November 21, 2024
Madhav Jadhav Poetry Book review by Dr Ashok Ingle
Home » प्रबोधनास्तव मनं प्रज्वलित करणारी कविता
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

प्रबोधनास्तव मनं प्रज्वलित करणारी कविता

ऐंशी पृष्ठांनी व्यापलेल्या या कवितासंग्रहात मुक्तशैलीतील एकूण सदोतीस रचना समाविष्ट करण्यात आलेल्या असून या कवितासंग्रहाला महाराष्ट्रातील आघाडीचे ख्यातनाम कवी, समीक्षक डॉ. पी. विठ्ठल यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना आणि सुप्रसिद्ध चित्रकार सरदार जाधव यांचे आशयाला अनुरूप असे मुखपृष्ठ लाभल्यामुळे प्रस्तुत कवितासंग्रह दखलपात्र ठरला आहे.

प्रा. डॉ. अशोक रा. इंगळे,
पदवी व पदव्युत्तर मराठी विभाग,
श्री शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, आकोट जि. अकोला
मो. ९४२१७४७४१७
माधव जाधव ज्या काळाचे प्रतिनिधित्व करत आहेत तो
 स्वातंत्र्योत्तर साडेसात दशकांचा काळ आहे. जाधव हे संवेदनशील कवी असल्यामुळे त्यांच्या सर्जनशीलतेवर या काळाचे ओरखडे उमटणे स्वाभाविक आहे. 'आपण म्हणतो महाराष्ट्र पुरोगामी आहे!" या संग्रहातून त्यांनी समकाळाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या भौतिक, मानसिक आणि भावनिक अंतःप्रवाहांची नोंद घेतली आहे. शेतकरी आणि सर्वसामान्य माणसाचे स्वातंत्र्य हिरावून घेणाऱ्या. त्यांचे अस्तित्व नाकारणाऱ्या सनातनी भूमिकेचे त्यांनी विच्छेदन केले आहे. 'पुरोगामी' या शब्दाचा व्यापक अर्थ त्यांना चांगलाच ठाऊक आहे. परंतु वर्तमान काळात प्रतिगामी शक्तींचे अधिक प्रभावी ठरत जाणे ही घटना अस्वस्थ करणारी आहे. विचारवंतांची हत्या असो, की अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील निर्बंध असोत शेतकरी, कष्टकऱ्यांची अवहेलना असो, की नोकरदारांची हेळसांड असो, समकाळातील या घटना घडामोडींनी कवीला अस्वस्थ केले आहे. त्याच्या भाववास्थेवर कळत नकळत या घटनांचा परिणाम झाला आहे. यातूनच ही कविता निर्माण झाली आहे. या कवितेत प्रक्षोभ आहे पण तो आक्रस्ताळा प्रक्षोभ नाही. समाजाचा सर्वकष विचार या कवितेतून पुढे येतो. सांस्कृतिक तेढ निर्माण करण्याचा विध्वंसक विचार या कवितेत नाही. पुनर्माडणीचा एक सकारात्मक आणि विधायक विचार कवी आपल्या कवितेतून मांडतात.

- डॉ. पी विठ्ठल

महाराष्ट्र राज्य शासनाचा पुरस्कार प्राप्त लेखक व कथाकार प्रा. डॉ. माधव जाधव यांचा “आपण म्हणतो महाराष्ट्र पुरोगामी आहे” हा दुसरा कवितासंग्रह अलीकडेच सौरव प्रकाशन संस्था औरंगाबादने २०२२ मध्ये प्रसिद्ध केला आहे. खरं तर यापूर्वी “कुळवाडी अभंग” ह्या कवितासंग्रहाव्दारे कवितेच्या प्रांतात त्यांनी दमदार प्रवेश केलेला आहे. डॉ. माधव जाधव हे ‘चौफेर लेखन’ करणारे व्यासंगी व गंभीर प्रवृत्तीचे कवी, लेखक आहेत. कविता, कथा, वैचारिक लेखनासह त्यांनी स्तंभ लेखनही केलेले असून त्यांच्या लेखनाचा केंद्रवर्ती बिंदू सर्वसामान्य माणूस हाच आहे. ह्याच सर्वसामान्य माणसाच्या वैचारिक, सामाजिक व आर्थिक उन्नयनास्तव कवीनं आपली लेखणी झिजवली आणि प्रज्वलित केली याचा साक्षात प्रत्यय प्रस्तुत कवितासंग्रहातील कवितेतून प्रखरपणे येतो.

कवी माधव जाधव यांची कविता भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या सुवर्णपर्वावर रसिक, वाचकांच्या भेटीला आलेली असून महाराष्ट्राच्या पुरोगामीत्वाला क्षती जात असण्याच्या समयी आल्यामुळे ती सर्वसामान्य माणसाला चिंतन करायला प्रवृत्त करते. वैचारिक जाणिवेच्या कवितेला तत्त्वचिंतनाचा वास्तव स्पर्श झाला की तो अनुभव काव्यरूप धारण करतो. इथे समाजातील अनेक घडामोडींना कवेत घेत कवीची काव्यानुभूती आकाराला आलेली जाणवते. वस्तुतः ही कविता केवळ कवीच्या बापाची वा तो ज्या समाज घटकातून आला त्या वर्गाची नाही, तर ती कविता समष्टीचं प्रतिनिधित्व करते. म्हणून ती समूहाची अनुभूती ठरते. परंतु ही अनुभूती मानवी मनाला अंतर्मुखतेसह सजग होण्याचा प्रत्यय देते. ”

टी.व्ही.वरची जाहिरात पाहून
त्यानं आणलं औषध
खूपच जहरी हाय म्हणून
अन् फवारू लागला, सोयाबीनवर
अळ्या-किडे किती मेले माहीत नाही
तो मात्र गेला कोमात
अन् लगेच लावली बातमी चॅनलवाल्यांनी
कंपनीच्या बोगसपणाची
कळतच नाही चूक कोणाची
त्यांची तिची का याची ( पृ.‌१८)

कृषी संस्कृतीतील शेतकरी जीवनानुभवाची अनेकविध दाखले प्रस्तुत संग्रहात बघायला मिळतात. कवी माधव जाधव वास्तवाचं सजग भान असलेले, नि लेखणीकडे शस्त्र म्हणून पाहणारे गंभीर प्रवृत्तीचे लेखक असल्यामुळे समाजात घडणाऱ्या हालचालींवर त्यांचं सूक्ष्मपणे लक्ष असतं. समाज जीवनातील अवलोकनाला साथ देत असताना त्यांची प्रतिभा वास्तवातील तरल जीवनानुभव शब्दाच्या चिमटीत अलगद पकडून घेतो, असे कविता वाचताना सतत जाणवत राहते. ”

बरेच दिवस वाट पाहून
किडे लागण्याच्या भीतीनं
त्यानं चना विकला सावकाराला
अन् पंधरा दिवसातच वाढले भाव
किड्याच्या औषधाच्या तिप्पट
कोणी वाढविले…का वाढविले…कसे वाढविले
आपण म्हणतो उत्पादकाला वस्तूचे भाव
ठरविण्याचा अधिकार आहे.” (पृ.२२)

ग्रामीण भागातील बहुजन युवक बेरोजगारीमुळं शेतात राबण्याऐवजी पानठेल्यावर उभा राहताना दिसतो किंवा एखाद्या पुढा-याच्या मागे फिरताना दिसतो. बहुजन समाजातील ही युवा पिढी दिशाहीन भरकटत असल्याकारणाने राजकीय नेते त्यांचा आपल्या स्वार्थापोटी उपयोग करून घेतात. त्यांना व्यसनाधीनतेकडे वळवितात. ‘साहेब,माफ करा’ ही कविता या ज्वलंत वास्तवाला सरळ जाऊन भिडते. “
साहेबांचे झेंडे धरायला,
जय करायला लागतातच तरूण
हे समजू शकतो आम्ही” (पृ. ४४)
पण हे समकालीन पुढारी मात्र जीवनभर त्यांच्या आयुष्याशी खेळत असतात याची तीव्र खंत प्रकट करताना ही कविता तरूणांच्या डोळ्यात अंजन घालायला विसरत नाही. इथे टोकदार उपरोधाचा वापर करून कवीनं आजचं जळजळीत वास्तव अधोरेखित केलं आहे.

खरं म्हणजे ” आपण म्हणतो महाराष्ट्र पुरोगामी आहे” ह्या कवितासंग्रहातील कविता समकालातील प्रश्नांना यथार्थपणे भिडते. त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा मनस्वी प्रयत्न करते. कवी आपली पुरोगामी भूमिका निर्भिडपणे तरूण, शेतकरी, व्यापारी व समाजातील सर्वहारा घटकांना नेमकेपणाने कळावी यासाठी गद्याचा आधार घेत तो पद्यरचनेतून व्यक्त होतो. उच्च विद्याविभूषित असलेल्या कवीची निष्ठा छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर असून या महापुरुषांच्या टॅगलाईनव्दारे तो समाज जागृतीचं अत्यंत अवघड काम करतो आहे. म्हणूनच तो दैवी प्राक्तनाला अव्हेरत प्रयत्नवादाचा पुरस्कार करतो. तरीही, वास्तवात विज्ञानाची पदवी संपादन केलेला डॉक्टरच देवाची पूजा करून पेशंटला तपासत असेल तर गोंधळलेला पेशंट तरी काय करेल? असा प्रतिप्रश्न विचारणारी कविता आणि कवी टोटल विज्ञानवादी असल्याचे दिसून येते. त्यासाठी कवी समकालातील युवा पिढीला उजेडाकडून अंधाराकडे न जाता, सदैव उजेडाकडून उजेडाकडेच मार्गक्रमण करण्याचा मौलिक संदेश तो देतो.

कोरोना काळातील भेदक वास्तव, एस.टी. कर्मचाऱ्यांचा संप, मोर्चा आणि लोकशाही इत्यादी ज्वलंत विषय व प्रश्नांना कवेत घेताना ही कविता समाजाचा, बदलता स्वभाव, बदलती राजकीय भूमिका, नेतृत्व आदींवर शरशंधान करते. कवीच्या ‘एक्सरे’ दृष्टीतून कुठलीच बाब सुटत नाही. शेतकरी, शेतमजूर, स्त्रिया, वंचित घटकांचे प्रश्न, त्यांच्या व्यथा व वेदनेला ही कविता मोकळी वाट करून देते. वंचित, बहुजनांच्या उत्थानाचा मार्ग प्रारब्धवादातून जात नसून तो विवेकवादातून जातो हे सांगण्याचं प्रचंड मोठं धाडस ही कविता आजच्या भ्रमयुगात नेटानं करताना दिसते. ”

घटनेनं दिलेलं स्वातंत्र्य सांगा कुठं गेलं
जगाच्या पोशिंद्याला कुणी गुलाम केलं” (पृ. ७१)
महाकवी वामनदादा कर्डकांसारखा खडा सवाल उपस्थित करणारी ही कविता ‘अच्छे दिनवाल्या’ मुजोर राजसत्तेला कडवं आव्हान देते. कारण या कवितेची लोकशाही मूल्यांवर असीम निष्ठा आहे किंबहुना संविधानाने दिलेल्या स्वातंत्र्य मूल्यांमुळेच आज आपण निडरपणे अभिव्यक्तीचा संकोच करणा-या व्यवस्थेविरुद्ध हल्लाबोल करू शकतो हे शाश्वत सत्यही या कवितेला ज्ञात आहे.

एकंदरीत, संवेदनशील असलेल्या कवी मनावर जे काही ओरखडे उमटलेले आहेत, ते सर्व अलगद टिपण्याचा प्रयत्न इथे कलात्मक पद्धतीने झालेला दिसतो. कवीला एक व्यक्ती म्हणून जगत असताना खेड्यापाड्यातील ग्रामीण व शहरी लोकांची मानसिकता कशी प्रारब्धवादाने ग्रासलेली आहे, स्वार्थाच्या या मतलबी दुनियेत मूल्यांची होणारी पडझड त्याला रोजच्या व्यवहारात प्रत्ययास येते. म्हणून तो क्षणभर विषण्ण देखील होतो आणि लगेच मनाला सावरून तो सलणारं, बोचणारं वास्तव आपल्या कवितेतून अधोरेखित करतो. कवीमनासाठी हे भावनिक विरेचन ठरत असले तरी, त्यातून समाजमनाला निश्चित असा आकार दिल्या जातो. म्हणूनच मुर्दाड बनलेली मनं प्रज्वलित करण्याचं महत्तम कार्य उत्तम कलाकृती करू शकते. कवी माधव जाधव यांची कविता हे ‘प्रबोधनाचं मौलिक’ कार्य सामाजिक बांधिलकीतून नेटाने पार पाडते आहे, असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.

एकूणच, ऐंशी पृष्ठांनी व्यापलेल्या या कवितासंग्रहात मुक्तशैलीतील एकूण सदोतीस रचना समाविष्ट करण्यात आलेल्या असून या कवितासंग्रहाला महाराष्ट्रातील आघाडीचे ख्यातनाम कवी, समीक्षक डॉ. पी. विठ्ठल यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना आणि सुप्रसिद्ध चित्रकार सरदार जाधव यांचे आशयाला अनुरूप असे मुखपृष्ठ लाभल्यामुळे प्रस्तुत कवितासंग्रह दखलपात्र ठरला आहे.

कवितासंग्रह – आपण म्हणतो महाराष्ट्र पुरोगामी आहे
कवी – माधव जाधव
प्रकाशक – सौरव प्रकाशन, औरंगाबाद
पृष्ठे – ८०, किंमत – १२० ₹


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading