“रानसखा : धनेश” हे फक्त पक्षीनिरीक्षण नाही, तर एक आंतरिक संवाद आणि निसर्गाशी एकरूप होण्याचा अनुभव आहे. परभणीच्या माणिक पुरी ( मो. 9881967346 ) या लेखकाच्या लेखणीतून आपल्याला “धनेश” या पक्ष्याचे केवळ वैज्ञानिक स्वरूपच नाही, तर त्याच्या सहजीवनातील कोमलता, त्याग, प्रेम आणि अस्तित्वाची नाजूक रेखाटनं दिसतात.
टळटळीत दुपार, जणू उन्हाचा कडक पहाराच! नुसती जीवाची तगमग होऊ लागली. मी पाम ट्री च्या सावलीत बसलो होतो. सावलीपेक्षाही अंगावर ऊनच जास्त पडायचं. झाडाची सावली पायात गोळा झालेली. झाडाची पानं पंख्यासारखी असल्यामुळे अंग चांगलच भाजू लागलं. सकाळी बॉटल भरून आणलेलं पाणी केव्हाच संपून गेलं होतं. आता तहान लागली होती. घसा कोरडा पडत चाललेला. पण समोरच्या नारळाच्या झाडाकडं पाहिलं की, बरं वाटायचं.
डोळ्यासमोर नारळाची तीन झाडे होती. त्यातील एका झाडाच्या खोडात धनेश पक्ष्याची ढोली होती. धनेशची मादी ढोलीतून बाहेर येण्याची मी वाट पाहत होतो. उन्हाचा कडक पहारा असला तरी, ढोलीच्या आसपास राहण्याचा प्रयत्न करू लागलो. मादी दोन-तीन दिवसात ढोलीतून बाहेर येणारच होती. ती बाहेर कशी येते? धनेश तिला बाहेर येण्यासाठी मदत करतो का ? मागील दीड महिन्यापासून मादी ढोलीत बंदिस्त होती. खरं तर तिनं स्वतःलाच बंदिस्त करून घेतलं होतं.
मादी दिवसाच ढोलीतून बाहेर पडणार होती त्यामुळे पहाटेच ढोलीच्या दिशेनं निघायचो. माझ्या घरापासून धनेशची ढोली 6 कि.मी. अंतरावर होती. दररोज दोन वेळा धनेशच्या नोंदी घेण्यासाठी जायचो. 24 कि. मी. चा प्रवास व्हायचा. कधी – कधी धनेशचा पाठलाग करण्यासाठी मोटारसायकलचा वापर करत असे. ढोलीपासून एक किलोमीटरच्या परिसरात असलेल्या वड, पिंपळ, कडूलिंब, जांभूळ, अशोक, अंजीर आणि फिरंगीचिंच या झाडांचे अंतर मोजून घेतले. पिकलेली फळे आणण्यासाठी धनेशला किती वेळ लागतो या बाबतच्या नोंदी करत असे. या नोंदीविषयी सांगणारच आहे पण आता मला दुर्बिणीतून मादीचा डावा डोळा दिसत आहे. ती बाहेर डोकावण्याचा प्रयत्न करत होती. मला तर ती अंधाऱ्या कोठडीत असल्यासारखीच वाटायची. ढोलीच्या इवल्याशा फटीतून प्रकाश तरी किती मिळणार ? तिनं असं बंदिस्त राहणं मला आवडायचं नाही. पण माझ्या आवडी-निवडीचा प्रश्न येतोच कुठे?
मी ढोलीकडे सारखा पाहायचो. धनेशच्या आवाजाकडे लक्ष ठेवायचो. पण त्याचा आवाज काही येत नसे. तो कुठूनही आणि केव्हाही येईल असं सारखं वाटायचं धनेश पक्ष्याला सर्व रानवाटा माहीत होत्या. कच्च्या रस्त्यालगतची शिरीषची झाडं त्याच्या ओळखीची झालेली. परभणी कृषी विद्यापीठातील कार्यालयाच्या इमारतीचा परिसर त्याने डोळ्यांनी टिपून घेतलेला. विद्यापीठातील नाल्याने अंग चोरून घेतलय हे त्याला माहीत होतं. पिंपळाचं झाडं तर तो दुरूनच ओळखायचा. नारळाजवळची निलगिरीची झाडं त्याचा थांबा असायची. कडुलिंब, बदाम, अंजीर, अशोक आणि साग अशी सगळी झाडं त्याला ओळखू यायची. चिंचेचं झाडसुद्धा निरखून पाहिलेलं. या परिसराचा सगळा भूगोलच त्याला ठाऊक झालेला! पलीकडचा डांबरी रस्ता, मोकळी रानं, मोकळ्या रानात पालं उभारून राहणारी माणसं, एवढच काय साखला प्लॉटमधील घरे आणि रेल्वे स्थानकातून शिट्टी देत बाहेर पडणारी रेल्वे सुद्धा त्याच्या ओळखीची होती. पण माझी ओळख व्हायला त्याला जास्त दिवस लागले.
वाढत्या उन्हाचा त्रास कमी व्हावा म्हणून मी जागा बदलली. जवळच असलेल्या चिंचेच्या झाडाखाली बसून लिहिलेल्या नोंदी वाचत होतो. तेवढ्यात एक खारुताई तोंडात कापूस घेऊन जाताना दिसली. ती खोडावर चढली, नंतर फांदीवर. फांदीच्या काटक्यात कापसाचा पुंजका दिसू लागला. तिचं ते घर होतं. ती घरट्यात गेली.
झाडाखाली बसून तीन तास झाले. धनेशचा आवाज ऐकू आला नाही. तो ढोलीकडे अजूनही फिरकला नाही म्हणून ढोलीत बसलेल्या मादीला काळजी वाटत असावी. मी ढोलीला पाहून परत चिंचेखाली यायचो. मादी ढोलीतून चोच बाहेर काढी. तिला भूक लागली असावी असं वाटे. धनेशला स्वतःच्या बायकोची काळजीच नाही. कोणत्या मोहाला बळी पडला काय माहित? उगाच मी धनेशवर राग-राग करू लागलो. घरट्यात गेलेली खारुताई खाली का बरं आली नाही म्हणून वर पाहिले. काय आश्चर्य! धनेश चिंचेच्या फांदीवर बसलेला दिसला. त्याचा आवाज ऐकू यावा म्हणून कानात प्राण आणले. ढोलीकडे जावून आलो. त्याच्यावर राग काढला. तर हे महाशय चिंचेच्या सावलीत आराम करत बसलेले दिसले. धनेश पक्ष्याची दुपारच्या वेळी आराम करण्याची जागा कळाली.
तो दररोज दुपारी 2-3 तास चिंचेच्या सावलीत बसायचा. मी सुद्धा झाडाखाली पडून राहायचो. तो पंख साफ करायचा. फांदीवरच्या बसण्याच्या जागा बदलायचा. शेंड्याकडे जाऊन ढोलीकडे पाहायचा. पुन्हा गळफांदीवर येऊन बसायचा. त्याचं माझ्या आसपास असणं माझ्यासाठी सुखावणारी गोष्ट होती. त्याला डोळे भरून पाहता आलं. त्याला पाहण्यासाठी दुर्बीण किंवा कॅमेऱ्याची गरज नव्हती. उघड्या डोळ्यांनी त्याची सुंदरता टिपता आली. त्याच्याविषयीच्या नोंदी करत गेलो.
“शरीराचा रंग राखाडी तरीसुद्धा अंगावर विविध छटा दिसून यायच्या. चोचीची वरची आणि खालची बाजू अर्ध्यापर्यंत पांढऱ्या रंगाची दिसत होती. शिंगाचा रंग काळपट तसा उर्वरित चोचीचा रंगही काळपटच! डोळ्याचा रंग लाल आणि आतील बुबुळाचा रंग जणू काळा ठिपका! डोळ्याची कडा काळपट. भुवईपासून जाड पांढऱ्या रंगाची पिसं मानेपर्यंत वळालेली दिसून आली. सगळा गळा राखी रंगाचा. खांद्यावरील दोन्ही बाजूच्या पंखांवर हलकेसे खवले असल्यासारखी पिसे दिसून यायची. शेपटीकडील पिसांचा रंग थोडा गडद राखाडी रंग जाणवायचा. मानावरील रंगापेक्षा किंचित अधिकचा होता. गुडघ्यापर्यंतची पिसे पांढऱ्या रंगाची होती. बोटापर्यंतचा भाग मात्र उघडाच! परंतु त्या उघड्या भागावर देखील पाच-सहा पांढरे पट्टे गोलाकार दिसून येत असत. एका पायाला चार बोटं. दोन्ही पायांचे मिळून 8 बोटं. नखाचा रंग काळपटच!”
कधी- कधी धनेश शेंड्याकडील फांदीवर बसायचा तेव्हा त्याचं निरीक्षण करणं अवघड व्हायचं. तो अस्पष्ट दिसायचा .त्याची खाली येण्याची वाट पाहायचो. काही दिवस तो खाली उतरलाच नव्हता. हळू-हळू आमची ओळख झाली. त्याला माझ्यापासून काही धोका नाही हे कळालं असावं. मी खोडाला टेकून बसायचो. हातात नोंदवही व पेन घ्यायचो. तो खालच्या फांदीवर आला की, नोंदवहीत टिपण लिहायचो.
“माझ्या डावीकडून धनेशच्या शेपटीचे पहिले पंख थोडे खराब (डॅमेज) झालेले होते. त्यानंतरचे तीन पंख सारखेच दिसायचे. पाचव्या क्रमांकाचे पंख सर्वात लांब होते. त्याच्या टोकाला पांढरा पट्टा नव्हता. इतर सातही पंखांच्या टोकाला पांढरा पट्टा त्यानंतर काळा पट्टा आणि उर्वरित पंखाचा रंग राखाडीच होता. शेवटचे तीन पंख एकसारखेच होते. सातव्या क्रमांकाच्या पंखाचा रंग इतर पंखांपेक्षा फिकटच जाणवायचा. त्यामुळे ते पंख लगेच ओळखून पडत असे.”
त्याने गळफांदीवर बसून पंख साफ केले. आता तो वरच्या फांदीकडे सरकला. मी दुर्बीण आणि कॅमेरा घेतला. पाम ट्री खाली जाऊन बसलो. तो चिंचेवरून वेंधळेपणाने उडत- उडत नारळाच्या दिशेनं झेपावला. तेव्हा दोन साळुंक्यांनी किती कलकलाट केला?
तो ढोलीजवळ बसला. मादीने ढोलीतून चोच बाहेर काढली. दोघांचा मूकसंवाद सुरू होता. काय बोलत असतील ते, त्या दोघांनाच ठाऊक?
कधी – कधी धनेश कोणतीही पूर्वसूचना न देता ढोलीकडे यायचा. त्यावेळी साळुंक्या तिथं नसायच्या. दोन्ही साळुंक्या चिंचेच्या पलिकडे गवतात काहीतरी टिपताना दिसायच्या. त्यावेळी साळुंक्यांचा आवाज येत नसे. ढोलीकडे आलेला धनेशसुद्धा आवाज काढून कळवित नसे. पण ढोलीतल्या मादीला नर आल्याचे लगेच कळायचे. ती ढोलीच्या फटीतून चोच बाहेर काढी. धनेश कडुलिंबाच्या फांदीवर येऊन बसे. तिथून नारळाच्या झाडाकडं झेप घेई. ढोलीजवळ अलगदपणे बसून घशातून फळे काढायचा. मादीला भरवायचा. तेव्हा त्याच्या खाऊ घालण्यात अजिबात गडबड किंवा गोंधळ नसायचा. सगळी फळं खाऊ घातल्यानंतर अर्धा – एक मिनिट तिथंच बसायचा. जणू तिच्यासोबत काहीतरी बोलायचा. सगळा मूकसंवाद चालायचा. एखादा मूक चित्रपट पाहावा तसं सगळं दृश्य समोर दिसायचं.
तो तिच्याशी संवाद करू लागला तसा साळुंक्यांनी बाजार भरवला. साळूंक्यांनी सगळं रान डोक्यावर घेतलं. पण त्यांच्या संवादात तसूभरही फरक पडला नाही. तो ढोलीजवळून उडाला. नाल्याच्या दिशेनं निघून गेला. तो 20 ते 22 मिनिटे ढोलीकडे येणार नव्हता. 1.2 कि.मी. अंतरावर असलेल्या वडाच्या झाडाची फळं आणायला गेला होता. माझ्याकडे 20 मिनिटे होती. तेवढ्या वेळात रेल्वे स्थानकात जाऊन चहा पिऊन आलो. येताना पाण्याची एक बॉटल घेऊन आलो होतो.
… दीड महिन्यापूर्वीची गोष्ट आठवते. पहाटे पक्षीनिरीक्षणासाठी विद्यापीठ परिसरात भटकंती सुरू होती. अचानक धनेश पक्ष्यांचा आवाज ऐकू आला. त्यावेळी मी खाली पडलेल्या बहाव्याच्या शेंगा गोळा करीत होतो. बहाव्याच्या झाडाजवळ एक कडुलिंबाचं झाड होतं. त्या झाडावर धनेश विराजमान झाला. मी हातातल्या शेंगा खाली ठेवून त्याच्याकडे पाहत होतो. तो मात्र निलगिरीच्या दिशेनं पाहत होता. 200 मी. अंतरावर दुतर्फा निलगिरीची अनेक झाडं दिमाखात उभी होती. जणू आकाशाकडं झेपावलेली. त्या झाडांमधून कि- कि – किया असा आवाज ऐकू आला. माझ्या जवळच्या धनेशने लांबलचक हाळी दिली. आवाज देताना शेपटी सारखी खाली-वर हलताना दिसली.
तो निलगिरीच्या दिशेनं उडू लागला. मी त्याचा पाठलाग केला. तो झोकांड्या देत वेंधळेपणाने उडताना दिसला. मध्येच तो दोन-चारदा पंख फडफड करायचा. त्यानंतर पंख वर उचलून थोडेसे अंतर तरंगत पुढे जायचा. त्याची उडण्याची लकब पाहून मला हसू फुटायचं.
त्यांनं निलगिरीचं झाड जवळ केलं. मला जायला थोडासा उशीर झाला. त्यांचा कि- कि-किया असा आवाज येत होता. त्या आवाजाचा माग काढत मी दुतर्फा झाडीत पोहोचलो होतो. एका फांदीवर नर आणि मादी बसलेले दिसले. एकमेकांचा लाड पुरवित होते. नर स्वतःच्या गळ्यातील पिशवी हलवून पिपरं बाहेर काढी. ती फळं चोचीच्या टोकाला अलगद घरंगळत येऊन बसायची. तो तिला भरवायचा. ती सुद्धा कोणतेही आढेवेढे न घेता त्यानं दिलेली फळं आवडीनं चाखायची. त्या दोघांनी अनेक झाडांच्या ढोल्या तपासून पाहिल्या. मी त्यांच्या मागावरच होतो.
धनेशची जोडी नारळाच्या फांदीवर उतरली. त्या झाडाच्या खोडात सुतार पक्ष्यांनी बनविलेल्या काही ढोल्या होत्या. मादी ढोल्यांची पाहणी करू लागली. ती ढोलीत बसून पाहायची. एक ढोली आवडली. त्यांचा निर्णय पक्का झाला. मादीने ढोलीचा ताबा घ्यायला सुरुवात केली. ती ढोलीतून बाहेर यायची अन् पुन्हा आत जावून बसायची. तो परिसराची पाहणी करायला गेला. फळाची मोठी झाडं कुठे आहेत? ढोलीचे आणि फळांच्या झाडांचे अंतर किती? फळे घेऊन आल्यावर थांबायचे कोठे? लपण्यासारखी जागा त्याला शोधायची होती आणि बरंच काही…
दोघंही निलगिरीच्या झाडावर बोलत बसायचे. जवळच्या शिरीषच्या पानाआड लपायचे. त्यांना लपण्यासाठी ते झाड उपयोगी पडायचं. त्यानंतर कडुलिंबाचं झाड आणि लगतच नारळाच्या खोडातली ढोली. सगळं कसं त्यांच्या मनासारखं घरदार भेटलेलं.
नारळाच्या आणि चिंचेच्या झाडादरम्यान अंजीराची बाग होती. अंजिरालगत पाम ट्री ची पाच झाडं. झाडांपलिकडे पेरूची बाग आणि पेरूची बाग संपली की, सागाची काही उंच झाडं. सगळ्या परिसरात झाडंच झाडं !
अंजिराच्या झाडांना मोठाले आळे केलेले. 10-15 दिवसांनी या झाडांना पाणी दिलं जायचं. आज रान भिजवलेलं होतं म्हणून सगळीकडची माती ओली होती. मी पाम ट्री खाली बसलो होतो. मादी ढोलीत बसलेली होती. नर नारळाच्या फांदीवर. त्यानं अचानक जमिनीवर झेप घेतली. मी त्याच्याकडे कॅमेरा फिरवला. तो चोचीच्या साहाय्याने चिखलाचा गोळा करत होता. काही सेकंदात त्याने तो चिखलाचा गोळा उचलला आणि ढोलीकडे गेला. त्याने मादीला चिखल दिला. तिने तो चिखल ढोलीच्या बाजूने लिपायला सुरुवात केली. असं अनेक वेळा त्याने ओली माती मादीला दिली. तिनं स्वतःच घरटं बनवायला सुरुवात केली. ती स्वतःला दीड महिन्यांसाठी बंद करून घेत होती. ढोलीची कडा पुढं आलेली दिसायची. आपल्या चोचीचा वापर थापीसारखा करायची. मी जिथं बसलो होतो तिथपर्यंत तो आवाज यायचा. ती सारखं मातीला थापत राहायची.
मी ढोलीकडे नजर ठेवूनच होतो. स्वतःला विचलित होवू न देता धनेशच्या जोडीचे बारीक-सारीक तपशील टिपायचो. काहीही झालं तरी धनेशची ढोलीकडची फेरी चुकवायची नव्हती. त्याला पाहिल्याशिवाय माझ्यातला पक्षी निरीक्षक शांत बसणार नव्हता.
साळूंक्यांनी कलकलाट केला अन् मी नारळाकडे पाहू लागलो. नाल्याच्या दिशेकडून धनेश आला. ढोलीजवळ बसून तिला वडाची फळं भरवीत होता. तो ढोलीजवळ बसला त्यावेळी शेपटीकडचे आठ पंख पसरून नारळाच्या खोडाला चिकटलेले दिसायचे. तो तिथं बसण्यासाठी शेपटीचा आधार घ्यायचा. तो पुन्हा – पुन्हा फळं घेऊन यायचा. ती दोन जीवाची होती. तिची काळजी तो नाही तर कोण घेईल?
तिनं ढोलीत अंडी दिली होती. पण नेमकी किती? हे कळायला मार्ग नव्हता. त्यांचा पूर्वीसारखा कि-कि-किया असा आवाजही कमी झालेला. धनेश पक्ष्याच्या कुळातील एका पक्ष्याचा इतर पक्ष्यांशी संवाद सुरू असतो का? मादी ढोलीत बंदिस्त असल्यावर तो इतर पक्ष्यांना भेटतो का? तो एखाद्या मादीच्या मोहाला बळी पडला तर? त्याचा रस्त्यात घातपात झाला तर मादीचं कसं होणार? तिनं दिलेली अंडी कुणाच्या भरवशावर वाढवायची? मनात असे भलते – सलते प्रश्न आले की, डोक्याचा भुगा व्हायचा. पुन्हा एका प्रश्नानं डोकं वर काढलंच. ढोलीतील एका अंड्याचा दुसऱ्या अंड्याशी संवाद सुरू असतो का?
मी एका दिवशी नारळाच्या झाडाजवळून चालत होतो. तेवढ्यात झाडाच्या खोडावरचा टक् टक् आवाज ऐकू आला. मला वाटलं एखादा सुतार पक्षी खोडावर चोचीने आघात करत असावा. नारळाच्या चहूबाजूने फेरी मारली पण सुतार पक्षी नजरेस पडला नाही. बाजूच्या दोन नारळाजवळ गेलो. तिथं काही खाणाखुणा सापडतात का? याचा शोध घेऊ लागलो. कानात प्राण आणून त्या आवाजाचा वेध घेऊ लागलो. पण त्या आवाजाची पुसटशी कल्पनाही येत नव्हती. जेव्हा मादी ढोलीला लिपत होती तेव्हा त्या लिपण्याचा आवाज येई. पण आता तर ढोली पूर्ण झालेली. ढोलीला दोन्ही बाजुंनी लीपून घेतलेलं होतं. एक लहानशी फट ठेवलेली. त्या फटीतून रसाळ फळं मादीला भरवित असे. खरं तर ढोलीला दोन दार बसविल्यासारखंच दिसायचं.
मी खोडाजवळ जावून डोकं टेकविलं. त्यानंतर कान लावून आवाज ऐकू लागलो. मादी ढोलीत बसून काहीतरी काम करत होती. त्या आवाजावरून कळायचं की, ती आतून ढोलीचा आकार मोठा करीत असावी. अंड्यातून पिल्लं बाहेर आल्यावर त्यांना पुरेशी जागा मिळावी म्हणून ती सतत कामात व्यस्त असायची.
धनेश पक्षी दररोज किती वेळा मादीला खाऊ घालतो याविषयीचे निरीक्षण नोंदवहीत टिपत होतो. कधी पहाटे 5:18 वाजता ढोलीसमोर बसून नोंदी घेतल्या तर कधी सायंकाळी 7:36 वाजेपर्यंतची निरीक्षणे नोंदवहीत नोंदविता आली.
तो सकाळपासून संध्याकाळपर्यंत मादीला वेगवेगळ्या फळांची, नाकतोड्यांची मेजवानी द्यायचा. तो दररोज ठराविक वेळेला खाऊ घालतो असे अजिबात नाही. त्याची खाऊ घालण्याची वेळ बदलत राहते. पण एकदा खाऊ घातल्यानंतर तो कोणत्या दिशेला आणि कोणत्या झाडाकडे वळला यावरून त्याच्या येण्याची वेळ मात्र अचूक सांगता येऊ लागली. मादीला खाऊ घालण्यात फारच विविधता होती. वड, पिंपळ, अंजीर, कडुलिंब अशोक, जांभूळ आणि उंबराची फळे तर सरडा, नाकतोडा, गोगलगाय, उधळ्या, किटक, अळ्या खावू घातल्याची नोंद करू लागलो.
भौगोलिक परिसर बदलला की, धनेशच्या आहारातही बदल झालेला दिसून येतो. जसे की, विदर्भात आढळणाऱ्या राखी धनेशला बिब्याची फुलं फार आवडतात. चारोळी आवडीने खातात. पण ही झाडे परभणी विद्यापीठ परिसरात नसल्यामुळे ती नोंद माझ्या डायरीत नव्हती. कोकणात आढळणाऱ्या धनेशच्या आहारात अजून विविधता आढळून येते.
धनेशने ढोलीसाठी निवडलेल्या झाडातही विविधता दिसून येते. जसे की, मला नारळाच्या खोडात ढोली आढळली. पण सगळीकडेच अशी परिस्थिती असेलच असे नाही. धनेश पक्ष्याला ढोलीसाठी झाड महत्त्वाचे असते. ते झाड कोणते का असेना! नवेगाव बांध परिसरात अर्जुनाच्या ढोलीत धनेशची विण आढळल्याची नोंद पक्षीतज्ज्ञ मारुती चितमपल्ली यांनी केली आहे. कोकणात आंब्याच्या ढोलीत वीण आढळते. असो..
दीड महिन्याच्या काळात ती स्वतःची आणि ढोलीची स्वच्छता कशी ठेवत असावी याचा शोध सहज लागला. नेहमीप्रमाणे पहाटेच पाम ट्री खाली पोहोचलो होतो. दुर्बिण डोळ्याला लावली. अजून काहीच हालचाल जाणवत नव्हती. धनेशचा कि-कि- किया असा आवाजही ऐकू येत नव्हता. साळुंक्या अजून ढोलीतून बाहेर आल्या नव्हत्या. आज साळुंक्या आळसावल्या होत्या असंच वाटे. त्यांचा कलकलाट सुद्धा नव्हता.
धनेश कडूलिंबावर उतरला तेव्हाच तो आल्याचं कळालं. तो ढोलीकडे सरकला. मान खाली- वर केली. घशातून हिरव्या रंगाचा नाकतोडा बाहेर काढला. तो नाकतोडा चोचित घेऊन ढोलीच्या फटीतून मादीला खाऊ घालत होता पण यावेळी धनेशच्या पंखाची उघडझाप झाली आणि नाकतोडा खाली पडला. मला वाटले धनेश जमिनीवर पडलेला नाकतोडा उचलून पुन्हा मादीला खावू घालीन. पण तसे झाले नाही. तो शिरीषच्या उंच ठिकाणी जावून बसला. दोन साळुंक्यांनी त्याचा पाठलाग केला तशी त्याने चोच फिरविली. तशा साळुंक्या माघारी वळाल्या.
धनेशने पूर्व दिशेला भरारी घेतली. तो नाल्याच्या दिशेने निघून गेला. आमची दोघांची अनेक वेळा नाल्याजवळ भेट व्हायची. तेव्हा तो मला ओळखायचा की नाही हे मला सांगता येणार नाही पण मी मात्र त्याला ओळखायचो.
त्याच्या चोचीतून खाली पडलेला नाकतोडा पाहण्यासाठी नारळाच्या झाडाखाली पोहोचलो. तिथं खाली पडलेली मादीची दोन पिसे सापडली. जवळच नाकतोडा दिसला. त्या नाकतोड्याला मुंग्या लागायला सुरुवात झालेली. खरं तर त्या झाडाखाली मुंग्यांची रांगच होती. धनेशच्या चोचीतून अनेक वेळा नाकतोडे पडत असावेत हे मुंग्यांना ठाऊक झालेलं असावं. अधून- मधून एखादा सरडा सुद्धा खावू घातल्याचा पुरावा सुद्धा तिथे सापडला.
लहानशा पिशवीत दोन पिसे जमा केली. नाकतोड्याचा फोटो काढला. ते मुंग्याचं अन्न होतं म्हणून त्या नाकतोड्याला जास्त हलवलं नाही. तिथं अजून काही वस्तू सापडल्या. त्या सापडलेल्या वस्तूंना समजून घेत होतो.
झाडाच्या सालीचे काही तुकडे झाडाखाली आढळले. त्या तुकड्यांवर धनेशची शीट (विष्ठा) असावी असा अंदाज बांधला. पण धनेश अशा ढलप्यावर शीट का बरं टाकत असावा? हातात ग्लोज घालून त्या सालीचे तुकडे म्हणजे ढलप्या उचलून निरीक्षण केले. दोन ढलप्यावर पक्ष्यांची शीट चिकटलेली होती. तीन ढलप्यावर शीट टाकलेली होती परंतु ती शीट वाळून बाजूला पडलेली दिसली. अजून दोन ढलप्या आढळल्या पण त्यावर शीट नव्हती. त्या सगळ्या वस्तूच्या नोंदी घेतल्या आणि त्या वस्तू पिशवीत जमा केल्या.
मी झाडाखाली पडलेला नाकतोडा पाहण्यासाठी आलो होतो पण इथं तर अनेक गुपिते उघड झाली.
धनेश तिला लहान आकाराच्या ढलप्या द्यायचा. त्या ढलप्यावर ती विष्ठा टाकायची. त्या ढलप्या ढोलीच्या फटीतून बाहेर द्यायची. कधी- कधी त्या ढलप्या झाडाखाली पडायच्या. मी जमा करायचो. ढोली स्वच्छ ठेवण्याची अशी सुद्धा पद्धत असू शकते याचं नवल वाटलं.
काही दिवसांनी मादी ढोलीतून काहीतरी बाहेर फेकून द्यायची हे कळालं पण काय फेकून देत असावी यासाठी मी ढोलीच्या फटीकडेच कॅमेरा लावून बसलो. तेवढ्यात मादी ढोलीच्या फटीतून एक पिस बाहेर टाकायचा प्रयत्न करू लागली. शेवटी तिने ते पिस बाहेर फेकून दिलं. आजची नोंद नवीन होती. यापूर्वी फटीतून खाऊ घालताना पाहिलय. पण आज मादीनं अंगावरची गळून पडलेली पिसे बाहेर फेकून दिली. गळून पडलेल्या पिसामुळे तिला आत बसण्यासाठी अडचण होत असावी. तिनं ती पिसे बाहेर टाकली.
जर मादीची शीट पातळ असली तर धनेश कोणत्या झाडांची वाळलेली ढलपी आणत असावा? व्यक्तिंना किंवा प्राण्यांना जुलाब लागते तेव्हा त्यांची काय अवस्था होते हे अनुभवलेलं असतं किंवा पाहिलेलं तरी असतं. पण जर पक्ष्यांना जुलाब लागली तर त्यांची काय अवस्था होईल?
कोणत्या झाडाची ढलपी पाणी किती शोषून घेऊ शकते याची धनेशला चांगलीच माहिती असली पाहिजे. त्यासाठी त्याने अनेक दिवस ढलप्यांचा कुस्करून अभ्यास केला आहे. अभ्यास म्हणजे काय? तर त्याने मादीला खाऊ घातलेल्या फळांवरून आणि ढलपीवर पडलेली शीट पाहून त्याने झाडांची केलेली निवड योग्यच आहे हे कळू लागते.
ढोली तयार होण्यापूर्वी धनेशला अनेक झाडावरच्या ढलप्या चोचीने बारीक करताना पाहिलय. तेव्हा त्याचा अर्थ कळत नव्हता. पण आज या ढलप्यांचा उपयोग किती योग्य पद्धतीने करतात याचच नवल वाटतं.
धनेशने आणलेल्या ढलप्या औषधी गुणधर्माच्या होत्या. कडुलिंब, शिरीष आणि आंबा या झाडांची साल औषधोपचारासाठी वापरली जाते. त्या झाडातील गुणधर्म धनेशला माहित आहेत. त्यामुळे ढोलीच्या स्वच्छतेसाठी अशा झाडांच्या ढलप्यांची निवड केली होती हे कळू लागते.
पक्ष्यांच्या प्रजातीत कावळा हुशार मानला जातो. तो घरटी बांधताना किंवा शिकार करताना वेगवेगळ्या युक्त्या वापरताना पक्षीअभ्यासकांना आढळून येतो. पण धनेशची हुशारी सुद्धा नजरेआड करता येणार नाही.
सुरुवातीला मी फक्त धनेशकडेच पाहायचो. तो कसा खावू घालतो हे पाहण्यात वेळ जायचा. परंतु तो जेव्हा फळं किंवा सरडे आणायला जायचा तेव्हा मी नोंदी करायचो. ढोलीकडे पाहत नसे तेव्हा मादी ढोलीतून काहीतरी फेकून द्यायची हे कळायचं नाही. पण खाली आढळलेल्या वस्तू पाहिल्यावर मी सतत ढोलीचे निरीक्षण करू लागलो.
झाडाखाली आढळलेल्या वस्तूंची यादी तयार करायचो. नाकतोडे, सरडे, गोगलगाय शंख, ढलप्या (झाडाच्या सालीचे तुकडे), मादीची शीट, मादीचे गळून पडलेली पिसे, पांढरी शीट, कडुलिंबाच्या बिया, अशोकाच्या बिया, अंड्यांची टरफले ( निळसर रंगाची), एक तुटलेले पिस इ.
पण झाडाखाली आढळलेल्या ढलप्याची गोष्ट भारीच होती!
घरी आणलेल्या ढलप्याचं निरिक्षण केल्यावर कळालं की, त्या केवळ बदामाच्या ढलप्या नव्हत्या. शिरीष, कडुलिंब आणि आंबा या झाडांच्या वाळलेल्या ढलप्या होत्या.
धनेशला ढलप्या शोधण्यासाठी फार मेहनत घ्यावी लागत नसे. त्या जवळच उपलब्ध होत्या. पण त्या ढलप्याचा आकार लहान करण्यासाठी त्याची धडपड असे. ढोलीच्या फटीचा आकार आणि आणलेल्या ढलपीचा आकार याचं गणित त्याला जुळवावं लागायचं. त्यासाठी त्याच्या कामातली अचूकता कळू लागली.
एका दिवशी नाल्याजवळ धनेशची भेट झाली. तो वडाची फळं आणायला गेला होता. मी नारळाच्या झाडाखाली पोहोचलो. मागोमाग धनेश माझ्या डोक्यावरून वेंधळेपणाने उडत कडुलिंबाच्या झाडाकडे झेपावला. काहीतरी वाजल्याचा आवाज आला. मी डोलीकडे पाहिले. मादी चोच बाहेर काढण्याचा प्रयत्न करू लागली. ढोलीचा उजवा दरवाजा चोचीच्या साह्याने तोडण्याचा प्रयत्न करू लागली. तिची चोच घसरायची. तिचे प्रयत्न सुरूच होते. अखेर तिला बाहेर पडता येईल एवढी जागा तयार केली. ती हळूवारपणे त्या ढोलीतून बाहेर आली. कडूलिंबाच्या फांदीवर बसली. ती दिवसभर त्या झाडावरच होती.
पुढील दीड महिन्यासाठी तिची पिल्लं त्या ढोलीत स्वतःला बंदिस्त करून घेणार होती. सायंकाळची वेळ. आकाशात ढग जमा होऊ लागले. गार वारा अंगाला बिलगून जाई. अंधार हळू-हळू हात- पाय पसरू लागला. तेव्हा मी घराकडे वळालो.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
