January 26, 2025
Overcoming conflict and working honestly at work Prof Shilpkala Randhave
Home » संघर्षावर मात करत नोकरीत प्रामाणिकपणे कार्यरत असणारी शिल्पकला
मुक्त संवाद

संघर्षावर मात करत नोकरीत प्रामाणिकपणे कार्यरत असणारी शिल्पकला

जिजाऊ – सावित्रीच्या कर्तृत्ववान लेकी-१
३ जानेवारी २०२५ ते १२ जानेवारी २०२५ पर्यंत सावित्री ते जिजाऊ दशरात्रोत्सव अंतर्गत १० कर्तृत्ववान महिलांच्या यशोगाथा…यामध्ये आज प्रा. शिल्पकला रंधवे यांच्या कार्याचा परिचय…

ॲड. शैलजा मोळक
लेखक, कवी, संपादक, प्रकाशक
अध्यक्ष, शिवस्फूर्ती प्रतिष्ठान पुणे
मो. 9823627244

प्रा. शिल्पकला रंधवे

पुणे महानगरपालिका शिक्षण मंडळात सध्या उपशिक्षण प्रमुख पदावर कार्यरत असणारी प्रा. शिल्पकला ही माझी धाकटी बहीण. माऊलींचे वंशपरंपरागत मानकरी असलेल्या वारकरी सांप्रदायिक कुटुंबातील कै. कृष्णराव वासुदेव रंधवे ( चोपदार गुरुजी) आणि कै. सौ. ताराबाई यांच्या पोटी आळंदी येथे १९ ॲाक्टोंबर १९७४ रोजी जन्माला आलेलं कन्यारत्न म्हणजे शिल्पकला.

आखीव रेखीव चेहऱ्याची अगदी गौरीसारखी दिसणारी, दगडावर कोरलेल्या मूर्तीसारखी ती सुंदर दिसते म्हणून तिचे ‘शिल्पकला’ असे युनिक नाव ठेवले. दोन भाऊ व दोन बहिणी अशी चार भावंड आपल्या आई – वडिलांसोबत दीड खणाच्या घरात गुण्यागोविंदाने वाढली. वडील प्राथमिक शिक्षक तर आई गृहिणी होती. आई – वडिलांनी चारही मुलांमध्ये कधी मुलगा – मुलगी असा भेद केला नाही. सर्वांना अतिशय चांगल्या संस्कारात वाढविले.

कुठल्याही कामाची लाज न बाळगता कोणतेही काम हलकं नसतं असे शिकवल्यामुळे तिने लहानपणी कार्तिकी यात्रेत साखरफुटाणे विकणे, वर्तमानपत्र वाटणे, काही दिवस साड्यांचे दुकान, स्टेशनरीचे दुकान चालवले. दादांनी शिकवलेली श्रमप्रतिष्ठेची शिकवण तिला पुढेही आयुष्यात उपयोगी पडली.

तिचे प्राथमिक शिक्षण आळंदी नगरपालिका शाळा क्र.२ मुलींच्या शाळेत तर माध्यमिक शिक्षण श्री ज्ञानेश्वर विद्यालयात झाले. इ.६ वीत असताना तिला चष्मा लागल्याने तिच्या मनात एक प्रकारचा न्यूनगंड निर्माण झाला आणि तिचे व्यक्तिमत्व घडण्यात काही मर्यादा आल्या. तिला खेळात, स्नेहसंमेलनात कधी भाग घेता आला नाही त्यामुळे ती थोडी बुजऱ्या स्वभावाची झाली. परंतु शाळेत असताना जे खेळ ती खेळायची त्यात शाळा – शाळा हा तिचा आवडीचा खेळ. जवळपासच्या सर्व लहान मुलांना गोळा करुन त्यांना विद्यार्थी बनवायची आणि ती शिक्षिका व्हायची. म्हणतात ना ‘ मुलाचे पाय पाळण्यात दिसतात’ त्याप्रमाणे दादांची इच्छा पूर्ण करण्यासाठी तिने शिक्षकी पेशा स्वीकारायचे ठरवले. तिचे महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातील नौरोसजी वाडियात झाले.

अर्थशास्त्र विषयातून ती एम. ए. झाली. लेझरचे ॲापरेशन करून चष्मा गेल्याने मनातील न्यूनगंड नाहीसा होऊन तिचा आत्मविश्वास वाढला. त्यानंतर तिने कोल्हापूर विद्यापीठातून सातारा येथील आझाद कॅालेज ॲाफ एज्युकेशन येथून मराठी विषय घेऊन तिने बी.एड.ची पदवी संपादन केली. बहिण वकील, दोघे भाऊ इंजिनियर पण शिल्पकलाने मात्र दादांची इच्छा पूर्ण करुन शिक्षकी पेशा स्वीकारला. सुरुवातीला एक वर्ष तिने गेनबा सोपानराव मोझे महाविद्यालय, येरवडा येथे ज्युनियर व सिनीयर कॅालेजवर अर्थशास्त्राची प्राध्यापिका म्हणून काम केले. त्यानंतर तीन वर्ष भोसरीत राजमाता जिजामाता महाविद्यालय व आळंदी येथील गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाच्या शरदचंद्र पवार महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम केले.

दरम्यानच्या काळात तिचा विवाह झाला. पण तो काही कारणांनी अयशस्वी ठरला. त्यातून ती सावरली. कुटुंबियांनी तिला यातून बाहेर येण्यासाठी मानसिक आधार दिला. तेच दु:ख कवटाळून न बसता मोठ्या जिद्दीने तिने प्राध्यापक म्हणून यशस्वीपणे काम केले. त्यानंतर लग्न म्हणजेच काही आयुष्य नसतं, अशी मनाची समजूत घालून पुन्हा लग्न न करण्याचे ठरवून एक छान व स्वच्छंदी आयुष्य तिने जगायचे ठरवले. घरच्या सर्वच सदस्यांनी तिच्या या निर्णयाला पाठिंबा दिला.

याच काळात तिला एक चांगली संधी चालून आली. शिक्षण मंडळ, पुणे मनपाची सहायक शिक्षण प्रमुख वर्ग – २ या पदासाठी जाहिरात आली. यात द्विपदवीधर, मान्यताप्राप्त सिनियर कॅालेजला शिकवल्याचा किमान दोन वर्षांचा अनुभव व वय वर्ष २९ अशी पात्रता हवी होती. मिळेल त्या पगारावर यापूर्वी नोकरी केलेली असल्यामुळे आलेल्या संधीचं सोनं झालं. तिला मिळालेले अनुभवाचे सर्टिफिकेट नोकरी मिळण्यासाठी उपयोगी पडलं. १ जून २००४ रोजी सहायक शिक्षण प्रमुख, शिक्षण मंडळ, पुणे मनपा येथे तिची अधिकारीपदी नियुक्ती झाली. गेले २० वर्ष ती या पदावर प्रामाणिकपणे कार्यरत आहे.

शिक्षण विभागातील वरिष्ठांनी आजवर सोपविलेल्या जबाबदाऱ्या तिने अत्यंत लीलया पार पाडल्या. पुण्यातील १०० % शाळांमध्ये तिने प्रशासकीय काम केले. शिक्षण विभागात आलेले नवीन उपक्रम सुरु करण्यापासून ते यशस्वीपणे राबविण्यात तिचा मोलाचा वाटा आहे. आजवर तिने विद्यार्थ्यांसाठी संगणक प्रशिक्षण, सर्व शाळांमध्ये ई-लर्निंग सुरु करणे, परीक्षा विभाग, शिष्यवृत्ती विभाग, केंब्रिज परीक्षा, साक्षरता अभियान, शिक्षकांसाठी इंग्रजी प्रशिक्षण, समुपदेशन उपक्रम, बालवाडी विभाग, महिला तक्रार निवारण केंद्र सदस्या म्हणून कामकाज पहात आहे. तसेच गुणवत्ता कक्ष, कलश षण्मासिकाचे कार्यकारी संपादक म्हणूनही तिने उत्कृष्ट काम केले. याबरोबरच पुणे शहरातील येरवडा, मुंढवा, हडपसर अशा विविध विभागांमधील शाळांमध्येही शाळा भेटी, शाळांची गुणवत्ता वाढविण्यासाठी शिक्षक व मुख्याध्यापकांना मार्गदर्शन, शाळांच्या तक्रारी सोडविणे, इ. प्रशासकीय कामकाज केले. तसेच दहावी – बारावीच्या भरारी पथकात, डी.एड्.परीक्षेच्या केंद्रसंचालक व दहावी परीक्षेची परीक्षक आणि नुकतेच विधानसभा निवडणुकीची निवडणूक अधिकारी म्हणूनही तिने जबाबदारीचे काम केले.

समग्र शिक्षा या केंद्र शासनाच्या योजनेत प्रकल्प अधिकारी म्हणूनही काम करताना पुणे शहरातील एकूण १२४८ शाळांचा कारभार तिने अतिशय जबाबदारीने पेलला. यात इ. १ ली ते ८ वीच्या सर्व शासकीय, खाजगी अनुदानित व अंशत: अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक वितरण नियोजन, शिक्षक प्रशिक्षण आयोजन, दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिबीराचे आयोजन, त्यांना शासनाकडून आवश्यक ते साहित्य मिळवून देणे, सर्व शाळांच्या माहितीचे संकलन करणे, शाळांना अनुदानाचे वितरण करणे, त्यांचे मागील २० वर्षांचे ॲाडीट करुन घेणे, दिव्यांग विद्यार्थ्यांचा एस.एस.सी. बोर्डाशी समन्वय साधून त्यांना न्याय मिळवून देणे, इ. महत्वाची कामे अचूकपणे पार पाडली.

अशा प्रामाणिकपणे करीत असलेल्या कामांची दखल घेऊन आजवर तिला शिक्षण मंडळाचा ‘उत्कृष्ट सेवा पुरस्कार’, शिवस्फूर्ती प्रतिष्ठानचा ‘ जिजाऊ-सावित्री पुरस्कार’, सिध्दी फाऊंडेशनचा ‘सिध्दी गौरव पुरस्कार’, पुणे महानगरपालिकेचा मानाचा व नामांकित समजला जाणारा असा ‘ गुणवंत कामगार पुरस्कार’, पुण्यातील ‘ऐश्वर्य कट्टा’ तर्फे महिला दिनानिमित्त शैक्षणिक क्षेत्रातील कार्याबद्दल तिचा सत्कार करण्यात आला. हे सर्व कौतुक पहायला आज आई-वडील सोबत नसल्याची खंत वाटते. अन्नपूर्णा असलेल्या आईचे २००९ साली गौरीपूजनाच्या दिवशी हृदयविकाराने दु:खद निधन झाले व कोरोना काळात २०२० मध्ये वडिलांचे प्रेमळ छत्र हरपले.

हे सर्व करत असताना तिचे आरोग्याकडे थोडे दुर्लक्ष झाले. तिला मागील १८ वर्षांपासून पायांना मुंग्या येणे, सूज येणे, पायांचे स्पर्शज्ञान कमी होणे, चालण्याची गती कमी होणे, त्यामुळे तिचा गाडी चालविण्यातील आत्मविश्वास कमी झाला. पण हे दुखणे कधी चेहऱ्यावर दिसू दिले नाही, ना कधी त्याचा कामावर विपरीत परिणाम होऊ दिला. वयाच्या चाळीशीतच ब्लॅाकेज निघाल्याने ॲन्जिओप्लास्टी करावी लागली. बी. पी. शुगर लागले, दोन्ही डोळ्यांची मोतिबिंदूंची ॲापरेशनही झाली. डोळ्याची दृष्टी टिकण्यासाठी डोळ्यात तीन इंजेक्शनही घ्यावी लागली. तरीही आज पन्नाशीत असतानाही सर्वांना लाजवेल, हेवा वाटेल असे जीवन ती जगतीय. आज सारे कुटुंब तिच्या सर्व सुख दुःखात, तिच्या यशस्वी वाटचालीत तिच्या कायम पाठीशी आहेत.

‘कोण काय म्हणेल याचा विचार न करता स्वत:ला काय आवडतयं? काय वाटतंय? याचा विचार करुन जेवढे आयुष्य आहे ते आनंदानं जगायचं. आपल्यासमोर आपल्याबद्दल लोक जे बोलतील, तेच त्यांनी मागेही बोललं पाहिजे हीच आयुष्याची कमाई हवी’ असे ती समजते.

तिला लेखन, वाचन, मित्र/ मैत्रिणी जोडून ठेवणे, छान छान साड्या – ड्रेस त्यावर मॅचिंग अशी साजेशी ज्वेलरी घालणे, आवश्यक असेल त्यांना शक्य तेथे मदत करणे, देश विदेशात पर्यटन करणे या गोष्टी आवडतात. तिने आजवर भारतात व भारताबाहेर परदेशी सहलींचाही मनमुराद आनंद लुटला आहे.
अशा या हौशी, आनंदी, कष्टाळू, जिद्दी, संघर्षावर मात करणाऱ्या, नोकरीत प्रामाणिकपणे कार्यरत असणाऱ्या या जिजाऊ- सावित्रीच्या कर्तृत्ववान लेकीला मानाचा मुजरा..!!


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading