April 14, 2024
Bapusaheb Parulekar an outstanding parliamentarian lawyer
Home » उत्कृष्ट संसदपटू ‘विधीज्ञ’ बापूसाहेब परुळेकर
सत्ता संघर्ष

उत्कृष्ट संसदपटू ‘विधीज्ञ’ बापूसाहेब परुळेकर

संसदीय लोकशाहीमध्ये मतदारांना ज्याप्रमाणे आपला प्रतिनिधी निवडून देण्याचा हक्क असतो त्याचप्रमाणे प्रतिनिधींना नाकारण्याचा (राईट टु रिजेक्ट) आणि हे नकारात्मक मत नोंदविण्याचा हक्क असतो असे सर्वोच्च न्यायालयाने एका निर्णयाने स्पष्ट केले होते. निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत केले होते. ही घटना निवडणूक प्रक्रियेमधील महत्वाची घटना होती. यासाठी लोकसभेमध्ये आपल्या कार्यकाळात आग्रही भूमिका घेण्याचे व तसा अशासकीय ठराव मांडण्याचे काम बापूसाहेबांनी केले होते.

धीरज वाटेकर
चिपळूण, मो. ९८०६०३६०९४८

कोकणातील ज्येष्ठ विधीज्ञ आणि माजी खासदार चंद्रकांत उर्फ बापूसाहेब परुळेकर (९४) यांचे गुरुवारी (ता. २७ जुलै) सकाळी वृद्धापकाळाने राहात्या घरी निधन झाले. कोकणाचा बौद्धिक वारसा पुढे नेणारं एक खंबीर वैचारिक नेतृत्व काळाच्या पडद्याआड झाल्याची अस्वस्थता मनात दाटून आली. मन भूतकाळात गेले. साधारणपणे वीस वर्षांपूर्वी १८ जुलै २००४ रोजी सावंतवाडी येथील भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालयात, पर्यावरण व वन मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या वतीने संपन्न झालेल्या ‘जल-जीवन अमृत’ कार्यशाळेत आम्ही ‘लिखित-दिग्दर्शित’ केलेली ‘कोयना अवजल : कोकणातील पाणी समस्येवरील एक उपाय’ ही टेलिफिल्म प्रथम प्रदर्शित झाली होती. त्याच दिवशी कॉलेजच्या दूरध्वनीवर संपर्क साधून बापूसाहेबांनी आमच्यासाठी, ‘कोयना अवजलच्या सीडीसह येऊन भेटावे’ असा निरोप ठेवला होता.

तेव्हा आमच्याजवळ मोबाईल नव्हते. सावंतवाडीत सुरु असलेल्या कार्यशाळेची माहिती घेऊन जिल्ह्याच्या माजी खासदार राहिलेल्या व्यक्तीने भेटीसाठी निरोप ठेवण्यातील तत्परता पत्रकारितेत वावरत असूनही चौवीस वर्षांच्या आमच्यासाठी एकदम नवीन आणि धक्कादायक होती. त्यानंतर याच विषयाला अनुसरून बापूसाहेबांसोबत आमच्या एक-दोन भेटी झाल्याचे आठवते. गप्पा मारताना विविध घडामोडी सांगण्यातील त्यांची सहजता आणि प्रसन्न शैली अफलातून होती. त्यांची अल्पकालीन खासदारकी जिल्ह्यासाठी दुर्दैवी बाब होती. या प्रत्यक्ष भेटीतून त्यांच्याविषयी आमच्या मनात एक विलक्षण कृतज्ञता निर्माण झाली ती कायमची! अगदी आम्ही लिहिलेल्या आणि अलिकडे बाजारात उपलब्ध झालेल्या, भारत सरकारच्या ‘हाफकिन’ संस्थेने शोधलेल्या विंचूदंशावरील लसीचे ‘प्रवर्तक’ आमदार डॉ. श्रीधर दत्तात्रय उर्फ तात्यासाहेब नातू या दैवी अंश लाभलेल्या डॉक्टरांच्या जीवनचरित्रातही प्रसंगानुरूप बापूसाहेबांच्या आठवणी नोंदवल्यात. नोव्हेंबर १९७०-७१च्या रत्नागिरी दौऱ्यात अटलजींचे दुपारचे भोजन हे बापूसाहेबांकडे झाले होते. आणीबाणीनंतर जनता पक्षाने, रत्नागिरी लोकसभेसाठी परिचित चेहऱ्याच्या, निगर्वी आणि नम्र स्वभाव असलेल्या बापूसाहेबांना उभे केले होते. तत्पूर्वी १९७१च्या निवडणुकीतही त्यांना जनसंघाने तिकीट दिले होते. तेव्हा त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. आणीबाणीनंतरच्या निवडणुकीत बापूसाहेब निवडून आले होते. तेव्हा दोन पोती गुलाल उधळून कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला होता. देशात पहिले बिगर काँग्रेसी सरकार स्थापन होण्यासोबत जयप्रकाश नारायण यांची लढाईही यशस्वी झाली होती. ऑक्टोबर १९७९च्या सातव्या लोकसभा निवडणुकीत उत्तर रत्नागिरी लोकसभा मतदार संघातून बापूसाहेब पुन्हा एकदा निवडून आले होते. उत्कृष्ट वक्तृत्व, अभ्यासू वृत्तीच्या जोरावर त्यांनी लोकसभेत उत्कृष्ट संसदपटू म्हणून आपली मोहर उमटवली होती.

संसदीय लोकशाहीमध्ये मतदारांना ज्याप्रमाणे आपला प्रतिनिधी निवडून देण्याचा हक्क असतो त्याचप्रमाणे प्रतिनिधींना नाकारण्याचा (राईट टु रिजेक्ट) आणि हे नकारात्मक मत नोंदविण्याचा हक्क असतो असे सर्वोच्च न्यायालयाने एका निर्णयाने स्पष्ट केले होते. निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत केले होते. ही घटना निवडणूक प्रक्रियेमधील महत्वाची घटना होती. यासाठी लोकसभेमध्ये आपल्या कार्यकाळात आग्रही भूमिका घेण्याचे व तसा अशासकीय ठराव मांडण्याचे काम बापूसाहेबांनी केले होते. जाणकारांमध्ये सतत चर्चा होत राहावी म्हणून या विषयाला लोकसभेत आपल्या अभ्यासपूर्ण विवेचनाने त्यांनी चालना दिली होती. अशी नोंद ज्येष्ठ संपादक आणि विचारवंत स्वर्गीय निशिकांत उर्फ नानासाहेब जोशी यांनी आपल्या ‘प्रवाह’ सदरात केली होती. बापूसाहेबांनी १९५१मध्ये स्वतःच्या काकांच्या मार्गदर्शनाखाली वकिलीची प्रॅक्टिस सुरु केली होती. तेव्हा रत्नागिरी जिल्ह्यात पंडित, नानल, बर्वे, चितळे, जोशी असे मोजके नामांकित वकील होते. जिल्ह्याचे मुख्य न्यायालय रत्नागिरी येथे होते.

बापूसाहेबांनी अत्यंत कष्टाने समाजमान्य यशस्वी वकील अशी स्वतःची ओळख निर्माण केली होती. बापूसाहेबांच्या घराण्यात चार-पाच पिढ्यांचा वकिली व्यवसाय आहे. राजकीयदृष्ट्या ते संघ-जनसंघाशी जोडले गेले तरी त्यांच्या येथे सर्व विषयांवर वाचन, अभ्यास व व्यासंग सुरु असायचा. जयप्रकाशजींच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात ते सहभागी झाले होते. आणीबाणीतही ते तुरुंगात गेले होते. लोकसभेच्या सेंट्रल हॉलमध्ये फिरोज गांधी यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या कोपऱ्यात बापूसाहेब हे तासन् तास बसून अनेक खासदारांसोबत चर्चा करीत असत. १९७७मध्ये ते श्यामरावजी पेजे यांच्यासारख्या बलशाली नेत्याच्या विरुद्ध लोकसभा निवडणूक जिंकले होते. जनता पक्षाची राजवट कोसळल्यावर १९८०मध्ये उमर काझींचा पराभव करून ते निवडून आले होते. लोकसभेत सर्व पक्षाच्या खासदारांशी त्यांचे जिव्हाळयाचे संबंध होते. राजीव गांधीही अनेकदा त्यांचा सल्ला घेत असत. स्व. नानांसाहेबांनी लिहिलेल्या या आठवणी स्व. बापूसाहेबांच्या कर्तृत्वावर भाष्य करण्यास पुरेशा आहेत.

१९६०च्या दशकात रत्नागिरी जिल्हा संयुक्त महाराष्ट्र समितीचे चेअरमन राहिलेले स्व. बापूसाहेब हे १९७०च्या दशकात रत्नागिरी जिल्हा जनसंघाचे अध्यक्ष होते. ते लोकसभेवर दोन वेळा निवडून गेले होते. संयुक्त महाराष्ट्र समितीच्या आंदोलनासह आणीबाणी काळात मिसा कायद्यांतर्गत त्यांना १६ महिने कारावास भोगावा लागला होता. रत्नागिरीत जनसंघ-भाजपची पायाभरणी करणाऱ्यांपैकी ते प्रमुख नाव होतं. अनेकांच्या राजकीय जीवनातील आदर्श असलेल्या बापुसाहेबांचे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना घडवण्यात मोठे योगदान होते. स्व. बापूसाहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली !

Related posts

घटस्थापनेनिमित्त पंढरपूर विठ्ठल मंदिरात बांधलेली पुजा…

पुण्यात पदभ्रमंती करू इच्छिणाऱ्या डोंगरभटक्यांसाठी मार्गदर्शक असे पुस्तक

Happy Republic Day : संचालनात महाराष्ट्राची वारली कला

Leave a Comment