March 27, 2023
ex-mp-raju-shetti Meets N D Patil
Home » …अन् एन. डी. राजू शेट्टींना म्हणाले, आंदोलन कसं कायं चाललयं
सत्ता संघर्ष

…अन् एन. डी. राजू शेट्टींना म्हणाले, आंदोलन कसं कायं चाललयं

चळवळीतील तारूण्यातील कार्यकर्ता, यशस्वी लोकप्रतिनिधी ते राज्याच्या शेतकरी चळवळीतील भीष्माचार्य असा एन डी पाटील यांचा प्रवास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला प्रेरणा देणारा आहे.

राजू शेट्टी

माजी खासदार
अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

वयाच्या ९२ वर्षे पुर्ण झाल्यानंतरही शरीर साथ देत नसल्याने अंथरूणावर असलेले चळवळीतील भीष्माचार्य एन डी पाटील ( दाजी) यांची आज कोल्हापूरातील निवासस्थानी तब्येतीची विचारपूस करण्यासाठी गेलो. शेतकरी चळवळीबद्दल अंतःकरणातून असलेली तळमळ व निष्ठेने करत असलेल्या आंदोलनाची धग आजही मनामध्ये दिसून आली. साहेबांना थोडे विस्मरण झाले आहे. समोर आलेल्या व्यक्तींचा त्यांना परिचय करून द्यावा लागत आहे.

भेटल्यानंतर शेतकरी संघटनेचे नेते भगवान काटे यांनी सांगितले, साहेब माजी खासदार राजू शेट्टी आलेत, क्षणातच त्यांच्या तोंडातून उद्गार आले “आंदोलनाच कस काय चाललंय “ करारी आवाज व भेदक नजरेतून चळवळीला दिशा दिलेले ज्येष्ठ नेते एन डी पाटील यांना विस्मरण जरी झाले असले तरी एखादे पुस्तक, पेपर किंवा टी. व्ही. मध्ये चळवळीतील व राजकीय घटना समोर आल्यानंतर त्यांच्या शरीरात आजही तारूण्यातील उर्जा निर्माण होते. माझ्यासारख्या चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्याला “भान ठेवून नियोजन करावं आणि बेभान होऊन कार्यवाही करावी “ यापद्धतीच एन. डी. पाटील यांच काम मी १९८० पासून जवळून पाहत आलो व यामुळेच माझ्या शेतकरी चळवळीला दिशा मिळत गेली.

चळवळीतील तारूण्यातील कार्यकर्ता, यशस्वी लोकप्रतिनिधी ते राज्याच्या शेतकरी चळवळीतील भीष्माचार्य असा एन डी पाटील यांचा प्रवास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला प्रेरणा देणारा आहे. मी व भगवान काटे १९८० पासूनच्या एन. डी. पाटील यांच्या चळवळीतील इतिहासाची पाने चाळत असतानाच एन. डी. च्या धर्मपत्नी सरोज माई आमच्याजवळ आल्या. माई समोर दिसताच एन. डी. साहेबांनी राजू व भगवानराव यांना जेवण करून पाठवून द्या असा आदेशच दिला. आजही चळवळीतील कार्यकर्त्याची काळजी व विचारपूस करण्याच्या साहेबांच्या स्वभावात तसूभरही फरक पडला नाही.

Related posts

पाणी प्रश्नांवर उत्तरे सुचविणारे पुस्तक

स्पेनमध्ये अवतरली महाराष्ट्र संस्कृती…

सामाजिक चळवळीचा महाग्रंथ

Leave a Comment