June 19, 2024
Book Review of Ranbhajya Medicinal Importance of Vegetables
Home » आरोग्यदायी रानभाज्याबाबत जागृती…
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

आरोग्यदायी रानभाज्याबाबत जागृती…

नैसर्गिक वातावरणात या भाज्यांची वाढ होत असल्याने त्यांची चवही नष्ट होत नाही. यामुळे आरोग्यासाठी रानभाज्या या निश्चितच उपयुक्त ठरतात. यासाठी रानभाज्यांबाबत जनजागृतीची गरज आहे.


मानवाच्या आहारात असणाऱ्या बहुतांश वनस्पतींची शेतात लागवड केली जाते. मात्र लागवड न करताही जंगलात आढळणाऱ्या बहुतांश वनस्पती या मानवी आहारात वापरल्या जातात. तणे, कंद यासारख्या अनेक वनस्पती ऋतुनुसार आपसुक वाढतात. अशा भाज्यांना रानभाज्या असे म्हटले जाते. सध्या यातील काही भाज्यांची आता लागवडीही केली जाऊ लागली आहे. आरोग्यदायी रानभाज्या या पुस्तकात अशाच निवडक ६१ रानभाज्यांची रंगीत छायाचित्रांसह सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

आरोग्यास पोषक ठरणाऱ्या रानभाज्यांच्या गुणधर्मांची सविस्तर माहितीही या पुस्तकात देण्यात आली आहे. तसेच रानभाज्यांपासून तयार केल्या जाणाऱ्या विविध रुचकर आणि पोषक पाककृतींचीही माहिती या पुस्तकात दिली आहे. रोजच्या आहारात या भाज्यांचा समावेश करून मधुमेह, पचनसंस्थेचे विकार, लठ्ठपणा अशा अनेक जीवनशैलीजन्य आजारांना अटकाव कसा करता येईल याविषयीचे मार्गदर्शनही यात केले आहे. निसर्गप्रेमी, आयुर्वेदप्रेमी, आहारातज्ज्ञ, अभ्यासक, शेतकरी व हॉटेल व्यावसायिक या सर्वांना हे पुस्तक निश्चितच उपयुक्त ठरणारे आहे.

पावसाळ्यात रानभाज्या आपोआप उगवतात. त्यांच्या कीड, रोगाचा प्रादुर्भाव कमी असल्याने रानभाज्या लागवडीचा विचार शेतकऱ्यांनी करायला हवा. कीटकनाशकांच्या फवारणीचा तसेच खतांचाही खर्च यामुळे कमी होतो. नैसर्गिक वातावरणात या भाज्यांची वाढ होत असल्याने त्यांची चवही नष्ट होत नाही. यामुळे आरोग्यासाठी रानभाज्या या निश्चितच उपयुक्त ठरतात. यासाठी रानभाज्यांबाबत जनजागृतीची गरज आहे.

रानभाज्यांपासून वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात. अळूपासून आपणास फक्त अळूची वडीच हे माहीत आहे. पण अळूच्या देठाची भाजी, अळूगाठी भाजी, अळूची भगरा भाजी, अळकुड्यांची भाजी हे पदार्थ हे केले जातात. करमळ ही औषधी वनस्पती आहे. यापासून लोणचे तयार केले जाते. उसाच्या शेतात मोठ्या प्रमाणात तण म्हणून वाढणारे घोळ हे आरोग्यासाठी उपयुक्त आहे. घोळीच्या पानामध्ये हृदयविकार दूर ठेवण्यासाठी महत्त्वाचे असणारे ओमेगा -३ फॅटी अॅसिड मोठ्या प्रमाणात असते. मग या घोळीची भाजी तण न म्हणता भाजीसाठी उपयोग केल्यास आरोग्यासाठी उपयुक्त ठरणार नाही का ? बांबूच्या कोंबाची भाजी केली जाते. शतावरीपासून सूप व शतावरीच्या कोंबाची भाजी केली जाते. असे रानभाज्यापासून करण्यात येणाऱ्या विविध पाककृतींचीही माहिती या पुस्तकात दिल्याने हे पुस्तक निश्चितच रानभाज्यांचे महत्त्व वाढवणारे आहे. शेतात उगवणारे तण हे सुद्धा उपयुक्त असते हे विचारात घेऊन त्यानुसार त्याचे महत्त्व जाणून घेऊन त्याचा योग्य वापर कसा करता येईल याबाबत जागरुकता निर्माण करण्याची गरज आहे. यासाठी हे पुस्तक निश्चितच प्रबोधन करणारे असे आहे.

पुस्तकाचे नाव – आरोग्यदायी रानभाज्या
लेखक – डॉ. मधुकर बाचुळकर
प्रकाशक – सकाळ प्रकाशन
पृष्ठे – १६० किंमत – 195 रुपये

Related posts

बाय वन, गेट वन फ्री !

एकनिष्ठ प्रेमाचा संस्कार

जामखेड येथील मराठी साहित्य प्रतिष्ठानचे साहित्य पुरस्कार जाहीर

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406