March 27, 2023
Place for Meditation article by Rajendra Ghorpade
Home » साधनेसाठी असे हवे आसन…
विश्वाचे आर्त

साधनेसाठी असे हवे आसन…

मन स्थिर होते असे प्रत्येक ठिकाण हे साधनेसाठी योग्यच आहे. यासाठी प्रथम मनाची तयारी करायला हवी. मन दृढ करायला हवे. मनाला साधनेची गोडी लागावी यासाठी मन त्यात गुंतवायला शिकले पाहिजे.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे

मोबाईल – 9011087406

म्हणोनि तैसें तें जाणावें। मन राहतें पाहावें।
राहेल तेथ रचावें। आसन ऐसें ।। 181।। ज्ञानेश्वरी अध्याय 6 वा

ओवीचा अर्थ – म्हणून ते स्थान, तसें आहे कीं, नाहीं, हे समजून घ्यावें, आपलें मन तेथें स्थिर राहाते की नाही ते पाहावें. आणि राहात असेल तर तेथें असें आसन लावावें.

साधनेच्या जागेस महत्त्व आहे. साधना कोठे करायची ? ते ठिकाण कसे असावे ? यावर विचार होण्याची गरज आहे. धकाधकीच्या जीवनात अशी जागा लाभेलच याची शाश्वती नाही. मंदिरात इतकी गर्दी असते की तेथे साधनेसाठी जागाच नसते. काही मंदिरे ओस पडलेली असतात पण ती बऱ्याचदा बंदच असतात. असा विरोधाभास पाहायला मिळतो. साधनेसाठी योग्य जागा न मिळाल्याने साधना होत नाही. वाढत्या लोकसंख्येच्या काळात हा प्रश्न गंभीर होत आहे.

घरातही आज निवांत बसावे असे ठिकाण नाही. दोन-तीन खोल्यांच्या घरात राहताना हॉलमध्ये टी. व्ही. असतो तो सतत सुरू असतो. आपली इच्छा नसली तरीही घरातल्यांच्या इच्छेमुळे तो सुरू असतो. अशावेळी घरातच शांत जागा शोधूनही मिळत नाही. शयनकक्षामध्ये साधनेला बसले की झोपच येते. कारण ते ठिकाण झोपायचे असते. अशा या बदलत्या जीवनशैलीत साधना कशी करायची ? हा सर्वांनाच भेडसावणारा प्रश्न आहे.

अशाने आपण ब्रह्मसंपन्न कसे होणार ? पण साधना करायची इच्छा मनात असेल तर साधनेसाठी ठिकाणाची गरजच भासत नाही. मनापासून साधना करताना शयनकक्षातही उत्तमप्रकारे साधना होऊ शकते. मनातील झोपेचा विचार झटकून टाकून दहा मिनिटे साधना करायचे म्हटले तर त्यात अशक्य असे काहीच नाही. फक्त साधनेचा विचार, साधनेची मानसिकता असायला हवी.

मन स्थिर होते असे प्रत्येक ठिकाण हे साधनेसाठी योग्यच आहे. यासाठी प्रथम मनाची तयारी करायला हवी. मन दृढ करायला हवे. मनाला साधनेची गोडी लागावी यासाठी मन त्यात गुंतवायला शिकले पाहिजे. मन सोऽहमच्या नादात गुंतले की मग बाहेरचे आवाज आपोआप बंद होतात. मनाची स्थिरता साधली जाते. असा अवस्थेत आपल्या शेजारी कितीही गोंगाट असला तरी मनाचे संतुलन ढळत नाही.

अशा या अवस्थेसाठी अभ्यासाची गरज आहे. ही अवस्था आणताना कोणत्या अडचणी येतात त्या दूर साधण्यासाठी प्रयत्नांची गरज असते. मनाला प्रेमाची सवय यासाठी लावावी लागते. प्रेमाने घरातल्यांची मने जिंकता यायला हवीत. साधनेत व्यत्यय आणणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला प्रेमाने जिंकायला हवे. तरच हे शक्य होणारे आहे. तसा बदल आपण आपल्या व्यक्तीमत्त्वामध्ये करायला हवा.

प्रथम या गोष्टी जमत नाहीत. पण हळूहळू हे शक्य होत जाते. मनातील चिडचिडा स्वभाव नाहीसा झाला तरच साधनेत मन रमते. यासाठी मनाला प्रथम योग्य सवयी लावायला हव्यात. याचा अभ्यास करायला हवा. स्वतःच्या मनाला सवय लावताना स्वतःच्या होणाऱ्या चुका विचारात घ्यायला हव्यात. त्यावर मात करायला हवी. तरच साधनेसाठी आवश्यक बैठक आपणास साधता येईल.

Related posts

ऋतंभरा प्रज्ञा कशास म्हणतात ?

समाधीपादः ईश्वरप्रणिधान म्हणजे काय?

मनोरथातून, संकल्पातूनच साधते प्रगती 

Leave a Comment