December 4, 2024
Agriculture during Mahabharata Indrajeet Bhalerao article
Home » महाभारतकालीन शेती
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

महाभारतकालीन शेती

॥ महाभारतकालीन शेती ॥

राजानं शेतकऱ्यांकडून कर रूपात उत्पन्नाच्या सहावा भाग घ्यावा. त्याशिवाय एक कवडीही घ्यायचा राजाला अधिकार नाही, असं महाभारताच्या शांतिपर्वातच सांगितलेलं आहे. गरजेनुसार शेतकऱ्याला कर्ज उपलब्ध करून देण्याची व्यवस्था त्या काळात राजाकडेच होती. त्यासाठी शेतकऱ्याला शेकडा एक रुपया महिना व्याजाने कर्ज दिले जात असे. अर्थातच त्या काळात आजच्यासारखे चलन नसल्यामुळे कर्जाचा शंभरावा भाग व्याज म्हणून दिला जात असे. इतक्या कमी व्याजात तेव्हा सावकाराकडून कर्ज मिळत नसे. त्यामुळे राजा देत असलेल्या या कर्जाला ‘सानुग्रह ऋण’ असा शब्द महाभारताच्या सभापर्वात वापरलेला आहे. जर शेतकरी हे ऋण परत करण्याइतका सक्षम नसेल तर राजा हे ऋण उदार अंतःकरणाने माफ करीत असे.

इंद्रजीत भालेराव

याआधी आपण वेदकाळातील शेतीविषयी सविस्तर विचार केला. आता आपण महाभारतकालीन शेतीचा विचार करूयात. रामायणाचाही साधारणतः हाच काळ समजला जातो. वेद आणि या महाकाव्यांच्या काळात चार-पाचशे वर्षाचं अंतर आहे. वेद साडेतीन हजार वर्षांपूर्वीचे तर ही महाकाव्य तिन हजार वर्षांपूर्वीची समजली जातात. म्हणजे आता आपण जी शेतीसंस्कृती पाहणार आहोत ती साधारणतः तिन हजार वर्षांपूर्वीची आहे. यासाठी मला प्रामुख्याने आधारभूत ठरला तो सुखमय भट्टाचार्य यांचा मूळ बंगालीत असलेला, पुष्पा जैन यांनी हिंदीत अनुवादित केलेला, ‘महाभारतकालीन समाज’ हा ग्रंथ.

रवींद्रनाथ टागोर यांनी भट्टाचार्य यांची या विषयातील योग्यता लक्षात घेऊन त्यांना तेव्हा शांतीनिकेतनला बोलावून तिथल्या संशोधन विभागात रुजू करून घेतलं आणि त्यांच्यावर हे काम सोपवलं. वर्षानुवर्ष मेहनत करून सुखमय भट्टाचार्य यांनी हे मूलभूत स्वरूपाचं काम करून ठेवलेलं आहे. या ग्रंथामुळे माझं काम फारच सोपं झालं.

वेदकाळासारखंच महाभारतकाळातही कृषीकर्माला वैश्यवृत्ती असं म्हटलं जात असे. आज आपण वैश्य हा शब्द केवळ व्यापारीवर्गासाठीच वापरतो. महाभारत काळात शेतीला पुष्कळच महत्त्व प्राप्त झालेलं होतं. महाभारताच्या शांती पर्वात असा उल्लेख सापडतो की ज्यात स्वतः लक्ष्मी म्हणते, ‘मी कार्यमग्न शेतकऱ्याच्या शरीरात वास करत असते.’ त्यामुळे राजाचंही शेतीकडं लक्ष असे. शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे चोर, राज्यव्यवस्थेतले दलाल, कर्मचारी यांच्याकडून शेतकरी नागवला जात असेल तर त्याला राजाच जबाबदार धरला जात असे. त्यामुळे शेती आणि शेतकऱ्यांची उन्नती होईल अशा सर्व गोष्टी करणे ही राजाचीच जबाबदारी समजली जात असे. जिथे नैसर्गिक पावसावर शेती करणं अशक्य आहे अशा ठिकाणी राजाने तलाव खोदले पाहिजेत असं महाभारतातल्या राजकर्तव्यात सांगितलेलं आहे.

जे शेतकरी अतिगरीब आहेत त्यांच्या खाण्यापिण्याची आणि बीबियाणाची व्यवस्था राजाने केली पाहिजे, असं महाभारताच्या सभापर्वात सांगण्यात आलेलं आहे. शेतीच्या व्यवस्थापनावर केवळ सज्जन लोकांची नियुक्ती राजाने केली पाहिजे असं महाभारताच्या सभापर्वातच सांगितलं आहे. शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्याच जीवावर जग आबादीआबाद होत असतं. त्यामुळे राज्यव्यवस्थेकडून त्यांना त्रास होणार नाही याची दक्षता राजानं घेतली पाहिजे. त्यासाठी सदैव सतर्क राहीलं पाहिजे असं महाभारताच्या शांतीपर्वात सांगितलेलं आहे.

राजानं शेतकऱ्यांकडून कर रूपात उत्पन्नाच्या सहावा भाग घ्यावा. त्याशिवाय एक कवडीही घ्यायचा राजाला अधिकार नाही, असं महाभारताच्या शांतिपर्वातच सांगितलेलं आहे. गरजेनुसार शेतकऱ्याला कर्ज उपलब्ध करून देण्याची व्यवस्था त्या काळात राजाकडेच होती. त्यासाठी शेतकऱ्याला शेकडा एक रुपया महिना व्याजाने कर्ज दिले जात असे. अर्थातच त्या काळात आजच्यासारखे चलन नसल्यामुळे कर्जाचा शंभरावा भाग व्याज म्हणून दिला जात असे. इतक्या कमी व्याजात तेव्हा सावकाराकडून कर्ज मिळत नसे. त्यामुळे राजा देत असलेल्या या कर्जाला ‘सानुग्रह ऋण’ असा शब्द महाभारताच्या सभापर्वात वापरलेला आहे. जर शेतकरी हे ऋण परत करण्याइतका सक्षम नसेल तर राजा हे ऋण उदार अंतःकरणाने माफ करीत असे. कर्ज वसूल करताना अन्याय किंवा जाच होऊ नये म्हणून राजा कर्जवसुलीच्या कामावर शूर आणि बुद्धिमान माणसांची नियुक्ती करीत असे. ही सर्व माहिती महाभारताच्या सभापर्वतच आलेली आहे.

कर आणि व्याजासंदर्भातील वरील तपशील पाहिले की आपल्या असं लक्षात येईल की राजा शिवछत्रपती यांच्या आज्ञापत्रावर महाभारताच्या वरील सर्व तपशीलाचा पुष्कळच प्रभाव आहे. जाणकार अभ्यासकांकडून राजांनी महाभारताचा राजकीय अभ्यास केलेला असावा असंही सहज वाटून जातं. अर्थातच शिवाजी महाराजांची आज्ञापत्रे आणि महाभारतकालीन राजकीय धोरणे यांचा कुणीतरी स्वतंत्रपणे तुलनात्मक अभ्यास करावा, असं मला सहजच वाटून गेलं.

महाभारत काळातही आजच्यासारखी ओलिताची, अर्धओलिताची आणि कोरडवाहू शेती केली जात असावी. त्यासाठी महाभारतात फार सुंदर शब्द आलेले पाहायला मिळतात. हे शब्द मला फार काव्यात्म वाटले. जिथं पूर्णतः पावसाच्या भरवशावर शेती केली जात असे अशा शेतीसाठी ‘देवमातृक शेती’ असा शब्द वापरला जात असे. जिथे जलसिंचनाची शेती केली जात असे तिला ‘नदीमातृक शेती’ असं म्हटलं जात असे. परिश्रमाशिवाय समुद्राकाठी भिजणाऱ्या शेतीला ‘प्रकृतीमातृक शेती’ म्हटलं जात असे. जिथे समुद्र, नदी, नैसर्गिक पाऊसही नसेल अशा ठिकाणी प्रयत्नपूर्वक पाणी व्यवस्था करून शेती केली जात असे. त्यासाठी काही वेगळा शब्द महाभारतात योजलेला दिसत नाही. पण आपण त्याला ‘राजमातृक शेती’ असं म्हणायला काही हरकत नसावी.

भीष्मपर्वात आणि गीतेतही असं म्हटलेलं आहे की शेती ही सूर्याचीच देन आहे. शेतीत पिकणारं धान सूर्याच्या कृपेमुळेच पिकतं. देवमातृक शेती हा शब्द त्यामुळेच महाभारतात आलेला असावा. सूर्य जेव्हा उत्तरायणात असतो तेव्हा प्रदीप्त होऊन तो पाण्याला स्वतःकडे खेचतो. नंतर दक्षिणायनात गेल्यावर सूर्य चंद्राच्या माध्यमातून आकाशातल्या पाण्याने भरलेल्या ढगांना धरणीवर बरसवतो आणि पेरलेल्या जमिनीवर अमृतसिंचन करतो. त्यामुळेच जमिनीच्या सुपीकतेचा जनक सूर्यच आहे, असं महाभारतात म्हटलेलं आहे. माणसाला जिवंत ठेवणारं अन्न हे सूर्याच्या तेजाचीच देणगी आहे. त्यामुळे जो शेतकरी हे निसर्गचक्र समजून घेत नाही आणि अथक मेहनत करत नाही, त्याला ही धरणी प्रसन्न होत नाही. तो धरणीच्या या दानापासून वंचितच राहतो. असंही महाभारत म्हणतं.

या काळात शेती बैल आणि नांगराच्या सहाय्याने केली जात होती, असा अंदाज करावा लागतो. कारण शेतीसंबंधी तसा स्पष्ट उल्लेख महाभारतात कुठेही सापडत नसला तरी वनपर्वात असा उल्लेख आहे की, वैष्णवयज्ञासाठी जी भूमी लागते ती सोन्याच्या नांगराने तयार करावी लागते. म्हणजे नांगर तेव्हा वापरात होता. महाभारतकाळात तांदूळ, जव, तीळ, मुग, उडीद आणि कोदो ही पीकं घेतली जात असावीत. कारण या धान्यांचा जागोजाग उल्लेख पाहायला मिळतो. शेती ही फार काळजीनं करायची गोष्ट आहे. ती केवळ नोकरांच्या भरवशावर करणे योग्य नाही. शेतमालकाने स्वतः शेतीत लक्ष घालायला हवे. नाही तर थोड्या हलगर्जीपणामुळे शेतीत मोठं नुकसान होऊ शकतं. असं महाभारताच्या उद्योगपर्वात सांगितलेलं आहे.

महाभारतात काही ठिकाणी शेतीची निंदाही केलेली आहे. पूर्वजन्मीच्या पापामुळंच माणूस शेतकरी कुळात जन्म घेतो असंही एका ठिकाणी म्हटलेलं आहे. हे तर आज जास्तच खरं वाटायला लागतं. शांती-पर्वात तुलाधार आणि जाजुली यांचा एक संवाद आहे. त्या संवादात तुलाधार म्हणतो, ‘बैल बिचारे सुखानं स्वतंत्रपणे राहत होते. पण माणसानं त्यांना पकडून, अनेक प्रकारचा त्रास देऊन, औताला जुंपलं. त्याला होणाऱ्या त्रासाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. नांगरानं जमिनीतले किडेमकोडे बाहेर पडतात आणि त्यांची जीवितहानी होते. या सगळ्या पापासमोर तर ब्रह्महत्याही कमी वाटावी’ किडेमकोड्याचा संदर्भ वाचताना वाटलं की हा तुलाधार जैन विचारांचा तर नसावा ? कारण पुढं जैन याच हिंसेच्या कारणास्तव शेतीतून बाहेर पडले आणि व्यापारातच स्थिर झाले. कदाचित इतर वर्णांच्या लोकांनी शेतीपासून दूर राहावं म्हणूनही वरील संवाद महाभारतात आलेला असावा. नाहीतर महाभारतात इतरत्र शेतीविषयी पुष्कळच गौरवात्मक लिहिलेलं वाचायला मिळतंच की.

महाभारताच्या आधी शेतीपेक्षा गोपालनाला जास्त महत्त्व होतं. महाभारतकाळात मात्र शेती आणि गोपालन हे समान महत्त्वाचे व्यवसाय होते. ते दोन्ही व्यवसाय शेतकऱ्यांच्याच ताब्यात होते. पण राजाने त्यांना त्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत, हे राजाचं कर्तव्यच आहे, असं तो काळ मानत होता. गायीचं महात्म्य महाभारतात जागोजाग वाचायला मिळतं. वशिष्ठाची होमधेनू महाभारतात फार महत्त्वाची समजली जाते. महाभारत काळात गाय ही सगळ्यात जास्त उपयुक्त पशु समजला जात असे. याशिवाय हत्ती, घोडे, गाढवं, कुत्रे, मांजरं हे पशु त्या काळात पाळले जात असत. त्या काळात पशुपालनाची व त्यांच्या आरोग्याची विद्या सर्वांनाच अवगत असे. राजाला हस्तिसूत्र आणि अश्वसूत्र अवगत असणं आवश्यक समजलं जात असे. पांडवांपैकी सहदेव हा गोविद्येत प्रवीण होता. त्यामुळे अज्ञातवासात विराट राजाकडं असताना त्याच्याकडं याच खात्याची जबाबदारी होती. मालकानं नोकरांच्या भरवशावर न राहता गायींची काळजी स्वतः घेतली पाहिजे, यावर महाभारताचा कटाक्ष होता.

महाभारतात अनुशासन पर्वत जागोजाग गाईचं महात्म्य वर्णन केलेलं आहे. एकदा देवराज इंद्रानेच आपल्या आजोबांना विचारलं की, देवलोकांपेक्षा गोलोक श्रेष्ठ का समजला जातो ? त्यावर आजोबांनी दिलेलं उत्तर असं, ‘गाय हीच यज्ञाचा प्रमुख भाग आहे. गाईशिवाय यज्ञ पूर्णच होऊ शकत नाही. गाईचे दूध आणि तूप हेच माणसाचं मुख्य अन्न आहे. गोवंशाशिवाय शेतीही होऊ शकत नाही. सगळ्या महत्त्वाच्या गोष्टीचे मूळ गायच आहे. म्हणून गाय जगात सर्वश्रेष्ठ आहे. गाय मानवप्राण्यासाठी आईच्या जागी आहे. त्यामुळेच प्रगतिशील माणसाने सतत गोसेवेत मग्न राहिले पाहिजे’ या संवादात गायीची महती भौतिक आणि अध्यात्मिक अशा दोन्ही अंगाने सांगण्यात आलेली आहे.

गाय त्या काळात पवित्र पशु समजला जात असे. हिंदू आजही गाईला पवित्र समजतात. इतकच नाही तर गाईच्या शेण व गोमुत्रालाही पवित्र समजलं जातं. त्याचं कारण काय ? तर त्याविषयी एक कथा महाभारताच्या अनुशासन पर्वातल्या ८२ व्या अध्यायात पाहायला मिळते. एकदा लक्ष्मी सजूनधजून गाईंकडं आली. गाईंनी तिला येण्याचं कारण विचारलं. तेव्हा लक्ष्मी म्हणाली की, ‘माझ्या प्रसन्नतेमुळेच इंद्र, विष्णू इतके ऐश्वर्यसंपन्न झालेले आहेत. मला वाटतं तुम्ही सुद्धा माझी भक्ती केली तर तुम्हीही तशाच ऐश्वर्यसंपन्न व्हाल’ त्यावर गाई म्हणाल्या, ‘आम्हाला तुझी गरज नाही. आम्ही आमच्या ऐश्वर्यसंपन्नच आहोत.’ तेव्हा लक्ष्मी म्हणाली, ‘पहा तुम्ही माझ्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे या जगातल्या लोकांच्या नजरेतून मी उतरेल. तेव्हा कृपा करा आणि मला तुमच्या सेणामुत्रात का होईना जागा द्या. मी तिथे राहायला तयार आहे’ तेव्हा गाईंनी विचारविनिमय करून लक्ष्मीला होकार दिला. तेव्हापासून लक्ष्मी गायीच्या सेणामुत्रात राहते. म्हणून ते पवित्र समजले जाते. त्या काळातही गोमांस व गोवध निषिद्ध समजला जात असे. हा संदर्भ महाभारताच्या अनुशासन पर्वत येतो. महाभारताचा नायक श्रीकृष्ण किती गोभक्त होता हे वेगळं सांगायची गरज नाही.

ही कथा काल्पनिक असली तरी तिचा निष्कर्ष मात्र खरा आहे. ज्यांना ही कथा मुळीच माहीत नव्हती असे अनेक शेतकरी मी पाहिलेले आहेत की, जे शेणाला लक्ष्मी समजत असत. माझ्या लहानपणी एक आमच्या गावात एक आजोबा तर रस्त्यात पडलेलं शेण दिसलं की धोतराच्या सोग्यात भरून घरी आणत असत. पण अर्थातच ते काही त्याची पूजा करीत नसत. तर त्या सेनाला उकिरड्यातच टाकीत. त्यांचं म्हणणं होतं की, या शेणामुळेच शेत सोन्यासारखं पिकतं. दिवाळीच्या दिवसात सेनाचेच पांडव, गायवाडा करून अजूनही शेतकरी त्याची पूजा करतात. हा कदाचित महाभारतकालीन गोमहात्म्याचाच अवशेष असावा.

महाभारतकालीन समाजाच्या शेतीविषयक धारणा या अशा स्वरूपाच्या होत्या. खरं-खोटं, चूक-बरोबर हे आज आपण ठरवत असलो तरी तो काळ आणि त्या लोकांनी त्या काळाला अनुसरून धारण केलेल्या धारणा कशा होत्या त्या वस्तुनिष्ठपणे पाहणं हेच संशोधकाचं काम असतं. त्याची सामाजिक चिकित्सा वेगळ्या व्यासपीठावर आपण करतच असतो. पण संशोधनात आपण जास्तीतजास्त वस्तुनिष्ठ राहायला हवं, असं मला वाटतं.

संदर्भ –
१. महाभारत कालीन समाज – सुखमय भट्टाचार्य, हिंदी अनुवाद – पुष्पा जैन, लोकभारती प्रकाशन, प्रयागराज (२०२३)
२. आज्ञापत्रे – रामचंद्रपंत अमात्य, सं – डॉ. आ. रा. कुलकर्णी, मानसन्मान प्रकाशन, पुणे (२००४)
३. अशोक आणि मौर्याचा ऱ्हास – रोमिला थापर, मराठी अनुवाद – डॉ. शेरावती शिरगावकर, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई – (१९८८)


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading