December 7, 2022
Non Violence should in Mind Rajendra Ghorpade article
Home » अहिंसा…
विश्वाचे आर्त

अहिंसा…

फुलातील गंध शोषताना किटक पाकळ्यांना इजा होणार नाही याची काळजी घेतात. तशी काळजी आपण आपल्या जीवनात घ्यायला हवी. वारा वाहतो तेव्हा त्या वाऱ्या विरुद्ध हात फिरवला तर तो वारा विचलित होईल किंवा हातवारे करताना आकाशाला नख लागेल म्हणून जोरजोरात हात फिरवू नये इतकी अहिंसा विचारात असायला हवी.

राजेंद्र घोरपडे

मोबाईल 9011087406

पै मानसिंचि जरी । अहिंसेची अवसरी ।
तरी कैची बाहेरी । वोसंडेल ।। 297 ।। श्री ज्ञानेश्वरी अध्याय 13 वा

ओवीचा अर्थ – परंतु मनातच जर अहिंसा नसेल तर बाहेर कशी येईल ?

अहिंसा मनातच नसेल तर कृतीत कधीच येणार नाही. मनात अहिंसा असायला हवी, तरच निश्चितच ती कृतीत उतरेल. मनातील विचारात अहिंसा असायला हवी. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या तेराव्या अध्यायात काही उत्तम उदाहरणे देऊन अहिंसचे महत्त्व पटवून दिले आहे. मनात अहिंसा कशी उत्पन्न करायची हे सुद्धा यातून स्पष्ट केले आहे. स्वामी झोपले आहेत. अशावेळी त्यांची झोपमोड होऊ नये किंवा साधनेला बसलेले आहेत. तेव्हा त्यांची साधना भंग पावणार नाही अशी कृती करायला हवी. म्हणजेच तसे विचार आपल्या मनात यायला हवेत. तरच ते कृतीत येतील. समाधी मंदिरात दर्शनासाठी जेव्हा भक्त जातात तेव्हा ते हा विचार करतात का ? त्यांच्या विचारात ही अहिंसा असते का ? तसेच तेथे सेवा देणाऱ्या सेवेकऱ्यांच्यामध्ये ही वृत्ती असते का ?

स्वामींची समाधी ही संजिवन असते. म्हणूनच तेथे आपण दर्शनासाठी जात असतो. सद्गुरु आत्मरुपाने आपणास बोध देत असतात. समाधीच्या ठिकाणी ते ध्यानरुपात असतात. हा विचार समाधीचे दर्शन घेताना किती साधक करतात ? मुळात हा अहिंसेचा विचार आहे. हा विचार दर्शन घेताना नसेल तर तर मग अहिंसा कृतित कशी अवतरेल. दर्शनासाठी गेल्यानंतर समाधीवर डोके टेकवतो न टेकवतो तेवढ्यात सेवेकरी पुढे ढकलतो. समाधीचे दर्शनही होत नाही. अशा स्थितीत सद्गुरुंना कशी समाधी लागेल.

वारीत भक्तांमध्ये एकोपा, समता, एकजुटीचा भाव, सहकार्यांचा भाव पाहायला मिळतो. चालतानाही वारीत एकमेकांमध्ये स्नेहभाव दिसून येतो. हा भाव हा अहिंसेच्या विचारातून आला. ही वृती वारकऱ्यांमध्ये कशामुळे येते.? वृत्ती आणि कृती ही मनातून उत्पन्न होते. म्हणून मनातच अहिंसेचा विचार असायला हवा. मनात अहिंसेचा विचार उत्पन्न झाला तर तो मग कृतीत आपोआपच अवतरतो. साहजिकच दर्शनावेळी ढकलाढकली न होता शांत चित्ताने दर्शन घ्यावे हा भाव सर्वात उत्पन्न होईल. दर्शन घेणाऱ्याने असे दर्शन घेतले तर दर्शन देणाऱ्यालाही तितक्याच उत्साहाने दर्शन द्यावे असे वाटेल. हे सर्व अहिंसेच्या विचारातून निर्माण होते हे विसरता कामा नये.

फुलातील गंध शोषताना किटक पाकळ्यांना इजा होणार नाही याची काळजी घेतात. तशी काळजी आपण आपल्या जीवनात घ्यायला हवी. वारा वाहतो तेव्हा त्या वाऱ्या विरुद्ध हात फिरवला तर तो वारा विचलित होईल किंवा हातवारे करताना आकाशाला नख लागेल म्हणून जोरजोरात हात फिरवू नये इतकी अहिंसा विचारात असायला हवी. असे अहिंसेचे विचार मनात उत्पन्न व्हायला हवेत. तेव्हाच आपल्या कृतीत अहिंसा दिसून येईल. यासाठी मनाला अहिसेंच्या विचारांची सवय लागायला हवी. बोलतानाही अहिंसेचा विचार आपणात असायला हवा. तसे असेल तर बोलण्यात आणि आपल्या वागण्यात अहिसेंचा भाव निश्चितच उत्पन्न होईल.

अहिंसेच्या विचारांनी देशाला स्वातंत्र्य मिळाले असेल तर अहिंसेच्या विचाराने अध्यात्मिक प्रगतीही निश्चितच होईल इतकी ताकद या अहिंसेच्या विचारात आहे. आपले बोलणे दुसऱ्याला आनंद देणारे असेल, आपली वाणी इतकी मधूर असेल तर दुसराही निश्चितच त्यातून सुखावून जातो. यासाठी अहिंसेच्या विचारांची पेरणी मनाच्या शेतात करायला हवी. तेव्हाच अहिंसेचे जोमदार पीक या देहाच्या भूमीत डोलेल. यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे.     

Related posts

दृढ निश्चयाने अभ्यास हवा

तैसें श्रुताधीत सकळ । गुरुकृपा साज ।। (एक तरी ओवी अनुभवावी)

मानसिक विकासासाठी योग्य ठिकाण शोधायलाच हवे

Leave a Comment