February 6, 2023
Need of Healty food production article by rajendra ghorpade
Home » दिखाऊ नको आरोग्यास प्राधान्य देऊन हवीत उत्पादने
विश्वाचे आर्त

दिखाऊ नको आरोग्यास प्राधान्य देऊन हवीत उत्पादने

सध्या उत्पादित होणारा शेतमाल दिसायला उत्तम आहे. पण त्याचा आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे, याचा विचार केला जात नाही. हा विचार आता शेतकऱ्यांनीच करून उत्पादने घ्यायला हवीत. तरच मानवी आरोग्य उत्तम राहू शकेल.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406

कळस ढिमाचे पोकळ । जळो वरील झळाळ ।
काय करूं चित्रींव फळ । आंतु शेण ।।470 ।। ज्ञानेश्वरी अध्याय 13 वा

ओवीचा अर्थ – आतून पोकळ आणि बाहेरून सोन्याचा मुलामा कळस जे असतात. त्यांच्यावरील नुसत्या दिखाऊ चकाकीला आग लागो. शेणाच्या फळांची चित्रे करून त्यांना बाहेरून रंग देऊन, जरी ती हुबेहुब फळा सारखी दिसणारी केली तरी त्यांना घेऊन करायचे काय ? कारण त्याच्या आत शेणच आहे.

पूर्वी शेणापासून फळांच्या प्रतिकृती तयार केल्या जायच्या. ही फळे आतून पोकळ व वरून हुबेहूब फळासारखी दिसणारी असतात. सध्या प्लास्टिक, मेण, चिनीमाती आदींचा वापर करून अशी आकर्षक फळे तयार केली जातात. हुबेहूब नैसर्गिक फळाप्रमाणे ती दिसतात. अशी फळे केवळ दिखावा म्हणूनच वापरली जातात. सध्या असा दिखावा असणारी उत्पादने अधिक घेतली जात आहेत.

नवी पिढी चंगळवादाकडे वळत आहे. त्यांच्या मनातच दिखाऊपणा भरला आहे. ही वाढणारी वृत्ती ही घातक आहे. दिसायला सुंदर असले म्हणजे ते चांगले असते असा त्यांचा समज झाला आहे. मनाचा हा त्यांचा समज कृतीतूनही दिसून येत आहे. अधिक तरुण दिसण्यासाठी अनेक प्रकारची सौंदर्यप्रसाधने तो वापरत आहे. पण जीवनात वृद्धाप्य आहे याचा विसरच त्यांना पडला आहे. अशा झटपट सौंदर्य वाढवणाऱ्या उत्तेजक पदार्थांमुळे त्यांचे आयुष्य कमी होत आहे. त्याचे आरोग्यावर दुष्परिणाम होत आहेत, याची जाणीवच त्याला नाही. आजचे आज पाहू, उद्याचे उद्या पाहू अशा विचारांमुळे दूरदृष्टीचा अभाव त्यांच्यात दिसून येत आहे.

अशा या बदलत्या विचारांचा प्रभाव शेतकऱ्यांवरही दिसून येत आहे. शेतकरीही या नव्या विचारांचा बळी ठरत आहे. यासाठी आता वेळीच सावध होण्याची गरज आहे. कृत्रिम आणि नैसर्गिक यातला फरक लक्षात घ्यायला हवा. तो समजण्याची दृष्टी त्याच्यात असायला हवी. नुसत्या दिखाऊपणाचे तोटे समजून घ्यायला हवेत. सध्या बाजारात आकर्षक माल असेल तर लगेच खपतो. लाल भडक गाजरे लगेच खपतात. पण फिकट रंगाची गाजरे जरी चवीला गोड असली तरीही खपत नाहीत. कारण जनतेत दिसायला सुंदर असले की घेण्याची वृत्ती वाढली आहे. चव कशी आहे हे तो पाहतच नाही.

नेमका हाच मुद्दा पकडून कृषी संशोधकांनीही तशाच पद्धतीने संशोधन केले. फळे दिसायला सुंदर केली. गाजरेही दिसायला सुंदर केली. पण त्याच्या चवीचा विचार केला नाही. फळांचे कवच टणक केले. कीड सहजासहजी लागणार नाही याची काळजी घेतली. टोमॅटो, सफरचंद आदी फळे-भाज्यांची कवचे आकर्षक व टणक केली. पण त्याचे दुष्परिणाम विचारात घेतले नाहीत. आरोग्यावर त्याचे परिणाम होतात याचा विचार केला नाही. आरोग्यास उत्तम असणारा आहार तयार करणे हे उद्दिष्ट असायला हवे. नुसता दिखाऊपणा नको.

सध्या उत्पादित होणारा शेतमाल दिसायला उत्तम आहे. पण त्याचा आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे, याचा विचार केला जात नाही. हा विचार आता शेतकऱ्यांनीच करून उत्पादने घ्यायला हवीत. तरच मानवी आरोग्य उत्तम राहू शकेल. कोणती उत्पादने अयोग्य आहेत. कोणती उत्पादने योग्य आहेत याचा विचार करून शेतकऱ्यांनीच यावर आळा बसवायला हवा. आरोग्यास प्राधान्य देऊन उत्पादने घ्यायला हवीत.

Related posts

जपाचे शब्द बुद्धीच्या डोळांनी पाहावेत

संत माहेर माझें…

अध्यात्माची पहिली पायरी

Leave a Comment