November 21, 2024
Home » कोकणच्या संस्कृती, पर्यटनाला वाव देणारे “कोकण” हे गीत लवकरच भेटीला !
काय चाललयं अवतीभवती

कोकणच्या संस्कृती, पर्यटनाला वाव देणारे “कोकण” हे गीत लवकरच भेटीला !

मालवण तारकर्ली येथे म्युझिकल ट्रिपच्या निमित्ताने आम्ही कोकणात आलो होतो. तेव्हा मला कोकण, कोकण हे गीत नकळत सुचले. आम्ही चार गाण्यांचे काम पूर्ण केले होते अन् हे पाचवे गाणे सुचले. हे गाण पटकण कागदावर उतरलं गेले नाही. कारण मी कोकण जगत होतो. यामुळे कोकणाचे अंग कस दाखवता येईल. पर्यटनाच्या अनुशंगाने याचा विचार केला. तसं ते मांडले गेले.

– प्रणय शेट्ये

सिंधुदूर्ग जिल्ह्यातील शिडवणे गावचा सुपूत्र युवा गीतकार, संगीतकार प्रणय शेट्ये ह्याने द्रौपदी क्रिएशन्सच्या माध्यमातून देशभरातील विविध ठिकाणच्या कलाकारांना एकत्र करुन कोकण या गीताची निर्मिती केली आहे. कोकणचे पर्यटन, परंपरा आणि लोकसंस्कृती या गीतातून उभी राहणार असून हे गीत रसिकांना आवडेल याची खात्री प्रणय शेट्ये यांनी दिली. 

कोकण, इंदौर, हैदराबाद, जळगाव, मुंबई अशा विविध भागातील कलाकार मित्रमंडळीना एकत्रित करुन मालवण येथे एका म्युझिकल ट्रिपचे आयोजन केले होते. त्यावेळी प्रणयच्या शब्दसंगीत रचनांना संगीत संयोजन करून स्वरसाज चढवण्याचे काम सर्व टीमच्या सहाय्याने उत्कृष्टरित्या पूर्ण करण्यात आले. 14 दिवसांत एकूण 5 संगीतरचनांवर काम करताना या प्रवासात गायक सार्थक कल्याणी, आकाश शर्मा, प्रशांत मेस्त्री, रेखा मुनेश्वर तर वादक योगेंन्द्र पाटील, कौस्तुभ कसालकर, ओमकार सावंत, शेखर सर्पे यांचाही प्रत्यक्ष सहभाग होता.

‘द्रौपदी क्रिएशन्स’ ह्या युट्युब चँनेलवरून भेटीला

कोकणच्या पर्यटन, संस्कृतीला वाव देणार्या “कोकण” या गीतात कोकणचे एकूण अंग मांडताना कोकणची ख्याती, संस्कृती, परंपरा ह्यांचा प्रसार जगभर करण्याची निखळ भावना व उद्देश ठेवत साकारलेले हे गीत लवकरच ‘द्रौपदी क्रिएशन्स’ ह्या युट्युब चँनेलवरून आपल्या भेटीला येईल. जगविख्यात संगीतकार ए. आर. रेहमान यांच्या विविध प्रोजेक्टमध्ये सहभागी असलेला नामांकीत गायक सार्थक कल्याणी यांच्या सुरेल आवाजात कोकणावरचे हे लोकगीत स्वरबद्ध झाले असून, याची शब्दसंगीत रचना प्रणय शेट्ये ह्या कोकणपुत्राने केली आहे. या आधीही मराठी माध्यम शाळेच्या प्रसारासाठी केलेले शीर्षक गीत, ऑस्ट्रेलिअन गायिकेच्या आवाजात भारतीय व पाश्चात्य संगीत संयोजनाच्या मिलापातून साकारलेले वंदे मातरम् तसेच लॉकडाऊनमध्ये डीजीटल कॉन्फरन्स कॉलवर वेगवेगळ्या शहरातील कलाकारांना जोडून घडवलेले उभारी गीत अशा वेगळ्या धाटनीच्या संकल्पनांमुळे अनेक उदयोन्मुख कलाकार मंडळी प्रणयच्या उपक्रमात सहभागी व्हायला उत्सुक असतात. आताही कोकण ह्या गाण्याव्यतिरिक्त नित्यप्रार्थना, प्रेमगीत, विरहगीत आणि हलदी गीत ह्या चार थीमवर मित्रमंडळींना घेऊन प्रणय काम करतोय.

कोकण पुरेपूर भक्कम आणि सक्षम

कोकणात ही म्युझिकल ट्रीप घडवून आणायचे कारण तितकच खास होतं असे सांगताना प्रणय म्हणतो, ‘माझ्यासाठी संगीत म्हणजे दीर्घकाळ जगता येणार सुख आहे. जगण्यातली संवेदना, भावना, एकांत व त्याहीपलीकडे बघितल्यास संगीत हे आठवणी गुंफणारा एक धागाच आहे. आणि ह्या सर्वच बाबतीत, सर्वांगाने माझा कोकणही पुरेपूर भक्कम आणि सक्षम आहे. म्हणूनच कोकणवाली म्युझिकल ट्रीप साकरण्याचं स्वप्नही सत्यात उतरवता आलं आणि ते यशस्वी सुद्धा झालं. 

 कोकण कोकण कोकण कोकण
  
 जीवाभावाची नाती ही कोकण
 आपुलकीचा प्रवाह कोकण
 निसर्गराजाचं हे कोकण
 परशुरामाची कृपा हे कोकण
 कोंबड्याच्या आरवण्याचा आवाज कोकण
 गायी बैल वासरांची पहाट कोकण
  
 कोकण कोकण कोकण कोकण
  
 गणपतीपुळ्याचं दर्शन कोकण
 देवदेवतांचा महाल कोकण
 लालपरीचा प्रवास कोकण
 चिऱ्या कौलांच्या घरांचा कोकण
  
 आंबा काजू नारळी पोफळी 
 कुळदाची पिटी अन् सोलकडी
 भाकरी कालवणाची चव लय न्यारी
 कोकणाची बायो जेवणात भारी
  
 विहीरीच्या पाण्याची चव निराळी
 शांती आनंदाची नदीच ग्वाही
 सारवलेला खळा, मातीतले खेळ
 अशी गर्द छाया कुठेच नाही
  
 मायेचा सागर ,प्रेमाचा डोंगर
 भक्तीची ओंजळ आहे कोकण
 सणांचा कोकण, प्रथांचा कोकण
 मुकूट मालवणीचा आहे कोकण
  
 पावसातल्या लावणीची मौजही कोकण
 गौरीगणपतीतला गाजावाजा कोकण
 कलारत्नांची खाणही कोकण
 दशावताराची झिंग हे कोकण
  
 गड किल्ले क्रांतीची निशाणी
 भिनविती रगे थोर छत्रपती
 होते इथे पावण जमीतून गंगामाई
 जन्म कोकणातला गतजन्मीची पुण्याई
  
 कोकण कोकण कोकण कोकण..
  
 शब्द - प्रणय मंगेश शेट्ये. 

( साैजन्य – निकेत पावसकर)


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading