March 5, 2024
Home » ‘गोड’ कडुनिंब…
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

‘गोड’ कडुनिंब…

Dr V N Shinde

परदेशातही कडुनिंबावर मोठ्या प्रमाणात संशोधन सुरू आहे. एड‌्स, कॅन्सर अशा आजारावर औषध बनवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कडुनिंबाचे तेल पाण्यात टाकून फरशी पुसल्यास ती निर्जंतूक बनते. या तेलाचा उपयोग दिव्याचे इंधन म्हणूनही केला जातो. या बियांपासून सरबतही बनवले जाते. या झाडाच्या मुळांना कुजवून त्यापासून पेय बनवले जाते. 

डाॅ. व्ही. एन. शिंदे

कडुलिंबाचे अनेक औषधी उपयोग माहित आहेत. त्याच्या पेटंटचा लढाही अनेकांना आठवत असेल. कडुलिंब त्याला इजा पोहोचवणाऱ्या व्क्तीच्याही उपयोगाला येतो. कडुलिंबात स्पष्टवक्त्या, सज्जन माणसाचे रूप दिसते. स्पष्टवक्ती माणसे बोलल्यानंतर ते मनाला लागते. मात्र त्यांच्या बोलण्यात आपलेच हित असते. कडुलिंबाचेही तसेच आहे. त्याचा कोणताही भाग घेतला तरी तो चवीला कडूच असतो. मात्र हा प्रत्येक भाग मानवाच्या उपयोगाचा असतो. कडुलिंबाचे पान, फुल, फळ, मूळ, साल, लाकूड एवढेच काय, जाळल्यानंतरची राखही मानवाच्या कामी येते. म्हणूनच कडुलिंब कडू नव्हे; गोड आहे. असा हा कडुलिंब… मला भेटला तसा…

ll१ll

गुढी पाडवा बाळगोपाळांचा आवडता सण. या दिवशी दारात गुढी उभी करण्यासोबत पूर्वी खारीक- खोबऱ्याचा हार बाळगोपाळांना मिळत असे. काळानुरूप बदल होत गेले आणि खारीक खोबऱ्याच्या हाराची जागा साखर-चिपळ्याच्या हाराने घेतली. पाडवा आणखी गोड झाला. मात्र या गोडपणात कटुता घालतो तो कडुनिंब. गुढी पाडव्यादिवशी सर्व लहान मुलांच्या हातावर गुळामध्ये कडूनिंबाची फुले मिसळून प्रसाद दिला जात असे. गुळ सोबतीला असला तरी कडुनिंबाची फुले काही आपली कडू चव सोडायला तयार नसत. अनेकदा मनात येत असे की कडुलिंबाला पाडव्याच्या वेळीच का फुले येतात? पण त्याचे उत्तर नसायचे. तो कडू प्रसाद खावाच लागत असे. यातून कोणाचीही सुटका नसे. धनत्रयोदशीलाही कडुलिंबाची पाने बारीक करून खडीसाखरेसमवेत मिसळून त्याचा प्रसाद दिला जातो. अशी या झाडाची नकळत्या वयातच कडवट ओळख होत असे. पुढे अनेक टप्प्यावर अनेक ठिकाणी कडुनिंब भेटत राहिला; मनात घर करून राहिला.

शालिवाहन शकाचा आरंभाचा दिवस म्हणजे पाडवा. दरवर्षी येतो आणि कडुलिंबाची भेट घडवतो. ऊत्तर भाद्रपदा नक्षत्राचा कडुलिंब हा आराध्य वृक्ष आहे. ब्रम्हदेव आणि जगन्नाथ या देवांचा कडुलिंब प्रतीक मानला जातो. कालिमाता आणि दुर्गामातेला हा वृक्ष प्रिय असल्याचे मानले जाते. त्यामुळे दक्षिण भारतात सर्व मंदिरांमध्ये कडुलिंब भेटतो. त्याची आवर्जून लागवड केली जाते. दक्षिण भारतात कडुलिंबाचे झाड तोडणे म्हणजे कन्या हत्या करण्याइतके वाईट मानतात. मयत विधीवरून परत आलेल्या माणसाला प्रथम आंघोळ करायला लावतात. त्यानंतर कडुलिंबाची पाने चघळून थुंकायला लावतात. यामुळे मयत व्यक्तीशी असलेला संबंध संपतो, असे मानतात.

चैतन्य महाप्रभू कडुलिंबाच्या झाडाखाली मिळाले किंवा जन्मले, असे मानले जाते. त्यामुळे त्यांना  ‘निमाई’ असे टोपणनावाने ओळखत. अक्क्लकोटच्या स्वामी समर्थांना वड, औदुंबर आणि कडुलिंब ही झाडे विशेष प्रिय होती. कडुलिंब आंध्रप्रदेशचा राज्यवृक्ष आहे. भारत सरकारने या वृक्षाचे महत्त्व ओळखून या झाडाचे तीन रूपये किंमतीचे टपाल तिकीट प्रसिद्ध केले.

निंब, लिंब, कडुलिंब, कडुनिंब, बाळंतलिंब अशा अनेक नावांनी हे झाड ओळखले जाते. या झाडाचे कुळ मॅलिएसी. याचे शास्त्रीय नाव अझाडिराच्टा इंडिका. याला इंग्रजीत इंडियन लिलक, निम, मर्गोसा ट्री म्हणून ओळखले जाते. हिंदीमध्ये नीम, नीमला, कानडीत बेवु, गुजरातीत लींबडो, तमिळमध्ये कड्डपगै, अरूलुंदी, तेलगुमध्ये निम्बमु, बंगालीत नीमगाछ, मल्याळममध्ये वेप्पु, अतितिक्त या नावांनी ओळखले जाते. संस्कृतमध्ये त्याला निंब, कटू चवीमुळे तिक्तक, धुण्यासाठी वापरले जाणारे म्हणून अरिष्ट, पारिभद्र, पारिभद्रक, पिचुमंद, पिचुमर्द इत्यादी नावे आहेत. या झाडाचे मूळ भारतीय उपखंडातील आहे. भारत, पाकिस्तान, नेपाळ आणि बांग्लादेशात याची विपूल झाडे आढळतात. याची पाने कडू असल्याने त्याला कडुनिंब किंवा कडुलिंब म्हटले जाते. कडुनिंबाचे झाड मोठे होते. हे झाड चांगल्या वातावरणात साठ फुटापर्यंत वाढते. याची सावली छान पडते. झाडाचा घेर अगदी पन्नास साठ फुट व्यासाचा बनतो. हा वृक्ष सदाहरित वर्गात मोडतो. कडुलिंब दिर्घायुषी आहे, तो पन्नास-साठ वर्षे जगतो. अतिपावसाच्या प्रांतात पावसाळ्यात कडुलिंबाची पाने गळतात. मात्र पावसाळा संपताच पाने फुटायला सुरुवात होते.

कडुनिंबाचे झाड हे त्याच्या बियांपासून उगवते. साधारण ७५ ते ९० टक्के बिया रूजतात. कमी पावसाच्या भागातही हे झाड चांगले वाढते. मात्र अतिपावसाच्या भागात ही झाडे चांगली वाढत नाहीत. कोकणात आणि अतिपर्जन्यमान असणाऱ्या भागात ही झाडे निसर्गात आढळत नाहीत. पाणथळ जागेवर कडुलिंब जगत नाही. या झाडांना जगण्यासाठी मोठ्या प्रमाणात सूर्यप्रकाशाची गरज असते. तीन वर्षांत चार ते सात मीटरपर्यंत या झाडाची वाढ होते. मराठवाड्यासारख्या कमी पावसाच्या भागात ही झाडे चांगली वाढतात. कोरड्या हवेत चांगले वाढणारे हे झाड, दमट वातावरणात मात्र टिकत नाही. या झाडाला सोटमूळ असते. ते खाली खोलवर अगदी चाळीस फुटापर्यंत जाते. सहा महिने झाडाला पाणी नाही मिळाले तरी ते जगते. तिव्र टंचाईच्या काळात, पाण्याच्या कमतरतेमुळे वरचा भाग वाळत जातो. मात्र, जसे पाणी मिळेल तसे ते ओलसर भागापासून पुन्हा फुटते. या झाडाला तोडल्यानंतर मुळांपासून फुटवे फुटतात. या झाडाची जगण्याची आणि इतरांना उपयोगी पडण्याची सवय लाजवाब! ही सवय प्रत्येकासाठी आदर्शवत.

सांगोला ते मिरज रस्ता केवळ कडुनिंबाच्या झाडामुळे सुखकर प्रवासाचा रस्ता बनला होता. मात्र रूंदीकरणात यातील बरीचशी झाडे कापली गेली. पांढऱ्या रंगांच्या बिया ओल्या मातीत पडल्या की रूजतात. नैसर्गिकरित्या पक्ष्यांच्या विष्ठेतून इतर झाडांच्या, खांबांच्या जवळ या बिया पोहोचतात. त्या आपोआप उगवतात. पानांची चव कडू असली, तरी जनावरे मात्र त्याला आवडीने खातात. त्यामुळे ही झाडे इतर झुडपांच्या मध्ये उगवली तरंच जगतात. जनावरांनी या झाडाला खाल्ले, तर, ते नीट वाढत नाही. त्यामुळे खास लागवड केलेल्या झाडांना जनावरांपासून सुरक्षित ठेवले जाते. सुरुवातीला येणाऱ्या कोंबाबरोबर दोन जाड पाकळ्या आणि दोन हिरवी आणि साधी पाने येतात. या पानालाही करवतीच्या दात्र्याप्रमाणे नक्षी असते. त्यानंतर येणारी या झाडाची पाने ही संयुक्त पाने असतात. खोड सुरुवातीला हिरवे असते. झाड जसे वाढत जाते, तसे खोडाचा रंग बदलत जातो. सुरुवातीला खोड लालसर तपकिरी रंगाचे कमी जास्त तिव्रतेचे पट्टे असणारे असते. या कोवळ्या खोडाला वेगळीच चमक असते. झाड सुरुवातीला सरळ वाढायला सुरुवात करते. झाड दहा-बारा फूट उंचीचे झाले की त्याला फांद्या फुटायला सुरुवात होते. खोडाला येणाऱ्या फांद्या या सुरुवातीला चॉकलेटी रंगाच्या असतात. नंतर त्यांचा रंग हिरवा होत जातो आणि मोठ्या झाल्यावर खोडाचा रंग धारण करतात.

     या फांद्यांना संयुक्त पाने येतात. पान खोडाला जेथे फुटते, तेथे फुगीर चार पाच मिलीमीटर लांबीचा मांसल भाग असतो. नऊ ते पंधरा इंच लांबीचे पानांचे देठ असते. या देठाला दोन ते पाच सेंटिमीटर लांबीच्या पर्णिका असतात. बारीक देठाच्या मध्ये असणाऱ्या पर्णिका या समोरासमोर असतात. त्यानंतर प्रत्येक पानांच्या टोकाशी एक पर्णिका असते. त्यामुळे एकूण पर्णिकांची संख्या विषम असते. पर्णिकांच्या मध्यभागी शीर असते. या शिरेच्या एका बाजूला पानाचा विस्तार थोडा जास्त असतो. कोवळी पाने तांबूस, तपकीरी रंगाची असतात. त्यानंतर त्यांचा रंग पोपटी आणि नंतर हिरवा होत जातो. पानावर चकाकी असते. पानांच्या कडांना करवतीच्या दात्याप्रमाणे छान नक्षी असते. या पानांची रचना करताना आणि त्यांना रंगसंगती प्रदान करताना निसर्गाने हात मोकळा सोडला असावा. लहान बाळाच्या त्वचेचा मऊ मुलायमपणा जाऊन वय वाढेल तसा राकटपणा यावा, तसेच काहीसे कडुलिंबाबाबत घडते. पान जुन झाले की त्याची चकाकी आपोआप लुप्त होते. रंगही गडद हिरवा होत जातो. पर्णिकांच्या मध्यभागी असणाऱ्या पोपटी शिरेपासून पुन्हा काही उपशाखा फुटतात. त्या पानाला सुंदर बनवतात.

धान्य किडू नये, ते टिकावे, म्हणून ते पोत्यात, डब्यात किंवा कणगीत भरताना या झाडांची पाने खाली आणि वर ठेवली जातात. ही पाने बुरशीनाशक आणि जंतुनाशक आहेत. या पानांचा रस काढून अनेक लोक सकाळी पितात. स्त्रियांना प्रसूतीनंतर तीन दिवस कडुनिंबाचा रस दिला जात असे. व्यायलेल्या गाईलाही कडुनिंबाचा पाला खाऊ घातला जातो. त्यामुळे दूधाचे प्रमाण वाढते, असे मानले जाते. पूर्वी गोवर कांजिण्या असा आजार झालेल्या रूग्णाला कडुनिंबाच्या पाल्यावर झोपवून मंत्र म्हटले जात असत. विंचू चावल्यानंतर कडुनिंबाची पाने चुरगळून लावल्यास दाह कमी होतो आणि विष उतरते, असे मानले जाते. कडुनिंबाचा पाला आंघोळीच्या पाण्यात टाकून गरम पाण्याने आंघोळ केल्यास त्वचारोग नाहीसे होतात. पानातील पर्णिकांच्या मध्ये असणारे देठ हे पातळ आणि पोपटी रंगाचे असते. पळस पानांच्या आणि वडाच्या पानांच्या पत्रावळ्या तयार करताना पाने एकमेकांना जोडण्यासाठी या काड्यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात असे. या काड्या अनेकजण चघळून त्याचा रस पितात. त्यामुळे दातांचे आरोग्य चांगले राहते. तोंडाचे विकार होत नाहीत.

विपुल पर्णसंपदा धारण करत झाड मोठे होत जाते. झाडाला कोणी इजा नाही केली नाही, तर, झाड डेरेदार बनत जाते. सर्व बाजूला फांद्या वाढतात. काही अंतर वाढल्यानंतर आणखी फांद्या वाढत जातात. या झाडाचे मूळ खोड सरळ वाढते. मात्र नंतर सरळ फांद्यांची लांबी जास्त नसते. फांद्या पानांच्या ओझ्यासोबत खाली वाकत राहतात. सर्व गुणसंपन्न विद्यार्थ्यांने गुरूसमोर नम्रपणे उभे राहावे तसे हे सर्वगुणसंपन्न झाड दिसते. झाड वाढत जाते, तसे खोडाचा रंग काळा बनत जातो. खोड मोठे होत जाते. खोडाच्या सालीवर मोठ्या भेगा असतात. या सालीचा काढा मलेरियाच्या रूग्णांवरील उपचारात वापरला जातो. या भेगांमध्ये रंग फिका पांढरट असतो. खोडावरील साल ही मध्ये लाल, गुलाबी रंगाची असते. त्याच्या आत पांढरे पातळ सालीचे आवरण असते. या पातळ सालीपासून दोरखंड बनवले जातात. त्याच्या आत पिवळसर लाकूड असते. जुन्या झाडाच्या लाकडाच्या केंद्रभागी लालसर रंग असतो. या लाकडाला मंद सुगंध असतो. सालीचा गंध त्या मानाने उग्र असतो. झाडाची पाने जुन झाली की गळतात. मोठ्या वाढलेल्या झाडाच्या खोडाला बाभळीच्या झाडाप्रमाणेच डिंक येतो. मात्र कडुलिंबाचा डिंक हा देखील कडू असतो. हा डिंक औषधी असतो. तो त्वचारोगावर वापरला जातो. तसेच या डिंकाचे लाडू बाळंत महिलांना खाण्यासाठी दिले जातात.

साधारण चैत्र महिन्यात झाडांना नवी पालवी फुटायला सुरुवात होते. झाड दहा बारा वर्षांचे झाले की त्याला कळ्या येतात. त्या कोवळ्या पानांबरोबर कळ्यांचे घोसही बाहेर येतात. घोसामध्ये येणाऱ्या कळ्या विरळ असतात. एका घोसातील कळ्या साधारण एकाच वेळी फुलतात. एका फुलाला पाच पिवळसर पांढऱ्या पाकळ्या असतात. निरखून पाहिले की या इवल्याशा सुंदर चांदणफुलांचे सौंदर्य मनात भरते. आकाशातील दूरवर दिसणाऱ्या लुकलुकत्या चांदण्या, वास्तवात खूप मोठे तारे असतात. तसेच या चांदणफुलातून निर्माण होणारे बी मोठे आणि मोठ्या कामाचे झाड जन्माला घालणार असते. फुलांच्या मध्यभागाचा रंग पिवळा असतो. फुले फुलली की वातावरणात मंद सुगंध पसरतो. फुले लहान असतात. तीन-चार मिलीमीटर लांब पाकळ‌्या असतात. फुले फुलली की या झाडावर किटकांचा आणि मधमाशांचा वावर वाढतो. ही सर्व मंडळी या फुलांतून मध गोळा करता करता परागीभवन करतात. कडुनिंबाच्या झाडाला बसलेल्या मधमाशांच्या पोळ्यातील मध औषधी मानला जातो. गुढी पाडव्याला गुळाबरोबर ही फुले खाल्ली जातात. सर्व आजार दूर राहावेत, यासाठी हिंदू नववर्षाची सुरुवातीला हा प्रसाद खाण्याची रीत आहे. कडुनिंबाची पाने किंवा फुले आणि मीठ, मिरे, हिंग, ओवा, चिंच आणि गूळ घालून चटणी बनवली जाते. अशी कोशिंबिर खाल्ल्याने पोटाचे विकार दूर होतात. उष्माघाताचा त्रास होऊ नये, म्हणूनही कडुलिंबाचा वापर केला जातो. केरळमध्ये कडुलिंब फुलांचा रस काढण्याचे प्रकल्प सहकारी तत्वावर उभारण्यात आले आहेत. या रसाला मोठी मागणी असून तो महाग असतो.

परागीभवन झालेल्या फुलांपासून फळ तयार होते. फळ सुरुवातीपासून पोपटी रंगाचे असते. या फळांना निंबोळ्या किंवा लिंबोळ्या म्हणतात. काही लोक निंबोण्या असेही म्हणतात. हे फळ दंडगोलाकार असते. पूर्ण वाढलेले फळ चार पाच मीलिमीटर रूंदीचे आणि एक ते दीड सेंटिमीटर रूंदीचे असते. फळ पक्व होताना त्याचा रंग पिवळा होत जातो. पूर्ण पिवळे झालेले फळ माकडापासून पक्ष्यापर्यंत अनेकांचे आवडते फळ आहे. या लिंबोळ्या उंटाला खूप प्रिय असतात. लहान मुलेही ही फळे चाखून पाहतात. पावसाळ्यात ही फळे खाली पडतात. या फळांमुळे कुबट वास पसरतो. मात्र या बिया गोळा करून विकण्याचे काम अनेक बेरोजगाराना मिळते. त्यातून त्यांना चांगले पैसे मिळतात. फळांमध्ये बियाभोवती तंतुमय पांढरा कडवट-गोड गर असतो. प्रत्येक फळात एक बी असते. फळाच्या आकाराप्रमाणेच बी असते मात्र ते देठाकडे निमुळते होत जाते. बियांवर पांढऱ्या रंगाचे आवरण असते. आवरणाच्या आत पुन्हा एक तपकिरी लाल रंगाचे पातळ आवरण असते. त्या आवरणाच्या आत पांढऱ्या रंगाचे स्निग्धांश असलेला मऊ भाग असतो. बी रूजताना निमुळत्या टोकाकडून कोंब बाहेर पडतो.

या झाडाच्या बियांपासून तेल काढले जाते. हे तेल औषधी आहे. जैविक किटकनाशकात या तेलाचा वापर केला जातो. या बियांची पेंड किंवा तेल काढल्यानंतर राहिलेला चोथा हा खत म्हणून वापरला जातो. त्याचप्रमाणे अनेक रसायनांमध्ये या तेलाचा वापर केला जातो. हे तेल वापरून टूथपेस्ट बनवली जाते. निंबोळ्यापासून बनवलेले तेल भाजलेल्या जखमावरही लावले जाते. या तेलांने मालिश केल्यास त्वचारोग नाहीसे होतात. परदेशातही कडुनिंबावर मोठ्या प्रमाणात संशोधन सुरू आहे. एड‌्स, कॅन्सर अशा आजारावर औषध बनवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कडुनिंबाचे तेल पाण्यात टाकून फरशी पुसल्यास ती निर्जंतूक बनते. या तेलाचा उपयोग दिव्याचे इंधन म्हणूनही केला जातो. या बियांपासून सरबतही बनवले जाते. या झाडाच्या मुळांना कुजवून त्यापासून पेय बनवले जाते. या झाडामध्ये मेलियासीन, ट्रीटरपेनॉईड, टॅनिन‌्स आणि फ्लॅवानॉईड‌्स इत्यादी औषधी घटक आहेत. अल्सर, जंत इत्यादीवर कडुलिंबाच्या विविध भागांचा वापर केला जातो. लैंगिक भावना नष्ट व्हाव्यात यासाठी अनेक साधू कडुनिंबाचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. कडुनिंबाचे औषधी गुणधर्म लक्षात आल्यानंतर परदेशी तज्ज्ञांनी आणि अनेक औषध कंपन्यांनी पेटंटसाठी दावा केला होता. डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या नेतृत्त्वाखाली भारताने हा लढा आंतरराष्ट्रीय न्यायालयात दावा दाखल केला. कडुलिंब भारतात हजारो वर्षांपासून औषधी कारणासाठी वापरला जातो. हा लढा भारताने जिंकला. मात्र त्यासाठी कोट्यवधी रूपये आणि अनेक तज्ज्ञांचा वेळ खर्ची पडला.

कडुलिंबाचा सर्व आयुर्वेद ग्रंथामध्ये उल्लेख आहे. चरकसंहितेत तर कडुलिंबाला सर्व रोग निवारक किंवा आरिष्ट म्हटले आहे. कडुलिंबाच्या पानात ‘अ’ जीवनसत्व तर बियांच्या तेलामध्ये मेदाम्ले आणि  ‘ई’  जीवनसत्व असते.  गोवर, कांजिण्या, चेहऱ्यावरील मुरूम,  मलेरिया,  कुष्ठरोग,  दमा,  काविळ,  मधुमेह, सांधेदुखी,  मुतखडा, नेत्रविकार,  क्षयरोग, हृदयरोग, अतिसार इत्यादी आजारावर कडुलिंब उपयोगी पडतो. लठ्ठपणा घालवण्यासाठी कडुलिंबाच्या पानांचा रस उपयोगी पडतो. दंतविकार, त्वचेचे आजार, त्वचेचा कोरडेपणा आणि खाज, सांधेदुखी, केसातील कोंडा कमी करणे यासाठीही कडुलिंबाचा उपयोग होतो. पाने जाळून डास पळवले जातात. कडुलिंबाच्या पानाच्या राखेचा उपयोग काजळ बनवताना केला जातो. साल जाळून ती खोबरेल तेलामध्ये मिसळून मलमाप्रमाणे लावत. कडुलिंबाचा रस किंवा तेल पाण्यात मोठ्या प्रमाणात मिसळल्यास मासे मरतात. डोक्यावरील केस शाबूत ठेवण्यासाठी कडुलिंबांची पाने तेलात काळी होईपर्यंत उकळतात. हे तेल केसाला लावल्यास केस गळती थांबते. कडुलिंबापासून बनवलेली सौंदर्य प्रसाधने वापरल्यास वयोमानानुसार येणाऱ्या वार्धक्यखुणा येत नाहीत, असे म्हणतात. कडुलिंबाचा रस पचनक्रिया सुरळीत ठेवतो. मात्र कडुलिंबाच्या विविध पदार्थांचे सेवन लहान मुले आणि गर्भवती महिलांनी टाळणे आवश्यक आहे. तसेच अशा पदार्थांचे सेवन डॉक्टरच्या सल्ल्यानुसार करावे.

कडुलिंबाचे लाकूड टिकाऊ असते. पूर्वी धाब्याची घरे बांधताना कडुलिंबाच्या लाकडाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात असे. कडुलिंबाला कीड लागत नसल्याने ही घरे अनेक वर्षे टिकायची. मोठ्या लाकडापासून आधाराची लाकडे, दरवाजे बनवले जातात. या लाकडापासून फळ्याही काढल्या जातात. छोट्या लाकडापासून शेतीसाठीची अवजारे बनवली जातात. कडुलिंबाची लाकडे जळणासाठीही वापरली जातात. लाकडापासून मोठ्या प्रमाणात उष्णता मिळते. या झाडाच्या फळ्यापासून पेट्या बनवल्या जातात. कडुलिंबाबाबत काही गैरसमजही आहेत. कडुलिंबाच्या लाकडाच्या खिडक्या आणि दरवाजे असल्यास घरात येत नाहीत. लाकडावर शिजवलेले अन्न खाल्यास सापाचे विष चढत नाही, असेही मानतात. मात्र केवळ कडुलिंबाच्या लाकडावर शिजवलेल्या अन्नाच्या भरवशावर न राहता सर्पदंश होताच योग्य वैद्यकीय उपचार घेणे आवश्यक असते.

कडुलिंबाची पाने, फुले, बिया, मुळे, साल अशा सर्व घटकांचा औषधी उपयोग होतो. अनेक आजारावर औषधी असल्याने कडुलिंबाला ‘औषधालय’ असे म्हणतात. मानवी जीवनात कडुलिंब जणू कल्पवृक्ष आहे. म्हणूनच कडुलिंब दारी असणे शुभ मानतात. साबण, सौंदर्य प्रसाधने, दंतमंजन, किटकनाशक, बुरशीनाशक अशा अनेक कारणासाठी कडुलिंबाचे विविध घटक वापरले जातात. असे हे झाड शेतकऱ्यांचेच नाही तर संपूर्ण मानवजातीचे मित्र आहे. याला शक्य असेल तेथे वाढू दिले पाहिजे. बांधावर किमान एक तरी कडुलिंब असलाच पाहिजे. कडुलिंबाचे झाड शेतकऱ्याचे सच्चा साथी असते.

ll२ll

कडुलिंब आणि ग्रामीण महिलांचे फार जवळचे नाते आहे. शेतात जाणाऱ्या महिलांना भर उन्हात सावली देण्यासाठी कडुलिंबच असतो. त्यामुळे त्यांच्या जात्यावरील ओव्यात कडुलिंब आढळतो. भावाला मुलगी झाल्यानंतर तो बहीण आणि भाच्यांना विसरला हे सांगताना ती म्हणते,

‘लिंबाच्या लिंबोळ्या लिंबाखाली पसरल्या,

पोटी आल्या लेकी, बहिणी भाची इसरल्या’.

याच अर्थाची आणखी एक ओवी येते.

लिंबाला लिंबोळ्या, लिंबाखाली अंथरूणl

बंधुला झाल्या लेकी, गेला बहिणीला विसरूनll’.

 आज जात्यावरचे दळण राहिले नाही तरी कडुलिंब महिलांशी नाते जपून आहे. रजनी काळे यांना कडुनिंब दारात असावा वाटतो. त्याचे गुणवर्णन करत त्या शेवटी लिहितात,

कडुनिंबाचे झाड अंगणी असावे,

गार सावलीत त्याच्या शांत मी बसावे,

जाणवतो येथे मजला भगवंताचा वास,

कडुनिंब फुलांचा गोड तो सुवास’.

सुविधा या कवयित्रीचा नायक गरीब आहे. त्याच्याकडे मोगऱ्याचा गजरा घेण्यासाठी पैसे नाहीत. तो तिच्या केसात कडुनिंब माळतो. त्याच्या सच्च्या प्रेमाची जाणीव असणारी प्रेयसी व्यक्त होताना म्हणते,

सोबत रहा तू कायम,

बघ आयुष्य कसं मोगरामय होईल’.

 व.पु. काळे त्यांचे जीवन तरीही कसे सुखाचे होते, हे सांगताना कडुनिंबाला आवर्जून आठवतात. ते लिहितात,

आंघोळीला लाईफबॉय साबण असायचा,

माणसापासून म्हशीपर्यंत सगळ्यांनाच चालायचा,

दात घासायला कडुलिंबाचा फाटा लागायचा,

दगडानं अंग घासण फारसं सुसह्य नव्हते,

तरीही माझं जीवन सुखाचं होतं’.

तथागत गायकवाड यांच्या कवितेत बालपणी कडुलिंबाच्या झाडाला बांधलेल्या झोक्याची आठवण येते. सदानंद रेगे उन्हाळ्यातील दुपार काव्यात बांधताना लिहितात,

लुकलुकणारे गोल कवडसे, लिंबाच्या छायेत बसावे,

खारीचे बावरे जोडपे, बकुळीखाली आणिक दिसावे’.

तर चैतन्य साळुंखे, ‘कसा बोलता बोलता, सखे संसार उभा झाला, आयुष्याच्या बागेमध्ये लिंब बहरून गेला’ असे संसाराचे वर्णन करतात. असे अनेक कविनी कडुलिंबाला, त्याच्या गुणांना कधी झाडाच्या वर्णनांतून तर कधी रूपकातून मांडले आहे.  

देवीला मुली सोडणे आणि लिंब नेसवणे या प्रथेचे वर्णन समीर गायकवाड यांनी लिहिले आहे. मात्र त्याहीपूर्वी राजन गवस यांच्या ‘भंडारभोग’ या बहुचर्चित कादंबरीमध्ये देवदासी आणि निंब नेसवणे या प्रथेचे वर्णन आले आहे. हे वर्णन वाचताना मनाला वेदना होतात. या प्रथांचा आपण अभिमान बाळगावा का? असा प्रश्न मनात येतो. गवस सरांच्या काव्यातूनही कडुनिंब भेटतो.

डोळं थांबलं गुमान,

लिंब म्हवारला फार,

तिच्या चोळीच्या गाठीत,

झाला हिरवा अंधार’,

ऐश्वर्य पाटकर यांनी गावाची आठवण लिहितांना कडुलिंबाच्या झाडाच्या छान आठवणी लिहिल्या आहेत. गावाकड लहानपणी ते आपल्या मित्रासह झाडावर बसून अभ्यास करत. कधी तोल गेला तर कडुलिंबाच्या फांद्याना पकडून ते पडण्यापासून स्वत:ला वाचवत. त्यांना कडुलिंबांच्या फांद्या हात बनून वाचवतात, असे वाटायचे. त्यांच्या लेखनात कडुलिंबाप्रती ओतप्रोत भरलेली कृतज्ञता दिसून येते.

ग.ह. पाटील यांनी आपल्या काव्यसंग्रहाचे नाव ‘लिंबोळ्या’ असे ठेवले आहे. मात्र यात कडुलिंबावर एकच कविता भेटते. या कवितेत कडुलिंबाचे

‘पर्णश्रुती तरुवरा, तव लक्षसंख्य,

हे डालेती धवल डूल तयीं सुरेख!

नक्षत्रपुत्र नयनात्सव अंबराचे,

की लोल झुलती लोलक अंबराचे’!

 असे सुरेख वर्णन केले आहे. कडुलिंब असा अनेक साहित्यिकांना साद घालतो.

संत साहित्यातही कडुलिंबाचे अनेक ठिकाणी उल्लेख येतात. ज्ञानेश्वरीमध्ये तर कडुनिंब अनेक अंगानी भेटतो.

जैसा निंब जिभे कडवटुl हिरडा पहिले तुरटुl

तैसा कर्मा ऐल शेवटुl खणुवाळा होय ll१८६ll

या ओवीतून कर्म चांगलेच केले पाहिजे असा आग्रह धरतात. जसा कडुलिंबाची चव कडू राहणार तसे वाईट कर्म वाईटच फळ देणार असे सोदाहरण सांगतात. त्याचप्रमाणे –

जैं सुखालागीं आपणपयांl निंबची आथी धनंजयाl

तैं कडुवटपणा तयाचियाl उबगिजेना ll९२४ll

आपल्या सुखी जीवनासाठी कडू चवीचा लिंब उपयोगाला येतो. तो आपले आरोग्य चांगले ठेवतो. मग त्याच्या कडुपणाची चर्चा कशासाठी? असा प्रश्न उपस्थित करतात. ज्ञानेश्वरीत आणखी बऱ्याच ठिकाणी कडनिंब भेटत राहतो. संत तुकाराम महाराज उपदेश न समजणाऱ्या मूर्ख माणसाचे वर्णन करताना कडुनिंबाच्या औषधी गुणधर्माचा वापर दाखल्यासाठी करतात. कडुलिंब पोटाचे दुखणे बरे व्हावे म्हणून दिला आणि रूग्णांने तो पोटावर सारवला, तर काय उपयोग असा प्रश्न करताना लिहितात,

निंब दिला रोग तुटाया अंतरीl

पोंभळिता वरी आंत चरेll’.

 इतर संतांच्या रचनांतूनही विशेषत: रूपकातून कडुनिंब भेटत राहतो.  मनात घर करून राहतो.

ll३ll

मलाही बालपणीच कडुलिंब भेटला. लहानपणी गुढी पाडव्याच्या दिवशी सकाळचा कडुलिंब फुलांचा प्रसाद आम्ही गोड मानून खायचो कारण संध्याकाळी ग्रामदैवत निळकंठेश्वराच्या मंदिरात मोठा सोहळा असायचा. प्रत्येक घरातून नारळ फोडला जाई. त्या नारळाच्या खोबऱ्याचे तुकडे करून गुळात मिसळून ‘शेरणी’ नावाचा प्रसाद मिळायचा. प्रसाद खाऊनच पोट भरायचे. शेतातील बांधावर कडुलिंब होता. माळावरील शेतात असणारी निव्वळ कडुलिंबांची झाडेच सावली द्यायची. कडुलिंबाची काडी दात दुखतो असे म्हटले की चावावी लागे. त्यामुळे अनेकदा आम्ही दातदुखी अंगावर काढायचो. कडुलिंबाची लाकडे जळणासाठी आणण्याचेही काम करावे लागे. गावातील काही गरीब मंडळी लिंबोळ्या गोळा करून आणायचे तेंव्हा तो वास नकोसा वाटे. गावाजवळच्या डोहाकडेला या लिंबोळ्या धुतल्या जात. तेथेही असा उग्र वास पसरलेला असे. कडुलिंबाचे लाकूड बाभळीपेक्षा मऊ असल्याने विटी दांडू बनवायला बाभळीपेक्षा कडुलिंबाच्या लाकडाला प्राधान्य असायचे. मयतावरून आल्यानंतर कडुलिंबाच्या डहाळीने सर्वत्र गोमूत्र शिंपले जायचे. पोतराज गावात आला की त्याच्या डोक्यावरील देव्हाऱ्यात देवीबरोबर कडुलिंब असायचा. त्याच्या कमरेलाही कडुलिंबाच्या डहाळ्या लावलेल्या असत. पंचमीचा झोका कडुलिंबाला बांधला जाई. पानाच्या देठावरील हिरवी साल काढून त्याची अंगठी घालून आम्ही मिरवायचो. तर गावातील मुली कान, नाक टोचले, की ते छिद्र बुजू नये म्हणून कडुलिंबाच्या काड्या घालत. त्या आणून देण्याचे मोठे कार्य आम्हालाच करावे लागत असे. ज्वारी निघाली आणि मळणी झाली की कडब्याची गंज रचली जात असे. अशा गंजीतील कडब्याला वाळवी लागू नये यासाठी मीठाचे पाणी तयार करून कडुलिंबाच्या डहाळीने गंजीवर मारले जात असे.

             लहानपणची आणखी दोन गोष्टी आठवतात. त्यातील पहिली गोष्ट म्हणजे थोराड मुले लिंबाचे बी आणत. नखाने त्याचे दोन भाग करत. ते कापलेले बीचे आवरण हातावर उलट ठेऊन जोराने धप्पा मारायचे. लगेच रक्त यायचे. दुसरा म्हणजे कडुलिंबाच्या झाडाखाली गुंडी किड्याचे घर असायचे. हे छोटे किडे भिवरी खड्डा तयार करायचे. त्या खड्ड्यात मुंगी आली की हा किडा तिला खाऊन टाकायचा. त्यांने माती पूर्ण मऊ केलेली असायची. ती माती बाजूला काढून त्यात आम्ही तो किडा शोधत राहायचो. तो तसा आम्हाला दिसायचा नाही मात्र मुंगी येताच तो मुंगीला खातो, हे लक्षात आल्यावर आम्ही मुंगी पकडून खड्ड्यात टाकायचो. तिला खायला किडा आला की आम्ही त्याला पकडायचो. खेळताना भांडण झाले की आमच्यात कडुलिंब यायचा, ‘कट्टीत कट्टी, बालं बट्टी, लिंबाचा पाला तोडू नको, बारा महिने बोलू नको’, असे सांगत, अबोला धरला जायचा. मात्र तो बारा महिन्याचा अबोला, बारा तासही टिकायचा नाही. काही मिनिटात संपायचा. अशीच मोठ्यांचीही भांडणे संपली असती तर…?

असे कडुलिंबाचे अनेक उपयोग पहात आम्ही लहानाचे मोठे झालो. नोकरीनिमित्त बाहेरगावी राहावे लागल्यांने शेतातील फेऱ्या कमी झाल्या आणि मधल्या काळात कडुलिंबाची ‘एक उपयोगी झाड’ एवढीच ओळख राहिली.

पुन्हा तो जवळचा झाला १९९६ मध्ये. मी स्कूटर चालवत असताना अपघात झाला. त्या अपघाताचे आज हसू येते. सांयकाळची पाचची वेळ होती. सौभाग्यवती आणि मी सावकाश रस्त्याच्या डाव्या बाजूने जात होतो. एक पशूपालक व्रात्य वासुदेव आपल्या गोधनाला पाणी पाजून घराकडे निघाला होता. बैलाने वेगाने चालावे, यासाठी त्याने बैलाचे शेपूट पिरगाळले. आणि तो वृषभ अनपेक्षितपणे उधळला. तो थेट आमच्या स्कूटरला धडकला. वेग कमी असल्याने आम्ही खाली पडलो. फारसे लागले नव्हते. मात्र ते बैलाला रूचले नसावे. तो मागे वळला. माझ्या पायावर आपल्या पायाची मुद्रा उमटवून ते वृषभराज परत गेले. आमच्या दोघांचीही रास वृषभ असतानाही त्याला दया आली नाही. त्याच्या पायातील नालाने माझ्या पायावर खोलवर जखम झाली. औषधोपाचार झाले. जखम भरली. मात्र काही दिवसात पुन्हा जखमांच्या ठिकाणी पुरळ आले. पुन्हा दवाखाना. पुन्हा उपचार. जखमांचे भरून येणे आणि पुन्हा पुरळ येणे. डॉक्टरकडे जाऊन कंटाळलो. एक दुष्टचक्र सुरू झाले. आईच्या मनात देवादिकांचे करणी-धरणीचे आहे का? अशी शंका आली. तिने फारच आग्रह धरला म्हणून तिच्या समाधानासाठी गावातील मारूतीदादा या देवर्षीकडे गेलो. वयाच्या चाळीशीनंतर खऱ्या अर्थाने लिहायला वाचायला शिकलेले हे गृहस्थ. त्यांच्याकडे देवर्षीपण असले तरी त्यांनी कधी कोणाला लुबाडले नव्हते. दक्षिणा म्हणून एक नारळ आणि सव्वा रूपयापेक्षा एक पैसाही जास्त घेत नसत. त्यांना वनौषधींचीही चांगली माहिती होती. त्यांनी ‘राजाभाऊ (आमचे गावातील टोपणनाव), देवा-करणीचं काही नाही. पायातल्या जखमात माती राहिली असंल. त्यामुळं याला एकच उपाय. कडुलिंबाची पानं, हळद, कडिपत्ता एकत्र घिवून वाटा. चांगला रगडून पायावर लावा. पायावरच वाहू द्या. वाळल्यावर कडुलिंबाचा पाला टाकलेल्या गरम पाण्यानं अंघूळ करा. बरं हुईल’, असे सांगितले. यात गैर काहीच नव्हते. कडुलिंबाचे, हळदीचे औषधी गुणधर्म माहीत होते. त्यातही, डॉक्टरांचा कंटाळा आल्याने हा प्रयोग मी मनोभावे करायचा ठरवले. आठच दिवसात सर्व जखमा बऱ्या झाल्या आणि आजवर त्यांचा पुन्हा कधीच त्रास झाला नाही.

नंतर २०१२ मध्ये दातदुखी सुरू झाली. दाढ पोखरली गेली होती. ‘रूट कॅनॉल’ करून घ्यावे, असा सल्ला आमचे डॉक्टर टी.के. पाटील यांनी दिला. त्यांनीच सुचवलेल्या नामवंत दंतवैद्याकडे गेलो. त्यांनी सर्व तपासणी केली. त्यानंतर दाढेला शक्य तेवढे स्वच्छ केले आणि ‘तुमचा हा त्रास कायम संपणार नाही. अधूनमधून उदभवणार’, असे प्रामाणिकपणे सांगितले. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तीन-चार महिन्यांत पुन्हा दाढेचे दुखणे सुरू झाले. पुन्हा दंतवैद्याकडे जायची इच्छा नव्हती. शेवटी बालपणी दात दुखतो म्हटले की कडुलिंबाच्या काड्या चघळायला लावत, हे आठवले. मी हाच प्रयोग करायचे ठरवले. दोन तीन दिवसांत पूर्ण दाढदुखी थांबली. त्यावेळेपासून दररोज कडुलिंब चघळण्याचा उपक्रम नित्यनेमाने करतो. आज दाढ, दातदुखीपासून पूर्ण मुक्त आहे.

कडुलिंब जो माणूस त्याला तोडतो, इजा पोहोचवतो, त्याच्याही उपयोगाला येतो. त्यामुळे कडुलिंबात स्पष्टवक्त्या, सज्जन माणसाचे रूप दिसते. अनेक स्पष्टवक्ती माणसे आपल्या बोलण्याने कोणाचे मन दुखावेल, याची पर्वा न करता बोलत असतात. त्यांना पुढच्या व्यक्तीचे होणारे नुकसान दिसत असते. ते टळावे, त्यांचे अहित होऊ नये, म्हणून ती बोलत असतात. त्यांचे बोलणे समोरच्या माणसाच्या भल्यासाठी असते. स्पष्टवक्तेपणाला ‘कटू बोल’ म्हणतात, ‘फटकळ’ असेही म्हणतात. अशा स्पष्टवक्त्या लोकांच्या बोलण्यामुळे दुखावलेले लोक त्यांच्याविरूद्ध वागतात, त्रास देतात. तरीही स्पष्टवक्ते लोक त्याची पर्वा करत नाहीत. स्पष्टवक्ती सज्जन माणसे तर असे वागणाऱ्या लोकांचेही आभार मानतात. दुसरीकडे सज्जन मंडळी आपल्या टिकाकारांनांही आपला गुरू मानतात. टिकेबद्दल वाईट वाटून घेत नाहीत. या टिकेत आपली चूक शोधतात आणि ती सुधारतात. संत तुकाराम यांच्यासारखी मंडळी तर ‘निंदकांचे घर असावे शेजारी’ म्हणतात. स्पष्टवक्ती माणसे कडुलिंबासारखी परोपकारी असतात. संत ज्ञानेश्वरांच्या भाषेत ‘जैं सुखालागीं आपणपयांl निंबची आथी धनंजयाl तैं कडुवटपणा तयाचियाl उबगिजेना’. कडुलिंब सर्वांगाने कडू आहे. मात्र तो अनेक आजारांवर उपयोगी पडतो. मग त्याच्या कडुपणाचा विचार कशाला करायचा? कडुलिंबाचे पान, फुल, फळ, मूळ, साल, लाकूड, डिंक एवढेच काय, जाळल्यानंतरची राखही मानवाच्या कामी येते. म्हणूनच कडुलिंब कडू नव्हे; गोड आहे.

Related posts

माझ्या जगण्याचे पुस्तक – प्रांजळ आत्मकथन

जाणून घ्या… कडुलिंबाचे औषधी उपयोग

प्लॅस्टिकचा विषारी विळखा !

Leave a Comment