मीठ म्हणजे एनएसीएल अमेरिकेत गेले तरी तेच भारतात आले तरी तेच. त्यात फरक नाही. अमेरिकेतील माणसात तोच आत्मा आहे. भारतातील माणसात तोच आत्मा आहे.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406
नाना लवणकणाचिये राशी । क्षारता एकचि जैसी ।
कां कोडी एकीं उसीं । एकचिं गोडी ।। 918 ।। ज्ञानेश्वरी अध्याय 13 वा
ओवीचा अर्थ – मिठाच्या अनेक कणांच्या ढिगातूंन जसा एकच खारेपणा असतो. अथवा कोट्यवधी उसांत गोडी जशी एकच असते.
मीठ खारट असते. साखर गोड असते. मिठाचा कोणताही कण हा खारटच असतो. तसे साखरेचा कोणताही कण गोडच असतो. हा ज्या त्या पदार्थाचा गुणधर्म आहे. मिठामध्ये सोडियम-क्लोरिन हे घटक असतात. त्या मूलद्रव्यापासून मीठ तयार होते. साखरेत कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन हे घटक असतात. उसामध्ये असणारी साखर ही इतर पिकामध्ये असणाऱ्या साखरेसारखीच आहे. फक्त त्याचे प्रमाण भिन्न आहे. उसामध्ये त्याचे प्रमाण अधिक असल्याने त्याच्या रसापासून साखर तयार केली जाते.
विविध फळांमध्येही साखर असते. पण त्याचे प्रमाण वेगळे असते. मात्र गोडी एकच असते. उसाच्या बुडाचे कांडे अधिक गोड तर शेंड्याकडचा ऊस कमी गोडीला असतो. साखरेचे प्रमाण कमी अधिक असल्याने ही गोडी वेगवेगळी वाटते. पण रसातील साखरेचा कण हा गोडच असतो.
ज्वारीतील साखर, गव्हातील साखर, तांदळातील साखर, विविध फळातील साखर ही चवीला वेगळी वाटत असली तरी ती साखरच आहे. आपणास त्याच्या कमी जास्त प्रमाणामुळे किंवा इतर मूलद्रव्यांशी झालेल्या संयोगामुळे चवीत फरक वाटतो. तसे देहात आलेला आत्मा हा एकच आहे. सर्व देहात असणारा आत्मा हा एकच आहे. पण तो वेगवेगळ्या देहात आल्याने तो वेगळा वाटत आहे. देहाला विविध आकार मिळाले आहेत. प्रत्येकाचा चेहरा हा वेगळा आहे. प्रत्येकाचा आकारही वेगवेगळा आहे. कोणी जाड आहे. कोणी बारीक आहे. कोणी उंच आहे तर कोणी बुटके आहे. पण त्यांच्याजवळचा आत्मा हा एकच आहे.
फळे हीसुद्धा विविध आकाराची आहेत. पिकेसुद्धा विविध आकाराची आहेत. पिकांचे दाणेही वेगवेगळे आहेत. काही लांबट आहेत तर काही गोल आहेत. त्यालाही विविध आकार आहेत. पण या सर्वांच्या ठायी असणारी साखर ही गोडच आहे. मीठ म्हणजे एनएसीएल अमेरिकेत गेले तरी तेच भारतात आले तरी तेच. त्यात फरक नाही. अमेरिकेतील माणसात तोच आत्मा आहे. भारतातील माणसात तोच आत्मा आहे. फुलांमध्ये असणाऱ्या विविध घटकांमुळे त्याचा रंग वेगळा झाला आहे. त्याच्या जनुकीय साखळीमुळे त्याचे रंग बदलले आहेत. जास्वंदीची फुले पूर्वी फक्त लाल-गुलाबी असायची. आता पांढरी, पिवळी अशी विविध रंगांची फुले पाहायला मिळतात. जास्वंदीच्या जनुकात तसा बदल केला गेला. रंगाचा जनुक बदलला तसा फुलांचा रंग बदलला. पण जास्वंद हे तेच आहे.
उसाचे कांडे विविध आकाराचे आहे. जातीनुसार कांड्याचा आकार बदलतो. जनुकीय बदलामुळे हे बदल झाले. पण त्यामध्ये असणारी साखर ही एकच आहे. ती बदलली आहे का? नाही. त्याचे प्रमाण कमी जास्त झाले आहे. त्यामुळे चवीला त्याची गोडी कमी जास्त वाटते. पण साखर ही शेवटी एकच आहे. तसा प्रत्येक देहात असणारा आत्मा हा एकच आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.