October 9, 2024
Book Review of Rame Tethe Man
Home » Privacy Policy » पशुपक्षी, वनसंपदा अन् माणुसकीला कवटाळणारी भटकंती…
काय चाललयं अवतीभवती

पशुपक्षी, वनसंपदा अन् माणुसकीला कवटाळणारी भटकंती…

कथा, व्यक्तिचित्र अशा चोवीस ललितबंधांच्या माध्यमातनं ही शब्दांमध्ये गुंफलेली भटकंती मन रमवायला भाग पाडते ती वाचकालाही या भटकंतीचं वेड लावतच..यातनच ही भटकंती हवी हवीशी वाटते.

रविंद्र गुरव

माणुसकीला कवटाळणारी भटकंती
माणुसकीला कवटाळणारी भटकंती

रमे तेथे मन हे पक्षीनिरीक्षक आणि अरण्यवाचक कथा कथनकार व्ही. डी. पाटील यांच्या लेखणी आणि रेखाटनातनं साकारलेलं त्यांचं पहिलं वहिलं दमदार पुस्तक रावा प्रकाशन, कोल्हापूर यांनी प्रकाशित केलं आहे. सर्जेराव सूर्यवंशी यांनी व्ही. डी. सरांच्याच रेखाटनांच्या माध्यमातनं देखण्या मुखपृष्ठाची मांडणी केली आहे. पर्यावरण अभ्यासक सुहास वायंगणकर यांना हे पुस्तक अर्पण केलं आहे. साहित्यिक बाळ पोतदार यांची वाङ्मयीन मूल्य अधोरेखित करणारी प्रस्तावना या संग्रहास लाभली आहे. आतून साद घालणारं लेखक मनोगत आपल्याला या पुस्तकाच्या माध्यमातून भटकंतीला घेऊन जातं.. कथा, व्यक्तिचित्र अशा चोवीस ललितबंधांच्या माध्यमातनं ही शब्दांमध्ये गुंफलेली भटकंती मन रमवायला भाग पाडते ती वाचकालाही या भटकंतीचं वेड लावतच..यातनच ही भटकंती हवी हवीशी वाटते. विशेष म्हणजे यातील तालुक्याबगलेची आडमुठी अशी एखादी भटकंती वगळता सर्रास भटकंती भुदरगड तालुक्याच्या अवतीभवतीनं उगीच जरासं हिकडंतिकडं व्हगलत स्वच्छंदीपणे केली आहे.

इतका हा संपन्न तालुका आहे हे जगवारी करायला अधीर झालेल्या मनानं आधी हावऱ्यागत भटकून बघावंच आणि मग परदेशी भरारावं असं आहे. याची प्रचिती हे पुस्तक वाचताना आल्यावाचून राहात नाही. हे पुस्तक भुदरगडची कडकोन्यान सफर करण्यासाठी हौशी पर्यटकांसाठी दीपस्तंभच असेल. मी या निखळ भटकंतीचा साक्षीदार बुरूजच आहे…कधी सोबत हिंडणारा तर कधी एका जागी तटस्थ उभा राहून न्ह्याळणारा टेहळणी करणारा. इतकं करूनही ही भटकंती मी तिनदा नजरेखालनं घातली. पहिल्यांदा पुस्तक येण्या आधी काय बघायचं राहून गेलय का बघूया म्हणून मग पुस्तक जी. के. सराकंडनं हाती मिळाल्यावर हावऱ्यागत…जरा रोगानं घाणा केला म्हणून नोंदी करायचं तवा राहिलं…आणि आता तिसऱ्या डाव नोंदी करत सविस्तर लिहावं म्हणून…अशीही तीनदा मनानं नजर घोड्यावरनं केलेली हवीहवीशी भटकंती…

आकुर्ड्याचा कोकणी बेंदूर- मातीची खण, चिकण माती बैलं सगळ्याहून मोठी करण्याचं कौशल्य, पायात तुरकाट्या घालणं इतकं करूनही पूजेचा मान कुंभाराच्या बैलांचाच. इतकच नाही तर चिखलाचे तीन सण एकाच वारी येतात हे तर्क पंचांग. देशी बेंदूर, कोकणी बेंदूर शेजारच्या दोन गावांमध्ये दोन वेगवेगळे बेंदूर कसे साजरे केले जातात ते मुदाळ, उंदरवाडी, बिद्री, बोरवडे या गावांच्या माध्यमातनं सांगितलं आहे. कर तोडण्याची धांदल, पेसाटी उभी करणं कर न तोडणारा बैल आणि राजकारणी यांची तुलना अतिशय मार्मिक पद्धतीनं केली आहे.

सुगी मध्ये भाताची सुगी आणि ग्रामपंचायत निवडणुकीच्या सुगीचा वर्णन यथार्थपणे केलं आहे. यात दुरपामावशीचं टोमणं हे विचार करायला लावतात. म्हादू माळीतल्याचा बैल बिरा धनगर लगमाच्या बानं आलदरीन दिलेली खिलार कालवड. तिला झालेलं पाडं त्याची जपणूक आणि तो गेल्यावर त्याच्या कातड्यापासून पोटाची मोट, शेपटीचा चाबूक, गळ्याच्या कातड्याचा घंटेचा कंठा कर म्हणणारा मुलखायेगळा मालक आणि पुरलेल्या जागेवर फणस उभा करणारा बैल आणि मालकाचा जीव्हाला दावणारा हा म्हादू माळीतल्याचा बैल मनात घर करतो ते ‘मणभर भात ज्यादा घ्या खरं चमडं माझ्या मालकीचं’ सांगून चपली पायताणच काय अंगठा जोडायसुद्धा सळ काढू नको हे बजावीत.

बँकेतील नोकरीसाठी बैलं न विकणारा तरुण आणि शेवटी पोस्टमन ने दिलेली शाळा मास्तरच्या नोकरीची ऑर्डर मन चाफ्याला धुमारा यावा अशीच. न्हाणीचं पाणी जिथं जाईल तिथं जाईल तिथं नाळ पुरून त्याच जागेवर चाफ्याची फांदी लावली जाई. ही झाडं जीव जगवणारी संस्कृती अधोरेखित करीत. नवले गावच्या दही शेतातलं बाळू रब्ब्याचे घर तिथं खळ्यावर रंगलेली कवीवर्य गोविंद पाटील, सुरेश मोहिते यांची काव्य मैफिल. झाडांचा गच्चपणा दावणारं केळी, फणस, शेवगा वेखंड. तिथलं फासलं पाणी त्यांची बैलं. त्यांनी मिळवलेली शिल्डं, टीव्ही ही बक्षीस कमाई. मोगऱ्याच्या कळ्यासारखा वाफाळणारा जिरेसाळ भात, वांगे आणि वरण्याची उसळ तिथला पाहुणचार सारंच जिभेवर मना इतकच रेंगाळणारं.

आंबे, काजू, वरण्याच्या शेंगा आणि मायाळू माणसांसह शाळेच्या माध्यमातून नावारूपाला आलेली मुलखावेगळी वर्पेवाडी तिथली थाबडं भरून वरण्याच्या शेंगा देणारी अनुमावशी व्हरांड्यातली पुस्तके गायब न होणारी वेगळं ग्रंथालय जपणारी तिथली प्राथमिक शाळा, तिथले शिक्षक, गावकरी श्रमदानाच्या माध्यमातून सायफणनं पाणी आणून पीक घेणारं गाव, शाळेला मदत करणारे चाकरमानी, सावित्रीबाई फुले, शाहू महाराजांचे पुतळे उभारून विचारांचा वारसा जपणारी ही अनोखी वर्पेवाडी तिथले यादव सर मनात घर करतात. नावेत भेटलेल्या बापटबाई तर त्यांच्या कार्यातून घराघरात पोहोचलेल्या महिलांच्या ओठावर येणाऱ्या त्यांच्या कार्य ओवीच्या माध्यमातनं. बाळंतिणीच्या नातेवाईकांच्या चेहर्‍यावरचा समाधानाचा भाव बघून तहानभूक हरवून जाणाऱ्या. या बाई उभ्या पावसात भरल्या वेदगंगेतनं नावेतनं जाऊन बाळंतपण करणाऱ्या. रात्रभर जागणाऱ्या, समाज ऋण फेडत या गरोदर माता भगिनींसाठी माणुसकीचे इमले बांधून जातात. शांताबाई दाई नाहीत तर आईच ठरतात.. गोरगरिबांना मदर टेरेसा वाटतात.

जंगल तोंडपाठ असलेला चंदगडच्या कोलिक या आडवळणी गावचा रोंग्या धनगर हाळीसरशी बिबट्याला परतवणारा. नाग, विंचू, इंगळी भेटले नाही तर चुकल्या गत वाटणारा. विकासासाठी पाच रुपये दान करणारा त्याच्या गळ्यात आपल्या गळ्यातील हार घालणारा लेखकाचा हात खूप काही सांगून जातो. असा हा रोंग्या धनगर आंबे काढताना पडून दुर्दैवी गेला असं वनपाल आनंद गुरव यांच्याकडनं कळल्यावर हळहळ वाटते.

एरंडप्याच्या धनगरवाड्यातला काटक म्हातारबा, कारभारी म्हणजे बमू फोंडे. तिथली केंबळ्याची झोपडी, कारवीचा कूड, तिथंच गाठ पडलेले वस्तीशाळा शिक्षक कुंडलिक मोरेआठवणीत बसलेलं. जुना पिंपळ वादळात पडला म्हणून उदास होणारे, त्या जागी पिंपळवृक्ष लावून तो मायेनं वाढवणारे स्मृती बनातले वेदशास्त्रसंपन्न विष्णुतात्या पुराणपुरुष वाटतात. तुकोबा एक झोपती पर्व संपलं मधील तुकाराम नारायण कुंभार म्हणजेच तुकोबा तोच गावभर ओळख असलेला देवबाबा. नऊवारी साडीतला यल्लमा देवीचा भक्त. त्याचं हे जग सोडून जाणं चौंढक्याच्या सुरात घुमणारी गीतं, दोन जोगत्यांनी तिरडीला दिलेला खांदा, रडणारं आकुर्डे गाव, गावातील एक पांघरूण हरवलं त्याच्या जाण्यानं. चौंडकं, तुणतुणं फुटलं खरं प्रथा तशीच मन सुन्न करणारी.

येरे$$ येरे$$ पावसा अशी साद घालणारी एरमट्याच्या शेताकडची भटकंती. तिथं गाठ पडलेला आभाळाचं स्वप्न बघीत पावसाचा अंदाज सांगणारा नामुदाचा बैल. दोन तीनदा आभाळाकडं बघून हुंगलं की पाऊस पडलाच म्हणून समजा. मूळच्या मेघोलीचा बैल मेघाच्या अंदाजाचे शिक्षण असा तर्क काढत पुढं दोनवडे- एरमट्याच्या शिवारातली फेरी. नलवडे साहेबांच्या घरांम्होरल्या शेतातला बिनगाटकाळ फणस. वाटेत आसरा घेतलेल्या घरात गाठ पडलेली गोजामामी. ‘पावसाला बोंबाडा हाय पाऊस हटल असं वाटत नाही’ म्हणणारी नवा तर्क मांडणारी म्हातारी.

रोहिणी कातवाडाचा मंडप गाजे। शूर मर्दाचा कोयता वाजे।।

बरका, कापा, कुरणा कापा अशा फणसाच्या जाती, २७नक्षत्रं आणि निसर्ग वाचून पाऊस कळा सांगणारी ओव्यातून सारं जगणं मांडणारी.

लागल्या मघा तर चुलीपुढं हागा। नाही लागल्या मघा तर टकमक बघा।।

उत्तरा नक्षत्र उतरलं तिथं उतरलं असं. तर हस्त हत्ती पडतोय भित्ती.. म्हणजे हादगा. हे न चूकणारं अनुभवी पंचांग मनी साठवत जरा पहिल्या पावसात भिजलं की पावसाळभर पाऊस बाधत नाही हे अनुभवातनं सांगत बाहेर पडणारे स्वतः लेखक आणि कवीवर्य गोविंद पाटील.

स्थलांतर कात्रुट धनगरवाड्याचे तिथलं राक्सादेवीचं टेकाड राधानगरी भुदरगडची सीमारेषा. मावळतीच्या सह्याद्री रांगेचं वर्णन हुबेहूब दिसतं ते इथच. पहिली रांग काळम्मावाडीचा सडा ते म्हसव्याचा पावडाबाई पठार. दुसरी डोंगर रांग फये हंड्याचा धनगर वाडा ते पाचवडे पंडिवरे देसाईवाडीच्या मध्यावरचा भोंगिरा …हं सडा ते थेट मुदाळात भीमाचा अंगठा दावून संपणारी. वाकीघोल तिथला वाकोबा तिथली वनसंपदा पलिकडचा तळकोकण कुडाळ, कणकवली. राक्सादेवी जवळ गाठ पडलेला भागू धनगर पाथरूड धनगर. विकासासाठी गावाकडं तोही सरकणारा. तिथला काळ्या करंद दगडाचा देखणा पार. डोळ्यादेखत निर्मनुष्य झालेला धनगरवाडा.. मे महिन्यातही तिथं सायफन पद्धतीनं फिरणारं पाणी. “सर, तुमची पोटं भरल्या तुमची भूक भागली म्हणून तुम्हाला निवांतपणा आणि डोंगर हे सुचतंय आमची भूक वेगळी हाय. पोरं शिकावीत गावाजवळ रहावीत असं वाटणारच की!” भागूदाचं उत्तर चपापाय लावणारं.

धाकू एकू म्हाकू आणि स्वतः भागू अशी ही चार भावंडं. त्याच्या घरातलं कोकम सरबत. रातांब्याची झाडं. कोकणी गरूड अर्थात मलबारी धनेश हं.. कोकणी मोर.. त्याचा आवाज साडेतीन किलोमीटर पर्यंत जातो ही मिळालेली नवलाई अचाटच. वाकोबाची राई, सावर्ड्याची राई जुनाट दुर्मिळ औषधी वनस्पती बघावी ती इथंच. एकूलाच्या हल्ल्यात जखमी धुळाप्पा पिंढरीला किंजळीची पानं किस काढून लावतो आठ दिवसात जखम वाळली. गैरसोय असलेल्या धनगरवाड्यावर राहण्यापेक्षा भागूही शामराव पार्ट्याच्या शेताजवळ घर बांधण्याचा निर्णय घेतो आणि एक खाता-पिता धनगरवाडा निर्मनुष्य होतो हे चित्र मन उदास करतं. फेरफटका बाटम वरांड्यावर कोकणी कडगाव. जानू फटकारे धनगर थकल्यागत दिसणारा तो अलीकडच. दोन गड्यांचं काम एकटा करणारा. वासनोली धनगरवाडा नावाजलेले शिकारी बंडा देसाई यांचे चिरंजीव मिलिंद देसाई यांच्यासोबत शिकार. तिथला हा जानू फटकारे म्हणजे धनगरवाड्याची सावलीच.

बापू धनगर, सिद्धा धनगर, भुतोबाची राई, नाराच जातीच्या गरुडाचं निरीक्षण त्याचंसरड्याचं तुकडं करून पिलांना भरवणं.. तुम्हाला सुगीत येणारे धनगर आज इथं तर उद्या तिथं असा *तळ* ठोकून निघू जाताना मन उदास करणारे. दक्षिण दिग्विजयापूर्वी मौनी महाराजांच्या आशीर्वादासाठी आलेल्या छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शानं पावण झालेल्या आकुर्डे गावच्या आठवणीतला गोठण, माळ, ज्योतिबाचं देऊळ त्याचं उतरतं छप्पर पाणोठा, चार विहिरी सगळं हरवल्याची खंत *गावपण हरवलेलं गाव* सांगतं. देवकेवाडीची विठाबाई मारकळीण पंढरीच्या विठोबाची महती सांगत पुढे जाते ती *पाऊले चालती* मधनं.

पूर्व डोंगररांगेचं राकट, कणखर स्वप्न, जमिनीच्या पोटातनं वर आलेला सह्यकडा म्हणजे *इतिहासाचा साक्षीदार भुदरगड. हा भुदरगड गड किल्ल्यांचा जनक दुसरा भोज राजा यांनी अकराव्या शतकात बांधलेला किल्ला. तटात स्वच्छतागृह असलेला आवाजाचा प्रतिध्वनी देणारा, गडिंग्लज, सामानगड, पन्हाळा, रांगणा, मालवणचा सिंधुदुर्ग इथूनच दावणारा. तिथली पेठशिवापूरची आश्रम शाळा…जी.के.सरांच्या माध्यमातनं तिथं लेखक फेऱ्या वाढलेल्या. तीनशे स्वातंत्र्यसैनिक घेऊन स्वातंत्र्यासाठी फाशी गेलेला तालुक्यातील पहिला क्रांतिकारक सुभाना दुलबाजी कदम. इंग्रजांनी त्यांचं बंड मोडलं. किल्ला ताब्यात घेऊन १३ ऑक्टोबर १८४४ रोजी त्यांना फाशी दिल्याचा स्फूर्तीदायक इतिहास हा गड सांगत राहातो. एका जखमी खंड्याला जीवदान दिलं तर दुसरा अचूक नेम लावा बघू म्हणून कु. स. पाटील गुरुजींच्या आग्रहाखातर लगोरीनं नेम लावला आणि त्यात जखमी झालेला खंड्या त्यालाही जीवदान दिलं. त्याचं स्मरणीय रेखाटन. संजय खोचारे यांच्या सोबतची खाटकाच्या माळावरची मुरूक्टेतली भटकंती रुबाबदार खंड्या घडवतो.

तमाशाची पात्री हं ..तोच तो तमाशाचा खडक त्यातलं पंकोळीचं घरटं पर्यावरणपूरक असंच. हे घर देखणं आणि टुमदार खूप काही शिकवणारं पंकोळीचे घरटे तच गाठ पडतं. भुतोबाच्या पठारावरचा तहानेनं व्याकूळ झालेला अंध गवा. त्याला पाणी पाजल्यावर सोडलेले प्राण असा हा मनाला चटका लावणारा गव्याचा मृत्यू.

बहिरी ससाण्याच्या आवाजाची नक्कल करून बुलबुलच्या तोंडातला लोदी किडा आयता मिळणारा, हरहुन्नरी अशा नकला करणारा करामती कोतवाल. आगीतनं कोतवालाच्या पोटात जाणारे किटक तेही असेच आयते गिळणारा. मेघोली धनगरवाडा, काकवादेवी परिसरात रान कोंबड्यांचे आवाज, पळस फुले अशा रमणीय स्थळी भटकंतीतनं ओठी शिळ गाणं आणणाऱ्या जी.के. सरांनी जळकांडात दावलेला पांढरा पक्षी अर्थात स्वर्गीय नर्तकाचे दर्शन. त्याचे नृत्य भटकंती सार्थकी लावणारच. खोपा झाडाला टांगला जखमी कोकिळवर उपचार, उंचीवर घरटं, झाडाच्या पूर्वेकडचं ठिकाण निवडणं, फुगीर भाग मावळतीच्या दिशेला हे सारं वास्तूशास्त्र सुगरणींच्या कलाकुसरीत दिसतं.वेरूळ कैलास मंदिराच्या धर्तीवर आधी कळस आणि मग पाया रचणारे हा घरटे महोत्सव …शेंड्याकडून उंबऱ्याकडं रचत येणारा अद्भूत, नयनरम्य असाच. तर अशी ही आपणबी आताच बाहेर पडावं, मनमुराद हिंडावं अशी वाटणारी शिळगाण्याचे जनक कवीवर्य गोविंद पाटील, एन.डी. पाटील अर्थात राजन कोनवडेकर, आनंदराव नलवडेसाहेब, बाबुल सर, डी. एन. पवार आदीं समवेतची ही भटकंती शबनम, कॅमेरा, दुर्बीण, स्केच बुक, पेन-पेन्सिल, कोयता, गलोरी, मीठ, हळद, कांदा, चाकू, पाणी, चटणी-भाकरी, तर कधी वांगं घातलेली वरण्याची उसळ आणि भाकरी अशी शिदोरी संगं घेऊन केलेली.

लेखकासह निसर्गवेड्या मुलखायेगळ्या माणसांनी निसर्ग आणि पशु-पक्ष्यांच्या सानिध्यात केलेली माणुसकीला कवटाळणारी ही भटकंती. मोका, धुमी, येडबाडली, चपापली किनट, ठरवून, तुकडा पाणी, शीण, वाकोरं, खोरं, लोटकं, इंजान, इळभर, पोत्याचं बटार, मातीबुडी, मांडव, तरवा, आळी ओपा, माळा, धुनी, नागोसा, पासलं पाणी, पेरं वरणं, लगी घोंगडं, लांबधारं, दशा, लगटच, म्हू, बांदोळं, परडं, मेसकाट्या, उजदार, करडं, कोंडाक, फळं, वड्या, दैवार, भाताची शीर पडणं, चेंबलं, येरगटला, कुडाण पिंजार, व्हळ्या अशा ठेवणीतल्या भुदरगडी बोलीतील शब्दांची गाठ घेत प्रत्येकानं करावी आणि मन रमवत…रमत गमत वाचावी अशीच आहे.

पुस्तकाचे नाव – रमे तेथे मन

लेखक- व्ही. डी. पाटील

प्रकाशक – रावा प्रकाशन, कोल्हापूर.

पृष्ठे – २११, मूल्य – ३४० ₹.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading