July 27, 2024
Environment and water scarcity in India
Home » पाणीटंचाई आणि पर्यावरण !
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

पाणीटंचाई आणि पर्यावरण !

नद्या कोरड्या होण्यामागे आणखी महत्त्वाचे कारण म्हणजे नद्यातून होणारा अमर्याद वाळू उपसा हे आहे. नद्यातील वाळू अनेक अर्थानी महत्त्वाची आहे. जैवविविधतेपासून पाण्याला जतन करून ठेवण्याचे काम वाळू करते. नद्यांच्या पात्रातील वाळू नैसर्गिक पर्यावरणीय रचनेचा भाग असते.

डॉ. व्ही.एन. शिंदे,
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

भारतात ऋतू कोणताही असो, पाणी बातमीचा विषय असतो. पावसाळ्यात पाऊस कधी येणार, पावसाळ्यात अवर्षण, पूर, ढगफुटी, विविध रूपात पाऊस आणि पाणी बातम्यांचा विषय बनतो. हिवाळ्यात पिकाला कालव्यात पाणी सोडावे, पिकाला ओढ बसून शेतकऱ्याचे नुकसान, अशा बातम्या सुरू होतात. उन्हाळ्यात पाणी टंचाईच्या बातम्या येतात. नद्या कोरड्या पडतात. तलाव कोरडे पडल्याच्या बातम्या येतात. कोयना धरणाजवळील २८ गावात पाणीटंचाई, ही नुकतीच आलेली बातमी. मागील वर्षी महाराष्ट्रात भरपूर पाऊस पडला. नद्यांना पूर आले. तलाव काठोकाठ भरले. तरीही उन्हाळ्यात पाणी टंचाईच्या बातम्या येत आहेत. आता पावसाळ्याची चाहूल लागत आहे. आताच पर्यावरणाचे नुकसान टाळून पाणी टंचाई होऊ नये, यासाठी प्रयत्न करायला हवेत.

पाऊस भरपूर पडला तरी महाराष्ट्रात पाणी टंचाई का होते, याचा विचार करायला हवा. सरासरी जगाच्या तुलनेत भारतात आणि भारताच्या तुलनेत महाराष्ट्रात पाऊस जास्त पडतो. तरीही महाराष्ट्रात पाणी टंचाई ठरलेली आहे. यामागे महत्त्वाचे कारण आहे ते म्हणजे झाडांचे घटलेले प्रमाण. एकूणच भारतातील, महाराष्ट्रातील जंगलांचे प्रमाण खूप कमी झाले. बांधावरची, नद्यांच्या काठावरील झाडांचे प्रमाण घटले आहे. झाडांच्या आणि जंगलाच्या घटलेल्या प्रमाणामुळे जमिनीत पाणी मुरण्याचे प्रमाण घटले. जमिनीतील पाणी उपसण्याचे प्रमाण प्रचंड आहे. शेतीला वापरल्या जाणाऱ्या पाण्यातील ७० टक्के पाणी विहिरी आणि कुपनलिकांमधून उपसण्यात येते. जेवढे पाणी वर्षभर उपसले जाते, तेवढे पाणी पुन्हा जमिनीत जाणे, मुरणे आवश्यक असते. मात्र तसे होत नाही, ही दुर्दैवाने वस्तुस्थिती आहे.

नद्यांवर बांधलेले तलाव हे दुसरे कारण सांगण्यात येते. मात्र हे कारण तितकेसे खरे नाही. कारण तलावांमध्ये पाणी साठवले नसते, तर त्यातील मोठा हिस्सा समुद्राला जाऊन मिळाला असता. शहरांना त्यामुळे पाणी पुरवठा करता आला नसता. शेतीला पुरेसे पाणी मिळाले नसते. आज जेवढे क्षेत्र हिरवे दिसते, त्याच्यापेक्षा एक तृतियांश क्षेत्र कमी झाले असते. त्यामुळे तलावांमुळे पाणी टंचाई होत नाही. नद्या लवकर कोरड्या पडतात. मात्र नद्या कोरड्या होण्यामागे केवळ हेच कारण आहे, असे नाही. नद्यांच्या काठावर असणारे झाडांचे घटलेले प्रमाण हे महत्त्वाचे कारण आहे.

नद्या कोरड्या होण्यामागे आणखी महत्त्वाचे कारण म्हणजे नद्यातून होणारा अमर्याद वाळू उपसा हे आहे. नद्यातील वाळू अनेक अर्थानी महत्त्वाची आहे. जैवविविधतेपासून पाण्याला जतन करून ठेवण्याचे काम वाळू करते. नद्यांच्या पात्रातील वाळू नैसर्गिक पर्यावरणीय रचनेचा भाग असते. ही वाळू सिमेंटच्या बांधकामासाठी महत्त्वाची. बांधकाम व्यवसायाला सुगीचे दिवस आल्यापासून नद्यांतील वाळू उपसा सुरू आहे. वाळू उपसण्याची शासनामार्फत रितसर निविदा काढण्यात येते. नदीतून किती वाळू उपसावी याचे प्रमाण सांगण्यात आलेले असते. अर्थात तेही कोणत्या बाबींचा विचार करून ठरवलेले असते, हे जाहीर होत नाही. या अधिकृत वाळू उपशाबद्दल सरकारला रॉयल्टी भरणे आवश्यक असते. मात्र जेवढी वाळू उपसणे आवश्यक असते, त्यापेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात वाळूचा उपसा होतो. असा अवैध वाळू उपसा मोठ्या प्रमाणात होतो. अवैध वाळू उपसा थांबवण्यासाठी काही आधिकारी प्रामाणिक प्रयत्न करतात. मात्र अशा आधिकाऱ्यांना वाळू माफियांच्या रोषाला बळी पडावे लागते.

वाळू नदीचा प्राण असते. वाळू नदीतील पाण्याला स्वच्छ ठेवण्याचे काम करते. वाळूने पकडून ठेवलेल्या पाण्यामध्ये अनेक जीव आपला उन्हाळा व्यवस्थित घालवतात. मात्र खालच्या माती किंवा खडकापर्यंत वाळूचा उपसा झाल्यानंतर यातील जीव टिकून राहू शकत नाहीत. त्यामुळे नद्यांची पर्यावरणीय रचनाच बदलली आहे. यातून नद्या मृत होत चालल्या आहेत. नद्यांची रचना, त्यांचा उगम, पाणलोट क्षेत्र, त्यावर असणारे पाणीसाठे, नद्यांचा प्रवाह, नद्यांमधील पाण्याचा प्रवाह, पाण्याचे प्रमाण या सर्व बाबींचा विचार करून त्यांचे संवर्धन आणि जतन करण्याचे धोरण ठरवणे आवश्यक असते. वस्तुस्थितीत मात्र तसे होताना दिसत नाही.

नद्या कोरड्या पडल्यामुळेच नाही तर, नद्यातील पाणी प्रदूषीत झाल्याने पाणी टंचाई झाल्याचे उदाहरण म्हणजे पंचगंगा नदी आहे. नद्यांमध्ये नागरी वस्त्यामधील वापरलेले पाणी, कारखान्यातील प्रदूषीत पाणी नाल्यांमधून, ओढ्यांमध्ये आणि ओढ्यातून नदीच्या पात्रात येते. मूळात शहरातील पूर्वी असणाऱ्या नद्यांचे आज गटारात रूपांतर झाले आहे. शहरातील सर्व सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता, गटारातून नाल्यात, नाल्यातून ओढ्यात आणि ओढ्यातून नदीत येते. या पाण्यामुळे नद्यातील जैवविविधता संपुष्टात आली आहे. निसर्गात पाणी स्वच्छ ठेवणारी यंत्रणा कार्यान्वीत असते.

एका विशिष्ट पातळीपर्यंत पाण्यामध्ये प्रदुषके असतील तर, ही नैसर्ग‍िक यंत्रणा सक्षमपणे कार्य करते. पाण्यामध्ये हायड्रीला, शैवाल आणि विविध प्रकारचे मासे, कासव, बेडूक, अशा जलचरांमुळे, उभयचरांमुळे जलसाठे स्वच्छ राहत असतात. या सर्व यंत्रणा आज निकामी झाल्या आहेत. नद्यांमध्ये मिसळणाऱ्या पाण्यांमध्ये मल-मूत्रमिश्रीत पाण्याबरोबर साबणाचे, रसायनांचे पाणी मिसळलेले असते. त्याचा परिणाम जलप्रवाहातील जैवसृष्टीवर झाला आहे. त्यामुळे ज्या पंचगंगेच्या पात्रातील पाणी कोल्हापूर शहराला पिण्यासाठी पुरवले जाते, त्याच पंचगंगेतील पाणी इचलकरंजी शहराला वापरण्यासाठीही घेता येत नाही.

इतर नद्यांची अवस्था यापेक्षा बिकट आहे. त्या नद्यांमध्ये पाणी केवळ पावसाळ्यात वाहत असते. हिवाळा सुरू झाला की हा प्रवाह आटतो. त्यामध्ये काही ठिकाणी पाणी असते. मात्र वाळू उपशामुळे त्यालाही ग्रहण लागले आहे. पाण्याचा अमर्याद वापर हेही पाणीटंचाईचे महत्त्वाचे कारण आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस पडणारा आणि सर्वाधिक धरणे असलेल्या इगतपूरी तालुक्यालाही पाणी टंचाई जाणवते. मालेगाव शहराला दोन दिवसाआड पाणी पुरवण्यात येते. लातूर शहराला आजही सात दिवसातून एकदा पाणी पुरवण्यात येते. पुणे शहरालाही एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येतो. याला मूळ कारण नद्यांमध्ये पाण्याचा प्रवाह नसणे, जमिनीतील पाणी अमर्याद पाणी उपसणे, वाढते काँक्रिटीकरण अशा अनेक कारणामुळे पाणी टंचाई वाढत आहे.

भविष्यात पाणी टंचाई संपणे अवघड आहे. मात्र पाणी टंचाईची तिव्रता कमी करता येणे शक्य आहे. त्यासाठी शक्य असेल तेथे झाडांची लागवड करायला हवी. आज पडणाऱ्या पावसाच्या पाण्यातील १० टक्के पाणी जमिनीत मुरते, १७ टक्के पाण्याची वाफ होते, ६७ टक्के पाणी समुद्राला जाऊन मिळते. आज आपण केवळ सहा टक्के पाण्याची साठवण करतो. पाण्याची टंचाई संपवायची असेल तर पळणाऱ्या पाण्याला थांबवण्याची आणि थांबलेल्या पाण्याला जमिनीत मुरवण्याची गरज आहे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

अल्प मुदतीच्या कृषी कर्जावर 1.5% व्याज सवलत

ब्रह्मांडाच्या ज्ञानासाठी आत्मज्ञानाचा विकास होणे गरजेचे

लक्ष्मीचे वाहन घुबड अंधश्रद्धेचे बळी

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading