बघा नुसती कल्पना केली तरी तुम्हाला दरदरून घाम फुटेल आणि क्षणात घेतलेली उतरेल. कुठलेही व्यसन हे जरा वेळ झिंग आणून त्या गोष्टीला विसरायला लावत असेल पण त्याने तो प्रश्न मिटत नाही किवा संपत नाही किंवा त्यावर तोडगा मिळत नाही. उलट असलेले प्रश्न अजून बिकट होतात.
सौ सुनेत्रा विजय जोशी

शिर्षक वाचून हादरलात ना? आज हे काय नवीन सुचले? झिंग म्हणजे नशा. आयुष्यात जगण्यासाठी एक आवश्यक असणारी गोष्ट. लगेच बारकडे वळू नका. किंवा बिडी सिगारेट हाती घेऊ नका. मी अस ऐकलय म्हणजे खरे खोटे माहित नाही. पण म्हणे दुःख दूर करायला माणसे दारू पितात किंवा खूप आनंद झाला की ते सेलिब्रेशन करण्यासाठी पितात. खरे खोटे देवच जाणे. पण मला एकच कळते की अशी जर दुःख दूर झाली असती तर जगात मग कुणी दुःखी राहिलेच नसते. आणि कुणी म्हणतात टेंशन आले की ते दारू किंवा तत्सम व्यसन केले की बरे वाटते.
पण मला अजून तरी असा एकही इसम भेटला नाही की अशी नशा केली आणि त्याची सगळी दुःखे, ताण संपले आणि तो आता मजेत आहे. खरे तर जर ही कारणे खरी असती तर तमाम महिला आधी व्यसनी झाल्या असत्या. कारण त्यांना लग्न करुन दुसऱ्या घरी जाण्याचा ताण. मग तिथे असेल त्या परिस्थितीत राहण्याचा ताण. नंतर मुले होणे न होणे याचाही ताण. तसेच झाली तरी ती नीट वागणे न वागणे याचा ताण. बरे वाईट निपजली तरी वडिलांचा उध्दार होत नाही तर आईने वळण लावले नाही असेच बोलल्या जाते. मुलगी असेल तर अजुनच वेगळी काळजी. त्यात नवरा रागीट, मारझोड करणारा किंवा लफडी करणारा असेल तर मग विचारुच नका. मग काय त्यांनी रोज दोन पेग मारायचे का?
बघा नुसती कल्पना केली तरी तुम्हाला दरदरून घाम फुटेल आणि क्षणात घेतलेली उतरेल. कुठलेही व्यसन हे जरा वेळ झिंग आणून त्या गोष्टीला विसरायला लावत असेल पण त्याने तो प्रश्न मिटत नाही किवा संपत नाही किंवा त्यावर तोडगा मिळत नाही. उलट असलेले प्रश्न अजून बिकट होतात. म्हणजे पैशाची चणचण असेल तर दारुचा खर्च केल्यावर ती अधिकच वाढणार आहे. तब्येत खराब होऊन डाॅक्टर चा खर्च अजुनच येणार आहे. त्यात मनस्ताप होणार तो वेगळाच. त्यापेक्षा त्याच पैशात तुम्ही घरचा दुसरा खर्च भागवू शकता. घरच्यांशी बोललात तर तेही काही छोटेमोठे काम शोधून पैशाचा हातभार लावू शकतात. तसेच काटकसर करुनही मदत करु शकतात. हो पण या साठी ती अडचण मिटविण्यासाठी इच्छा हवी. काही जण तर त्यावर आत्मनाश ओढवून घेतात.. पण त्यानेही प्रश्न तसेच राहतात किंवा ते अधिक वाढतात. आणि ते प्रश्न मग घरातल्या लोकांना पडतात. नुसते मनाचे चोचले पुरवायचे आणि त्याला वेगळे कारण देऊन.हवे ते करायचे असे.. नको.
आता मी सुरवातीला म्हटले ते की जगण्यात नशा झिंग हवी पण ती कोणती? तर काहीतरी करून दाखवण्याची. प्रत्येकात काही तरी कलागुण, हुशारी असतेच. ती करुन नाव कमावण्याची. समाजाला उपयुक्त असे काही काम करण्याची किंवा कुणाच्या उपयोगी पडण्याची. आपल्या आजुबाजूला अनेक गोष्टी प्रतिकूल घडत असतात त्या बघून काही चांगला बदल घडविण्यासाठी काही करण्याची. एकदा असे काही काम करून तर बघा. तुम्हाला सुखाची अशी काही झिंग येईल की पुन्हा पुन्हा तुम्ही अशी कामे करुन समाधान मिळवाल. कुणाच्या चेहर्यावर आनंद बघून जो आनंद मिळतो तो शब्दात नाही सांगता येत. शिवाय त्यातून निर्माण होणारी सकारात्मक उर्जा अजून आनंद देते. आणि हे समाधान कुठल्याच मादक पदार्थाने विकत नाही मिळणार. घरच्यांच्या, मित्रमंडळींच्या प्रेमाची, मायेची झिंग काही वेगळीच. पैसे खर्च न करताच कधी न उतरणारी आणि वेळप्रसंगी जिवाला जीव देणारी ही माणसे सोबत असतील. हे अनुभवाचे बोल आहेत नुसतीच पोपटपंची नाही.
नशा ये प्यार का नशा है… म्हणत आयुष्यभर प्रेमाचा झिंगझिंगझिंगाट अनुभवायचा की क्षणभरच्या नशेत आयुष्य नासवून घ्यायचे आणि त्याचा तमाशा अनुभवायचा हे ज्याचे त्यानेच ठरवायचे आहे. सुज्ञास अधिक सांगणे नलगे.