकाला ठणकावून सांगितलं. अखेरीस मान खाली घालून हा ग्राहक पावले टाकीत पुढे निघून गेला आणि आंबा विक्रेता ताठ मानेने घराकडे परतला. या जगात जशास तसं वागावं लागतं अन्यथा तुमचा निभाव लागणं कठीण असतं. आंबा विक्रेत्याच्या सुपीक डोक्यातून ग्राहकाला अद्दल घडविण्याची सुचलेली कल्पना भन्नाटच म्हणावी लागेल. कोकणातील माणसं ‘ इरसाल ’ असतात असं म्हणतात, ते काही उगाच नव्हे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.