March 29, 2024
meditation as per your capacity article by rajendra ghorpade
Home » नियम, व्रतात न अडकता जमेल तशा साधनेनेही ज्ञानप्राप्ती
विश्वाचे आर्त

नियम, व्रतात न अडकता जमेल तशा साधनेनेही ज्ञानप्राप्ती

नियम असावेत पण ते सर्वांसाठी सारखेच असावेत. येणाऱ्या भक्ताला नियम आहे आणि मंदिरात सेवा देणाऱ्या व्यक्तींना नियम नाही. मग तेथे इतर भक्त भाविक कसे येतील. याचा विचार व्हायला नको का ? साधनेसाठी निवडलेले ठिकाण दिसायला सुंदर असून चालत नाही तर तेथील वातावरणही तितकेच सुंदर असायला हवे. एकांतात कोठेही बसला तरी साधना होऊ शकते.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे

मोबाईल – 9011087406

तुम्हीं व्रतें नियमु न करावे । शरीरातें न पीडावें ।
दुरी केंही न वचावें । तीर्थांसी गा ।। 89 ।। ज्ञानेश्वरी अध्याय तिसरा

ओवीचा अर्थ – याखेरीज तुम्हाला आणखी व्रतें व नियम करण्याची जरुरी नाही, शरीराला पीडा देण्याची जरुरी नाही व दूर कोठें तिर्थाला जाण्याचे कारण नाहीं.

एक मंदिर होते. सुंदर होते. परिसर निसर्गरम्य होता. पण या मंदिरात फारसे कोणी जाता येताना दिसत नव्हते. मला मंदिर आवडले म्हणून मी तेथे नेहमी जाऊ लागलो. साधना करायचो. पण इतका चांगला परिसर असूनही येथे कोणीच का येत नाही ? हा प्रश्न मात्र मला नेहमीच विचलित करायचा. लोकांच्या आवडी निवडी बदलल्या आहेत का ? की लोकांना आजकाल अशा नयनरम्य परिसरातही जायला वेळ नाही ? असे अनेक प्रश्न मला पडू लागले. उत्तर मात्र सापडत नव्हते.

मी मंदिरात नेहमीप्रमाणे साधनेला बसलो होतो. अचानक माझा मोबाईल वाजला. त्यावेळी मंदिरात माझ्याव्यतिरिक्त एक-दोन व्यक्ती असतील. मी फोनवर बोलू लागलो. लगेच मंदिरातील पुजारी, मंदिरामध्ये इतर कामकाज पाहणाऱ्या व्यक्ती तिथे आल्या. त्यांनी मला मोबाईल ताबडतोब बंद करण्यास सांगितला आणि माझ्याशी वाद घालण्यास सुरवात केली. तुम्हाला लिहिलेले वाचता येत नाही का ? मंदिर आवारात मोबाईलवर बोलण्यास बंदी आहे. असे खडे बोल सुरू झाले. त्यांची उद्धट भाषा पाहून मलाही राहावले नाही. मीही बोलण्यास सुरवात केली. कारण त्या मंदिरात मी रोजच जात होतो.

ध्यान मंदिराची जागा स्वतंत्र आहे. तेथे मोबाईलवर बोलू नये हे मलाही समजते. पण मंदिरात बोलले तर काहीच फरक पडत नाहीत. तसे मंदिरात कोणी नव्हतेही? अशावेळी माझ्या बोलण्याचा कोणाला त्रास होणार हेच मला समजत नव्हते. मी रोज मंदिरात साधनेला बसतो तेव्हा तेथील पुजारी येणाऱ्या भक्तांशी गप्पा मारत बसतात. याचा त्रास रोजच होत होता. पण ते चालते. माझे बोलणे चालत नाही. यानंतर मी लगेच तेथून उठलो, बाहेर आलो.

यावर माझ्याशी देव बोलला. गावाच्या भर वस्तीत असणाऱ्या या निसर्गरम्य मंदिरात कोणीच का येत नाही ? हाच तुझा प्रश्न होता ना ? मिळाले का उत्तर. नुसता निसर्गरम्य परिसर असून चालत नाही. तेथील वातावरणही रम्य असावे लागते. यासाठी त्या मंदिरात सेवा देणाऱ्या व्यक्ती, पुजारी हेही तसेच सुभाषिक असायला हवेत. तरच तेथे लोक रमतात. अन्यथा सर्व सुविधा असूनही कोणीच तेथे फिरकत नाही. कारण प्रत्येकाला मनःशांती हवी असते. यासाठी प्रत्येकजण तेथे येत असतो. असा फुकटचा वाद घालायला कोणी येत नाही ?

नियम असावेत पण त्याची अमंलबजावणी योग्यवेळी, योग्यप्रकारे व्हायला हवी. मोबाईल बोलण्यास बंदी आहे तेव्हा मंदिरातील पुजाऱ्याला गप्पा मारत बसण्यास बंदी का नाही ? यासाठीच नियम कोणते असावेत यावरही सर्व अवलंबून आहे. याचाही विचार व्हायला नको का ? निसर्गरम्य परिसर मनाला मोहित करतो, पण तेथे प्रेम नसेल तर तेथे देव नांदत नाही. मग तेथे भक्तही राहत नाहीत. यामुळेच तेथे कोणी जात नाही.

सांगण्याचा उद्देश हा की, नियम असावेत पण ते सर्वांसाठी सारखेच असावेत. येणाऱ्या भक्ताला नियम आहे आणि मंदिरात सेवा देणाऱ्या व्यक्तींना नियम नाही. मग तेथे इतर भक्त भाविक कसे येतील. याचा विचार व्हायला नको का ? साधनेसाठी निवडलेले ठिकाण दिसायला सुंदर असून चालत नाही तर तेथील वातावरणही तितकेच सुंदर असायला हवे. एकांतात कोठेही बसला तरी साधना होऊ शकते. यासाठी त्रास करून घेण्याची काहीच गरज नाही. त्रास करून साधना होत नाही. उलटा त्याचा त्रास आपणासच अधिक होतो. आपणच उलटे त्यामुळे विचलित होतो. लांबची तिर्थस्थाने करूनही देव भेटतोच असे नाही. कारण स्वतःतला देव प्रथम समजून घ्यायला हवा. तो समजला तर त्रास होणार नाही. शरीराला त्रास देऊन तिर्थस्थाने करण्यापेक्षा एकांतस्थळी मन रमेल अशा ठिकाणी बसूनही साधना होऊ शकते. नियम आणि व्रतात न अडकता स्वतःला जमेल तरी जमेल तेवढी साधना करत राहीले तरी अध्यात्मिक प्रगती होते.

Related posts

चिमणी नक्की काय बोलत असावी बरं….

जीवनावर मार्मिक भाष्य करणाऱ्या कविता – आईचा हात

भारूड : नृत्यनाट्याद्वारे सोप्या शब्दांत अध्यात्माची शिकवण देणारा काव्यप्रकार

Leave a Comment