३८ वे महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलन अमरावती येथे संत ज्ञानेश्वर सभागृह येथे होत आहे भव्य आयोजन
अमरावती: या वर्षीचे ३८ वे महाराष्ट्र राज्य तथा तिसरे अखिल भारतीय पक्षिमित्र संमेलन अमरावती येथील वन्यजीव व पर्यावरण संवर्धन संस्थेच्या (वेक्स WECS) च्या यजमानपदाखाली संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृहात ०१ आणि ०२ नोव्हेंबर २०२५ दरम्यान होत आहे. पक्षीमित्रांचे संघटन असलेली महाराष्ट्र पक्षिमित्र ही चळवळ राज्यात गेली साडेचार दशके कार्यरत असून, अशा प्रकारचे संघटन आणि संमेलने घडवून आणणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य आहे.
पक्षी अभ्यास, संवर्धन व जनजागृती यासाठी कार्यरत असलेल्या या संस्थेची राज्य स्तरीय तसेच विभागीय स्तरावर पक्षिमित्र संमेलने होत असतात. संपूर्ण राज्यात आजवर ३७ राज्यस्तरीय संमेलने व विभाग स्तरावरील ३० संमेलनांचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी अमरावती येथील या संमेलनाच्या पूर्वी स्थानीक स्तरावर विविध स्पर्धांचे आयोजन सुद्धा आयोजकांच्या वतीने करण्यात आले होते तसेच राज्यस्तरीय पक्षी छायाचित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या छायाचित्रांची व उत्कृष्ट चित्रांचे प्रदर्शन येथील आर्ट गॅलरी मध्ये केले जाणार आहे. या छायाचित्र प्रदर्शनीमध्ये अमरावती मधील नामवंत पक्षी छायाचित्रकार यांच्या छायाचित्रांचे स्वतंत्र दालन सुद्धा केले जाणार आहे. या संमेलनासाठी संपूर्ण राज्यातून व राज्याबाहेरून किमान ३०० प्रतिनिधी या संमेलनासाठी उपस्थित राहतील असा अंदाज आहे.
संमेलनाचा मध्यवर्ती विषय
या वर्षीचे चे ३८ वे महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलन विदर्भात अमरावती येथे होणार आहे. या संमेलनासाठी संपूर्ण राज्यातून तसेच इतर काही राज्यातील पक्षिमित्र सुद्धा सहभागी होणार आहेत. या संमेलनाचा मध्यवर्ती विषय हा “सातपुडा आणि विदर्भातील पक्षी जैवविविधता, पक्षीअधिवास संवर्धन आणि आव्हाने” असा आहे. दोन दिवस चालणाऱ्या या संमेलनात विविध चर्चासत्रे, सादरीकरणे, परिसंवाद, तज्ञांची व्याख्याने अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून, संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र पक्षिमित्र तर्फे दिले जाणारे पक्षिमित्र पुरस्कार पक्षी छायाचित्र स्पर्धा व शालेय विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांच्या परितोषिकांचे वितरण उद्घाटन कार्यक्रमात करण्यात येणार आहे.
२५ वर्षे झाल्याच्या निमित्त्याने
अमरावती मध्ये यापूर्वी २०१३ साली २६ व्या महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलनाचे व ११ व्या विदर्भ पक्षिमित्र संमेलनाचे आयोजन अमरावती येथील वन्यजीव व पर्यावरण संवर्धन संस्थेकडून (वेक्स) करण्यात आले होते. या वर्षी वेक्स संस्थेच्या स्थापनेस २५ वर्षे झाल्याच्या निमित्त्याने यावर्षी पुन्हा या संमेलनाचे आयोजन करण्याची जबाबदारी संस्थेने घेतली आहे. वेक्स ही संस्था अमरावती मध्ये गेल्या २५ वर्षापासून वन्यजीव व पर्यावरण संवर्धन यासाठी कार्यरत असून संस्थेने आजवर मेळघाट, सातपुडा आणि विदर्भातील अनेक ठिकाणी विविध प्रकल्प राबविलेले आहेत. पक्षी अभ्यासात संस्थेचे महत्वाचे योगदान असून आजवर अनेक संशोधन व जनजागृती प्रकल्पासह संस्थेने पक्षी नोंदी व नवीन अभ्यासक घडविण्यात मोलाचे योगदान दिले आहे. संस्थेच्या स्थापनेस यावर्षी २५ वर्षे पूर्ण झाली आहेत.
या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्याने संस्थेकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार असून यातील महत्वाचा कार्यक्रम म्हणजे यावर्षीचे महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलन. अमरावती येथे यावर्षी आयोजित होत असलेल्या या संमेलनात आजवर सर्वात जास्त पूर्व नोंदणी झाली असून वेळेवर नोंदणी झाल्यावर या संमेलनात ३००-३५० प्रतिनिधी उपस्थित राहण्याचा अंदाज आहे.
संमेलनाध्यक्षपदी प्रवीणसिंह परदेशी
या संमेलनासाठी संमेलनाध्यक्ष म्हणून निवृत्त प्रशासकीय अधिकारी तथा “मित्रा” या राज्य नियोजन संस्थेचे अध्यक्ष तथा मुख्यमंत्री यांचे मुख्य आर्थीक सल्लागार प्रवीणसिंह परदेशी (IAS Rtd.) यांची निवड केली आहे. संमेलनाध्यक्ष प्रवीणसिंह परदेशी हे त्यांच्या प्रशासकीय सेवेच्या सुरुवातीपासूनच वन्यजीव व पक्षी छायाचित्रकार व वन्यजीव संवर्धक म्हणून संपूर्ण राज्यात परिचित आहेत. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील पुनर्वसन तसेच राज्याच्या वन विभागाचे सचिव असतांना त्यांनी वन विभागात अतिशय धडाडीने काम करून जंगल व वन्यजीव संवर्धनात आपल्या कार्याचा ठसा उमटविला होता. महाराष्ट्र पक्षिमित्र सोबत ते गेल्या ३ दशकांपासून जुळलेले असून त्यांनी अनेक संमेलनात उपस्थित राहून तसेच संमेलनाच्या आयोजनात सुद्धा मोलाची भूमिका बजाविली होती. ते १९९३ साली अमरावती येथे झालेल्या विदर्भ पक्षिमित्र संमेलनाचे अध्यक्ष होते, तर सोलापूर येथे १९९८ साली सोलापूर येथे पार पडलेल्या संमेलनाचे ते स्वागताध्यक्ष सुद्धा होते. या शिवाय त्यांनी इतरही काही संमेलनात उपस्थित होते. सध्या ते वन्यजीव क्षेत्रातील सर्वात जुन्या अशा बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे अध्यक्ष सुद्धा आहेत.
या संमेलनाचे उद्घाटन संत ज्ञानेश्वर सभागृह येथे शनिवारी ०१ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० ला होणार असून यासाठी उद्घाटक म्हणून महाराष्ट्र राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) एम. श्रीनिवास रेड्डी लाभले आहेत. मा. रेड्डी हे यापूर्वी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रासंचालक म्हणून अमरावती येथे होते. महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलनात ते यापूर्वी सुद्धा उपस्थित राहिलेले आहेत. उद्घाटन समारंभास प्रमुख अतिथी म्हणून संमेलनाध्यक्ष प्रवीणसिंह परदेशी यांचेसह अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा (चांडक) यांची उपस्थिती राहणार आहे.
मनपा आयुक्त यांचे उपस्थितीत भविष्यात मनपा व वेक्स यांचे संयुक्त विद्यमाने अमरावती शहरात राबविले जाणारे विविध कार्यक्रमांची सुरुवात केली जाणार आहे. याशिवाय मंचावर माजी महापौर तथा वेक्सचे सल्लागार मिलिंद चिमोटे, महाराष्ट्र पक्षिमित्रचे अध्यक्ष डॉ. जयंत वडतकर, माजी संमेलनाध्यक्ष डॉ. अनिल रतिलाल माळी, नाशिक तसेच वेक्स आयोजक संस्थेचे अध्यक्ष डॉ. अंजली देशमुख, आयोजन समिती अध्यक्ष डॉ. गजानन वाघ, सहसचिव प्रा. मंजुषा वाठ, उपाध्यक्ष डॉ. श्रीकांत वर्हेकर यांची उपस्थिती राहणार आहे. संमेलनाचे उद्घाटन झाल्यानंतर छायाचित्र प्रदर्शनीचे उद्घाटन केले जाणार आहे. संमेलन स्थळ असलेल्या संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन परिसरास “पद्मश्री मारुती चितमपल्ली पक्षिमित्र नगरी” असे नामकरण केले जाणार असून सभागृहास “डॉ. सालिम अली सभागृह” असे नामकरण केले जाणार आहे. संमेलन स्थळी पक्षी विषयक पुस्तके, दुर्बिणी, व इतर साहित्याचे व विविध संस्थांचे माहिती देणारे स्टॉल लावले जाणार आहेत.
या संमेलनात दोन दिवसात चार सत्रांचे नियोजन करण्यात आले असून पहिल्या दिवशीच्या दोन सत्रात एकूण १३ तज्ञ अभ्यासकांचे सादरीकरण व मार्गदर्शन होणार असून दुसऱ्या दिवशीच्या दोन सत्रात एकूण १७ अभ्यासकांचे मार्गदर्शन होणार आहे. महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलनाचा समारोप रविवार दि. 2 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वाजता होणार असून कार्यक्रमासाठीप्रमुख अतिथी म्हणून संमेलनाध्यक्ष प्रवीणसिंह परदेशी यांचेसह मेळघाट व्याघ्रप्रकल्प चे क्षेत्रासंचालक एम आदर्श रेड्डी तसेच मा. प्रा. डॉ. प्रवीण रघुवंशी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. याशिवाय मंचावर महाराष्ट्र पक्षिमित्रचे अध्यक्ष डॉ. जयंत वडतकर, माजी संमेलनाध्यक्ष डॉ. अनिल रतिलाल माळी, नाशिक तसेच वेक्स आयोजन समिती अध्यक्ष डॉ. गजानन वाघ हे उपस्थित राहतील, आयोजक संस्थेच्या अध्यक्ष डॉ. अंजली देशमुख कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहतील. दोन दिवसाचे सम्मेलन आटोपल्यावर राज्यातून विविध ठिकाणाहून आलेले पक्षिमित्र यांचेसाठी एका ऐच्छिक मेळघाट सहलीचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये सुमारे ५० पक्षिमित्र सोमवारी मेळघाटातील पक्षीविश्व अभ्यासातील.
या संमेलनाच्या निमित्त्याने व वेक्स संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त एका स्मरणिकेचे प्रकाशन सुद्धा संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमात केले जाणार असून याशिवाय काही पक्षी विषयक पुस्तके व माहितीपत्रके यांचे सुद्धा प्रकाशन केले जाणार आहे. तसेच या दोन दिवसीय संमेलनात सादर केले गेलेले सादरीकरण व्याख्याने, तज्ञांची मार्गदर्शन, पाहुण्यांची भाषणे या सर्वांचे संकलन असलेली एक स्वतंत्र स्मरणिका संमेलन नंतर एक महिन्यात पुन्हा संकलित करून प्रकाशित केली जाणार आहे.
या संपूर्ण आयोजनासाठी वेक्स संस्थेचे पदाधिकारी तथा कार्यकर्ते यांची टीम परिश्रम घेत असून अमरावती जिल्ह्यातील वन्यजीव क्षेत्रात कार्यरत विविध संस्थांचे सुद्धा सहकार्य लाभत आहे. या संमेलनाच्या खर्चासाठी अमरावती येथील सामाजिक संस्था तथा व्यावसायिक यांनी सहकार्य केल्यामुळे संमेलनाचे आयोजन शक्य झाले आहे. या संमेलनातील छायाचित्र प्रदर्शनी, विद्यार्थ्यांनी काढलेल्या पक्ष्यांच्या चित्रांची प्रदर्शनी तसेच संमेलनातील तज्ञांच्या व्याख्यानांचा लाभ अमरावती करांनी सुद्धा घ्यावा असे आवाहन वेक्स तर्फे केले गेले आहे.

Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
