March 25, 2023
Israel study tour article by Gangadhar Mute
Home » ईस्राईल अभ्यास दौरा केल्यानंतर…
मुक्त संवाद शेती पर्यावरण ग्रामीण विकास

ईस्राईल अभ्यास दौरा केल्यानंतर…

शेतकऱ्यांची पावलोपावली अडवणूक व मुस्कटदाबी करणाऱ्या ऐदी आणि लाचखोर अधिकाऱ्यांची संख्या शासकीय यंत्रणेच्या कृषी विभागात भरपूर असली तरी मनमिळावू, शेतकऱ्यांच्या सेवेस तत्पर व निस्वार्थी असणाऱ्या अधिकाऱ्यांची संख्या देखील कृषी विभागात कमी नाही.

गंगाधर मुटे आर्वीकर

वयोमानानुसार शरीर कितीही वृद्ध होवो पण मनाला ताजेतवाने ठेवायचे असेल तर मनाला सतत गुंतवून ठेवण्यासाठी नवे नवे मार्ग चोखाळावेच लागतील. साठीच्या आधी जे केले, जसे केले, आपण जसे जगलो त्या व्यतिरिक्त वेगळे काहीतरी नव्याने करावे लागेल. मोकळ्या केसांत स्वतःला गुंतवणे क्षणभंगूर असते पण वैश्विक कार्यात स्वतःला गुंतवणे चिरंजीव-शाश्वत असते हा मानवी जीवनाचा गुरुमंत्र चढत्या वयात शिकायचा राहून गेला असेल तर निदान उतरत्या वयात तरी शिकावा लागेल. दर दिवशी, दर क्षणाला मनाला नव्या नव्या अनुभूती द्याव्या लागतील आणि हे अजिबात अवघड नाही. एकदा काहीतरी करायचे ठरवले तर जगाच्या पाठीवर करण्यासारखे आणि शिकण्यासारखेही खूप आहे. संगीतापासून ते संगणकीय तंत्रज्ञानापर्यंत आणि शेतीपासून ते उद्योग-व्यापारापर्यंत काहीही करणे सहज शक्य आहे. आणखी एक फरक लक्षात घेतला पाहिजे की शिकणे आणि शिकवणे यात जमीन-अस्मानाचे अंतर आहे. शिकवण्यामुळे ज्ञानदान अवश्य होते पण मनाची अवस्था कुंठल्यागत होते. याउलट शिकण्याची उमेद मनाला भरारी मारण्यास प्रवृत्त करते.

मला वाटते कि या बाबतीत मी बराच नशीबवान आहे. शिकण्यासाठी आणि कार्य करण्यासाठी मला जाणीवपूर्वक फारशा उठाठेवी कराव्या लागल्या नाहीत. मी वयाच्या पन्नाशीत जी कामे करत होतो ती सर्व कार्ये आजही कायम आहेत, जशीच्या तशी कायम आहेत आणि सोबतीला पुन्हा नव्याने काही कार्य वाढत आहेत. यात प्रामुख्याने नव्याने निर्मित होत असलेल्या दोन कंपन्यांचा उल्लेख करावा लागेल. पहिली ॲग्रीसन फार्मर्स प्रोड्युसर कं. लि. आणि दुसरी युगात्मा शरद जोशी फार्मर्स प्रोड्युसर कं. लि. त्यात आणखी भर म्हणून सोबतीला युगात्मा शरद जोशी स्मारक व शरद जोशी ग्लोबल ग्रंथालय हे दोन संकल्पही आहेतच. एकंदरीत उर्वरित आयुष्य अपुरे पडेल, वय संपेल पण कामे संपणार नाही इतकी कामाची व्याप्ती माझ्यासमोर श्रीदत्त म्हणून उभी आहे.

तीन वर्षापूर्वी महाराष्ट्रातील प्रगतिशील आणि प्रयोगशील शेतकरी मंडळींसोबत मी ईस्राईलला गेलो होतो. तिथे एक सहज विषय निघाला की शेतीचा अभ्यास करायला म्हणून अनेक लोक ईस्राईलला येतात आणि अभ्यासाऐवजी पर्यटन करून परत जातात. ईस्राईल अभ्यास दौरा पूर्ण केल्यानंतर आपल्या राज्यात जाऊन राज्यातील शेतकऱ्यांसमोर ईस्राईलचा शेतकरी किती कर्तबगार आहे याचे पोवाडे गात बसण्याशिवाय आणि इस्रायलच्या शेतकऱ्यांकडून शेतीतंत्रज्ञान शिकण्याचे सल्ले देण्याशिवाय कुणीही काहीही करत नाहीत. अशा स्थितीत निदान आपण तरी ईस्रायलमध्ये केलेल्या अभ्यासाचा उपयोग करून राज्यात असे काहीतरी करून दाखवले पाहिजे की जे अन्य शेतकऱ्यांसाठी आदर्श मॉडेल ठरू शकेल.

मायदेशात परतल्यानंतर राज्यातील विविध भागातील ईस्रायल रिटर्न शेतकऱ्यांनी एकत्र येऊन ॲग्रीसन फार्मर्स प्रोड्युसर कं. लि. ही कंपनी स्थापन केली. कंपनीची नोंदणी झाली, प्रमाणपत्र हाती पडले आणि पुढील प्रत्यक्ष कार्याला सुरुवात करायची वेळ आणि कोरोना आगमनाची वेळ एकच आल्याने आमचे एक वर्ष व्यर्थ गेले. त्यातही योगायोगाने एक गोष्ट चांगली झाली. याच काळात महाराष्ट्र शासनाने जागतिक बँकेच्या सहकार्याने बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प घोषित करून अंमलबजावणी सुरु केल्याने आम्हाला आयतीच संधी उपलब्ध झाली आणि बीजोत्पादन व विपणनाचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे सादर करता आला. प्रारंभिक प्रस्ताव दोन कोटी रुपयाचा असला तरी भविष्यात या उद्योगाचा विस्तार करायला प्रचंड वाव आहे.

होतकरू आणि प्रयोगशील शेतकऱ्यांनी मिळून ही कंपनी स्थापन केल्यामुळे राज्यातील विविध भागातील प्रतिनिधी संचालक मंडळावर आहेत. विविध भागातील शेतकरी संचालक मंडळावर व सभासद असणे हे कंपनीचे शक्तीस्थळ आहे. शेतकरी उत्पादक ते थेट शेतकरी ग्राहक अशी मूल्यवर्धित शृंखला तयार करण्याची आमची योजना असल्याने पक्का माल वितरित करण्यासाठी व्यावसायिक दृष्टिकोनातून आम्ही आमच्या कंपनीचा राज्यभर विस्तार केलेला आहे. कृषी विभागाचे श्री मोरे व श्री कापसे तसेच पर्यटन विभागाचे श्री सोळांकुरे ईस्राईल दौर्‍यात मार्गदर्शक म्हणून आमच्या समवेत होते. त्यांच्याच मार्गदर्शनामुळे शेतकरी सुद्धा उद्योग उभारू शकतो असा आत्मविश्वास मिळाल्याने सर्वांचे मनोबल वाढून कंपनीची निर्मिती व पायाभरणी झाली.

शेतकऱ्यांची पावलोपावली अडवणूक व मुस्कटदाबी करणाऱ्या ऐदी आणि लाचखोर अधिकाऱ्यांची संख्या शासकीय यंत्रणेच्या कृषी विभागात भरपूर असली तरी मनमिळावू, शेतकऱ्यांच्या सेवेस तत्पर व निस्वार्थी असणाऱ्या अधिकाऱ्यांची संख्या देखील कृषी विभागात कमी नाही. आम्ही भाग्यवान आहोत की पदरचे पैसे खर्चून स्वखर्चाने आमच्यापर्यंत येऊन कंपनीला मार्गदर्शन करणारे अधिकारी आम्हांस मिळाले. श्री मोरे व श्री कापसे मदतीसाठी सदैव उत्सुक असतात, वेळोवेळी ऑनलाईन मिटींगला उपस्थित राहून मार्गदर्शन करित असल्याने येत्या काही काळात ॲग्रीसन फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लवकरच नावारूपास येईल अशी आशा नव्हे, तर आम्हांला खात्री आहे.

Related posts

शतावरी ( ओळख औषधी वनस्पतींची )

Neettu Talks : परफ्युम निवडताना…

दहावी नापास ते प्रथितयश लेखिका…

Leave a Comment