सण, समारंभ, उत्सव आपण का साजरे करतो ? त्याचे महत्त्व काय ? याचा विचार नव्यापिढीने करायला हवा. काळ बदलला आहे सर्वत्र आधुनिक विचार पुढे आले आहेत. अशावेळी आपल्या भारतीय संस्कृतीच्या विचारांचा अभ्यास करून ते जोपासण्याचा प्रयत्न करायला हवा. सण, उत्सवाचा खरा अर्थ समजून ते साजरे करायला हवेत.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे,
मोबाईल – 9011087406
परि घातयाही पायां पडतां । नुठी गतायु पंडुसुता ।
तैसी नुपजे उपजवितां । क्रोधोर्मी गा ।। १२९ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १६ वा
ओवीचा अर्थ – परंतु, अर्जुना ब्रह्मदेवाच्याही पाया पडले असतां आयुष्य संपलेला पुरुष ज्याप्रमाणें उठत नाही, त्याप्रमाणें क्रोध उत्पन्न होण्याची शिकस्त केली असतां त्याच्या ठिकाणी क्रोधाचा विकार उत्पन्न होत नाही.
आधुनिक तंत्रज्ञानाच्या या युगात जगभर विविध प्रकारचे दिवस साजरे केले जातात. जागतिक पर्यावरण दिवस, व्हॅलेन्टाईन डे अर्थात प्रेमाचा दिवस, मैत्रीचा दिवस, जागतिक योग दिन, मदर्स डे, फादर्स डे असे एक ना अनेक दिवस आता साजरे केले जातात. या अशा दिवसाच्या निमित्ताने आपणास कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळते. भारतीय संस्कृतीमध्येही असे विविध दिवस साजरे केले जात होते व त्यातील काही दिवस आजही साजरे होतात, पण आता त्याचे स्वरुप वेगळेच झाले आहे. आपण ते परिवर्तनाच्या अनुशंगाने पाहात नाही. त्यामुळे त्याचा योग्य लाभ आपणास मिळत नाही.
विश्वावर प्रेम करण्याचे विशाल ध्येय असणारी अशी ही आपली भारतीय संस्कृती आहे. चराचरात प्रेम करू पाहाणारी, कृतज्ञता सर्वत्र प्रकट करणारी ही भारतीय संस्कृती आहे, असे मत साने गुरुजींनी व्यक्त केले आहे. यासाठीच या संस्कृतीचा अंतरात्मा ओळखून पूर्वजांची ही थोरदृष्टी घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करायला हवेत, असे आवाहनही साने गुरुजी यांनी केले आहे. कारण अशा संस्कारातूनच मनुष्याचे व्यक्तिमत्व घडत असते. मनातील दुष्ट भाव जाऊन चांगल्या विचारांची पेरणी मनामध्ये व्हायला हवी. तरच क्रोध जावून प्रेमभाव उत्पन्न होईल. यासाठी या पवित्र दिवसांचे महत्त्व ओळखून त्याचे आचरण होणे गरजेचे आहे.
सण, समारंभ, उत्सव आपण का साजरे करतो ? त्याचे महत्त्व काय ? याचा विचार नव्यापिढीने करायला हवा. काळ बदलला आहे सर्वत्र आधुनिक विचार पुढे आले आहेत. अशावेळी आपल्या भारतीय संस्कृतीच्या विचारांचा अभ्यास करून ते जोपासण्याचा प्रयत्न करायला हवा. सण, उत्सवाचा खरा अर्थ समजून ते साजरे करायला हवेत. नागपंचमीचे महत्त्व काय ? हे समजले तर सापांची हत्या न करता त्यांच्या प्रजातींच्या संवर्धनासाठी प्रयत्न होतील. पावसाळ्यातील पुरामुळे सापांचे बीळ अर्थात त्यांचे राहाण्याचे ठिकाण नष्ट होते. अशावेळी तो साप नागरीवस्तीत वळचणीला येऊन बसतो. पण अशा सापाला विषारी समजून मारतो. ही मानसिकता बदलायला हवी. सापांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करून त्याला पकडून जंगलात सोडल्यास त्याच्याबरोबरच जैवविविधतेचे संवर्धन होऊ शकते. साप शेतातील उंदीर खातो. त्यामुळे होणारे पिकांचे संभाव्य नुकसान टळते. विषारी सापातही चांगुलपणा पाहावा, असे भारतीय संस्कृती शिकवते.
शिळासप्तमी पूर्वीच्या काळात साजरी केली जात होती. पण आता चुलीच राहील्या नाहीत. गॅसच्या शेगड्यांनी चुलीची जागा घेतली आहे. साहजिकच शिळा सप्तमीची प्रथा उरलीच नाही. मातीच्या चुलीच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस फक्त औपचारिकता म्हणून काहीजण साजरा करतात. शिळासप्तमी प्रमाणेच दिव्यांची अवस हा दिवस सुद्धा साजरा केला जातो. दिव्याबद्दल कृतज्ञता दाखवण्याचा दिवस. आता विजेच्या झगमटामुळे हा दिवस आता औपचारिकता म्हणूनच राहीला आहे. अशा दिवसांच्या निमित्ताने कृतीतूनच प्रेममयी भारतीय संस्कृतीचे दर्शन घडते. हे विचारात घ्यायला हवे.
क्रोधावर नियंत्रण मिळवण्यासाठी, मनातील अहंकार नष्ट करण्यासाठी कृतज्ञता भाव जागृत करून प्रेममयी संस्कृतीचे विचार कसे उत्पन्न होतील याचा विचार नव्या पिढीने करायला हवा. वटपौर्णिमा किंवा पर्यावरण दिवस हे सुद्धा वृक्षापासून मिळणाऱ्या लाभांच्याप्रती कृतज्ञता, प्रेमभाव व्यक्त करणारा दिवस आहे. असे मनपरिवर्तन झाल्यास जैवविविधतेचे संवर्धन होऊ शकेल. विविध सणांच्या पारंपारिक प्रथेतील भाव विचारात घेऊन सण साजरे झाल्यास प्रेममय सृष्टी निर्माण होईल. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे हे खऱ्या अर्थाने कृतीत येईल. क्रोधावर, अहंकारावर निश्चितच यातून मात करता येईल. कारण सण अन् उत्सवातून मनपरिवर्तन घडते. त्याला आधुनिकतेची जोड देता आल्यास नव्यापिढीत व्यक्तिमत्त्व विकास निश्चितच होईल. प्रेममय जगात क्रोध उत्पन्नच होणार नाही.