अनुभवातूनच अध्यात्माची खरी ओळख होते. यासाठी हा स्वर अनुभवायला हवा. आपण म्हणजे सो ऽ हं. ही वस्तू आहोत हे जाणून घ्यायला हवे. ज्याला हे समजले तो ज्ञानी. ज्याने याचा अनुभव घेतला तो ज्ञानस्वरुप होतो. ज्याला याचा बोध होतो तो आत्मज्ञानी होतो. अमरत्वाला पोहोचतो.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे
मोबाईल – 9011087406
तें अक्षर जी अव्यक्त। निर्देशदेशरहित।
सोऽहंभावें उपासित । ज्ञानिये जे ।। 32 ।। ज्ञानेश्वरी अध्याय 12 वा
ओवीचा अर्थ – ती वस्तू अविनाशी व इंद्रियांना विषय न होणारी आहे. ती वस्तू दाखविता येण्याजोगी नाही व तो देशाने मर्यादित नाही अशी आहे. अशा वस्तूची जे ज्ञानी ती वस्तू मी आहे अशा भावनेने उपासना करतात.
सो ऽ हं हे अक्षर आहे तरी काय ? सो ऽ हं हा स्वर आहे. आपण श्वास आत घेतो तेव्हा सो तर श्वास बाहेर सोडतो तेव्हा हम् हा स्वर उत्पन्न होतो. श्वास आत बाहेर घेण्याची ही क्रिया म्हणजे सो ऽ हम्. साधनेत हेच तर करायचे असते. श्वास आत बाहेर घेण्याच्या या क्रियेवर लक्ष केंद्रित करायचे असते. मन या स्वरात मिसळायचे असते. सो ऽ हं हे अक्षर असे आहे.
आपला जन्म होतो तेव्हापासून ते आपला मृत्यू होईपर्यंत हाच तर जप सुरू असतो. समस्त मानवाचा हाच तर प्राण आहे. यासाठीच समस्त जिवात तो सामावला आहे. म्हणजे हा सो ऽ हं सामावला आहे. प्रत्येक मानवामध्ये तो आहे. हा सो ऽ हं जो आत्मा आहे. तो या शरीरात आला आहे. जन्म झाल्यानंतर तो शरीरात येतो. मृत्यू पावल्यानंतर तो शरीरातून जातो. देहात आला असल्याने आपण त्याला नाव देतो. पण प्रत्येकाच्या देहात तो आहे. या देहात वेगळा, त्या देहात वेगळा असा भेदभाव नाही. त्याला मरण नाही. तो अमर आहे. अविनाशी आहे.
इंद्रियात येतो पण इंद्रियापासून तो वेगळा आहे. सो ऽ हं हा स्वर आहे. त्यामुळे तो दिसत नाही. पण तो कानाने ऐकायचा असतो. मन त्याच्यावर नियंत्रित करायचे असते. डोळ्यांची नजर त्याच्यावर केंद्रित करायची असते. त्याला वास नाही, गंध नाही त्यामुळे त्याची जाणीव ही स्वरांनीच अनुभवायची असते. आपण म्हणजे कोण आहोत ? आपणाला नाव आहे पण ते आपण नाही. ते देहाचे नाव आहे. मग आपले खरे स्वरूप काय आहे ? श्वास हेच आपले खरे स्वरूप आहे. आपण म्हणजे श्वास आहोत. श्वासातील स्वर सो ऽ हं. हे आपले खरे स्वरूप आहे. हे आपण ओळखायला हवे. ते जाणून घ्यायला हवे. ते अनुभवायला हवे. त्याची अनुभूती यायला हवी.
अनुभवातूनच अध्यात्माची खरी ओळख होते. यासाठी हा स्वर अनुभवायला हवा. आपण म्हणजे सो ऽ हं. ही वस्तू आहोत हे जाणून घ्यायला हवे. ज्याला हे समजले तो ज्ञानी. ज्याने याचा अनुभव घेतला तो ज्ञानस्वरुप होतो. ज्याला याचा बोध होतो तो आत्मज्ञानी होतो. अमरत्वाला पोहोचतो. कारण सो ऽ हं हे अक्षर अमर आहे. अविनाशी आहे. यासाठी या भावनेने सो ऽ हं ची साधना करायला हवी. उपासना करायला हवी. म्हणजे आपणही आत्मज्ञानी होऊ. आपणही त्याचा बोध घ्यायला शिकले पाहिजे. हेच अध्यात्म आहे.
अध्यात्म हे याच अक्षरात सामावले आहे. या अक्षरातच सर्व विश्व सामावले आहे. यामुळेच या विश्वस्वरुप अक्षराची उपासना करायला हवी. सर्व सचिवांची अनुभूती या अक्षरातून घ्यायला हवी. कारण तो सर्व जीवात आहे. तो एकच आहे. त्याचे एकत्व जाणून घेऊन स्वतःचा जन्म कशासाठी झाला हे ओळखायला हवे. खरा धर्म समजून घेऊन स्वधर्माचे पालन करायला हवे. आत्मज्ञानी होणे हा प्रत्येक मानवाचा स्वधर्म आहे. यासाठीच मानव जन्म आहे.
।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु।।