March 19, 2024
need to take river pollution seriously Dr V N Shinde article
Home » नदी प्रदुषणाकडे गांभिर्याने पाहण्याची गरज
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

नदी प्रदुषणाकडे गांभिर्याने पाहण्याची गरज

जगातील तिसऱ्या क्रमांकाची लांबी असणारी गंगा नदी आहे. तिच्यात मल-मूत्रयुक्त पाणी सर्वाधिक प्रमाणात मिसळते. त्यामुळे आज सर्वात पवित्र मानली जाणाऱ्या गंगा नदीचे, जगातील सर्वाधिक प्रदूषीत नद्यामध्ये पहिले स्थान आहे. भारत सरकारने स्वच्छता अभियान सुरू केले. गंगा नदी स्वच्छतेसाठी खास अभियान राबवले जाते. तरीही अद्याप या नदीचे प्रदुषण मोठ्या प्रमाणात होत आहे, दुर्दैवाने हे वास्तव आहे.

डॉ. व्ही. एन. शिंदे,
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

नद्या प्रदुषणाचा प्रश्न चुटकीसरशी सोडवणे शक्य नाही. तसेचं हा प्रश्न फक्त भारतापुरता मर्यादित नाही, तर, वैश्विक आहे. जगातील ४४ टक्के नद्यातील पाणी हे पिण्यासाठी आणि मासेमारीसाठी अयोग्य असल्याचे अभ्यासक जॉन केरी यांचे मत आहे.

आज नद्यांच्या प्रदूषणाचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. खरेतर नद्यांना जीवनदायीन्या म्हणून ओळखले जाते. मात्र त्यांनाच प्रदूषणाचा विळखा पडल्याने त्या विषवाहिन्या बनू लागल्या आहेत. हे जाणणाऱ्या लोकांची संख्या अतीशय कमी आहे. नद्यांचे पाणी प्रदुषीत करणारे अनेक लोक आहेत. त्यांना कायम माझ्या एकट्यामुळे नदी प्रदूषीत व्हायची थोडेच थांबणार आहे, असे वाटते. बहुतांश लोकांचे असेच मत असल्याने नद्यांचे प्रदूषण होतच राहते. त्यातच नद्यांच्या प्रदूषणामध्ये आर्थिक बाबी आहेत. त्यामुळे नद्या प्रदुषणाचा प्रश्न चुटकीसरशी सोडवणे शक्य नाही. तसेचं हा प्रश्न फक्त भारतापुरता मर्यादित नाही, तर, वैश्विक आहे. जगातील ४४ टक्के नद्यातील पाणी हे पिण्यासाठी आणि मासेमारीसाठी अयोग्य असल्याचे अभ्यासक जॉन केरी यांचे मत आहे. काँझर्व्ह-एनर्जी-फ्युचर संस्थेच्या संकेतस्थळावर जगातील एकवीस सर्वाधिक प्रदूषीत नद्यांची यादी प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार जगातील सर्वचं राष्ट्रात हा प्रश्न गंभीर आहे.

या संकेतस्थळावरील सध्या उपलब्ध असलेल्या एकवीस नद्यांमध्ये भारतातील दोन मोठ्या नद्या- गंगा आणि यमुना यांचा समावेश होतो. गंगा नदी तर पहिल्या क्रमांकावर आहे. भारतासह चीन, ब्राझील, इंडोनशिया, अमेरिका, युरोप, फिलीपाईन्स, बांग्लादेश, अर्जेंटिना, जॉर्डन, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया अशा सर्वच देशांना ग्रासले आहे. यात सर्व नद्यांच्या प्रदूषणामागे मानवाचा हात आहे. यातील सर्वात जास्त दहा प्रदूषीत नद्यांचा विचार करणार आहोत.

भारतात गंगा नदीला सर्वात जास्त महत्त्व. या नदीत स्नान केले, की सर्व पापे धुतली जातात, हा एक गैरसमज किंवा समज. मयताचे प्रेत या नदीत सोडले की मृतात्म्याला स्वर्गप्राप्ती होते, अशी लोकांची श्रद्धा. या नदीच्या काठावर मोठ्या प्रमाणात मानवी वस्ती आहे. या वस्तीतील लोकाना जगवण्यासाठी आणि गंगाकाठी पाणी मोठ्या प्रमाणावर असल्याने अनेक उद्योग उभारण्यात आले. या उद्योगधंद्याना लागणारे पाणी गंगा नदी पुरवते. हे पाणी वापरून स्वच्छता आणि सुबत्ता प्राप्त केली जाते. वापरलेले अनेक जीवाना अपाय करणाऱ्या घटक सामावून घेत असलेले, घाण पाणी इतरत्र न पाठवता पुन्हा गंगेत सोडले जाते. जगातील तिसऱ्या क्रमांकाची लांबी असणारी गंगा नदी आहे. तिच्यात मल-मूत्रयुक्त पाणी सर्वाधिक प्रमाणात मिसळते. त्यामुळे आज सर्वात पवित्र मानली जाणाऱ्या गंगा नदीचे, जगातील सर्वाधिक प्रदूषीत नद्यामध्ये पहिले स्थान आहे. भारत सरकारने स्वच्छता अभियान सुरू केले. गंगा नदी स्वच्छतेसाठी खास अभियान राबवले जाते. तरीही अद्याप या नदीचे प्रदुषण मोठ्या प्रमाणात होत आहे, दुर्दैवाने हे वास्तव आहे.

पीत नदीच्या पाण्याला पिवळा रंग

चीनने औद्योगिक उत्पादनाची बाजारपेठ काबीज करण्यासाठी मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे उभे केले. पीत नदीच्या काठी मोठ्या औद्योगीक वसाहती उभारल्या. मुळातच विशिष्ट खडकातून वाहिल्याने या नदीच्या पाण्याला पिवळा रंग येतो. पिवळा रंग घेऊन वाहणारी ही नदी आहे. त्यात काठावरील उद्योगांनी सोडलेल्या घाण पाण्यामूळे आणखी प्रदूषीत झाली आहे. सध्या ती दुसऱ्या क्रमांकाची प्रदूषीत नदी आहे. खनीजावरील प्रक्रिया करणारे अनेक उद्योग वापरलेल्या घाण पाण्याचा विसर्ग, पीत नदीत सोडतात. त्यामूळे हे पाणी पिण्यासाठी तर नाहीचं, पण शेतीसाठी वापरण्यासही योग्य राहिले नाही.

प्रदुषित पाण्याने जीवसृष्टी धोक्यात

जगातील तिसऱ्या क्रमांकाची प्रदूषीत नदी आहे, ब्राझीलमधील डोस नदी. या नदीच्या काठावर स्टीलचे कारखाने उभा राहिले. एकेकाळी शुद्ध पाण्याने भरलेली नदी आता प्रदूषीत आणि विषारी पाण्याचे साधन बनली आहे. त्यानंतर सर्वाधिक प्रदूषीत नद्यात, चवथा क्रमांक हा इंडोनेशियातील सीटारम नदीचा लागतो. इंडोनेशियाच्या नागरी वस्त्याना जगवणाऱ्या या नदीच्या दोन्ही बाजूला मोठी नागरी वस्ती आहे. या वस्त्यातून येणारे मल-मूत्रमिश्रीत पाणी हे पाण्याचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण करते. तसेचं औद्योगिक वसाहतीतून येणाऱ्या घाण पाण्यामुळे, या नदी काठावरील संपूर्ण जीवसृष्टी धोक्यात आली आहे. विशेषत: पारायुक्त पाणी नदीत आल्याने धोका वाढला आहे. या नदीतील प्रदूषीत पाण्यामुळे वर्षाला पन्नास हजार लोकाना मृत्यू पहावा लागतो.

मिसिसीपीचे पाणी तपकिरी

जगातील पाचव्या क्रमांकाची प्रदूषीत नदी आहे अमेरिकेतील मिसिसीपी नदी. जगातील ही सर्वाधिक लांबीची नदी. नदीमध्ये वापरलेले पाणी सातत्याने सोडले जात असल्याने आज तिचे पाणी तपकिरी रंगाचे झाले आहे. पाण्यावर तेलाचा तवंग असतो आणि आतमध्ये विषारी घटक. नायट्रोजनयुक्त घटकांमुळे नदीतील ऑक्सिजनचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटले असून नदीतील जीवसृष्टी संपुष्टात आली आहे.

प्रदुषित पाण्याने यकृताचा कर्करोग

त्यानंतर प्रदुषणात सहावा क्रमांक हा सर्नो नदीचा. युरोपातील ही सर्वाधिक प्रदूषीत नदी. सुरूवातीला या नदीचे पाणी सर्वोत्तम आहे. पुढे नदीकाठावरील मानवी वस्त्यांचे सांडपाणी, मैलायुक्त पाणी आणि उद्योगातील वापरलेले पाणी नदीत सोडले जाते. त्यामूळे नदीचे पाणी वापरास योग्य रहात नाही. या नदीकाठच्या लोकामध्ये यकृताच्या कर्करोगाचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे.

नदी प्रदुषणाने बांग्लादेशात अनेक प्रश्न

जगातील सर्वाधिक प्रदूषीत नद्यात सातव्या क्रमांकावर फिलीपाइन्समधील मरिलिओ नदी आहे. या नदीला प्लॅस्टीकचे डंपीग ग्राउंड बनवले आहे. त्यानंतर आठवा क्रमांक हा आपल्या शेजारच्या बांग्लादेशातील बरिंगंगा नदीचा लागतो. बांग्लादेशातील ही सर्वात मोठी नदी. या नदीला वेगळ्याचं समस्येने ग्रासले आहे. या नदी काठावर मोठ्या प्रमाणात चर्मोद्योग उभारण्यात आले आहेत. चर्मोद्यागासाठी वापरण्यात आलेले पाणी या नदीत सोडण्यात येते. त्या पाण्याने या नदीच्या प्रदूषणाला मोठा हातभार लावला आहे. त्याचंप्रमाणे अन्य नद्याप्रमाणे या नदीतही मानवी वस्त्यांचे घाण पाणी आणि अन्य उद्योगांचे वापरलेले पाणी सोडले जाते. ही नदी प्रदूषीत झाल्याने बांग्लादेशासमोर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

जडधातूमुळे कर्करोगाची बाधा

नवव्या क्रमांकावर आता अर्जेंटिनातील मांताझा-रियाचुलो नदी आली आहे. उद्योगधंद्यांनी या नदीचे पाणी प्रदूषीत केले आहे. पारा आणि शिशाच्या अंशानी भारलेले हे पाणी नदीतील संपूर्ण जीवसृष्टी नष्ट करत आहे. जडधातूमुळे कर्करोगाची बाधाही अनेक लोकांना होत आहे. दहावा क्रमांक मेक्सिकोतील तिजुआना नदीचा लागतो.

पाण्यासाठी यादवी निश्चितच

नदी प्रदूषणाने जगातील सर्व देश ग्रासले आहेत. या प्रश्नाने आता वैश्विक रूप धारण केले आहे. इतर संस्थांच्या सर्वेक्षणातही याचं नद्या क्रमांकातील थोड्या फार फरकाने समाविष्ट आहेत. भविष्यात महायुद्ध झाले तर पाण्यामुळे होईल असे तज्ज्ञ सांगतात. पाण्यामुळे युद्ध होईल किंवा नाही, हे सांगता येत नसले, तरी यादवी निश्चितच निर्माण होऊ शकते. त्यामुळे पाण्याचा काटकसरीने वापर करणे आणि आपले पाण्याचे साठे स्वच्छ ठेवण्याकडे प्रत्येकांने जातीने लक्ष देण्याची गरज आहे. नाहीतर आज पाण्यातील जीव मरतात, उद्या आपला नंबर असेल.

Related posts

मन साधनेत रमण्यासाठी हे करा

प्रतिसरकार स्थापण्याची वेळ ?…आपणास काय वाटते ? व्हा व्यक्त…

राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेचे विशेष पुरस्कार जाहीर

Leave a Comment