March 1, 2024
Bhagwatgeeta Need for Future Sunetra Josho article
Home » भगवद् गीता काळाची गरज…
मुक्त संवाद

भगवद् गीता काळाची गरज…

श्रीमत भगवद् गीता ही इतकी थोडक्यात सांगण्यासारखी नाही. तरी कर्मयोग थोडा तरी जाणावा. त्याची या पिढीला नितांत गरज आहे. प्रत्येक अध्यायातील प्रत्येक श्लोक वाचून समजून घ्यावा. मनातील सगळ्या प्रश्नांची उत्तरे त्यात नक्की सापडतात. आज गीता जयंती निमित्ताने आपण सगळे एक संकल्प करू शकतो की रोज एक तरी श्लोक मी वाचून समजून घेईन. आणि ती शिकवण आचरणात आणण्याचा प्रयत्न करेन.

सुनेत्रा विजय जोशी
रत्नागिरी

कुरूक्षेत्री रणांगणावर आपल्याच आप्तगणांना पाहून संभ्रमित झालेल्या अर्जुनाला प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेली… युद्धजन्य परिस्थिती ही प्रत्येक काळात कायमच असते. युध्द रणांगणातच फक्त लढले जाते असेही नाही. तर रोजच्या जगण्यात, घरात, मनात सुरुच असते. कधी सत्याचे असत्याशी. तर कधी चांगल्याचे वाईटाशी. आणि बरेचदा ते सगळे लोक आपलेच असतात.

बाहेरच्या अनोळखी व्यक्तीवर आपण विश्वास ठेवतच नाही. त्यामुळे त्याच्याकडून विश्वासघात होण्याची शक्यता कमीच असते. आणि त्यातही कुणी फसवले तर त्याला शिक्षा करताना मन कचरत नाही. पण घरातील किंवा आपसातील कुणी ज्याच्यावर आपण डोळे झाकून विश्वास ठेवतो त्याने जर का विश्वासाला सुरंग लावला तर मात्र प्रचंड पडझड आणि दुःख होते. शिवाय प्रेमाच्या व्यक्तीला शिक्षा देणे सुध्दा यातना देणारे असते..अशा वेळी या गीतेचा खूप आधार मिळतो.

त्यामुळेच ती प्रत्येकाने वाचावी, अभ्यासावी, समजून घ्यावी आणि जमेल तितकी आचरणात आणण्याचा प्रयत्न करावा. पण ती वाचायला आणि समजायला जितकी सोपी वाटते तितकीच आचरणात आणणे अवघड आहे. आपण निष्काम कर्म करूच शकत नाही. आपल्याला आपण केलेल्या कर्माचे फळ हवेच असते कधी पैशात तर कधी सन्मानात. कधी प्रसिद्धीत वगैरे. पण फळाची अपेक्षा न करता कर्म करण्याचा प्रयत्न करायला हरकत काय आहे ?

आपण कृष्णाला फक्त राधाकृष्ण आणि प्रेमयोगाच्या निमित्ताने आठवतो आणि त्यांनी सांगितलेला कर्मयोग मात्र सोयीस्करपणे विसरतो. खरे तर हाच कर्मयोग जगण्याचा आणि अंती मोक्षपदाला जाण्याचा मार्ग आहे. गीतेच्या तिसऱ्या अध्यायात कर्मयोगाबद्दल सांगितले आहे. कामावर निष्ठा असल्याशिवाय ज्ञान नाही. त्यामुळे मन आणि बुद्धीचे स्थैर्य नाही. मग इंद्रियांवर नियंत्रण नाही. आणि विषयातच राहिल्याने शेवटी मोक्षप्राप्ती नाही.. आपण कर्म केल्याशिवाय राहूच शकत नाही. नित्य आणि नैमित्तिक कर्म करावीत. काम आणि क्रोध हे दोन या सर्वाचे मूळ शत्रू आहेत. या दोघांवर विजय मिळविला तर स्वकर्म हे स्वधर्मात बदलते. आणि यालाच निष्काम कर्म म्हणतात.
इथे एक श्लोक सांगते..

न मे पार्थास्ति कर्त्तव्यं त्रिषु लोकेषु किञ्चन
नानावाप्तमवाप्तव्यं वर्त एव च कर्मणि |3–22
यदि ह्यहं न वर्तेयं जानु कर्मण्यतन्द्रितः
मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थि सर्वशः |3..23

स्वतः भगवान श्रीकृष्ण म्हणतात कि मला तर या तिन्ही लोकात मिळविण्यासारखी कुठलीच वस्तू नाही. काही कर्तव्य पण नाही. पण तरी मी कर्तव्यकर्म करीतच असतो. कारण कर्म केली नाही तर अनर्थ होईल. कारण माणूस माझे अनुकरण करणार आहे. जसे की विद्यार्थ्यांसाठी शिक्षक, मुलांसाठी आईवडील, प्रजेसाठी राजा आदर्श असतो तसेच सगळ्यांसमोर ईश्वराचा आदर्श असतो. त्यामुळे मला कर्म करावेच लागते. पिडीतांना सहाय्य करण्यासाठी मला धावावे लागते. म्हणूनच युध्दामध्ये श्रीकृष्ण अर्जुनाचे सारथ्य करण्याचे कर्म करतात. मानवाने कर्माचे महत्त्व जाणावे म्हणून भगवंत कर्म करतात. त्यामुळे देवाला आवडणारे कर्म केले तर मोक्ष निश्चित आहे. अंतकाळी जशी मती तशी गती असे आपण म्हणतो.

तेव्हा कर्म करीत रहा फळाची अपेक्षा ठेवू नका. आज सुध्दा या शिकवणीची गरज आहे. बदलत्या प्रत्येक काळात गीतेची शिकवण ही उपयुक्त आहेच. आजही पांडवांप्रमाणे थोडे लोक धर्माचे आचरण करतात आणि कौरवांप्रमाणे जास्त लोक अधर्माने वागतात. पण अंती विजय सत्याचाच होतो. हे कायम लक्षात ठेवणे गरजेचे आहे. वाईट कर्म करण्याची बुद्धी आपल्याला देव देत नाही. कारण जन्मतः बाळ निष्पाप असते पण रजोगुणापासून काम आणि क्रोध निर्माण होतात. आणि आपण विषयसुखाच्या आसक्तीत अडकून वाईट कर्म करतो. पण या दोघांवर ताबा मिळवला तर हेच कामक्रोध मित्र होतात.

अर्थात श्रीमत भगवद् गीता ही इतकी थोडक्यात सांगण्यासारखी नाही. तरी कर्मयोग थोडा तरी जाणावा. त्याची या पिढीला नितांत गरज आहे. प्रत्येक अध्यायातील प्रत्येक श्लोक वाचून समजून घ्यावा. मनातील सगळ्या प्रश्नांची उत्तरे त्यात नक्की सापडतात. आज गीता जयंती निमित्ताने आपण सगळे एक संकल्प करू शकतो की रोज एक तरी श्लोक मी वाचून समजून घेईन. आणि ती शिकवण आचरणात आणण्याचा प्रयत्न करेन.

Related posts

धोकादायक “शॉर्ट सेलिंग”नियमांची कठोर अंमलबजावणी गरजेची !

अध्यात्मिक प्रवासात सद्गुरु हे वाटाड्या

अर्थसंकल्प 2022-23ः शाश्वत कृषी विकासाला समर्पित अर्थसंकल्प

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More