September 17, 2024
Nature The Grate artist article by Bhakti Jadhav
Home » निसर्ग-थोर कलावंत
मुक्त संवाद

निसर्ग-थोर कलावंत

मानवी कलाकृतीला दुसरा निसर्ग म्हणतात, माणूस हा त्या कलाकृतीचीच नक्कल करतो. आशा नकलेला कला नाही तर कारागिरी असे म्हणतात. पहिली असते ती कलाकृती व नंतरची असते ती अनुकृती. निसर्गापासून प्रेरणा घेऊन माणूस अनुकृती निर्माण करतो, आभास निर्माण करतो.

✍🏻 भक्ती मंगल मधुकर जाधव

मोबाईल – 9518715587

फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार ! विठ्ठला तू वेडा कुंभार ! असे कविवर्य माडगूळकर यांनी म्हंटले आहे, प्रत्येकाचे रूप आगळे – प्रत्येकाचे दैव वेगळे, अशी कितीतरी मडकी कुंभार घडवतो. मडके फुटते – मडक्याची माती, मातीचे मडके हे चक्र सुरूच आहे, हा खेळ कधीपासून सुरू आहे सांगता येत नाही. खेळ दिसतो पण त्यामागचा खेळीया दिसत नाही. तोच हा निसर्ग आहे.

फ्रेंच तत्ववेत्ता रुसो यांनी”निसर्गाला अनुसरा”असा संदेश दिला आहे. महानुभाव संतकवी नरेंद्र आयचीत पासून कालिदास, तुकाराम, बालकवीपर्यंत कवींनी निसर्गाची अनेक रूपे सादर केली आहेत ”

पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर ! ओढा नेई सोने वाटे वाहूनिया दूर ! असे कविवर्य भा. रा. तांबे यांनी म्हंटले आहे. या निसर्ग कलावंताचे रूप अत्यंत मोहक-आकर्षक आहे. त्याचे वर्णन करताना शब्द अपुरे पडतात. सूर्य एकच आहे पण सकाळचा सूर्य, दुपारचा सूर्य, मावळतीचा सूर्य, उन्हाळा – पावसाळा -, हिवाळा ,इतकेच काय पण ढगा पलीकडील, ग्रहनकाळातील सूर्य अशी नाना रूपे आपणास दिसतात.

निसर्गाची ही दुनिया रंग – गंधाची आहे. अनेकरंगी पाने – फळे – फुले – पाण्याच्या लाटा, डोंगर उतारावरून खळखळत येणारे झरे, उंच कड्यावरून कोसळणारे धबधबे अशी कितीतरी रूपे आहेत. महाकवी कालीदास यांनी ऋतुसंहारमध्ये निसर्गाची रूपे साकारली आहेत. खंडाळ्याच्या डोंगर आणि मुंबईचा समुद्र हे माझे मित्र आहेत, असे आपल्या आत्मचरित्रमध्ये आचार्य अत्रे यांनी म्हटले आहे. मानवी कलाकृतीला दुसरा निसर्ग म्हणतात, माणूस हा त्या कलाकृतीचीच नक्कल करतो. आशा नकलेला कला नाही तर कारागिरी असे म्हणतात. पहिली असते ती कलाकृती व नंतरची असते ती अनुकृती. निसर्गापासून प्रेरणा घेऊन माणूस अनुकृती निर्माण करतो, आभास निर्माण करतो.

निसर्गाची काय जादू आहे पहा, किती प्राणी, किती पक्षी – पाण्यातील – पाण्याबाहेरील, जमीनीवर बसणारे, हवेत झेप घेणारे, त्याची गणतीच नाही. एक माणूस दुसऱ्या सारखा नाही. अगदी जुळी भावंडे सुद्धा थोडीफार वेगळी दिसतात. झाडे-वेली-पशु-पक्षी-फुलपाखरे यांचे नुसते रंग पाहिले तरी आपण चकित होतो. वाघाची कातडी-सिंहाची कातडी-जिराफाची, उंटाची, गेंड्याची कातडी अशी कितीतरी रूपे आहेत. गरुडाचे पंख-रानकिड्याचे पंख-मोराचे पंख ही नानारूपे शब्दातून सांगता येत नाहीत. निसर्गरूपी कलावंत आपणास सतत देत असतो. ते दान घेता घेता आपले हात कमी पडतात.

“अनंत हस्ते कमलावराने ! देता किती घेशील दो कराने !- याची अनुभूती येते. आशा या निसर्गाचे मूळ रूप आहे असे अबाधित ठेवणे, यातच मानव जातीचे कल्याण आहे. पशुपक्षांचा संहार करून, झाडी नष्ट करून आपण सुखाने जगू शकणार नाही. निसर्गाची शक्ती – त्याचे सामर्थ्य आणि त्याची गरज ध्यानात घेऊनच माणसाला वाटचाल करावी लागणार आहे. शेवटी माणूस हा त्या निसर्गाचाच एक घटक आहे. हे आपण समजून घेतले पाहिजे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

आदि गुरु शंकराचार्य यांचे तत्वज्ञान सर्वसामान्यांपर्यत पोहोचविण्यासाठी अनुराधा पौडवाल यांची विशेष मोहीम

इथेनॉलवरील वस्तू, सेवा करात कपात

महिलांच्या आहारात प्रोबायोटेक्स का असावे ?

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading