भाताच्या काढणीनंतर असणाऱ्या शेतातील ओलाव्यावरही तुरीची लागवड करता येते. भात काढणीनंतर लगेचच टोकण पद्धतीने त्या क्षेत्रात तुरीची लागवड केल्यास मशागतीचा खर्चही वाचतो. कमी खर्चात उपलब्ध ओलाव्यावर हे पीक घेतले जात असल्याने शेतकऱ्याला अधिक नफा मिळतो. नव्याने विकसित केलेल्या या जाती आता तीनही हंगामांत घेता येणे शक्य आहे.
डॉ. अनुपमा हिंगणे,
तूर पीक पैदासकार, इक्रिसॅट, तेलंगणा
तुरीचे पीक पक्व होण्यास अधिक कालावधी लागतो. उत्पादनही कमी असते. यामुळे शेतकरी हे पीक मुख्यतः सोयाबीन, कापूस, मूग, ज्वारी आदी पिकांमध्ये आंतरपीक म्हणूनच घेतात. पण जमिनीस नत्राचा पुरवठा करणारे हे पीक असल्याने पिकांच्या फेरपालटात या पिकाचे महत्त्व आहे. यासाठी शेतकरी तुरीच्या लागवडीस प्राधान्य देतात. तरीही तुरीची लागवड करण्यात विविध कारणांमुळे मर्यादा येते. हवामान बदलाचा भारतातील शेतीवर मोठा परिणाम झालेला दिसून येत आहे. वाढते वार्षिक तापमान, धुके, अवेळी पाऊस आणि गारपीट याचा शेती उत्पादनास मोठा फटका बसत आहे. मुख्यतः कोरडवाहू भागात तुरीची लागवड केली जाते.
मॉन्सूनचे आगमन होताच पेरणी केली जाते; पण पेरणीनंतर पावसाने ओढ दिल्यास उगवलेले पीक पाण्याचा ताण सहन न करू शकल्याने वाळून जाण्याची शक्यता अधिक असते. यामुळे दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यासमोर उभे राहते. जुलै आणि ऑगस्टमध्ये पाऊस अधिक असतो. या काळात शेतात पाणी साचून राहिल्यास तूर पिकाच्या वाढीवर याचा परिणाम होतो. मोझॅक आणि फ्युसेरियम विल्ट रोगामुळेही तुरीचे मोठे नुकसान होते. या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी कमी कालावधीत व अपारंपरिक क्षेत्रातही घेता येऊ शकणाऱ्या अधिक उत्पन्न देणाऱ्या तुरीच्या जाती विकसित करण्याचे आव्हान संशोधकांसमोर होते. हे आव्हान स्वीकारून इक्रिसॅटमधील तूर पीक पैदासकारांनी आयसीपीएल ११२५५, आयसीपीएल २०३४०, आयसीपीएल २०३३८ या जाती विकसित केल्या आहेत. महाराष्ट्र, ओडिशा, कर्नाटक, तेलंगणा, उत्तराखंड, राजस्थान आणि आंध्र प्रदेश येथील शेतकऱ्यांना या जाती निश्चितच फायदेशीर ठरणार आहेत.
३० बाय १५ सेंटिमीटर अंतर ठेवून या पिकाची लागवड केल्यास ९० ते १०० दिवसांमध्ये प्रतिहेक्टरी ८ ते १० क्विंटल उत्पन्न मिळू शकते. अवघ्या ९० दिवसांत उत्पादन घेता येत असल्याने शेतकऱ्यांना तूर- गहु अशी पीक पद्धतीही घेता येणे शक्य होणार आहे. कमी कालावधीत पक्व होणारी जात असल्याने घाटेअळीच्या प्रादुर्भावापासूनही सुटका होणार आहे. भाताच्या काढणीनंतर असणाऱ्या शेतातील ओलाव्यावरही तुरीची लागवड करता येते. भात काढणीनंतर लगेचच टोकण पद्धतीने त्या क्षेत्रात तुरीची लागवड केल्यास मशागतीचा खर्चही वाचतो. कमी खर्चात उपलब्ध ओलाव्यावर हे पीक घेतले जात असल्याने शेतकऱ्याला अधिक नफा मिळतो. नव्याने विकसित केलेल्या या जाती आता तीनही हंगामांत घेता येणे शक्य आहे. पश्चिम महाराष्ट्रातील ऊस पट्ट्यामध्ये खरिपात उसामध्ये आंतरपीक म्हणून घेतल्यास उसाच्या पिकास याचा फायदा होतो. तसेच ऑक्टोबर व जानेवारी या बिगर हंगामामध्येही तुरीची लागवड करता येणार आहे…
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.