December 5, 2024
Miracle Garden Dubai article by Prashant Satpute
Home » दुबईचे ‘मिरॕकल’ गार्डन..!
फोटो फिचर

दुबईचे ‘मिरॕकल’ गार्डन..!

दुबईचे ‘मिरॕकल’ गार्डन..! रणरणत्या वाळवंटात उभारलेले हे मिरॕकल गार्डन पर्यटकांना पर्वणी तर आहेच, शिवाय दुबईच्या उत्पन्नात दिऱ्हम ची देखील वाढ करणारे आहे.

प्रशांत सातपुते

तब्बल ७२ हजार चौरस मीटर म्हणजेच जवळपास ७ लाख ८० हजार चौफूट बागेत १५० दशलक्ष फुलं आणि २५० दशलक्ष झाडं असलेलं जगातील सर्वात मोठं नैसर्गिक फुलांचे हे उद्यान दुबईचे अगदी खरोखरच ‘मिरॕकल गार्डन’ आहे.

एकीकडे वाळवंट, दुसरीकडे समुद्र आणि पाऊस-पाणी तर ‘नाहीच’ च्या बरोबर, अशा प्रतिकूल परिस्थितीत जगातील सर्वात मोठी बाग फुलवण्याचा चमत्कार करुन जगाला अचंबित केलं आहे. हिरव्याकंच उंचच-उंच वृक्ष राजीची विस्तीर्ण संरक्षण भिंत दिसू लागली, तसे उद्यानाजवळ आल्याचे पक्के झाले.

मिरॕकल गार्डनच्या प्रवेशद्वारावर बांबूपासून भल्या मोठ्या फुलदान्या बनवून त्यामध्ये रंग-बेरंगी फुलांचा ताटवा उभा केला आहे. जणू हा बाग पहायला येणाऱ्या पर्यटकांच्या स्वागतासाठी फुलांचा गुच्छ होय. आतमध्ये सुरुवातीलाच दोन्ही बाजूला दोन अश्वमुखाची भल्यामोठ्या प्रतिकृती हिरव्यागार वनस्पतींनी साकारली होती. त्या दोघांच्यामध्ये अगदी पुराण-पुरुष भासावा, अशा वटवृक्षाची कल्पक प्रतिकृती सिमेंटमध्ये बनवून त्यावर हिरव्या विविध झाडांची उगवण, त्यावर रंगीत फुलांचा ताटवा आणि टोकावर बसूनही जमिनीवर फुलांनी बहरलेला त्याचा पिसारा, असे दोन मोर लक्ष वेधून घेत होते.

पांढऱ्या, गुलाबी फुलांची खाली झालर लावलेली होती. फुलांचे मनोरे, पॕगोडे, टांगलेल्या छोट्या कुंड्यांची झुंबरं हा सगळा नजारा, ‘याला खरे उद्यान म्हणतात,’ हे दर्शवत होता. उजव्या बाजुला लाकडी पाणचक्की फिरत होती. खाली लाल भडक, गुलाली रंगाची झालर पसरलेली होतीच.

नजर भिरभिरत होती. ती जाईल तिथंपर्यंत नुसती फुलं, फुलं आणि केवळ फुलं दिसत होती. सोबतीला हिरवाई डवरलेली. ह्दयाच्या आकारातील आकर्षक फुलांच्या खास विविधरंगी फुलांच्या तयार केलेल्या कमानी, स्वतःभोवती गिरक्या घेणाऱ्या फुलांच्या पोशाखातील नृत्यांगना, अलादीनचा जीन, ओक च्या ड्रममधून चषकात बाहेर पडणारी रेड वाईन, ‘स्व तसबिरी’साठी जागोजागी खास सायकली, चहाच्या किटलीतून बशीतील कपात पडणारी फुलांची धार, सॕक्सोफोनमधून पडणारा निर्झर, फुलांचा टेडी बेअर अशा कितीतरी कल्पक रचना या बागेत पाहून थक्क व्हायला झालं.

अगदी खरोखरीचं चक्क विमानच बागेत ठेवलं असून, त्यावरही फुलांची झाडे वाढवली आहेत. हे वेगळंच आकर्षण होय. हिरवाळलेले मोठाले उभे पेंग्विन, फुलांची घरे, भोवताली मिनार, विविधरंगी छत्र्यांच्या सजावटीच्या कमानी, जागोजागीचे पाण्याचे झरे, प्रपात, छोटेखानी तलाव, हत्ती, फुलपाखरांच्या प्रतिकृतीतून फुलांचा फुलोरा सारंच कसं वाळवंटी उष्म्यात सुखद गारवा देणारं नयनरम्य, आल्हाददायक होतं. हे सारं डोळ्यातून मनाच्या कप्प्यात बंदिस्त करतानाच आठवणी जपण्यासाठी मोबाईलच्या कॕमेऱ्यातही बंदिस्त होतं होतं.

दुबईचा राष्ट्रीय पक्षी फाल्कन अर्थात बहिरी ससाणा हा इथल्या दिऱ्हमवर जसा स्थिरावला आहे, तसाच तो खास छायाचित्रे घेण्यासाठी मनगटावर स्थिरावत होता. डोक्याला खास ‘गत्रा’ गुंडाळून फाल्कन ला मनगटावर बसवून छबी टिपण्यात वेगळा आनंद मिळाला. रणरणत्या वाळवंटात उभारलेले हे मिरॕकल गार्डन पर्यटकांना पर्वणी तर आहेच, शिवाय दुबईच्या उत्पन्नात दिऱ्हम ची देखील वाढ करणारे आहे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading