रंजनाबरोबरच शिस्त, कष्ट, चतुराई, जिज्ञासा, कलाप्रेम, देशप्रेम, आनंददायी शिक्षण, आधुनिकता, मानवता, पर्यावरण संवर्धन, शांततामय सहजीवन, संशोधक वृत्ती, मुक्या जीवांचा लळा इत्यादी सद्गुणांचा मूल्यसंस्कार बिंबविणारी ही बालकविता बालवाचकांना हवीहवीशी वाटेल.
डॉ. सुरेश सावंत, नांदेड.
sureshsawant2011@yahoo.com
कोल्हापूर जिल्ह्यातील गोविंद पाटील हे एक उपक्रमशील शिक्षक आणि सर्जनशील लेखक कवी आहेत. त्यांनी स्वतःच्या सर्जनशील निर्मितीबरोबरच बालकुमारांसाठी लेखन कार्यशाळा घेऊन विद्यार्थ्यांची पुस्तके प्रकाशित केली आहेत. त्यांचा ‘थुई थुई आभाळ’ हा बालकवितासंग्रह सांगलीच्या सृजन प्रकाशनाने परवाच्या शाहू जयंतीला प्रकाशित केला आहे.
सामान्यतः मोर थुई थुई नाचतो, हे आपण ऐकतो, वाचतो आणि पाहतोही. गोविंद पाटील यांच्या कवितेची वेगळीक अशी, की ह्या कवितेत आभाळच थुई थुई नाचते आहे. ६४ पृष्ठांच्या ह्या संग्रहात ५६ बालकविता आहेत. ग्रामीण बाज असलेली ही बालकविता गावशिवाराचा आणि शेतीमातीचा सुगंध घेऊन आली आहे.
‘चांदोमामा’ ह्या कवितेत मामा आणि भाच्याचा छान संवाद रंगला आहे. ‘कामकरी मुंग्या’ ह्या कवितेत कष्टकरी मुंग्यांचा कामसूपणा अधोरेखित झाला आहे. खारूताईची आणि तिच्या पिलांची पळापळ आपले लक्ष वेधून घेते.
‘एक सरडा दूध घेऊन
टोलापूरला आला
टॅंकरला धडकला नि
टॅंकर उलटा झाला’
ह्या ओळींतली अद्भूतरम्यता बालवाचकांना बेहद्द आवडते.
टोलापूरचा इटुकला टोळ माल विकून गब्बरसिंग बनतो.
दिवसरात्र पाण्यात राहून मासोळीला सर्दी कशी होत नसेल? असा प्रश्न ह्या कवितेतील बालकाला पडला आहे. टोलापूर ही ह्या कवितांची जन्मभूमी आहे ( अर्थातच काल्पनिक).
टोलापूरचे पशुपक्षीही भारी आहेत. इथला मोर मोबाईलवर बोलत बसला आहे.
ढगांची चित्रकारीही अफलातून आहे! गोविंद पाटील यांची कविता संपूर्ण ऋतुचक्राला कवेत घेते. कवीने धुळू आजोबा आणि जिऊ आजोबा ही दोन व्यक्तिचित्रे रेखाटली आहेत. दोन्ही आजोबा कष्टाची शिकवण देऊन जातात.
मोठे सगळे खोटे, असे छोट्यांना वाटत असते. म्हणून छोट्यांनी केलेली मोठ्यांची काव्यमय तक्रार मोठ्यांना विचार करायला भाग पाडते.
वर्गातल्या बाई जर आई झाल्या, तर विद्यार्थ्यांना शाळा ही ‘दुसरं घर’ वाटायला लागते.
समस्त शिक्षकवर्गाने याचा अवश्य विचार करावा.
‘दिवाळी आली’ ही कविता मानवतेचे दीप लावण्याचा आणि पर्यावरण वाचविण्याचा संदेश देते.
हातपाय काड्या आणि लुकडी मान असणारा एक मुलगा कुस्तीत गामा पैलवानाला चीतपट करतो, हे पाहून बच्चेकंपनी खूश होते.
एका कवितेत ढग, वारा आणि सूर्य प्रदूषणाविषयी तक्रार करतात. कवीने ह्या कवितेच्या माध्यमातून एका गंभीर समस्येकडे वाचकांचे लक्ष वेधले आहे.
टोलापूरचा एक बगळा वाहतूक पोलीस बनून धमाल उडवून देतो.
टोलापूरची शाळा मात्र वृक्षवेलींनी सजली आहे. अशी निसर्गरम्य शाळा बाळगोपाळांना आकृष्ट करणारच!
‘झाडे लावूया’ ह्या कवितेतून कवीने झाडांची उपयुक्तता बालकांच्या मनांवर बिंबविली आहे.
‘बापलेक’ ह्या कवितेतील बालक वडलांचा कष्टांचा वारसा पुढे चालवते आहे.
कॅप्टन लिओ आजोबांची गोष्ट हे एक कथाकाव्य आहे. बुडणाऱ्या जहाजातील प्रवाशांना वाचविणारे कॅप्टन लिओ आजोबा हे बालकुमारांचे हीरो ठरतात.
ह्या कविता वाचून बालवाचक नक्कीच म्हणतील, ‘लै भारी!’
‘खेळू लेझीम झुळुम चुळुम
धरली घाई हळुम हळुम’
किंवा
‘झिंगालाला झिंगालाला झिंग झिंग झिंग’
अशी बच्चेकंपनीला आवडणारी अंगभूत लय ह्या कवितेला लाभली आहे.
पूर्वी ग्रामीण भागात दरवर्षी अस्वलवाला, नंदीवाला, माकडवाला, गारुडी, कोल्हाटी, कोकेवाला, कडकलक्ष्मी, वासुदेव इ. लोककलावंत येत असत. पण आता हे लोक खूपच कमी झाले आहेत. कवीने ह्या लोककलावंतांची छान ओळख करून दिली आहे.
वांग्याच्या झाडाला लागली ढब्बू मिरची,
चहाच्या कपात पडली खुर्ची,
रस्त्यावरून झाडे पळत आहेत,
जमिनीवरून मासे पळत आहेत,
यासारखी कल्पनेच्या जगातली अद्भूतरम्यता बालवाचकांचे डोळे विस्फारण्यासाठी पुरेशी आहे.
‘वर्गात आले प्राणी तर…’ ह्या कवितेतली कल्पनारम्यता बाळगोपाळांच्या विचारांना चालना देऊन जाते.
मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाची भलतीच भीती वाटते. ‘इंग्लिश विंग्लिश’ ह्या कवितेत कवीने इंग्रजी किती सोप्पी आहे, हे उदाहरणांसह पटवून दिले आहे.
‘सुरमयी शाम’ ह्या कवितेत संगीताची मैफल छान जमली आहे!
वासराचा जन्म ही शहरातील मुलांना ज्ञात नसलेली गोष्ट कवीने कवितेत बांधली आहे.
‘आमच्या शेतात’ ह्या कवितेत कवीने शहरी बालवाचकांना शेतीची उत्पादकता दाखवून गावगाडा व शेताशिवारातून फिरवून आणले आहे.
‘गाणी गाऊ’ ह्या कवितेत कोरोनाच्या साथीचे आणि ऑनलाईन शाळेचे प्रतिबिंब उमटले आहे.
प्रत्येक शिक्षकाला आणि विद्यार्थ्यांनाही आपल्या शाळेविषयी अभिमान असतोच! ह्या कवितेत मायाळू आईसारख्या छान छान बाई आहेत. बापासारखे शिस्तप्रिय शिक्षक आहेत. कवीने अशा प्रेमळ शिक्षकांचे वर्णन
‘गुलाबाचे काटे आणि जाईचा दरवळ’ अशा समर्पक शब्दांत केले आहे. दंमत, हुमान, खेळ बाळाचा ह्यासारख्या बडबडगीतांनी ह्या संग्रहाची रंगत वाढविली आहे.
बाळगोपाळांच्या बोबड्या बोलांतील काही कविताही ह्या संग्रहात आहेत. बालकवितेचे हे बाळरूप म्हणूनच लोभसवाणे झाले आहे.
आपल्या कवितेतून बालवाचकांचे मनोरंजन करत असतानाच कवी
‘देश असतो सर्वांसाठी
सुखाने राहण्याची सुरक्षित जागा’
हे सांगायला विसरत नाही.
पूर्वी बालसाहित्यात गावगाड्याचे, शेताशिवाराचे आणि जित्राबाचे वर्णन अभावानेच आढळत असे. कारण बहुसंख्य लेखक कवी शहरी होते. आता गोविंद पाटील यांच्यासारखे ग्रामीण भागातील लेखक कवी लिहू लागले आहेत. त्यामुळे त्यांच्या बालसाहित्यात ग्रामीण लोकजीवन आणि लोकसंस्कृतीचे ठळक प्रतिबिंब उमटू लागले आहे. ह्या कवितेत ग्रामीण बालकांचे भावविश्व जोरकसपणे प्रकटले आहे. खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांना ही कविता म्हणजे आपल्या परिसराचा आरसाच वाटेल. कवीने शहरी बालवाचकांचे बोट धरून अतिशय आत्मीयतेने त्यांना शेताशिवारातून फिरवून आणले आहे. गोविंद पाटील यांची बालकविता शेताशिवाराचा सगळा रानगंध घेऊन आली आहे. पाटील यांच्या बालकवितेचे हे वेगळेपण नजरेत भरण्यासारखे आहे.
चित्रकार पुंडलिक वझे यांच्या मुखपृष्ठाने आणि आतील चित्रांनी ह्या कवितेच्या सौंदर्यात अनेक पटींनी भर घातली आहे. सांगलीचे सृजन प्रकाशन म्हणजे बालसाहित्याचे डोळस विचारपीठ आहे. त्यांनी हे पुस्तक आकर्षक स्वरूपात प्रकाशित करून बालसाहित्याचा मार्ग प्रशस्त केला आहे.
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस यांनी ह्या पुस्तकाची पाठराखण करताना ‘ह्या बालकविता लहान मुलांचे भावविश्व समृद्ध करणा-या आहेत’ असे म्हटले आहे, हे शब्दशः खरे आहे!
संग्रहाच्या सुरुवातीला दिलेले संतोष पद्माकर पवार, एकनाथ पाटील, श्रीवर्धन पाटोळे, भाऊसाहेब चासकर, रमिजा जमादार यांचे अभिप्राय खूपच बोलके आहेत. रंजनाबरोबरच शिस्त, कष्ट, चतुराई, जिज्ञासा, कलाप्रेम, देशप्रेम, आनंददायी शिक्षण, आधुनिकता, मानवता, पर्यावरण संवर्धन, शांततामय सहजीवन, संशोधक वृत्ती, मुक्या जीवांचा लळा इत्यादी सद्गुणांचा मूल्यसंस्कार बिंबविणारी ही बालकविता बालवाचकांना हवीहवीशी वाटेल.
ह्या बालकविता वाचल्यावर बालकुमारांचा मनमोर थुई थुई नाचला नाही तरच नवल!
पुस्तकाचे नाव – थुई थुई आभाळ ( बालकवितासंग्रह)
कवी : गोविंद पाटील, कोल्हापूर.
प्रकाशक : सृजन प्रकाशन, सांगली.
पृष्ठे ६४ ( आर्ट पेपरवर संपूर्ण रंगीत)
मुखपृष्ठ व सजावट : पुंडलिक वझे, मुंबई
किंमत रु. १६०