लेखकाला आयुष्यभरात भेटलेले काही सुहृद, प्रिय स्नेही आणि मार्गदर्शक यांच्याप्रति अपार आदर, प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करणारी ही मनातील पत्रे वाचणे हा एक छान आनंद सोहळा आहे. जिव्हाळा हा या पत्रांचा अंतःस्तर आहे, तर लालित्य हा बहिःस्तर आहे. त्यामुळेच हे पुस्तक अंतर्बाह्य ‘सुरेल’ झाले आहे. पुढच्या पिढीला हे पुस्तक या अर्थाने मार्गदर्शक ठरेल.
विवेक सबनीस
राजीव बर्वे यांचा हा एका वेगळ्याच विषयावरील पत्रांचा अनोखा संग्रह आहे. मन, देव, आरसा, सूर्य, सागर अशा व्यक्त-अव्यक्त गोष्टींबरोबर आवडत्या व्यक्तींना लिहिलेली सुमारे 14 पत्रे यात आहेत; तर एक पत्र कैफियत मांडणारे आहे. विशेष म्हणजे ही सर्व एका बाजूने लिहिलेली पत्रं असून त्याला उत्तर मिळणार नाही. किंवा उत्तर मिळाले, तरी या पत्रांच्या संदर्भात ते महत्त्वाचे नाही, असे त्यामागे गृहितक आहे. त्यामुळेच या सर्व पत्रांमध्ये एक वेगळेच नाट्य दडले आहे. त्यातून या पत्रांमधील काही मूर्त गोष्टींना आणि त्यामागील अमूर्त कल्पनांना आपोआप एक मानवी भाव-भावना आणि विचार असणारे व्यक्तीमत्त्व प्राप्त होते. ही सर्व पत्रे म्हणजे लेखकाचे एकप्रकारे आत्मकथन आहे. त्यातील काही पत्रांमधील भाबडेपणा, काहीसा बालीशपणा आणि शालेय पातळीवरील निबंधात असणारा आदर्शवाद त्यामध्ये डोकावतो. अर्थात, पत्र लेखनातील ही उणीव नसून ती त्यामधील पत्रलेखकाचा मूड व त्याच्या भावना व विचारांमधली विविधता आहे.
‘पत्रलेखनातून व्यक्तीचित्रण’ हा एक वेगळाच घाट राजीव बर्वे यांनी निर्माण केला आहे. पत्र पाठवलेल्या व्यक्तीचे विविध पैलू उलगडून त्यासंबंधी पत्रलेखकाची निरीक्षणे, विश्लेषण आणि काही निष्कर्षात्मक अंदाज यामुळे ही पत्रे वैशिष्ट्यपूर्ण झाली आहेत. तसेच या पत्रांतील कर्तृत्त्ववान व्यक्तींकडे कोणत्या नजरेतून बघावे, त्याचा काय अर्थ लावावा, यांचा आगळा-वेगळा व स्वतंत्र परीपाठच ही पत्रे घालून देतात. यातील 11 पत्रे ही बर्वे यांच्या मनातील त्या त्या व्यक्तींच्या संदर्भातील कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच लिहिली असली, तरी प्रत्येक पत्राचे स्वतंत्र खैसियत आहे. ही सर्व संहिता वाचत असताना जाणवले की, पत्रलेखक बर्वे यांनी एकेक पत्र लिहायला सुरूवात केली आणि नंतर हळुहळू त्या पत्र लेखनातील ‘मूळ हेतूच्या पलिकडील वेध घेण्याचा’ सूर त्यांना गवसू लागला. काही पत्रांमध्ये तो ठळकपणे व नेमकेपणाने व्यक्त होतो.
बर्वे यांना मनातील भावना व्यक्त करण्यासाठी पत्र हे माध्यम जवळचे वाटले. या पत्रांमधील हयात नसलेल्या व्यक्तींविषयी त्यांच्या जाण्यामुळे मनाला झालेल्या जखमेवर औषध म्हणून काही प्रमाणात ही पत्रं काम करतात. एकंदर ही सारी पत्रं लिहिल्यामुळे त्यांच्या मनातली अस्वस्थता कमी होण्यास मदत झाल्याचे त्यांनी आवर्जुन म्हटले आहे. मुळात ही सर्वच पत्रे वाचनीय झाली आहेत. त्यामुळे या संहितेचे पुस्तक काढायला हरकत नाही.
परीक्षकाने या संहितेस दिलेला दर्जा : अ
परीक्षकाची काही निरीक्षणे, विश्लेषण आणि सूचना:
- पत्रलेखन हा साहित्यप्रकार जुना असला तरी ‘एकतर्फी पत्रे’ व त्याला उत्तर मिळणार नाही, हे गृहीत धरल्यामुळे ती पत्रे पत्रलेखकाच्या मनातील भावना काहीशा विस्ताराने व्यक्त करतात. मन, देव, सागर, सूर्य, आरसा अशा काही पत्रांमध्ये त्यातील बाळबोध भाबडेपणा आणि आदर्शवादापलीकडे जाऊन त्यातील पत्रलेखकाला अभिप्रेत असणारा दडलेला आशय छान व्यक्त झाला आहे. तर प्रत्यक्ष व्यक्तींना लिहिलेल्या उर्वरित पत्रांमध्ये मात्र लेखकाच्या भावनांचा उद्रेक, हळवेपणा आणि मनाला लागलेली रुखरुख संयमाने बाहेर पडली आहे. पत्रलेखन हे म्हटले तर भावना व्यक्त करण्याचे औपचारिक माध्यम आहे. त्यातील अनौपचारिकताही एका मर्यादेपलीकडे अघळ पघळ होत नसते. ते पत्थ्य पत्रलेखक बर्वे यांनी इथेही कसोशीने पाळले आहे. यातून पत्र पाठवलेल्या व्यक्तींची व्यक्तिचित्रे पत्रलेखकाच्या नजरेतून वाचकाच्या डोळ्यांपुढे उभी राहतात.
- ही सर्व पत्रे हा लेखकाच्या जीवनात डोकावलेल्या विविध व्यक्तींच्या रूपातील एक भावनिक कोलाज आहे. मन, देव, आरसा, सागर आणि सूर्य या अमूर्त आणि नश्वर गोष्टींनाही व्यक्ती मानून पत्रलेखकाने त्याच्या मनातील काही गमतीदार कल्पना आणि संकल्पनांना वाट मोकळी करून दिली आहे. या पाचही गोष्टींबद्दलचे लेखकाच्या मनातील आदिम कुतूहल, त्याचा त्याने लावलेला अर्थ आणि व्यक्त केलेल्या अपेक्षा हे सारेच वाचकाच्या मनातील बालसुलभ इच्छा-आकांक्षेचे प्रातिनिधीक स्वरूप आहे.
प्रियजनांपैकी लिहिलेल्या व्यक्तींपैकी सहा जण हयात नाहीत. त्यांच्या वियोगाचे अपार व आतापर्यंत अव्यक्त राहिलेलं दु:ख आणि वेदनाही त्यातून अत्यंत सहजतेने बाहेर पडते. पत्रलेखकाच्या मानसिक पातळीवरील हे विरेचन (कॅथार्सिस) असले तरी त्यात एक उत्स्फूर्तता आहे, एक अंगभूत सुंदर लय आहे. किंबहुना, त्यामध्ये एक हृदयापासून घातलेली आर्त साद असल्यामुळे त्यातील कातरता व उत्कटता संयमित असून ती वाचकाला भावणारी आहे. यातील प्रत्येक पत्रांत पत्रलेखकाची काही सुंदर वाक्ये ‘आतून’ आल्यामुळे ती या पत्राची अंगभूत कलात्मकता वाढवण्यास हातभार लावतात.
- मनास पत्र : बालसुलभ कुतुहल जागे करणारे हे पहिले पत्र स्वत:च्या मनाला ‘माझा जवळचा मित्र’ म्हणून संबोधते. त्यातील ‘माझा’ म्हणजे कुणाचा? कारण त्या ‘माझा’लाही मन आहेच! त्यात दुसरा तात्त्विक प्रश्न येतो, तो ‘तुला कुणी घडवलं’ हा. ‘कोऽहं’, मी कोण आहे? त्यातील तत्त्वज्ञानात न शिरता पत्रलेखक या मनाचा लहानपणापासून आजपर्यंतच्या मैत्रीपूर्ण सोबतीचे वर्णन करतो. तुझ्यामुळे मी संयम शिकलो, कल्पनेचे इमले बांधताना मला सावध केलेस वगैरे. ‘मनी वसे ते स्वप्नी दिसे’ या उक्तीनुसार स्वप्नातले तुझे-माझे नाते काय हा प्रश्न पत्रलेखकाला पडतो. ‘मानत यायला प्रयत्नांची साथ मिळाली की नियती यशाचं दार किलकिलं करते व असाध्य ते साध्य होऊन जाते.’ ‘माणूस जेव्हा मनाने खचतो, तेव्हा जगातली कोणतीच सर्जरी त्याला बरं करू शकत नाही.’ ‘सगळी सुखे देऊन तू परत अलिप्तपणे ती पहात बसतोस.’ ‘मी म्हातारा झालो, तरी तू तरूण रहा!’ अशा वेधक वाक्यांमधे भाबडेपणा असला तरी त्यातील उत्स्फूर्तता वाखाणण्याजोगी आहे.
- असे असले तरी, ‘मन तरुण असले तरी ते परिपक्व बनते’ याची उकल या पत्रात यायला हवी होती. ‘विवेकी विचारांमध्ये (रॅशनल थिंकिंग) मनाचे स्वरूप काय होते’ याचेही विवेचन त्यात असते तर ते पत्र अधिक परीपूर्ण झाले असते. मन वेळोवेळी आपल्याला काय काय सुचवत जाते, आपल्या विचारांना आणि बुद्धीला कसा आकार देते, याबाबत पत्रलेखक म्हणून असणार्या संकल्पनाही त्यात येऊ शकल्या असत्या.
- देवास पत्र : हे पत्र ही पत्रलेखकाच्या मनातील भाबडेपणाचे प्रतिक आहे. त्यातून तो देवाने त्याच्यासाठी केलेल्या अनेक गोष्टींची कबुलीही (कन्फेशन) देतो. परमेश्वर म्हणजे नशीब आहे, असा विश्वास त्यातून व्यक्त होतो. एकीकडे पत्रलेखक म्हणतो की, ‘झोपेतल्या स्वप्नांना किंमत देऊ नकोस.’ असे असले ती दुसरीकडे मात्र ‘स्वप्न पहायला, त्याचा पाठलाग करायला तू शिकवलंस’ ही गमतीदार विसंगतीही त्यातून दिसते. ‘जीवन जगण्याची व आनंद घेण्याची अद्भूत कला तू शिकवलीस.’आपल्यापेक्षा सुखी माणसे पाहण्यापेक्षा आपल्यापेक्षा दु:खी माणसे पाहण्याची सवय खूप काही शिकवून जाते.’ अशी काही चमकदार वाक्येही या पत्रात आहेत. पत्र ठीक झाले आहे.
- या पत्रात परमेश्वराबद्दल पत्रलेखकाला आणखी काय वाटलं, हेही यायला हवं होतं. परमेश्वराचं स्वतंत्र अस्तित्त्व त्याला कसं जाणवलं? परमेश्वरी कृपेने तो कसा घडला, आयुष्यात चांगले का घडत गेले याचे आणखी मूल्यमापन यायला हवे होते. पहिल्या दोन्ही पत्रांमधून ‘मन’ आणि ‘देव’ या संकल्पनांची अधिक सुस्पटता यायला हवी होती. परमेश्वराकडे स्वत:च्या चुकांबद्दलची माफी मागून मन मोकळं करता येतं. पण त्यामागचा कार्यकारण भावही त्यात लिहिला असता तर ते अधिक योग्य झालं असतं.
- वहिनीस पत्र : खूप ‘आतल्या’ भावनांचा हे पत्र एक हळवा अविष्कार आहे. 25 वर्षांपूर्वी निवर्तलेल्या प्रेमळ वहिनीच्या कर्तुत्त्वातील मोठेपणाबरोबरच तिच्या कामाची झेप याबद्दल पत्रलेखकाला वाटलेली ओढ त्यातून सुंदर व्यक्त झाली आहे. ती जाऊन पाव शतक लोटलंय, त्यामुळे तिच्या ओढीबरोबरच तिच्याकडे आजच्या नजरेतून बघण्याचा तटस्थपणा किती आला आहे? त्यावेळचं आत्ता काय आठवतंय? असे अनेक प्रश्न यातून पत्रलेखकाला पडलेत. आपण लहान असताना वहिनीला ‘बघण्याच्या’ कार्यक्रमात ‘ती एकदम आपल्यातलीच वाटून गेल्याची बालसुलभ भावना’, आजारपणात तिच्या मांडीवर आपले डोके घेऊन तिने केलेली सुश्रुषा पत्रलेखकाला आजही भावकातर करते. शालेय वयातील संवेदशनीलतेबरोबरच पुढे पत्रलेखकाचा विवाह आणि प्रकाशन हा व्यवसाय करू लागेपर्यंत वहिनीने त्याला दिलेली साथ, तिचा शाळेची शिक्षिका ते मुख्याध्यापिका हा कर्तुत्वसंपन्न प्रवास तिने जमिनीवर ठाम उभे राहून केलेला आहे. पुढे पत्रलेखकाच्या वडिलांनी तिच्या उपस्थितीत सोडलेला प्राण. शेवटी कॅन्सरने तिला गाठल्याने तिचा झालेला वेदनामय शेवट. असे असले तरी दु:खात आनंद वाटून घेत पत्रलेखक तिच्यातील बॅडमिंटनचे कौशल्या तिच्या मुलात व आता नातीत आल्याचे तिला कळवतो. तिच्या जाण्यानंतर सगळं पुन्हा सुरू झालंय पण त्यात कुठेही ‘तू नाहीस’ ही वेदना या पत्रातून ठायीठायी व्यक्त होते. ‘अपार त्यागाची मूर्तीमंत प्रतिक होतीस तू.’ तसेच ‘बाहेरून शांत, पण आतमध्ये स्वत:शीच संघर्ष करणार्या तुझ्याकडे दुसर्याला न सांगतो येणारे दु:ख आतून पोखरत होते का?’ या प्रश्नांमधून आदर्श भारतीय सोशिक स्त्रीचे एक ठळक रूप पत्रलेखकाला तिच्यात सापडते. पत्र उत्कट पण संयमित शेलीत लिहिले असल्यामुळेच सुंदर झाले आहे.
- अशा पत्रांची उत्तरं कधी येणार नसतात, हे पत्रलेखकालाही माहित आहे. ती भावनांच्या विरेचनाचे माध्यम असतात. आपल्या मर्मबंधातल्या या व्यक्तीस लिहिलेलं पत्र हे ‘तिच्या नजरेतून स्वत:ला बघण्याची’ एक संधी असते. ‘तिला काय वाटेल’, याची पत्रलेखकाला आजही काळजी वाटते. त्यातून येणारा भावनिक चिंबपणा; तर दुसरीकडे तिच्यातल्या मोठेपणाबद्दल वाटणारा आदर व कधीही न संपणारी अपूर्वाई. तिचा मूक प्रेमळपणा-आस्था याबद्दल लिहिताना होत जाणारे भारावलेपण. तिच्यातील उत्तुंगतेच्या मागे राहिलेल्या खुणा, त्याची वेळोवेळी होणारी जाणीव व नेणिवेच्या पातळीवरील तिचे जाणवणारे अस्तित्त्व. ती आजही बरोबर असण्याचा आभास. तिच्या आनंद व समाधानात आपले आनंद व समाधान वाटण्यातली कृतकृत्यता. ‘ती आहे’ हे समजून तिच्याबरोबरचा हा आजचा संवाद संज्ञाप्रवाही (भूतकाळाला जोडणारा) आहे. पत्रलेखकाच्या उचंबळून येणार्या भावना शब्दबद्ध करण्याचा प्रयत्नही अपुरा वाटावा व तिची ‘व्यापक जाणीव’ कवेत मावू नये अशी आवस्था झाली आहे. तिची ही एकप्रकारे केलेली भक्ती आहे. यातील प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष येणार्या काव्यमयतेमुळे हे पत्र म्हणूनच भावपूर्ण पत्रलेखनाचा एक अजोड नमुना आहे!
- आरशास पत्र : आरसा हा एक व्यक्ती असल्याचे मानून पत्रलेखकाने त्याच्याशी केलेला हा संवाद आहे. आरसा हा जरी दृश्य असला तरी त्याबाबतची संकल्पना मात्र अमूर्त, अदृश्य आहे. त्याच्याबाबतही बालपणापासून जाणवलले निरागस आकर्षण. त्याच्यात दिसणार्या प्रतिबिंबाबाबतच्या पत्रलेखकाच्या कल्पनांमध्ये रोमँटिक तसेच रागवणारा, तर दुसरीकडे स्थितप्रज्ञ व गंभीर दिसणारा भाव आहे. गरीब, श्रीमंत, चिंताग्रस्त माणसांसाठी तू तुझी रूपं बदलतोस. ‘घडलेल्या गोष्टींचा परिणाम आपल्या (आरशातील) दिसण्यावर झालेला असतो.‘आरसा- हा मनातला ‘आतला’ आवाज आहे.’
‘खोट्यांच्या जगात माझा सच्चा मित्र तू आहेस, गुरुही आहेस.’ ‘अखेरपर्यंत आपल्या सोबत असतं ते म्हणजे आरशात दिसणारे प्रतिबिंब.’ अशी चमकदार वाक्ये यात आहेत. हे पत्र ठीक झालं आहे.
- आरसा या विषयाची व्याप्ती मुळात फार मोठी नाही. असे असले तरी, यामध्ये आरशाबद्दलचं तत्त्वज्ञान आणखी असायला हवं होतं. त्याचा आणखी थोडा कल्पनाविस्तार व्हायला हवा. आरसा हा रोमँटिकपणाचे प्रतिक, तसा वास्तवाची जाणीव करून देणारा वास्तवदर्शीही आहे. रोमँटिक मनातला थरारक आनंद, आरशात पाहून भांग पाडताना शोळ घालत स्वत:वर खूष होत म्हटलेली गाणी. वय कमी करणारा, तर दुसरीकडे केसातले पांढरेपण दाखवणारा आरसा हा त्रयस्थ, निराकार, निर्गुण व निर्विकारही आहे. त्यामुळे स्वत:चा आरसा होऊन स्वत:कडे बघीतले पाहिजे. एकच आहे की, आरशतली आपली प्रतिमा उलटी असते. तिच्यातले विश्वही उलटे असते. पण आपण मात्र सुलट असतो! तसेच आरशात दिसणारा मी हा खरा ‘मी’ आहे का? असा तात्त्विक प्रश्नही पडायला हवा. असे असले तरीही आरशास पत्र पाठवण्यातला आनंद पत्रकर्त्याकडून पुरेसा व्यक्त होतोय. अशा प्रकारची पत्रे म्हणजे एक प्रकारे स्वत:शीच केलेला संवाद असतो. आणि तो आनंद याही पत्रातून व्यक्त होताना स्पष्ट दिसतो.
- प्रमोद बापट यांना लिहिलेलं पत्र : या संग्रहातले हे एक उत्कृष्ठ पत्र. प्रकाशन क्षेत्रात कर्तुत्त्व दाखवणारे प्रमोद बापट हे ज्येष्ठ स्नेही पत्रलेखकासाठी एक मोठा प्रेमळ आधार होते. त्यांचे 19 वर्षांपूर्वी निधन झाले. साहित्य व प्रकाशनक्षेत्रातील तमाम घडामोडीचे ते साक्षीदार असून त्यांनी अनेक तरुण प्रकाशकांना मदतीचा हात दिला. त्यांच्या जगण्याबाबतची कमालीची सकारात्मकता आणि मोठे आर्थिक नुकसान, विरोध, बदनामी, फसवणूक पचवूनही त्याचे दु:ख हृदयापर्यंत पोचू न देण्याची विलक्षण हातोटी. दिवसभराच्या कामानंतर सायंकाळी त्यावेळच्या ‘एलोरा’, ‘जवाहर’, ‘सेव्हन लव्हज’ या लीकरबारमध्ये मद्याचे अनिर्बंध सेवन. त्यातून लवकर वाट्याला आलेला लिव्हरचा कॅन्सर. सिनेमाचे वितरक असणार्या वडीलांचा वारसा बाजूला ठेवून स्वत:ची स्वतंत्र वाट तयार करणार्या कर्तुत्त्ववान बापटांची ही प्रेरणा देणारी कहाणी पत्रलेखनातून तितक्याच तन्मयतेने समोर ठेवली आहे. क्षणभंगूर आयुष्यात ‘अपयशाचे दु:ख हृदयापर्यंत जाऊ द्यायचे नाही, यशाचा अहंकार मेंदूपर्यंत जाऊ द्यायचा नाही.’ किंवा ‘जीवनात माणसे सांभाळायची व पैसा वापरायचा असतो.’ ‘उगीचच चिंता करणे म्हणजे कर्ज न घेता व्याज भरण्यासारखे असते.’ ‘परिस्थिती कधीच समस्या बनत नाही, समस्या बनते जेव्हा आपल्याला परिस्थिती हाताळता येत नाही,’ हे वाक्य डेल कार्नेज या व्यवस्थापन तज्ज्ञाची आठवण करून देते. विशेषत: ‘तुम्ही निरोशेसाठी मद्य घेतले नाहीत व मद्यपीसारखी आसवे गाळली नाहीत.’ हे वाक्यं हृदयाचा ठाव घेते.
- हे पत्र उत्तम व्यक्तिचित्रणाचे व अभिव्यक्तीचे उदाहरण आहे. बापटांचा विक्षिप्त प्रेमळपणा. त्यांच्यातला व्यवसायातील व्यवहार कोळून प्यायलेला वास्तववादी माणूस. भल्या-बुर्या मार्गाचा आवलंब करताना व स्वत:च्या र्हासाकडेही तटस्थपणे पहाणारा हा तत्त्वज्ञ मनाला चटका लावून जातो. पत्रलेखकाला त्यांच्याकडून शिकलेल्या अनेक गोष्टींबाबत कृतज्ञता वाटते. या पत्रातून प्रकाशन व्यवसायाचा चेहरामोहरा ही काही प्रमाणात कळतो. मुद्रक-प्रकाशकाचे तत्त्वज्ञान, कमावल्याच्या आनंदापासून व गमावल्याच्या दु:खापासून लांब राहाण्याची वृत्ती बापटांमध्ये कशातून आली असावी? याचा शोध घेण्याचा प्रयत्न या पत्रातून काही प्रमाणात घेणे पत्रलेखकाला शक्य होते. तरीही एक झोकून दिलेल्या आयुष्याचा आदर्श वस्तूपाठ या पत्रातून प्रत्ययास येतो. पत्रलेखकाच्या वैयक्तीक व व्यावसायिक व्यक्तीमत्त्वावर बापटांचा असणारा प्रभाव ठळकपणे जाणवतो, हेच या प्रभावी पत्राचे रहस्य आहे !
- मित्र अॅड. अजित जांभळी यांना पत्र : जवळचा मित्र आणि आपल्यासाठी कोणत्याही खटपट्या-लटपट्या करणारा कल्पक वकील आता या जगातून जाऊन अकरा वर्षे झालीत. आपण केलेल्या बेकायदेशीर बांधकामाला नियमित करण्यासाठी डोकेबाज सल्ले देणारा अजित. घराला लागून केलेले बेकायदा बांधकाम पाडायला आलेली असताना ऐनवेळी ‘स्टे ऑर्डर’ आणल्याचे बेमालून नाटक वठवणारा हा बहुरुपी मित्र. पुढे खरी स्थगिती मिळवून सात-आठ वर्षे केस कोर्टात लढवत ठेवून जिंकून दाखवणारा कसलेला वकील. मित्रासाठी सर्वस्व पणाला लावणारा दिलदार माणूस. बुद्धिमान असूनही उगीच खोटा बडेजाव न करणारा जमिनीवर पाय असणारा जागरूक सुहृद. वकीली पेशात घटस्फोटाच्या केसेसमधे एक पैसाही न घेणारा हळवा पाठीराखा. स्वत:तली माणूसकी न मोजता येणारा श्रीमंत असा कुटुंबातील कर्ता पुरुष. एकंदर जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवणारा ठाम गृहस्थ. असे असूनही त्याचे वाढत गेलेले मद्यपान आणि त्यातून स्वत:चा शेवट जवळ आल्याची स्पष्ट जाणीव. त्यातून असाध्य रोग झाल्याने जवळ केलेला मृत्यू. केलेल्या कामाचा चेक दिल्यावर तो चेक रक्कम टाकून न वटवता आपल्या मैत्रीचे अनमोल प्रतिक आहे जपून ठेवणारा पारखी स्नेही. तो गेल्यामुळे पत्रलेखकाला वाटलेली हळहळ, या पत्रातून काठोकाठ भरून वाहते आहे. वकील म्हणून लवढवेल्या अत्यंत गुंतागुंतीच्या केसेसचे व टोकच्या मानवी स्वभावाचे किस्से सांगणारा गोष्टीवेल्हाळ सखा गेल्याचे कधीही न संपणारे दु:ख मागे ठेवलेला हा जिवलग. या सर्व विरह-वेदनेच्या भावना या पत्रातून संयमित पण प्रभावीपणे अभिव्यक्त झाल्या आहेत. ‘खिशात किती आहे हे महत्त्वाचं नाही, तर आपण खुशीत किती आहोत हे महत्त्वाचं.’ ‘विश्वास फक्त देवावर ठेवावा व प्रेम आपल्या कामावर करावं. ते दोघं आपली कधीच फसवणूक करत नाहीत.’ ‘भरलेलं घर आणि सुंदर मन हे फक्त समाधानी व्यक्तीकडेच असते.’
‘आयुष्याच्या कोणत्याही वळणावर माणूस कधीच एकटा पडू नये म्हणून देवाने मैत्रीचं नातं निर्माण केलं.’ ‘माणूस स्वत: केलेल्या चुकांबद्दल स्वत:चा वकील बनतो आणि इतरांच्या चुकांबद्दल जज्ज बनतो.’ अशा विविध सुंदर वाक्यांनी हे पत्र अपार मैत्रीच्या सुगंधाने बहरले आहे!
- वाढलेल्या मद्यपानामुळे मृत्यू आलेला पत्रलेखकाचा हा दुसरा जिवलग माणूस. प्रमोद बापटांप्रमाणे अजित जांभळीकडेही दिलदारपणा, निस्वार्थीपणा आणि संपूर्ण सकारात्मकतेचा विलक्षण गुणधर्म ठासून भरला आहे. या दोन्ही व्यक्तीमधले हे समान योगायोग आहेत. आपल्याला या दोघांनी संपूणं जिंकाले आहे, ही त्यांच्यावर जीव ओवाळून टाकायची पत्रलेखकाची भावनाही तितकीच तीव्र व खरीखुरी. दोघांमध्येही असणारे अजब वाटणारे जीवनविषयक भक्कम तत्त्वज्ञान. दोघांच्याही तोंडी हितचिंतकाची असणारी सखोल दृष्टी देणारी गहन तत्त्वचिंतक वाक्ये. याचा अन्वयार्थही पत्रलेखकाने या पत्रांमधून अधिक घेतला असता तर ती पत्रे अधिक समृद्ध झाली असती. त्यातला भाबडेपणा कमी करून थोडा तटस्थ मूल्यमापनाचाही भाग त्यामध्ये यायला हवा होता. यातूनच आपल्या मित्राच्या मैत्रीतला जिव्हाळा व स्नेह अधिक गहिरा व्हायला मदत झाली असती. विषेश म्हणजे स्वत:चेच जीवनविषयक तत्त्वज्ञान न पचवता आल्यामुळे या दोघांनीही स्वत:ला दारूच्या प्याल्यात बुडवून टाकणे. हे साम्यही त्यांची एका अपरीहार्य शोकांतिकेकडे होणारी समान वाटचाल पत्रलेखकाला विद्ध करते. दोन्ही पत्रे प्रभावी झाली आहेत.
- सागरास पत्र : महाकाय व अथांग सागरापुढे आकाराने क्षूद्र असणार्या पत्रलेखकाने त्यास पत्र पाठवण्याचे धाडस दाखवले आहे. सागराचा जन्म, तीन चतुर्थांश जमिन व्यापणार्या पृथ्वीवरच त्याची निर्मिती का, असे मूलभूत प्रश्न पत्रलेखकापुढे निर्माण झालेत. सागराचे खारे पाणी आकाशात वाफ होऊन जमिनीवर बरसताना मात्र त्यातला खारटपणा सोडून बरसते, याबद्दल वाटणारे आश्चर्य. सागरातील मिठामुळे पदार्थाच्या चवीपासून पाणी म्हणून सर्वत्र पसरण्याचा त्याच्यातील समानतेचा आदर्श. सागर किनार्यात व खळाळत्या ताजेपणात ठासून भरलेले सौंदर्य. विशेषत: प्रत्येक संध्याकाळी त्याचे प्रसन्न ऋषीसारखे (ध्यानस्थ) भासणे. त्याच्या भरती-ओहोटी व चंद्राच्या कलांचा संबंध. कमी व जास्त दाबाचे पट्टे निर्माण करताना स्वत:तील उग्र, विराट व संतापलेले रूप लवकर नियंत्रणात आणण्याची त्याची ताकद. पत्रलेखक त्याची मनातल्या वादळाशी तुलना करतो. त्याच्या अस्तित्त्वामुळे पृथ्वीवर जीवसृष्टी निर्माण झाल्याची पत्रलेखकाची कृतज्ञता. त्यातून मानवाने सागराच्या लाटांवर आरूढ होऊन शोधून काढेलेले एकेक देश. माणसाच्या वागण्याने पृथ्वीची झालेली तापमावाढ व त्यामुळे तो सगळी पृथ्वीच गिळंकृत करील, अशी भीती पत्रलेखक व्यक्त करतो. आपल्यातील आत्मविश्वास, संयम, दातृत्त्व, धाडस आणि सहनशीलता सागर आपल्याला शिकवतो, हा पत्रलेखकाला झालेला साक्षात्कार.
‘(सागराने) घेतलेला श्वास ज्या सहजतेने सोडतो, त्या सहजतेने परतीच्या लाटेबरोबर नको असलेले विचार सोडता आले पाहिजेत.’ ‘(सागराच्या सौंदर्याबाबत) सत्य हे पाहणार्याच्या इच्छेचा विचार करत नाही, ते सदैव असतं तसंच पुढं येत असतं.’ ‘तो लयीत येणारा लाटांचा आवाज तुझ्या कष्टाचा आहे, तो आवाज कुणालाच ऐकू येत नाही.’ ‘(देशपर्यटन करणार्या) जिद्दी माणसांना तू कधीच नाऊमेद करत नाहीस.’ ‘एकदा का संघर्ष पेलण्याची सवय झाली की आपले शरीरसुद्धा आपोआप संघर्ष करू लागते.’
‘तुझे अथांग रूप पाहिले की हृदयानील भावना आणि डोक्यातील विचार यात सांगड बसत नाही.’ अशा अनेक सुंदर वाक्यांनी हे पत्र समृद्ध झाले आहे. एकंदर पत्र व्यवस्थित झाले आहे.
- या पत्रातून सागराची विषालता, विराटता आणि विक्राळपणा दाखवताना पत्रलेखकाने त्याची मानवी स्वभावाशी तुलना केली आहे. अथांगतेचा शोध घेणारा हा एक प्रयत्न आहे. त्यातून ‘सागर’ हा विषय ा पत्रलेखनासाठी वापरलेला आहे. ज्या जलतत्त्वातून सागर निर्माण झाला त्याची वाफ आणि बर्फ ही अन्य दोन रूपंही आहेत, त्यावरही यातून भाष्य करता आले असते. पण शेवटी हे पत्र आहे, जलतत्त्वावरील भाष्य नाही. त्यामुळे ‘सागर’ हा विषय पत्रलेखकाने व्यवस्थित हाताळला आहे.
- अविनाश यास पत्र : जिवलग मित्राकडून दुखावले गेल्याचे हे अत्यंत प्रभावी पत्र आहे. या संग्रहातील उत्कृष्ठ पत्रांपैकी एक. वरवर त्यातून होणारा संवाद जरी खासगी असला तरी त्यात माणसातील अगम्य स्वभावाचे व त्याला अनुलक्षून येणार्या नातेसंबंधातील ‘लव्ह-हेट’ रिलेशनशिपचे ते मनोज्ञ दर्शन घडवते. सामाजिक काम करणार्या एका संस्थेच्या सभासदाच्या संस्था सोडून देणे व पुन्हा परत येणे. या त्याच्या बेजबाबदार व अनाकलनीय वर्तनाविषयीचा वाद पराकोटीला गेल्यामुळे अविनाश व पत्रलेखक राजू यांच्यात संस्थेच्या बैठकीत वाद व भांडणं होतात. दोघांमधील आतापर्यंत असणार्या संवादाचे विसंवादात रूपांतर होते. या संस्थेत गेली तीन दशके काम करून उच्चपदापर्यंत गेलेल्या राजूचा पाणउतारा अविनाश करतात. खजील झालेले राजू बैठकीतून निघून जातात आणि आतापर्यंतचे मैत्रीचे जुने संबंध लक्षात घेता ते तुटण्यापेक्षा शांत राहण्याचा निर्णय घेतात. 25 वर्षांच्या मैत्रीला हे लागलेले मोठे गालबोट असते. अविनाशकडून ‘सॉरी’ हा एक शब्दाचा मेसेज येऊनही नंतर पुन्हा सारं काही बिनसलेलंच आणि अबोलाही न संपलेला. हे पाहून राजूना आश्चर्य वाटलेले. मित्राने आपल्याला केलेली जखम खोलवरची असल्याने राजू अखेर अविनाशना पत्र पाठवून आपल्या साचलेल्या भावनांना पत्र लिहून मोकळी वाट करून देण्याचा घेतलेला निर्णय. एरव्ही आपल्याशी समजूतदारपणे वागणारा मित्र अचानक दडपशाहीने वागू लागल्याची भळभळणारी जखम राजूच्या मनात अनेक प्रश्न निर्माण करते.
यापूर्वी आपल्या या जिवलग मित्राचा भूतकाळात वेळोवळी झालेला उपयोग व त्याचे उपयुक्त मैत्रीपूर्ण सल्ले यांची प्रकर्षाने झालेली आठवण. त्यातून हा नवा अवघड पेच राजूला सोडवता न येणं. हा आपल्या दोघांमधील साधासुधा गैरसमज नाही. तसेच अविनाशच्या किंवा स्वत:च्या पत्नीच्या मध्यस्तीनेही तो सुटणारा नसल्याची जाणीव. ‘अविनाश आपल्याशी असं का वागला’ या प्रश्नाचं उत्तर अविनाशकडेही नाही, याची राजूला असणारी खात्री. त्यामुळे पत्र लिहिल्यावर त्यांना हलकं वाटणे. हे पत्र म्हणजे मनातील भावनांचा उद्रेक संयतपणे व्यक्त करण्याचा आदर्श व उत्कृष्ठ नमूना आहे. त्यातील चिरंतन मानवी नातेसंबंधाचे नाट्यही अंगभूत उत्कटतेने व्यक्त होते.
- जिवाभावाची घट्ट मैत्री अचानक व अनपेक्षित पद्धतीने तुटल्याचा घाव पत्रलेखकाला जिव्हरी बसला आहे. वरवर क्षुल्लक वाटणार्या अशा नाजूक घटनांमधूनच रामायण-महाभारत घडत असते! एखादी दीर्घकथा किंवा कादंबरी लिहावी इतका हा मोठा ‘न सुटलेल्या कोड्या’सारखा हा विषय असतो. कारण त्यातले अनपेक्षित अपेक्षाभंगाचे दु:ख अपार असते. त्याची जखम दीर्घकाळ ठसठसणारी असते. दुरावलेले व दुखावलेले मन पटकन सावरले जात नाही. तसेच ती गोष्ट मनातून जातही नाही. ते आपले कधीही भरून न येणारे अपरिमित नुकसान असते, याची सततची जाणीव पत्रलेखकाला आहे. अशा वेळी मनात खोलवर दडून बसलेल्या त्या व्यक्तीबद्दलच्या सुखद भावना व आठवणीही एखाद्या कारंज्यासारख्या उफाळून वर येतात. आपल्यातील या दुराव्यात कोणाचीही शिष्टाई उपयोगाची नसते.
पत्रलेखकाला हेही लक्षात येते की ही आपली वैयक्तीक लढाई आहे व ती आपल्याला एकट्यालाच लढायची आहे. यासाठी आणखी काही काळ जाऊ देणे हाच त्यावरचा एकमेव पर्याय आहे. त्यातून प्रश्नाची तीव्रता कमी होऊन तो अधिक शांतपणाने सोडवता येईल. एकप्रकारे पत्रलेखक राजूने ते स्वत:च स्वत:चं केलेले समूपदेशन आहे. या दुराव्यातली दाहकता ही त्या व्यक्तीसच जाणवते. या अत्यंत आवघड विषयावर काव्ये आणि महाकाव्येही लिहिली जातात इतके ते सखोल, अर्थपूर्ण आणि आशयाचे अनेक सूक्ष्म पदर उलगडणारे असते.
या नात्यातले खाचखळगे व बारकावे ज्याचे त्यालाच माहित असतात. ज्याचं जळतं त्यालाच कळतं! हे दु:ख दुसर्या कोणापाशी उघडपणे उलगडून सांगताही येणारे नसते. (आणि सांगितले तरी त्याला ते कळेलच याची खात्री नसते.) एक प्रकारे तो तोंड दाबून बुक्क्यांचा मार असतो. मैत्रीपेक्षा मैत्रीच्या विरहातच नाट्य असते, कारण त्यामागे एक नाते बिघडल्याची शोकांतिकाच रडत असते! ते रडणं चेहर्यावर न दाखवता आतच गिळून टाकावं लागतं, अशी ही कोंडमारा झालेली विचित्र आवस्था. ही सारीच उत्कट नाट्यमयता या पत्रात र्हदयापासून व्यक्त झाल्याने ते अत्यंत प्रभावी व खरे वाटते. मैत्रीतली सारी तळमळ त्यातील शब्दाशब्दातून बाहेर पडली आहे. ही कधीही न संपणारी वेदना आहे. ती कधी स्फोटासारखी बाहेर पडणारी असूनही इथे मात्र ती संयमाने मांडली गेली आहे. त्यात कोणताही आक्रस्ताळेपणा नाही. मैत्रीच्या अशा जखमा कधीही बर्या होत नाहीत. मुळात हे पत्रच इतकं प्रभावी झालंय की त्यानंतर अविनाश आणि राजू यांच्यात समेट होतो की नाही, या गोष्टीही (या पत्राच्या संदर्भात) फिजूल ठरतात. त्यातील अपूर्णतेतच या पत्राचं सौदर्य दडलेलं आहे. मुख्य म्हणजे मैत्रीच्या नात्यातील शाश्वतता अत्यंत ठळकपणे अधोरेखित करणारे हे पत्र आहे. उत्तम!
- सूर्यास पत्र : विश्वाचा ऊर्जास्रोत असणार्या सूर्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारे हे पत्र आहे. इथेही पत्रलेखकाला सूर्याच्या विराटपणापुढे स्वत:तील खुजेपणा जाणवतो. सूर्या, तुझ्यामुळे ही सृष्टी रोज सकाळी जागी होऊन नव्या उत्साहाने कामाला लागते. तुझ्यामुळेच चैतन्यमय नद्या, डोंगर, शिखरे, मेघ हे सारे निसर्गाचे मनमोहक घटक दिसू शकतात. विशेष म्हणजे तू आहेस, हेच जगातले सत्य आहे. आमचे अस्तित्त्व केवळ तुझ्यामुळेच आहे. तूच आम्हाला आमच्या कर्तव्याची जाणीव करून देतोस. ‘तुझे सकाळचे आगमन म्हणजे नवीन क्षणांची सुरूवात.’ ‘तुझ्या रथाच हे चौखूर उधळलेले उन्मेषी घोडे प्रात:समयी पृथ्वीतलावर प्रवेश करू लागतात आणि आसमंतात पसरू लागतं ओजस्वी चैतन्य!’
‘सुख-दु:खांना न कंटाळता सोबत घेऊन चालायचं असतं.’ ‘अथदी आणि अनंत फक्त तूच एक.’ अशा सुंदर वाक्यांच्या उधळणीने हे पत्र वाचनीय झाले आहे. - सूर्याच्या व्यापक अस्तित्त्वाबद्दलचे हे एक चित्रमय वर्णन करणारे पत्र आहे. तरलता व काव्यमयताही त्यात आली आहे. आधीच्या सर्व पत्रांचा समारोप म्हणून हे पत्र सृष्टीनियंत्याचे ऋण व्यक्त करण्यासाठी मुद्दाम वापरले आहे, असे जाणवते. यातून मानवी जीवनाची शाश्वतता तसेच नश्वरताही अधोरेखित होते. मुळात सूर्याला पत्र लिहिणे, ही कल्पनाच खूप वेगळी आहे. सृष्टीतल्या अवाढव्य जगडव्याळपणाला उद्देशूनच हे पत्र आहे. त्यात भाबडेपणा असला तरी पत्रलेखकाची मन:पूर्वकता दिसते. जीवनातील तत्त्वज्ञानाबरोबर जगण्यातली रोमँटिक व स्वच्छंदी वृत्तीही दिसते. वरवर साधे वाटणारे सूर्याचे हे वर्णन हे एकूण जीवनचक्र कसे सुरू आहे त्यातील सातत्यावर भाष्य करते. सूर्यासारख्या मूर्त गोष्टीतून
त्यातून निर्माण होणार्या अमूर्त गोष्टींनाही ते उद्देशून लिहिले आहे. एक समूर्त मूड (मानसिका आवस्था) निर्माण करणारी ही सर्व पत्रे आहेत!
- पत्नी मधूमितास पत्र : 43 वर्षांच्या वैवाहिक व संसारिक सहवासानंतर पती राजूने पत्नी मधुमितास काय व कसे पत्र लिहिले आहे या बाबतची उत्सूकता व अपेक्षा यांची बर्याच अंशी पूर्तता हे पत्र करते. त्यात केवळ घटनाक्रम नाहीत वा आजवर झालेल्या गोड-कटू प्रसंगांचा आढावाही घेतलेला नाही. आपल्या नकळत आपण जिच्यावर प्रेम केले, व जिने जाणतेपणाने आपल्याला प्रिय मानले, अशा दोन प्रेमीजनांच्या वैवाहिक परीपूर्तीनंतरच्या चारहून अधिक दशकांचा हा भावनिक, वैचारिक व काहीप्रमाणात चिंतनशील लेखाजोखा आहे. त्या अर्थाने हे पत्र म्हणजे राजूने लिहिलेली दीर्घ कविता आहे. अपयश आणि नैराश्यांनंतर आपल्या वाट्याला आलेले यश आणि आनंदाचे श्रेय राजू ते थेट मधूमिताला देतो.
तिची निष्ठा, सोशिकता आणि त्याग त्याला या प्रेमात सर्वात जास्त महत्वाच वाटते. व्यावसायिक जोखीम घेणारे व अपयशी ठरलेल्या निर्णयांची जबाबदारी राजू स्वत:कडे घेतो. आपल्या काहीशा उधळ्या व जोखीम घेणार्या वृत्तीमुळे मधुमिताची फरफट होते आहे. आपल्यामुळे तिला कटूपणाही सहन करावा लागतो. ही चूक उमगलेला राजू स्वत:कडे जाणीवपूर्वक कमीपणा घेतो. आपल्या या अनियंत्रित वृत्तीला मधुमिताच्या प्रेमाच्या धाकाची वेसण आवश्यक आहे, याची जाणीव त्याला सुरूवातीपासूनच झाली आहे. मधूमिता मात्र यातील प्रेमामागे वैवाहिक नात्यापेक्षाही त्यातील मैत्रीत असणारी निष्ठा व त्याबरोबर येणार्या अधिकाराची जोड जाणवून ती अधिक घट्ट करताना दिसते. या मैत्रीपूर्ण प्रेमामुळेच बरेचदा राजू मधुमिताकडे आपल्या चुकांची स्पष्ट कबूली (कन्फेशन) देतो, तर मधुमिता तिच्या स्वभावामुळे निर्माण होणारी कटूता कमी करण्यासाठी आपण पुन्हा तशी चूक करणार नाही याची माफी मागते. प्रेम करणे म्हणजे मालकी हक्क नाही, याची जाणीव मधुमिताला जास्त आहे.
त्यामुळे राजूच्या पत्रातून मधुमिताचे व्यक्तिमत्त्वही अधिक ठशीवपणे उलगडत जाते. राजू व मधुमिताच्या व्यक्तिमत्वांमधील गुंतागुंत व त्यांचे प्रेम व जगण्याकडे पाहण्याचे दृष्टिकोन या पत्रातून काही प्रमाणात व्यक्त होतात. सिटी पोष्टाजवळील गणपती चौक ते शंकरशेट रोडवरील सेव्हन लव्हज चौकापर्यंत मधुमिताला राजूने वेळोवेळी (आवर्जुन) दिलेली स्कूटरवची लिफ्ट, त्या सहवासानंतर हळुहळू मधुमिताच्या मनात फुलत गेलेला प्रेमांकूर. त्यासाठी काहीही करण्याची तिची तयारी, यातून मधुमिताच्या व्यक्तीमत्त्वाचे एकेक पदर उलगडू लागतात; तर दुसरीकडे तीही राजूला वेळोवेळी जोखताना दिसते. त्यातून ती राजूच्या वृत्तीतील कुमकुवत दुवे (वीक पॉईंटस्) लक्षात घेते. तसेच त्याच्या स्वैर वागण्याच्या शक्यतेकडे जाणीवपूर्वक तटस्थपणे पाहते. मधुमिताकडून मिळालेल्या प्रेमातून राजूच्या स्त्रीविषयक कल्पनाही निश्चित होत जातात. ‘स्त्री ही पुरुषाची मर्यादा आहे’, हे त्याला प्रकर्षाने उमजतं. त्यातूनच त्याला कायम शंकेखोर असणार्या आपल्या स्वभावाला मधुमिताचा आशावादी स्वभाव भावतो. त्याला ‘घरातली स्त्री समाधानी असणं महत्त्वाचं वाटू लागतं.’ ‘मधुमिताबरोबर आपणही स्वत:ची वेगळी जागा (स्थान) निर्माण करू शकलो.’ हा मधुमितामधील कर्तुत्त्ववान स्त्रीत्वाचा आविष्कार राजूला प्रभावित करतो. आपल्या क्षमतेपेक्षा जास्त मिळाल्याची नम्र जाणीव राजूला होताना आपले मधुमितावरील प्रेमही तसेच चिरंतन राहील, असा आशावाद तो शेवटी व्यक्त करतो.
तर दुसरीकडे मधुमिता राजूला आपलं प्रेम कठीण परिस्थितीतही भक्कम आहे, असे संकेत देत राहते. राजूवरील संकटात ती त्याच्या पाठिशी प्रत्येक वेळी भक्कमपणे उभी राहते. राजू खचून जाणार नाही, याची दक्षता मधुमिता घेते. राजूचा स्ट्रगल व त्यामागची त्याची तळमळ तिला समजते. वाढते वय व जबाबदार्या पूर्ण करताना राजू पोक्त होईल ही भीती तिला वाटत असल्यानेच ती त्याला पतीपेक्षा मित्र व सखाच जास्त मानते. हे मैत्रीचे बरोबरीचे सहज व अनौपचारिक असे अत्यंत जवळचे नाते आहे, याची आठवण ती त्याला करून देते. या पत्रात राजूला मधुमिता का आवडली. किंवा त्याचं तिच्यावर का प्रेम बसलं याचं अप्रत्यक्ष उत्तर वाचायला मिळतं. ‘एसटीच्या प्रवासात एखादा शेजारी गप्पा मारता मारता आपला व्हावा, एवढ्या सहजतेने तू (मधुमिता) माझ्या आयुष्यात मिसळलीस.’ ‘हीच आपली सखी आहे.’ जिमखान्यावरील ‘वैशाली’ हॉटेलात कॉफी पिणे हे राजू व मधुमिता यांची ‘एकमेकावर प्रेम करण्याची जागा’ असल्याचे ते हॉटेल हे ‘प्रेमाचे एक चिरंतन प्रतिक’ म्हणूनच समोर येते. या पत्रात काही सुंदर व काव्यमय वाक्यांमुळे वाचकलाही ते त्याच्या वैयक्तिक अनुभवाशी जोडता येते.
उदाहरणार्थ, ‘परिस्थिती नावाच्या शाळेने पुढील आयुष्यात योग्य शिक्षण दिले.’ ‘(‘वैशाली’त बसल्यावर) कानांनी एकमेकांचे बोलणे ऐकले तर फक्त शब्दांचा आवाज ऐकू येऊ शकतो. पण मनाने ते ऐकतो त्यामुळे साध्या साध्या वाक्यांतील शब्दांपेक्षा शब्दांमधील प्रेम आत्मियता नकळत आत्मसात होते. हृदयात घट्ट होते.’ ‘माझ्या प्रेमाचा श्वास तुला आठवत राहील ना?’ हे वैयक्तीक पत्र वाचकांसमोर येताना अधिक सुंदर झाले आहे. एकूण हे पत्र राजूच्या मधुमितावरील प्रेमाचा तितक्याच तटस्थपणाने घेतलेला विस्तृत मागोवा आहे.
- शंकर सारडांना पत्र : या ‘न पाठवलेल्या’ पत्रांमध्ये हे पत्रही मन हेलावून सोडते. न बोलता आपले साहित्य समीक्षा व संपादनाचे काम शेवटच्या श्वासापर्यंत अत्यंत समाधानाने करणार्या एका अभिरुचीसंपन्न रसिकाला वाहिलेली हे पत्र म्हणजे आदरांजली आहे. ‘मराठी साहित्यातील चालता बोलता कोश’ असणार्या सारडांबाबतची कृतज्ञता, त्यांचे संपादन व साहित्य निवडीतील चोखंदळपणा, नवोदित लेखकांचा मोठा आधार, तर अभिरुचीहीन लेखनावर थेट टीका करण्याचे धाडस दाखवणारा साहित्यप्रेमी अशी अनेक रूपे या पत्रातून अनुभवायला मिळतात. कुमार वयातील सारडांचे पुस्तक दिलीप प्रकाशनाने प्रसिद्ध केल्यापासून दिलीपराज प्रकाशनाच्या हाऊस मॅगझिनचे संपादक आणि शेवटचा श्वास घेण्यापूर्वी काही तास आधी दिलीपराजची संहिता ‘स्वीकृत’ करणारे मराठी साहित्याचा ध्यास घेणारे चोखंदळ वाचक. सारडांच्या अनेक भूमिका या पत्रातून अभिव्यक्त होतात. पत्रलेखकाशी त्यांचे नाते मोठा भाऊ असल्यासारखे वडीलकीचे जाणवते. संपदकांचा अग्रणी, मराठी लेखकाला नोबेल मिळाले पाहिजे असा आग्रह धरणारे, तसेच मराठी साहित्य इंग्रजीतून जगभर जावे अशी तीव्र इच्छा बाळगणारे, ‘वाड्मयीन पत्रकारिता’ या क्षेत्राचे आघाडीचे शिलेदार, साहित्य विश्वावरील चिंतनीय भाष्यकार, आस्वादकी समीक्षेचा मापदंड घालून देणारे रत्नपारखी अशी अनेक गुणवैशिष्ट्ये सांगत मुक्त कंठाने प्रशंसा करणारे हे पत्र सारडांचे वाड्मयीन व्यक्तीमत्त्वच काही प्रमाणात समोर मांडते. त्यांच्यातील साहित्याची ही ओढ लहानपणी महाबळेश्वरमधील वडिलांच्या किराणा मालाच्या दुकानातील पुड्या बांधताना निर्माण झाली असल्याचा अंदाज पत्रलेखक करतात. सारडांचे अपूर्ण राहिलेले ‘माझी साहित्यिक वाटचाल’ या अपूर्ण राहिलेल्या आत्मवृत्ताचा संदर्भही त्यामध्ये याबाबतीत ते देतात. सारडांचा साहित्य क्षेत्रातील निर्विवाद मोठेपणा मान्य करताना पत्रलेखक एक महत्त्वाचा दुवा निखळल्याबद्दल हळहळ व्यक्त करतात ती वाचणार्याच्या मनालाही भिडते. हे पत्र उत्तम लिहिले आहे.
- अरविंदरावांना पत्र : अरविंद ठोसर हे प्रसिद्ध निवृत्त मेजर ग. स. ठोसर यांचे सुपुत्र. ते पत्रलेखक राजू यांच्याबरोबर रोटरी क्लबमध्ये त्यांच्या निधनापर्यंत 21 वर्षे होते. त्यांच्या निधनानंतर 12 वर्षांनी हे पत्र त्यांना लिहिले असून त्यामध्ये केवळ भावनिक न होता तटस्थपणे वेध घेतल्याचे जाणवते. या पत्रात प्रसिद्ध मराठी लेखक ग. ल. ठोकळ यांचे चिरंजिव कृष्णकुमार ठोकळ, तसेच कल्याण बॅनर्जींचा उल्लेख पत्रवाचकाला भूतकाळात नेतो. फुटीपासून रोटरी क्लबला वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणारे, एक वर्ष रोटरी प्रेसिडेंट राहाणारे, करारी पण तितकेच खोडकर व जगण्याचे अजब तत्त्वज्ञान सांगणारे हे वल्ली व्यक्तीमत्त्व. ‘शत्रू मिळवणं सोपं नसतं, त्यासाठी खूप चांगली कामं करावी लागतात.’ गंमत म्हणून मोठी आगळीक केल्यावर संतापलेल्या राजूला ते म्हणतात की, ‘रागाने बोललेले शब्द विषारी असतात, की तुझ्यावर केलेल्या प्रेमाच्या गोष्टी त्यातून नष्ट होतात.’ स्वत:वर विनोद करून हसणारे हे उमदे व्यक्तिमत्त्व जगण्याकडे पाहण्याच्या सकारात्मक दृष्टीसह साकार होते. बरोबरच्या तरुणांमध्ये तरुण होऊन मिसळण्याची खेळकर वृत्ती लाभलेले अरविंदराव 75व्या वर्षी उत्साहाने दांडिया खेळल्याची यात गमतीदार आठवणही आहे. गाणे व अभिनयाच्या आवडीबरोबर जीवनाचे तत्त्वज्ञान समजावून घेण्यासाठी श्री श्री रविशंकरांचे भक्त बनलेले अरविंदराव ‘थिंक बिग’, ‘मोठी स्वप्ने पहा’ असे म्हणत चुकलेल्या सहकार्यांच्याही पाठिशी भक्कमपणे उभे राहात. ‘प्रौढत्वी निज शैशवास जपणे बाणा कवीचा असे’ या उक्तीनुसार कवीमनाच्या अरविंदरावांमधील निरागसता व त्यातून आलेला खोडकर मुलाचा बाणा शेवटपर्यंत जिवंत होता, हे पत्रलेखकाचे विश्लेषण अंतर्मुख करते. पत्रातून अरविंदरावांचे उत्साही व मिश्किल व्यक्तीमत्त्व डोळ्यापुढे साकार होते. पत्र छान जमून आले आहे.
- तानाजीराव चोरगे यांना पत्र : यशस्वी माणसाच्या यशस्वितेमागची अंतर्दृष्टी देणारे हे विलक्षण नाट्यपूर्ण व प्रेरणादायी पत्र आहे. डॉ. तानाजीराव चोरगे यांचे कृषी विद्यापीठात शिक्षण, त्या क्षेत्रात कॅलिफोर्निया विद्यापीठातून डॉक्टरेट घेतलेली, खेळांची आवड, जिल्हा परिषदेवर निवडून, तीन कृषी विद्यापीठांमध्ये नोकरी केल्यानंतर स्वत:चे विना अनुदानीत कृषी विद्यापीठ स्थापन, विविध क्षेत्रांतील माणसांचा लोकसंग्रह, कला, सहकार, साहित्य व कृषी यावर 40 पुस्तकांचे लेखन, बँकींग क्षेत्रात कामगिरी, स्वत:ची पतपेढी स्थापन, नाटकाची आवड व त्यांचे लेखन, दिग्दर्शन आणि अभिनयाचाही अनुभव, 21 कादंबर्या व चार कथासंग्रहाचे लेखन, अनेक पुरस्कारांचे मानकरी, आणखी 18 शैक्षणिक संस्था व एका आयुर्वेद महाविद्यालयाची निर्मिती अशी ही न संपणारी त्यांच्या कर्तुत्त्वाची यादी. या सार्या यशामागचे विश्लेषण पत्रलेखकाने विचारपूर्वक केले आहे. खेळांच्या आवडीतून तानाजीरावांच्या स्वभावात आलेला अंगभूत खिलाडूपणा, पडेल ती मेहनत घेण्याची तयारी, चौफेर नजर, कामात हितशत्रूंकडून आरोप होत आहेत, हे लक्षात येताच राजिनामा देऊन दुसरी नोकरी धरणे. जिथे नोकरी केली त्याचे मालक असणार्या खासदार निकमांच्या मुलीशी प्रेमविवाह, तीन-चार नोकर्यांनतर शेती, पुस्तक विक्रीचे दालन आणि नंतर सापडलेला नेमका सूर. अत्यंत प्रामाणिक, सदशील, बुद्धिमान, दूरदृष्टीचे आणि अनुभव व कष्टांमधून आलेली कर्तुत्वसंपन्नता यांची चढती कमान यातून पुढे तानाजीरावांच्या व्युत्पन्न व्यक्तीमत्त्वाची उंची व खोली पत्रलेखकाने टप्प्याटप्प्याने क्रमवार मांडली आहे.
जगण्यातील अवहेलना, अपमान यांच्याकडेही मोठ्या मनाने पाहून ‘मोठ्या गोष्टींवरील’ लक्ष विचलिन होऊ न देणारे तानाजीरावांचे हे अत्यंत प्रभावी व प्रेरणादायी व्यक्तीमत्त्व पत्रलेखक बर्वे यांनी नेमकेपणाने मांडले आहे. पत्र उत्तम झाले आहे. आपली न्याय्य भूमिका न सोडणे, अपयशाच्या भीतीने स्वाभिमान गुंडाळून तडजोडीचे आयुष्य न स्वीकारणे, विचाराची परीपक्वता व ध्येयनिश्चितीतून साध्यापर्यंत पोचण्याची हातोटी त्यामुळेच आतापर्यंत हुलकावणी देणारे लौकिक यश तानाजीरावांपुढे हात जोडून उभे राहिले. मोठे होण्यासाठी मोठ्या घरातच जन्यावे लागते, हा गैरसमज तुम्ही दूर केलात.’ ‘अपार मेहनतीला बुद्धीची जोड दिली की नशीब साथ देऊ लागते.’ ‘आपण उभ्या केलेल्या संस्थेकडे त्रयस्थपणे पण अभिमानाने पाहण्याततून मिळणारा आनंद स्वर्गसुखापेक्षाही मोठा असतो.’ ‘यशाकडे जाणारे रस्ते कधीच सरळ नसतात. यश मिळाल्यावर रस्ते आपोआप सरळ होत जातात.’ ‘स्तुतीत लपलेलं खोटं आणि टीकेत लपलेलं सत्य हे तुमच्यासारख्या ज्यांना समजले, त्याला चांगल्या व वाईटाची ओळख आपोआप समजते.’ ‘कष्ट व संघर्ष हाच यशाचा एकमेव मार्ग आहे, हे तुमच्या आयुष्याकडे पाहिल्यावर लक्षात येते.’ ‘प्रयत्न, मेहनत आणि स्वप्ने याशिवाय कोणतीही व्यक्ती मोठी नाही.’ या व अशा अनेक सुंदर सुभाषितप्रचूर वाक्यांनी हे पत्र नटल्याने त्याला एक वैचारिक उंची प्राप्त झाली आहे.
- रवीप्रकाश कुलकर्णी यांना पत्र : दिलीपराज प्रकाशनासाठी हजारांहून अधिक संहिता परीक्षणाचे काम करणारे व वयाची पंचाहत्तरी पूर्ण करणारे रवीप्रकाश व राजीव बर्वे यांची गेल्या तीनहून अधिक दशकांची मैत्री. अफाट वाचनाचा ‘रियाज’ असणार्या रवीप्रकाशांची छोटा-मोठा लेखक हा भेद न करता तटस्थ व प्रामाणिकपणे समोर आलेल्या प्रत्येक संहितेचे मूल्यमापन करण्याची पद्धत बर्वे यांना भावलेली. संहितेचे बारकाईने शेवटपर्यंत वाचन, त्यावर टिपणं काढून त्याची संदर्भासहीत नोंद तसेच छापण्यायोग्य होणार असेल तर त्यानुसार दुरुस्त्या, तसेच पुरर्लेखनाबाबतचे मार्गदर्शन केलेले समंजस पद्धतीने केलेले सविस्तर परीक्षण. चांगल्या दर्जेदार साहित्याचे तोंडभरून कौतुक करण्याचा दिलदारपणा. यासाठी लागणारा निगर्वी परखड वृत्तीमुळेच ‘बनचुके’, अहंकारी व वाड्मयचौर्याची लबाडी करणार्या लेखकांना स्पष्ट सुनावण्याची त्यांची हातोटी. आपल्या कामात इतक्या उंचीवर गेल्यानंतरही रवीप्रकाश यांच्या वागण्यातील निगर्वी साधेपणा बर्वे यांना म्हणूनच सौंदर्यपूर्ण वाटतो. प्रकाशकाकडे पुस्तकाची संहिता निवडीचे काम सर्वात जोखमीचे, जबाबदारीचे व तितकेच परदर्शक असण्याची गरज रवीप्रकाश सर्वार्थाने पूर्ण करत असल्याचा कौतुकमिश्रीत आनंद बर्वे या पत्रातून मुक्तपणे व्यक्त करतात. रवीप्रकाश यांच्या आजवरच्या कामाला हृदयापासूनची दिलेली ही दाद असून त्यामागे बर्वे यांच्यातील अंत:करणपूर्वक कृतज्ञता भरून राहिली आहे. अशा निरपेक्ष मित्रामुळेच आपले प्रकाशन उंच भरारी घेऊ शकल्याचे समाधानही त्यांना होताना जाणवते. यातून रवीप्रकाश यांची वैचारिक खोली व परिपक्वता एक मित्र म्हणूनही बर्वे यांना मोलाची वाटते. हे पत्र छोटे पण अर्थपूर्ण झाले आहे.
- पांडुरंग नागेश कुमठा यांना पत्र : मराठी प्रकाशनाला 200 हून अधिक वर्षे झाली असताना त्यातील अलीकडच्या सुमारे 100 वर्षांचा साक्षीदार असणारे कुमठा हे त्या अर्थाने पुस्क व्यवसाय क्षेत्रातील पितामह शोभतील असेच आहेत. ही सार्थ उपमा पत्रलेखक राजीव बर्वे यांनी त्यांना आदरपूर्वक बहाल केली आहे. मराठी ग्रंथव्यवहार हा मुळात अत्यंत गुंतागुंतीचा, अनेक चढ-उतारांचा, नवनव्या प्रवाहांचा आणि तरीही तितक्याच जोखमीचा असतानाही, त्यातील खाचाखोचा, अवघड वळणं आणि धोके यांचे सम्यक मार्गदर्शक म्हणून कुमठांचे कार्य किती महान आहे, याची कल्पना हे पत्र वाचल्यावर होते. या क्षेत्रातील त्यांचे जबाबदार, मार्गदर्शक व प्रेमळ पितृत्त्वच बर्वे यांनी यापूर्वीच मान्य केले आहे. त्यांची पिता म्हणून असणरी निस्पृह-प्रेमळ जाण, वडीलकीच्या नात्याने सांगण्यातले व्यावहारीक कर्तव्य व इतरांपेक्षा पाहिलेले जास्त पावसाळे या सार्याचेच एकत्रित रसायन कुमठांच्या व्यक्तीमत्त्वात बर्वे यांना दिसते. वडिलांच्या अचानक निधनानंतर बर्वे यांच्या ऐन पंचविशीत त्यांच्यावर आलेल्या एका मोठ्या पुस्तक प्रकाशन समारंभाची जबाबदारी वडिलकीच्या नात्याने स्वत: सांभाळत कुमठा यांनी त्यांना दिलेला धीर व मोलाचा सल्ला या पत्रातून वाचल्यावर त्यांच्यांतील माणूसकीचा गहीवर स्पष्ट जाणवतो. सलग 48 वर्षे बॉम्बे बुक डेपोच्या माध्यमातून त्यांनी ग्रंथ विक्रीबरोबर त्या व्यवसायाला पूरक असणार्या
दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनाची कौशल्यपूर्ण हातोटी. पुस्तक दालनाच्या संकल्पनेचे प्रणेते. कोणती पुस्तके वाचकांपर्यंत व्यवस्थित पोचतील याची अभ्यासपूर्वक कुंडली मांडणारे भविष्यवेधी द्रष्टे. नवोदित व अडचणीत आलेल्या प्रकाशकांचे आधारस्तंभ. प्रसंगी तडजोडी करायला लावणारे व्यवहारी सल्लागार. अशी कुमठा यांची अनेक रूपं पाहिल्यावर ग्रंथ प्रकाशन क्षेत्राच्या वर जाऊन त्यांचे या क्षेत्राचे विहंगावलोकन करण्याची असणारी क्षमता ही आवाक करणारी वाटते. या व्यापक दृष्टिकोनातूनच त्यांनी मराठी प्रकाशकांनी आपापसातील हेवेदावे सोडून त्यापलीकडे जाऊन सर्वस्पर्शी विचार करायला
शिकवले. वयाच्या 98व्या वर्षांपर्यंत हे कार्य अविरत करणार्या या दीर्घायुषी मार्गदर्शकाबद्दलची कृतज्ञता या पत्रातून ओथंबलेली आहे. हे पत्र कुमठांच्या व्यक्तीमत्त्वाचा वेध घेणारे बहुस्पर्शी झाले आहे.
- प्रकाश देशपांडे यांना पत्र : निस्वार्थी, प्रामाणिक, सकारात्मक व कर्तुत्त्ववान माणसांच्या यादीतील हे आणखी एक नाव. उत्तम नेतृत्त्वगुण असूनही शेवटपर्यंत हाडाचे कार्यकर्ता म्हणून शेकडो हाडाचे कार्यकर्ते घडवण्याचे मोठेपण. लोकमान्य टिळक वाचनालय व पुरातन वस्तूंच्या संग्रहालयाचे संस्थापक. 2005 आणि 2021 मध्ये आलेल्या पुरातून या दोन्ही उपक्रमांची उडालेली धूळधाणीची तितक्याच चिकाटीने केलेली पुनर्बांधणी. प्रत्येक संकटाचे संधीत रूपांतर करण्याची विलक्षण किमया. विविध वादांमधून यशस्वी मार्ग काढून 2014 मधील चिपळूणच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे यशस्वी आयोजन. अडचणीच्या काळातून मार्ग काढण्याकरता लागणारा कमालीचा शांतपणा, संयम व विचारांची प्रगल्भता. या सार्यातून संस्थात्मक कार्याचा आदर्श घडवणारे आदर्श मार्गदर्शक. संस्थात्मक उभारणीत वैयक्तीक सुख-स्वार्थ बाजूला ठेवणारे स्थितप्रज्ञ. कोकणात साहित्यिक वातावरण निर्माण व्हावे यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजक, कोकणवासीय लेखकांचे प्रकाशक. राष्ट्रीय स्वयंसंवक संघाचे असल्याच्या सार्थ अभिमानाबरोबर इतर विचारसरणींच्या लोकांबरोबर तितक्याच समरतसतेने वावरण्याची हातोटी. यश डोक्यात जाऊ न देता येणारा हेकेखोरपणा बाजुला ठेवत परखडपणाबरोबरच अंगभूत असणार्या अभिजात प्रेमळपणाचे मूर्तीमंत व्यक्तीमत्त्व. पत्रलेखकाचा मसाप उपाध्यक्षपदाच्या निवडणूकीत पराभव झाल्यानंतरही त्यांची योग्यता पाहून त्यांना परत संस्थेत उपाध्यक्ष म्हणून परत आणण्यासाठी केलेला नि:स्वाथी खटाटोप. या सार्या घटनांची सुरुवात देशपांडे यांच्याशी 1977 मध्ये आणीबाणीनंतरच्या लोकअभियान मतदार जागृती चळवळीतून चिपळूण येथे होते. तो स्नेह आजतागायत 48 वर्षे वृद्धिंगत झाला असल्याची कृतार्थ कृतज्ञता पत्रलेखक बर्वे यातून व्यक्त करतात. पत्र व्यवस्थित झाले असून देशपांडे यांचे संस्थात्मक कार्य करणारे व्यक्तीमत्त्व सुंदर उभे राहिले आहे. यात देशपांडे यांच्या व्यक्तीमत्व घडण्यामागचे पत्रलेखकाचे विश्लेषण मात्र थोडे कमी पडले आहे.
पुस्तकाचे नाव – मनातील पत्रे
लेखक – राजीव बर्वे
प्रकाशक – दिलीपराज प्रकाशन
किंमत – ६०० रुपये
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
