प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार 22 व 26 एप्रिल रोजी मराठवाडयात तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 22 एप्रिल रोजी नांदेड, लातूर व धाराशिव जिल्हयात तर दिनांक 23 एप्रिल रोजी परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, धाराशिव व लातूर जिल्हयात तर दिनांक 24 एप्रिल रोजी परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, धाराशिव, जालना व लातूर जिल्हयात तर दिनांक 25 एप्रिल रोजी मराठवाडयातील सर्व जिल्हयात तूरळक ठिकाणी उष्ण व दमट वातावरण राहण्याची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील चार दिवसात कमाल तापमानात हळूहळू 2 ते 3 अं.से. ने वाढ होऊन त्यानंतर हळूहळू 1 ते 2 अं.से. ने घट होण्याची तर पुढील दोन दिवसात किमान तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही व त्यानंतर 1 ते 2 अं.से. ने घट होण्याची शक्यता आहे.
सामान्य सल्ला :
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 25 एप्रिल ते 01 मे 2025 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी, कमाल तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा जास्त व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.
सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयात बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे.
वाढत्या तापमानामूळे व वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामुळे पिकात, फळबागेत, भाजीपाला व फुल पिकास आवश्यकतेनूसार सकाळी किंवा संध्याकाळी पाणी व्यवस्थापन करावे.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
काढणी केलेल्या हळद पिकाची उकडणे, वाळवणे व पॉलीश करणे ही कामे करून मालाची सुरक्षित ठिकाणी (गोदामात) साठवणूक करावी. उन्हाळी भुईमूग पिकात आवश्यकतेनूसार तुषार सिंचन पध्दतीने पाणी व्यवस्थापन करावे. भुईमूग पिकात आऱ्या सुटल्या नंतर अंतर मशागत करू नये. उन्हाळी भुईमूग पिकात रसशोषण करणाऱ्या (मावा, तुडतुडे, फुलकीडे व पांढरी माशी) कीडींना आकर्षीत करण्यासाठी एकरी 10 ते 12 पिवळे व निळे चिकट सापळे लावावेत व तंबाखूवरील पाने खाणाऱ्या अळीचे व लाल केसाळ अळीचे समूहातील अंडी लहान अळ्या हाताने वेचून नष्ट कराव्यात. उन्हाळी भुईमूग पिकात रसशोषण करणाऱ्या किडींचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंचा ॲझाडिरेक्टिन (30 पीपीएम) 3 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
फळबागेचे व्यवस्थापन
घड लागलेल्या केळी झाडांना काठीने आधार द्यावा. काढणीस तयार असलेल्या केळीच्या घडांची काढणी लवकरात लवकर करून घ्यावी. केळी बागेस आवश्यकतेनूसार सरी वरंब्याने पाणी द्यावे. जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी केळी फळझाडाच्या आळयात आच्छादन करावे. नविन लागवड केलेल्या केळीच्या रोपांचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी रोपांना सावली करावी. काढणीस तयार असलेल्या आंबा फळांची काढणी करून घ्यावी. आंबा बागेत पाण्याचा ताण बसल्यामूळे फळगळ होऊ शकते, फळगळ होऊ नये म्हणून आंबा बागेत आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी आंबा फळझाडाच्या आळयात आच्छादन करावे. नविन लागवड केलेल्या आंब्याच्या रोपांचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी रोपांना सावली करावी. काढणी राहिलेल्या द्राक्ष फळांची काढणी करून घ्यावी. द्राक्ष बागेतील माती मोक्ळी करून खत व्यवस्थापन करावे. द्राक्ष बागेमध्ये एप्रिल छाटणी ही घड निर्मितीसाठी केली जाते. द्राक्ष बागेत एप्रिल छाटणी 15 एप्रिल ते 15 मे या दरम्यान करावी.
भाजीपाला
काढणीस तयार असलेल्या भाजीपाला, टरबूज, खरबूज पिकांची काढणी करून घ्यावी. भाजीपाला पिकात खूरपणी करून भाजीपाला पिक तण विरहीत ठेवावे. नविन लागवड केलेल्या रोपांना आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. भाजीपाला ( मिरची, वांगे व भेंडी) पिकात रसशोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यस्थापनासाठी पायरीप्रॉक्सीफेन 5% + फेनप्रोपाथ्रीन 15% 10 मीली किंवा डायमेथोएट 30% 13 मीली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
फुलशेती
फुल पिकात खूरपणी करून फुल पिक तण विरहीत ठेवावे. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी करून बाजार पेठेत पाठवावी.
पशुधन व्यवस्थापन
आपल्या पशुंना उन्हामध्ये बांधु नका (निदान तिव्र उन्हाच्या कालावधीमध्ये त्यांना झाडाखाली/सावलीमध्ये किंवा शेड/गोठ्यामध्येच बांधणे चांगले). पशुंना शक्यतो थंड/स्वच्छ/मुबलक पाणी दोन-तिन वेळेस पाजावे. पाण्यामुळे पशुंच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी (डीहायड्रोजन) होणार नाही. जमल्यास पाण्यामधून क्षार द्यावेत, 5 लिटर पाण्यामध्ये चिमुटभर गुळ (25 ग्रॅम), थोडे मिठ (5-10 ग्रॅम) आणि 5 ग्रॅम क्षार मिश्रण दिल्यास उत्तम, मात्र नजीकच्या पशुवैद्यकाचा सल्ला घेऊनच व्यवस्थापन करावे.
सौजन्य
मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.