May 30, 2024
Pioneering thoughts of Saint Tukaram
Home » संत तुकारामांचे प्रागतिक विचार
मुक्त संवाद

संत तुकारामांचे प्रागतिक विचार

संत तुकारामांचे प्रागतिक विचार

मढे झाकोनिया करिती पेरणी । कुणबियाचे वाणी लवलाहो ही ।। १ ।।
तयापरी करी स्वहित आपुले । जसासि फावले नरदेह ।। २ ।।
ओटीच्या परिस मुठीचे ते वाढे । यापरी कैवाड (डे) स्वहिताचे ।। ३ ।।
नाही काळसत्ता आपुलिचे हाती । जाणते हे गुंती उगविती ।। ४ ।।
तुका म्हणे पाही आपली सूचना । करत तो शहाणा मृत्यु लोकी ।। ५ ।।

तुकारामांनी कुणबी जीवनाचा जाणीवपूर्वक अभ्यास केल्याचे या अभंगातून जाणवते. शेती करणाऱ्या कुणबी जातीचे लोक हे हंगाम पाळण्यावर कटाक्ष ठेवतात. वाफसाच्या वेळी पेरणी करण्याविषयी इतके दक्ष असतात की त्या काळात घरातील एखादी व्यक्ती तरी मृत्युमुखी पडली तरी त्याचे प्रेत झाकून, पेरणी करण्याकरिता मोठ्या तत्परतेने शेतीकडे धाव घेतात. कारण घात साधणे महत्त्वाचे असते. नाहीतर पीक धोक्यात येते. पीक हाती नाही लागले तर खाणार काय ? वर्षभर धान्य आणणार कोठून ? जमीन पडीक पडेल म्हणून मुलगा, बाप वा बायको कोणी मेले तरी त्याचा मृतदेह झाकून ठेवतात. वाच्यता करीत नाहीत. पेरणी करून आल्यावर सर्व विधी करतात.

पेरणी करताना ओटीत जे बी असते, त्यापेक्षा मुठीत असलेले बी प्रगतीच्या पुढच्या टप्प्यावर असते. त्याप्रमाणे माणसाने स्वत:च्या सांसारिक हिताच्या बाबतीत वागावे. खरे तर ‘स्वहित तत्परता’ ही महत्त्वाची आहे. हे तुकारामांनी जाणवून दिले आहे. मात्र स्वहित तत्परता म्हणजे स्वार्थ नव्हे याचीही जाणीव करून दिली आहे. नरदेह लाभला की त्या अनुषंगाने येणारे सर्व सोपस्कार ओघाने करावे लागतात. निसर्गाने जे हंगाम वा घात साधण्याचे बंधन घालून दिलेले आहे ते पाळल्याशिवाय पीक अथवा जे काही मिळवायचे ते हाती कसे लाभणार? म्हणून तुकारामांनी हा विचार मांडला आहे.

काळ कोणासाठी थांबत नाही. एखादी गेलेली वेळ परत मिळविता येत नाही अथवा हाती लागत नाही. म्हणून काळाची सत्ता लक्षात घ्यावी. ती गुंतागुतीची आहे हे जाणकारांना कळते. म्हणून आपले व्यावहारिक शहाणपण पणाला लावून लाभ करून घेतला पाहिजे. अशा तऱ्हेच्या वर्तनाचा शहाणपणा ज्याच्याकडे असेल तो काळाच्या सूचनेप्रमाणे वागेल.

यासंदर्भात आणखी एक अभंग शेतीच्या क्षेत्राशी मिळत्या जुळत्या ओळीचे स्मरण होते त्या अशा – एका बीजा केला नाश । मग भोगले कणीस । लाभ नाही फुकासाठी । केल्यावीण जीवासाठी । शेतात आधी थोडे बी पेरले. मग गाड्या भरून धान्य नेता येते. पेरलेले बी वाया थोडेच जाते. तसे वाटले तरी अखेरीस वाढीव लाभ मिळतो हे लक्षात घ्यावे. झाडाला आळे करून पाणी दिले तर फळ लाभते असेच अनुभवांती लक्षात येते. म्हणून तुकारामांनी कृषि क्षेत्राशी निगडित असे विचार मांडले. एका बीजाचा नाश केला की कणीस भोगायला मिळते. जीवावर उदार होऊन कार्य केल्याशिवाय फुकाफुकी लाभ मिळत नाही. तुकारामांनी प्रयत्नवादाचा एक महत्त्वाचा मुद्दा सांगितला तर आहेच, शिवाय यश मिळविण्यासाठी त्यागाची, समर्पणाची गरजही प्रतिपादन केली आहे. बीजाचा नाश या उदाहरणातून ते असेही सुचवितात की, प्रसंगी सर्वस्व गमावण्याची तयारी ठेवावी लागते. तरच लाभाधिक्याची शक्यता नव्हे तर खात्री असते.

तुकारामांनी या अर्थाचे इतर कित्येक अभंग सांगितले आहेत. दह्यामध्ये लोणी असते. पण मंथन कसे करायचे जाणणारा लोणी मिळवू शकतो. आरसा स्वच्छ केल्याशिवाय चेहरा नीट कसा दिसेल ? खडे निवडले तर दळण चोख मिळेल. शेतातले तण काढले तरच पीक चांगले येईल. थंडी वाजत असेल तर अग्नी काय बोलावून हाका मारून जवळ यायला मागत नाही. स्वत:च तिथपर्यंत जावे लागते. पाणी काय या आणि मला प्या असे सांगत बसते ? ज्याला तहान लागलीय तो ते पिण्यासाठी धावतो. या सर्व अभंगरूपी विचारातून तुकारामांनी मनुष्याला जीवनात धडपड केल्याशिवाय काही मिळत नाही हा विचार रुजविण्यासाठी दैनंदिन जीवनातील उदाहरणे दिली आहेत. ती इतकी मार्मिक आणि बिनचूक लागू पडणारी आहेत की माणूस त्यादृष्टीने जागृत होतो हेच खरे.

आळस करता कामा नये. निष्क्रिय राहून चालणार नाही. प्रयत्नाशिवाय फळ मिळणार नाही. हालचाल केल्यावरच लाभ मिळेल. आपोआप हाती काय लाभणार ? त्यासाठी कष्टाची तयारी ठेवावी लागते. प्रयत्नवादाचा मंत्र तुकारामांनी या अभंगातून दिलेला आहे. दैववादी न बनविणारे तत्त्वज्ञान तुकाराम सांगतात. ईश्वर भक्ती करीत राहूनही प्रयत्नांकडे डोळेझाक करून चालणार नाही असेच त्यांना सुचवायचे आहे एवढेच नव्हे, ठासून वारंवार ते विचार मांडून लोकांमध्ये रुजविण्याचे कौशल्य, कामगिरी ही तुकारामांनी केली.

त्याप्रमाणे एका वेगळ्या जाणिवेचा मतीतार्थ यातून निघतो तो म्हणजे नरदेहाची प्राप्ती झालेली आहे तेव्हा सांसारिक व कौटुंबिक व्यवहार पाळा, त्याच बरोबर त्यातून वेळ काढून परमार्थ करण्याविषयीची जाणीव ठेवा. कारण पुन्हा नरदेह मिळेल न मिळेल. तेव्हा त्यादृष्टीने विचार करण्याविषयी ते सुचवितात. स्वहित वाढविण्याविषयी निर्धार ठेवा. आपले हित साधण्यासाठी उशीर लावू नका. कोणत्याही वेळी काय घडेल याचा नेम नाही. म्हणून हाती आलेल्या वेळेचा सदुपयोग करून घ्यावा. तुकाराम महाराज म्हणतात की, मी ही जी सूचना केलेली आहे ती लक्ष देऊन अतित्वरेने या मृत्यूलोकात पाळली पाहिजे तरच हित करून घेता येईल.

आजच्या प्रगत आधुनिक युगात तर ही त्वरा करणे, वेळ पाळणे आणि प्रयत्नशील राहणे म्हणजे यशाची गुरुकिल्ली होय. तुकारामांचे विचार हे शाश्वत आहेत. ‘टाईम इज मनी’ एवढ्यावर न थांबता ‘राईट वर्क ॲट राईट टाईम’ हे तत्त्वज्ञान सांगण्यातून तुकारामांचे प्रागतिक विचार लक्षात येतात. ‘टाईम मॅनेजमेंट’ चे तत्त्व त्यांनी सांगितले आहे. वेळ चुकली ती पुन्हा येत नाही. लाभ हातातून निसटतो. मग वृथा काळजी करून चुकचुकत राहण्यात काय अर्थ आहे? वेळेचे व्यवस्थापन हे आजच्या उद्योग व्यवसाय कृषि सेवा वगैरेसारख्या क्षेत्रात आधुनिक तत्त्व म्हणून पाळले जात आहे. तो विचार तुकारामांनी अभंगरूपाने त्या काळात वेगवेगळे दाखले देत सामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला. नव्हे तर घणाघातीपणाने मांडून लोकांना सतत वेळेच्या महत्त्वाबद्दल जागे ठेवले. किती द्रष्टेपण ! नि काळाच्याही पुढे जाऊन विचार मांडण्याचा तुकाराम महाराजांचा हा पैलू म्हणजे सर्वसामान्यांच्या आयुष्याला प्रयत्नवाद व कष्ट तेही वेळेवर करण्याचा मंत्र देण्याची अट्टाहासी भूमिका होय.

डॉ. लीला पाटील, कोल्हापूर

Related posts

शब्दगंधचे साहित्य पुरस्कार जाहीर

स्वाभिमान जागा केला त्याने पावन झाली धरा

शिवजयंती निमित्त जुन्नरमध्ये शिवनेरी मॅरेथॉनचे आयोजन

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406