तीर्थाच्या संदर्भात या अभंगात मांडलेला तुकारामांचा विचार म्हणजे तीर्थक्षेत्री जाऊन जे मिळवायचे ते आपल्या स्थानी राहूनच माणूस मिळवू शकतो. फक्त त्याच्याकडे भक्ती असायला हवी. तीर्थाला जाण्यापेक्षा आपल्या स्थळी निश्चळ राहणे अधिक चांगले असे ते म्हणतात.
डॉ. लीला पाटील, कोल्हापूर
देह असोनिया देव । वृथा फिरतो निर्देव ।।१ ।।
देव आहे अंतर्यामी । व्यर्थ हिंडे तीर्थग्रामी ।। २ ।।
नाभी मृगाचे कस्तुरी । व्यर्थ हिंडे वनांतरी ।।३ ।।
साखरेचे मूळ ऊस । तैसा देहि देव दिसे ।।४।।
दुधी असता नवनीत । नेणे तयाचे मथित ।।५ ।।
तुका सांगे मूढजना । देही देव का पाहाना ।।६ ।। तुकाराम गाथा (४४८२)
तुझे आहे तुजपाशी । परि तू जागा चुकलाशी ।। असे म्हणावेसे वाटते ते हा अभंग वाचून आपल्या देहातच परमेश्वर सनातन जीवांशाच्या रूपाने असतो. पण स्वानंदाला मुकलेला मूढ माणूस मायेच्या योगाने बाह्य वस्तूत आनंद शोधत दश दिशांना भटकतो. तुकारामांची ईश्वरविषयक कल्पना स्पष्ट आहे. जो देव जळी-स्थळी, काष्टी-पाषाणी भरला आहे, तो काय स्वतःच्या देहामध्ये नाही का? अर्थातच असला पाहिजे. नव्हे आहेच.
तुकाराम विश्वचैतन्य उपासक आहेत. त्यामुळे त्यांना जळी-स्थळी काष्टी पाषाणी देवाचे अस्तित्व जाणवते. मनापासून भक्ती करणाऱ्यांना देव सर्वत्र भेटतो. यात्रा-जत्रा करीत फिरावे लागत नाही. देव देव करीत हिंडावे लागत नाही. भक्ती करताना कर्मकांडात, रूढी- परंपरात गुंतून पडणे तुकारामांना मान्य नाही.
तीर्थाच्या संदर्भात या अभंगात मांडलेला तुकारामांचा विचार म्हणजे तीर्थक्षेत्री जाऊन जे मिळवायचे ते आपल्या स्थानी राहूनच माणूस मिळवू शकतो. फक्त त्याच्याकडे भक्ती असायला हवी. तीर्थाला जाण्यापेक्षा आपल्या स्थळी निश्चळ राहणे अधिक चांगले असे ते म्हणतात. देव आपल्या देहातच असताना, तो आपल्या अंतर्यामी असताना त्याचा शोध घेण्यासाठी तीर्थग्रामी हिंडणारा मनुष्य अभागी असल्याचे म्हटले आहे.
हे स्पष्ट करताना तुकारामांनी दिलेली उदाहरणे मार्मिक आणि सामान्यांना पटणारी आहेत. कस्तुरीमृगाच्या नाभीमध्ये कस्तुरी असते, पण तो कस्तुरीचा सुवास कोठून आला हे न कळून मृग सैरावैरा धावतो. कशासाठी? तर सुवास शोधण्यासाठी. स्वतःमध्येच अंतर्मनात ईश्वराचे वास्तव्य असते, पण ते न कळल्याने आपण तीर्थश्रेत्री त्याला शोधत राहतो त्या कस्तुरीमृगाप्रमाणे. दुसरे उदाहरण म्हणजे साखर जशी उसाच्या कांडामध्ये असते, तसा देव आपल्या देहामध्ये गुप्त असतो. पण तो ओळखण्यासाठी दृष्टी पाहिजे. ती नसलेल्यांकडून तीर्थक्षेत्री ईश्वर शोध घ्यायला अकारण भटकणं घडतं. कारण ऊस गाळावा कसावा ते माहीत पाहिजे तसे परमेश्वर शोधावा कसा याबद्दलचे अज्ञान तीर्थक्षेत्राकडे वळविते. तिसरे उदाहरण तुकाराम या अभंगात देतात ते म्हणजे दुधामध्ये असलेल्या लोण्याचे होय. दुधामध्ये लोणी असते. पण दुधाचे दही लावून ते घुसळल्यानंतर नवनीत म्हणजे लोणी हाती येते. ते घुसळणे माहीत पाहिजे. ज्यांना जे मंथन कसे करायचे ते कळत नाही ते लोक मूढ आहेत असे तुकाराम म्हणतात.
विठ्ठल भक्त आणि विठ्ठलाच्या नामापुढे सर्व तीर्थे फिकी आहेत. नामाचा उच्चार केला असता वाराणसी वा इतर नाना तीर्थांना जाण्याची गरज नाही. तुम्ही देहामध्येच देव का बरे पाहात नाही असा प्रश्न लोकांना तुकाराम विचारतात. ज्याला देव फक्त तीर्थातच दिसतात व इतर स्थाने देवाच्या अस्तित्वाच्या दृष्टीने ओस आहेत असे वाटते, तो त्यांचा दोष आहे असेही त्यांनी एका अभंगात सांगितले आहे.
साध्या सोप्या शब्दात मांडलेल्या या अभंगामागे ईश्वरविषयक अतिरंजित, कर्मकांडसह कल्पना त्या काळात मांडल्या गेल्या. त्या फोल आहेत हा दाखविण्याचा तुकारामांचा हेतू आहे. तीर्थक्षेत्री जाऊन ईश्वर भेट होते ही शक्यता ज्यांनी जाणीवपूर्वक सामान्य लोकांच्या मनात भरवून दिली. त्यांचा त्यामागील स्वार्थही तुकारामांनी ओळखला असावा. तीर्थक्षेत्री मंदिर, देऊळ असते. मूर्तीची प्रतिष्ठापना केलेली असते. जेवढे अधिक संख्येने लोक तीर्थाच्या गावी जातील, तितकी देवापुढे दान, देणगी, नैवेद्य, नारळ, पेढे, ओटी रूपाने मिळकत होते. म्हणूनसुद्धा स्वार्थी हेतू साध्य करण्यासाठी तीर्थक्षेत्री जाण्याचा व देवाला भेटण्याचा शॉर्टकट सांगितला असावा. कारण तीर्थक्षेत्री स्नान संध्या, पूजा-अर्चा केली की झाले. इतर वेळी कसेही वर्तन करण्याची जणू मुभा मिळविणारे हे लोक तीर्थक्षेत्री गर्दी करीत असावेत. अशाही भूमिकेतून तुकारामांनी ‘व्यर्थ हिंडे तीर्थग्रामी’ असे म्हटले आहे.
मानवी देह स्वतःच चैतन्यरूप आहे, तेथेच ईश्वराचे अधिष्ठान आहे. स्वतः तील चैतन्याचा अंश जागृत करण्याऐवजी देव देव करणे म्हणजे बाह्य अंगी देव शोधण्याचा वेडेपणा होय. नैतिक आचरणाने, प्रामाणिक भावनेने त्याचा शोध घेतला तरच तो दिसेल. तीर्थाटन, मूर्तिपूजा, उपास-तापास, नवस-सायास हे केवळ बाह्य उपचार होत, ती भक्ती नव्हे.
आजची तीर्थक्षेत्रांची स्थिती पाहिली तर तेथे भक्ती, चिंतन, मंथन, शांती आणि स्वस्थपणाने देवदर्शन याचा यत्किचितही अनुभव येत नाही. तीर्थक्षेत्रे म्हणजे अस्वस्थतेचे साम्राज्य, अनारोग्याची लागण, पाणी, हवा, ध्वनी प्रदूषण हे तर आढळतेच. शिवाय चोरी, लूटमार आणि भक्ताकडून रीतसर पैसे उकळणे याचीही चलती दिसून येते. अर्थात काही मंदिरांमध्ये स्वच्छता, सफाई, शिस्त व शांतता याचा सुंदर व प्रसन्न अशा वातावरण मनःशांती देणारा अनुभव मिळतो. ती प्रसिद्ध आहेत. मात्र तेथेही श्रीमंत पैसेवाले यांना दर्शनाची स्वतंत्र स्पेशल सोय आहे. देवसुद्धा दर्शन घेणाऱ्या भक्तांमध्ये असा दुजाभाव करणारा, देणगी-दान यानुसार प्रतवारी लावणारा अशा व्यवस्थापन प्रणालीत स्वतःला बसवून घेत असेल तर ती तीर्थक्षेत्रे तरी कितपत मानवता, समानता आणि निःस्वार्थीपणाने वर्तन करणाऱ्या हातात, अधिकारात आहेत असे म्हणता येईल? तीर्थक्षेत्री भरणाऱ्या जत्रा, यात्रा, मेले म्हणजे तर प्रदूषणांची रेलचेल ! भक्तिभावाने दर्शन दुरापास्त; पोलिस बंदोबस्तावर ताण, आता तर दहशतवादी कारवायांची सतत टांगती तलवार व विशिष्ट प्रसंगी तर रेड अलर्ट. शासनाला तीर्थक्षेत्री यात्रा, जत्रा अशावेळी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवावी लागते. काही (मांढरदेवी यात्रेच्या) वेळा चेंगराचेंगरीमुळे जीवित हानी झाल्याचे प्रकार घडतात. तीर्थक्षेत्रे सुरक्षितता, शांतता आणि मनःस्वास्थ्य देणारी राहिली आहेत काय? याचे उत्तर होय येईल तेव्हा तेथे परमेश्वर सापडेल.
तुकाराम आपल्या विचाराशी सुसंगत व प्रामाणिक राहून अन्य अभंगात म्हणतात… तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी । जावूनी तीर्थी काय तुवां केले । चर्म प्रक्षाळिले वरीवरी । आशा धरूनी फळीची । तीर्थी व्रती मुक्ति कैसी ।।
मनात आशा धरून तीर्थयात्रा केल्याने मुक्ती मिळत नाही. मनुष्य आतून शुद्ध नसेल तर काशी आणि गंगा तरी त्यांच्या बाबतीत काय करू शकणार आहेत असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. त्याचे मर्म जाणून घ्यावे हेच सर्वार्थाने इष्ट आणि ते मर्म म्हणजे मनाच्या शुद्धत्वाला खरे महत्त्व आहे.
डॉ. लीला पाटील, कोल्हापूर
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.