October 14, 2024
Home » Privacy Policy » समुद्रातील शैवालापासून बायोडिझेल
संशोधन आणि तंत्रज्ञान

समुद्रातील शैवालापासून बायोडिझेल

बायोडिझेल संदर्भात चेन्नई येथील राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्थेच्या संशोधकांनी नुकताच एक शोधनिबंध सादर केला आहे. त्यामध्ये जी. धरणी, डी. मगेश पीटर, जी. टी. मॅरी लीमा, टी. एस. कुमार, के. त्रिपाठी, ए. जोसेफाईन, आर. किरुबगरन आणि एम. ए. आत्मानंद या संशोधकांनी समुद्री सूक्ष्म एकपेशीय वनस्पती क्‍लोरिला व्हल्गॅरिसपासून बायोडिझेलचे उत्पादन घेतले आहे. 

– राजेंद्र कृष्णराव घोरपडे

भारतात दर वर्षी 219.15 मेट्रिक टन इंधन आयात केले जाते. त्याची किंमत 90 बिलियन अमेरिकन डॉलर इतकी म्हणजे 5.62 लाख कोटी इतकी होते. त्यातील 70 टक्के इंधन हे ऍटोमोबाईलमध्ये वापरले जाते. सर्वाधिक इंधन आयात करणाऱ्या देशांच्या यादीत भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. गेल्या दोन दशकात भारताची इंधनाची गरज मोठ्या प्रमाणात वाढली आहे. 1970-71 मध्ये पाच दशलक्ष मेट्रिक टन इतका इंधनाचा वापर होत होता. तो 2006-07 मध्ये 45 दशलक्ष मेट्रिक टन इतका झाला.

एकपेशीय वनस्पती क्‍लोरिला व्हल्गॅरिस

भारतातील इंधनाचा वाढता वापर विचारात घेता त्याचे पर्याय शोधण्याची गरज भासू लागली आहे. भविष्यात इंधनाचा तुटवडा जाणवणार हे निश्‍चित आहे. त्यासाठी आर्थिक तसेच पर्यावरणासाठी उपयुक्त ठरणाऱ्या इंधनाचा शोध घेतला जात आहे. भाजीपाल्यातील तेल आणि प्राण्यांतील चरबीपासून बायोडिझेल मिळवले जाऊ शकते; पण अन्न सुरक्षेचा विचार करता हे एक मोठे आव्हान आहे.

बायोडिझेल संदर्भात चेन्नई येथील राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्थेच्या संशोधकांनी नुकताच एक शोधनिबंध सादर केला आहे. त्यामध्ये जी. धरणी, डी. मगेश पीटर, जी. टी. मॅरी लीमा, टी. एस. कुमार, के. त्रिपाठी, ए. जोसेफाईन, आर. किरुबगरन आणि एम. ए. आत्मानंद या संशोधकांनी समुद्री सूक्ष्म एकपेशीय वनस्पती क्‍लोरिला व्हल्गॅरिसपासून बायोडिझेलचे उत्पादन घेतले आहे. तसेच, हे बायोडिझेल दुचाकी आणि चारचाकी गाड्यांमध्ये वापरण्यायोग्य असल्याचेही त्यांनी प्रयोगाअंती सिद्ध केले आहे. सल्फरविरहित व कार्बन मोनो ऑक्‍साईड, हायड्रोकार्बन आदीचे किमान उत्सर्जन यातून होते. यामुळे करण्यात आलेले हे संशोधन भावीकाळात खूपच उपयुक्त ठरणारे असे आहे. सूर्यप्रकाशात या सूक्ष्म एकपेशीय वनस्पतीचे उत्पादन घेऊन बायोडिझेल उत्पादनाचा खर्चही कमी करता येऊ शकेल, असे मत या संशोधकांनी व्यक्त केले आहे.

बायोडिझेलसाठी आवश्‍यक घटक

क्‍लोरिला व्हल्गॅरिसमध्ये असणारे फॅटी ऍसिड मिथिल इस्टर (फेम)च्या घटकांच्या प्रमाणावरून बायोडिझेल इंधनाची गुणवत्ता ठरते. फेमच्या प्रमाणावरूनच या सूक्ष्म एकपेशीय वनस्पती बायोडिझेलचे उत्पादन देऊ शकते, हे निश्‍चित करण्यात आले. क्‍लोरिला व्हल्गॅरिसमध्ये पालमिटीक ऍसिड 45.54 टक्के, पालमिटोलिक ऍसिड 31.10 टक्के, असे प्रमाण आढळते. तसेच सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड 58.37 टक्के इतके आढळते. इंधनाची गुणवत्ता सॅच्युरेटेड फॅटी ऍसिडच्या प्रमाणावरूनच वाढत जाते.

इतकी आहे औष्णिक कार्यक्षमता

पेट्रोलियम डिझेलची औष्णिक कार्यक्षमता 32.42 ते 39.77 टक्के इतकी आहे. तर क्‍लोरिला व्हल्गॅरिसपासून तयार केलेल्या बायोडिझेलची औष्णिक कार्यक्षमता 32.42 ते 37.15 टक्के इतकी आहे. यावरून मायक्रोअल्गीपासून तयार केलेले बायोडिझेल हे पेट्रोलियम डिझेलला उत्तम पर्यायी इंधन ठरू शकते, असा दावा या शोधनिबंधात संशोधकांनी केला आहे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading