साकोली येथील झाडीबोली साहित्य मंडळाच्यावतीने २८ वे झाडीबोली साहित्य संमेलन मुर्झा/पारडी, (ता.लाखांदूर, जि.भंडारा ) येथे शनिवारी (ता. २५) व रविवारी ( ता. २६) होत आहे. या निमित्ताने झाडीपट्टीतील या चळवळीत आम्ही कसे ओढले गेलो याबाबत…
ॲड. लखनसिंह कटरे
बोरकन्हार
441902, जि.गोंदिया.
झाडीबोलीचा वेलू आता गगनावरी जातोय. 1973 दरम्यान मी ग. त्र्यं. माडखोलकरांच्या काही कादंबऱ्या वाचल्या आणि त्यात झाडीपट्टीतील गावांचा तथा बोलीचा ओझरता उल्लेख वाचून/पाहून मला झाडीबोलीबद्दलचा आपलेपणा जाणवायला लागला. आनंद यादव यांच्या “गोतावळ्या”शी ओळख झाली व हा “आपलेपणा” दृढ होऊ लागला. 1980 च्या दरम्यान “ललित” मासिकात चकवा या शब्दाच्या अर्थाबाबत काही वाचकांनी अनभिज्ञता दर्शविल्यावर, मी चकवा या मूळ झाडीबोलीतील शब्दाच्या अर्थाबाबत व त्यामागील सांकल्पनिक कथेबाबत लिहिलेले एक टिपण गंभीर आणि गंमतीदार या सदरात प्रसिध्द झाले होते.
शिवाय दिल्लीहून प्रकाशित एका हिंदी मासिक पत्रिकेचा (प्रकाशित मन, संपादक-दयानंद वर्मा) मी 1973-1977 दरम्यान वर्गणीदार वाचक व टिपण-लेखक असल्याने/राहिल्याने या कालावधीत मला स्थानिक-बोलीचे महत्त्व व प्राधान्याची कारणमीमांसा सुद्धा कळू लागली होती. पर्यायाने माझ्या लेखनात “झाडीबोली” हक्काने प्रवेशू लागली.
या प्रवासात पुढे साकोली येथे कार्यरत असताना हरिश्चंद्र बोरकर यांच्यासी परिचय झाला. आणि मी आपली एकखांबी चळवळ विसर्जित करून झाडीबोलीची पालखी वहायला लागलो. 09 व 10 फेब्रुवारी 2002 ला माझ्या वडीलांच्या धन-धान्यसंगतीने मी माझ्या जन्मगावी बोरकन्हार (जि. गोंदिया) येथे नववे झाडीबोली साहित्य संमेलन घेतले. मी स्वागताध्यक्ष व माझे काॅलेजमधील वर्गमित्र (स्व.)घनश्याम डोंगरे हे संमेलनाध्यक्ष होते. जबरदस्त सफल झाले हे संमेलन !!! या संमेलनाने आमच्या झाडीबोली चळवळीला नवीन पिढीचे काही महत्त्वाचे झाडीबोली – साहित्यिक जोडून दिले. जे आज झाडीबोलीची ही चळवळ आपल्या खांद्यावर वाहू लागले आहेत.
आनंदवन/वरोरा (जि. चंद्रपूर) येथे 03 व 04 जानेवारी 2004 ला झालेल्या अकराव्या झाडीबोली साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष आचार्य ना. गो. थुटे तर संमेलनाध्यक्ष मी होतो. या संमेलनाने एक इतिहासच रचला. आनंदवनच्या सभागृहात तेथील अंध-अपंग कलाकारांचा अद्भुत आर्केस्ट्रा प्रत्यक्ष डाॅ. विकास आमटे यांच्या गायनासहित आमच्या या संमेलनानिमित्ताने “रचला” गेला. असा आमचा प्रवास सुरू होता.
दरम्यान नोव्हेंबर 2004 मध्ये डाॅ. हरिश्चंद्र बोरकर गौरव ग्रंथ सज्ज झाला. त्या “कृतार्थ” शीर्षकाच्या गौरवग्रंथात मी बोरकरांवर एक कविता केली होती. आमचे मित्र मिलिंद रंगारी यांनी मला त्याची आठवण करून दिली. 23 व 24 डिसेंबर 2017 ला भंडारा जिल्ह्यातील जवाहरनगर (ठाणा) येथे रजत महोत्सवी पंचेवीसावे झाडीबोली साहित्य संमेलन झाले. त्या रजत महोत्सवी संमेलनाचे संमेलनाध्यक्ष बंडोपंत बोढेकर (ग्रामगीताचार्य) हे होते. त्या निमित्ताने मी “कृतार्थ” मधील माझी “ती” कविता अशी…
हरिश्चंद्र बोरकर : एक अवलिया अभ्यासक
सूर्याचे एक नाव –
मित्र आहे.
माझ्या सन्मान्य मित्राचे नाव –
हरिश्चंद्र बोरकर आहे.
सूर्याचे संवर्धकत्व
आपल्यात सामावून घेणारा
अवलिया अभ्यासक –
हरिश्चंद्र बोरकर आहे.
झाडीपट्टीत “गहाळ” ठरलेल्या
लेखकांना शोधून पुढे आणणाऱ्या
एका आश्वासक अधिष्ठानाचे नाव –
हरिश्चंद्र बोरकर आहे.
विवेकसिंधू, ज्ञानेश्वरी सारख्या
ग्रंथांतून लपलेली झाडीबोली
“शोधून” काढणारा संशोधक –
हरिश्चंद्र बोरकर आहे.
झाडीबोलीचे भाषाशास्त्रीय आकलन
विद्वानांच्या ताटात वाढणारा वाढपी –
हरिश्चंद्र बोरकर आहे.
मराठीच्या माहेरातील आप्तांनाही
भाषेचे “मर्म” समजावून सांगणारा
बोली उद्धारक –
हरिश्चंद्र बोरकर आहे.
“बोली चे ‘वजन’ वाढले
तर मराठीचा ‘पाया’
मजबूत होईल”
असे बजावणारा समन्वयक –
हरिश्चंद्र बोरकर आहे.
‘बोली’ वजाबाकीचे नव्हे
तर बेरजेचे ‘कार्य’ करते;
शब्दार्थांचे गुणाकार करते;
मराठीचे सामर्थ्य वाढविते;
असे अव्याहत सांगणारा प्रचारक –
हरिश्चंद्र बोरकर आहे.
विद्वत्ता ही आढ्यता वाढवीत नसते
तर नम्रतेची प्रतीक होते;
शालीनता शिकविते;
आधारक होते;
धाक न दाखविता
शीतल पाठीराखी होते;
याचे मूर्तिमंत प्रतीक-
हरिश्चंद्र बोरकर आहे.
मला-
माझ्या देशाचा,
माझ्या महाराष्ट्राचा,
माझ्या विदर्भाचा,
माझ्या मराठीचा,
माझ्या झाडीबोलीचा,
माझ्या अवलिया मित्राचा,
अभिमान आहे.
सव्वीसावे झाडीबोली साहित्य संमेलन, पुन्हा दुसऱ्यांदा, झाडीबोली साहित्य संमेलनांच्या इतिहासात प्रथमच दोनदा एकाच गावात संमेलन घेण्याचा प्रसंग, माझ्या बोरकन्हार (जि.गोंदिया) या गावात साजरा करण्यात आला. हे संमेलन 29 व 30 डिसेंबर 2018 ला यशस्वीपणे पार पडले. या संमेलनाचे संमेलनाध्यक्षपद मिलींद रंगारी यांनी भूषविले.
सत्तावीसावे झाडीबोली साहित्य संमेलन 28 व 29 डिसेंबर 2019 ला गडचिरोली जिल्ह्यातील मौशी खांब येथे झाले. या संमेलनाचे संमेलनाध्यक्षपद डाॅ. गुरूप्रसाद पाखमोडे यांनी भूषविले होते. या मौशी खांब गावाचे वैशिष्ट्य असे की, या गावात अजूनही रावणपुत्र मेघनादच्या मूर्तीची पूजा केली जाते.