शाळा, महाविद्यालयांमध्ये विविध प्रकारची संमेलने, प्रशिक्षणे आयोजित केली जातात. याप्रसंगी प्रतिमांचे पूजन केले जाते. विद्यालय असल्याने विद्येची देवता सरस्वती, या प्रतिमेचे शाळांमध्ये पूजन केले जाते. परंतु पती महात्मा जोतीराव फुले यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्यात भरीव योगदान देत आपली स्वतंत्र प्रतिमा ज्यांनी निर्माण केली, त्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंची प्रतिमा शाळा- महाविद्यालयांमधील कार्यक्रमात मुलांसमोर यावी आणि सावित्रीबाईंच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करावे, असा प्रयत्न शिक्षण क्षेत्रातील प्रशासकीय अधिकारी म्हणून मी गेली अनेक वर्ष सातत्याने करत आहे. या प्रयत्नाला प्रतिसादही मिळत आहे. त्या मागची भूमिका अगदी शुद्ध आणि प्रबोधनकारी आहे. जोतीराव आणि सावित्रीबाई फुले या दांपत्याने स्त्री शिक्षणासाठी केलेले कार्य आता बऱ्यापैकी समाजासमोर येत आहे.
डॉ. विश्वास सुतार, कोल्हापूर ९४२०३५३४५२
लेखक, गायक आणि शिक्षण क्षेत्रात प्रशासकीय अधिकारी
आद्य शिक्षिका म्हणून सावित्रीबाई आपणास परिचित आहेत. शिकवण्यासाठी घरातून भिडेवाड्याकडे जाताना त्यांच्यावर अनेक वाईट प्रसंग आले. परंतु त्यांनी चिकाटीने आपले व्रत पार पाडले. महाराष्ट्राला सावित्रीबाईबद्दल किती माहिती आहे ? बालिका दिनाच्या पार्श्वभूमीवर सावित्रीबाईंचे विचार, कार्य आणि साहित्य यांची प्रस्तुतता कशा प्रकारची आहे, हे पाहणं उचित ठरावे. खरंतर कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटी येथील प्रा. डॉ. मा. गो. माळी यांनी संशोधनपूर्वक सावित्रीबाईंचे चरित्र लिहिले. कष्टपूर्वक सावित्रीबाईंचे समग्र साहित्य जमा करून ते संपादित केले. महाराष्ट्र शासनाने ते प्रकाशित केले. हे मराठी वाङ्मय क्षेत्रातील मोठे संचित आहे. नव्या पिढीने ते नव्याने समजून घेण्याची वेळ आता आली आहे.
प्रगल्भतेची घडण
३ जानेवारी, १८३१ हा सावित्रीबाईंचा जन्मदिन. कोणत्याही महान व्यक्तीचे चरित्र हे त्या त्या काळाच्या पटलावर अभ्यासायला हवे, असं मला वारंवार वाटतं. सावित्रीबाईच्या जन्माचा काळ, त्याची पार्श्वभूमी आपण पाहू तर काय दिसते ? एकोणीसाव्या शतकातील पूर्वाधाचा काळ होता तो. इंग्रजांची राजवट भक्कम पाय रोवत होती. इंग्रज आणि मिशनरी लोक भारतात नवं शिक्षण आणत होते (त्यांच्या लाभाचा विचार करून). स्वातंत्र्याचा लढा सुरु झालेला नव्हता. अनिष्ट प्रथा, परंपरा आणि विषमतेच्या खाईत समाज लोटला होता. बंगालमध्ये राजा राममोहन रॉय या सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रयत्नामुळे १८२९ मध्ये सतीबंदीचा कायदा लागू झाला. हजारो स्त्रियांची जितेपणाच्या मरणातून सुटका झाली.
इकडे पुण्यात मुली वा स्त्रिया अक्षर शिकतील तर त्यांच्या अन्नात अळ्या पडतील; अक्षर शिकते ती स्त्री विधवा होते अशा वावड्या उठत होत्या. धर्मग्रंथांच्या कर्मठपणामुळे स्त्रीशिक्षणाची दारे घट्ट बंद होती. अशा प्रतिकूल काळात सावित्रीचा जन्म होतो. नायगावसारख्या ठिकाणी ती सुसंस्कारित होते आणि दहाव्या वर्षी लग्न होऊन पुण्यात जोतीरावांकडे येते. लग्नापूर्वी निरक्षर असलेली सावित्री जोतीरावांमुळे अक्षरज्ञान घेते. ती कधी जमिनीवर अक्षर गिरवते, तर कधी मातीवर आणि पाटीवर. निरीक्षण आणि तर्कक्षमतेच्या आधारे सावित्री गतीने शिकते. तत्कालीन मिशनरी आणि पुण्यातील विशिष्ट संस्कृती यामुळे तिचा भाषाविकास होतो. प्रभावाचं असं एक वय असतं. सावित्रीवर जोतीरावांचा कमालीचा प्रभाव पडला. त्यामुळे आपल्या पतीच्या पावलावर पाऊल ठेवून मार्गक्रम करण्याचा सावित्री निश्चय करते, त्यांच्या सर्व कृतींना साथ देते. सावित्रीबाई सोळा-सतरा वयातच प्रगल्भ होत जाते.
आद्य शिक्षिका आहेतच पण…
सावित्रीबाई आद्य शिक्षिका आहेतच, पण पहिल्या मुख्याध्यापिकाही आहेत. वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी सावित्रीबाईंनी शिकवण्यासाठी घराबाहेर टाकलेले पहिले पाऊल हे ‘क्रांतिकारी’ ठरणारे आहे. पूर्णवेळ विनावेतन शिकवण्याचं काम सावित्रीबाईंनी केलेले आहे. हे कार्य वर्तमानात सर्वांसाठी अंतर्मुख बनवणारे आहे असे वाटते. त्या शिक्षिका होऊन थांबत नाहीत. त्या लिहित्या होतात आणि परिवर्तनाचे साहित्य निर्माण करतात. समाजास न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व यांची दिशा देण्याचे कार्य सावित्रीबाईंच्या साहित्याने केलेले आहे. स्त्री-पुरुष समानता, ज्ञानार्जन आणि अंधश्रद्धा निर्मूलन यासाठी आयुष्यभर सावित्रीबाई झटल्या आणि आपल्या साहित्यातून आविष्कारित झाल्या. आपल्या लेखणीचा त्यांनी ‘शस्त्र’ म्हणून वापर केलेला आहे. सावित्रीबाईंनी आपल्या समग्र वाङ्मयात ‘एकमय लोकांची’ संकल्पना दृढ करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
समाजातील सर्व स्तरातील, सर्व धर्माचे, सर्व जातींचे लोक सुखासमाधानाने एकत्र नांदावेत, त्यांच्यात रोटी-बेटी व्यवहार खुल्या मनाने व्हावेत हा विचार सावित्रीबाईंनी आपल्या आयुष्याच्या अखेरपर्यंत आपल्या साहित्यातून मांडलेला आपणास दिसून येतो. सावित्रीबाई स्वतः लिहून थांबत नाहीत; तर जोतीराव आणि त्यांच्या तालमीत तयार झालेल्या सत्यशोधक ताराबाई शिंदे यांना ‘स्त्री- पुरुष तुलना’ हे पुस्तक लिहण्यास प्रोत्साहन देतात. १८८२ मध्ये लिहिलेले जगातले हे पहिले स्त्रीवादी पुस्तक आहे. जोतीराव-सावित्रीबाईंनी लिहिलेली ‘विषयपत्रिका’ स्वातंत्र्यपश्चात आजही मार्गदर्शक आहे, हे विशेष नमूद करावेसे वाटते.
काही मंडळी असा प्रचार करतात की, जोतीरावांनी भटशाही, धार्मिक परंपरा, देवधर्म यांच्यावर टीका केली. मात्र त्यांच्याच पत्नीच्या ‘काव्यफुले’ या ग्रंथावर शंकर-पार्वतीचे चित्र कसे काय ? काळाच्या कसोटीवर ही भूमिका समजून घ्यायला हवी. सावित्रीबाई आणि जोतीरावांनी लोकांमधील धर्मश्रद्धेला धक्का दिलेला नाही. खुद्द जोतीराव ‘देव’ ऐवजी ‘निर्मिक’ हा शब्द वापरून निर्मिकाचे अस्तित्व मान्य करताना दिसतात. वैयक्तिक उपासनेला सावित्रीबाईंचाही विरोध नाही. त्यांना हिंदू धर्मातील भोंदूगिरी, आंधळ्या रुढी आणि परंपरांवर प्रहार करायचे होते. सावित्रीबाईंनी शंकराच्या ठिकाणी असलेली आपली सर्जनशील धर्मश्रद्धा ही महात्मा फुले यांच्या निर्मिकाशी सुसंगत ठेवली आहे.
सावित्रीबाईंचे साहित्य आणि प्रस्तुतता
१८५४ मध्ये सावित्रीबाईंचा ‘काव्यफुले’ हा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित झाला. त्यांनी मोडी लिपीत पहिल्या बारा कविता लिहिल्या आहेत. ‘काव्यफुले’ या ग्रंथात एकूण ४१ कविता आहेत. त्यात निसर्गविषयक, सामाजिक, बोधपर आणि ऐतिहासिक अशा कविता आहेत. ‘काव्यफुले’ मध्ये सावित्रीबाई म्हणतात-
”ज्ञान नाही, विद्या नाही
ते घेण्याची गोडी नाही
बुद्धी असुनी चालत नाही
तयास मानव म्हणावे का ?”
आजघडीलाही सावित्रीबाईंची ही कविता आपणास वास्तवतेचे दर्शन घडवीत नाही का ? तसेच शिकण्यासाठी तडफेने झोकून देण्याचे विशेष आवाहन करताना सावित्रीबाई म्हणतात-
”असे गर्जूनी विद्या शिकण्या
जागे होऊन झटा।
परंपरेच्या बेड्या तोडूनी
शिकण्यासाठी उठा ॥
मानवतेचे उदात्त चित्रण सावित्रीबाई एका कवितेत करताहेत, ते असे-
”काळरात्र गेली अज्ञान पळाले।
सर्व जागे केले सूर्याने या।
शूद्र या क्षितिजी जोतीबा हा सूर्य
तेजस्वी अपूर्व उगवला॥
जाऊ चला गाठू मानवता केंद्र।
‘मनुष्यत्व’ इंद्र पदी जाऊ॥
सावित्रीबाईंच्या उच्च दर्जाच्या प्रतिमा आणि व्यापक विचारांचे दर्शन अशा कवितांमधून आपणास होताना दिसत आहे. त्यांनी बोधपर कविताही लिहिलेल्या आहेत. संत तुकारामांनी ज्याप्रमाणे नवसाने कन्या पुत्र होत नाहीत असा विचार मांडला, तोच विचार पुढे नेत सावित्रीबाई आपल्या कवितेत म्हणतात-
धोंडे मुले देती। नवसा पावती।
लग्न का करती। नारी नर ॥
सावित्री वदते। करुनी विचार।
जीवन साकार। करून घ्या॥
सावित्रीबाईंची ही विचारसंपदा अत्यंत प्रगल्भ आहे. आपल्या कर्तृत्वाचं श्रेय आपल्या सहकार्याला, जीवनसाथीला देता येणं, ही मनाची मोठी उदारता आहे. जोतीरावांना आपल्या साहित्य निर्मितीचं सारं श्रेय देताना सावित्रीबाई म्हणतात-
जयाची मुळे मी कविता रचीते।
जया ते कृपे ब्रह्म आनंद चित्ते।
जयाने दिली बुद्धी ही सावित्रीला।
प्रणामा करी मी यती जोतिबाला ॥
याठिकाणी शेवटच्या ओळीत ‘पती’ हा शब्द न वापरता शिक्षण आणि सामाजिक कार्यातील तपस्वी या संदर्भाने ‘यती’ शब्द योजला आहे. शब्दयोजनेचे कौशल्य सावित्रीबाईंमध्ये अंगभूत होतेच. त्यांचा जीवनकाल पाहता त्यांनी निर्माण केलेली काव्यसंपदा ही उच्च प्रतिभेचे संचित होते, असेच म्हणावे लागेल. या अर्थाने सावित्रीबाईंना आधुनिक मराठी काव्याच्या जननीच म्हणावे लागेल. मला वाटतं, सावित्रीबाईंची उपजत प्रतिभा, बालपणीचे संस्कार, स्वतःचे प्रयत्न, तत्कालीन समाज व्यवस्थेचा प्रभाव आणि जोतीरावांची शिकवण या साऱ्यांमुळे सावित्रीबाई आविष्कारित होताना दिसतात.
सावित्रीबाईंनी जोतीबांची भाषणे संपादित केली आहेत. त्यातून जोतीबांचे जीवनविषयक, शिक्षणविचार मांडले आहेत. जोतीरावांना त्यांनी तीन पत्रे लिहिलेली आहेत. एका पत्रात सावित्रीबाई जोतीरावांना आपण आपल्या माहेरी भावास काय सांगितले ते लिहितात. ते असे- ‘तू शेळी, गाय यांना जवळ घेऊन कुरवाळतोस. नागपंचमीस विषारी नाग पकडून त्याला दूध पाजतोस. अरे, महार मांग हे तुझ्या सम मानव असतात. त्यास अस्पृश्य समजतोस त्याचे कारण सांग ?’ असा प्रश्न विचारून सावित्रीबाईंनी समानता आणि समतेचे तत्त्व अधोरेखित केले आहे. घटनाकारांनी हा विचार भारतीय संविधानात घेतला आहे. आज तो आपण सर्वव्यापी करण्याचा काळ आलेला आहे. पुढच्या पत्रात सावित्रीबाई जोतीरावांना आपल्या गावातील एक प्रसंग सांगतात. गावातील नुकतीच वयात आलेल्या सारजा नावाच्या मुलीवर एका पंचांग सांगणाऱ्या गावाबाहेरील ब्राह्मण तरुणाचे प्रेम जडले. त्यातून त्या मुलीस दिवस गेले. यामुळे गावातील लोकांनी दोघांनाही जबर मारपीट केली, त्यांची धींड काढली. सावित्रीबाईंनी पुढाकार घेऊन त्यांना वाचवले. त्यांना पुण्याला जोतीरावांच्याकडे पाठवले. कार्यकर्त्याचे असे कृतिशील वर्तन समाजास दिशा देणारे ठरते. सावित्रीबाईंनी पाच भाषणे दिली आहेत. ती भाषणे वाङ्मयरूपात उपलब्ध आहेत. उद्योग, विद्यादान, सदाचरण, व्यसने, कर्ज हे त्या भाषणांचे विषय आहेत. हे विषय जरी आपण पाहू; तरी सद्यस्थितीला या विषयांची समुचितता आपल्या लक्षात यावी. सदासर्वकाळ मेहनत करण्याचा संदेश सावित्रीबाई या भाषणात देतात. ‘दे रे हरी, पलंगावरी’ ही आळशी वृत्ती मनुष्यानं झटकून द्यावी, असे त्या निर्धाराने सांगतात. आपल्या भाषणात युरोपियन लोकांचा त्या संदर्भ देतात. विद्यादानाने माणूस खरा श्रीमंत होतो, हे त्या कसोशीने सांगतात. विद्याधनरहित मनुष्य मोठ्या कुळात जन्मला, तरी त्याला कोणी विचारत नाही, तुच्छ समजतात. याउलट हीन कुलात असूनही विद्यावंत असेल तर त्याची सर्वत्र पूजा होते. तो लोकांमध्ये मान्यता पावतो, असा विचार सावित्रीबाईंनी तत्कालीन परिस्थितीत मांडलेला आहे. व्यसनांबद्दल सावित्रीबाई खूपच गंभीर आहेत. ‘मद्यपिच्या घरी, अवधसा वास करी’ असा वाक्प्रयोग वापरून त्या आपले भाषण प्रभावी करतात. ‘कर्ज काढून सण साजरा’ ही म्हण वेडेपणाची आहे, असेही सावित्रीबाई सांगतात. कवितेतून सावित्रीबाई याविषयी म्हणतात – शेटजीचे कर्ज जो घेई तयाचे सुख दुरू जाई संकटाने हैराण होई बेजार होई कर्जदार ॥
सावित्रीबाईंचा ‘बावनकशी सुबोध रत्नाकर’ हा कवितासंग्रह जोतीरावांच्या निधनानंतर प्रसिद्ध झाला. यामधील ५२ रचनांमधून त्यानी देशाचा इतिहास कवितारूपाने मांडला आहे. नवसमाजाला तो सदैव प्रेरणादायी ठरणारा आहे.
सावित्रीबाईंची ही सारी ओळख नव्याने सांगण्याचं कारण इतकच की, संत जनाबाई, बहिणाबाई या आपल्याला जवळच्या वाटतात. साहित्यात त्याच ताकदीचे कार्य सावित्रीबाईंनी केलेले आहे. आजही त्यांचे विचार आणि साहित्य हे समाजाला पथदर्शक ठरणारे आहेत. बाराव्या शतकातील महात्मा बसवण्णा आणि नीलांबिका यांच्याशी जोतीराव-सावित्रीबाईंची तुलना करता येईल. त्यांच्या साहित्यातील उक्ती आणि त्यांची कृती यातील साम्यता सांप्रतकाळच्या सर्व सत्ताधीश, साहित्यिक आणि सर्वसामान्य नागरिकांनी अनुकरण करण्यासारखी आहे. सावित्रीबाईंनी लिहिलेली एक आठवण या ठिकाणी उद्धृत करून समारोप करत आहे.
सावित्रीबाई लिहितात- ”मी माझ्या भगिनींना शिकवण्याचे पवित्र कार्य करीत असताना तुम्ही माझ्यावर शेण अगर खडे फेकीत आहात, ही मला फुलेच वाटतात. ईश्वर तुम्हाला सुखी ठेवो!” आयुष्याच्या अंतिम क्षणी येशू आणि गांधी यापेक्षा वेगळं काय म्हणतात ? परिवर्तनाच्या चळवळीत काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांसाठी हा एक प्रेरणादायी संदेश वाटतो. या अर्थाने सावित्रीबाईंचे साहित्य आणि विचार संक्रमित करण्याची जबाबदारी आपण घेणे आवश्यक नव्हे; अनिवार्य !
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.