November 12, 2025
पुरंदर विमानतळामुळे पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील शहरांना उड्डाणांची नवी दिशा; हरित तत्त्वावर आधारित हा प्रकल्प पर्यटन, उद्योग आणि रोजगार वाढवणार आहे.
Home » पुण्याच्या स्वप्नांना नवे आकाश
विशेष संपादकीय

पुण्याच्या स्वप्नांना नवे आकाश

पुरंदर येथील विमानतळावरून आंतरदेशीय आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे वाढणार आहेत. या विमानतळाला एक्सप्रेस वे आणि रेल्वे मार्ग जोडण्याची योजना आहे. पुणे शहरा प्रमाणेच सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर अशा अनेक शहरांसाठी हा विमानतळ जवळचा आणि सोयीचा असणार आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या इतर शहरांसाठी सुद्धा नवीन विमानतळ उपयुक्त असणार आहे.

प्रकाश मेढेकर,
स्थापत्य सल्लागार, पुणे

भारतातील विमान वाहतुकीचा इतिहास अत्यंत प्रेरणादायी आहे. देशातील पहिली विमान सेवा १५ ऑक्टोबर १९३२ रोजी जहांगीर रतनजी दादाभाई टाटा यांनी सुरू केली. त्यांनी टाटा एअरलाइन्सच्या माध्यमातून कराची ते मुंबई दरम्यान टपाल आणि प्रवासी वाहतूक सुरू केली. हाच पुढे भारताच्या राष्ट्रीय विमान कंपनीचा पाया ठरला. १९४६ मध्ये या सेवेला एअर इंडिया हे नाव देण्यात आले, तर १९४८ पासून भारत सरकारने त्यात भागीदारी करून एअर इंडिया इंटरनॅशनल सुरू केली. १९५३ मध्ये नागरी विमान वाहतूक राष्ट्रीयकृत करण्यात आली. आणि इंडियन एअरलाइन्स देशांतर्गत उड्डाणांसाठी स्थापन झाली.

१९९० नंतरच्या जागतिकीकरणामुळे खासगी कंपन्यांना विमान सेवा सुरू करण्याची संधी मिळाली. जेट एअरलाइन्स, स्पाइसजेट, इंडिगो, गोएअर अशा अनेक कंपन्यांनी देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक सुलभ केला.आज भारत जगातील सर्वात वेगाने प्रगती करणाऱ्या विमान वाहतूक उद्योगांपैकी एक आहे. वाढते विमानतळ, आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रवाशांची वाढती संख्या यामुळे भारताची नागरी विमान सेवा नव्या उंचीवर पोहोचली आहे. नुकतेच नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन झाले. हा प्रकल्प होण्यासाठी तब्बल वीस वर्षाचा कालावधी लागला. यातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा जमीन अधिकरणाचा होता. पण हा प्रश्न प्रशासनाने चिकाटीने का होईना अखेरीस मार्गी लावला.

या विमानतळामुळे मुंबईच्या सध्याच्या विमानतळावर असणारा ताण हा सुलभ होणार आहे. नवीन एअरपोर्ट आलिशान असून त्याची प्रवासीक्षमता २ कोटी पासून ९ कोटीपर्यंत वाढू शकते. विमानतळ जवळ असेल तर प्रवासाचा वेळ वाचून इंधनाची बचत होते तसेच एक विमानतळ प्रकल्प हजारो लोकांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करतो.

२०१० च्या सुमारास राष्ट्रकुल स्पर्धेच्या निमित्ताने राजधानी दिल्लीच्या पायाभूत सुविधांच्या विकासाची कामे प्रगतीपथावर होती. तेथे मेट्रोचे जाळे विणले जाऊन आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विमानतळाची उभारणी करण्यात आली. दिल्लीच्या टर्मिनल ३ विमानतळाला अमेरिकेतील लीड या मानांकन पद्धतीने सुवर्ण दर्जा बहाल केला आहे. असाच दर्जा पुणे शहरा जवळ होणाऱ्या भावी विमानतळाला प्राप्त होऊ शकतो. महाराष्ट्राच्या भावी विकासासाठी अशाच पायाभूत सुविधा होणे आवश्यक आहे. पुणे शहरात मेट्रो प्रकल्प सुरु होऊन त्याचे जाळे विणले जाणे हा यशस्वी टप्पा म्हणता येईल. विमानतळाची जागा पुण्याजवळील पुरंदर या ठिकाणी असल्याचे शासनाने आता जाहीर केले आहे. तरीही भूसंपादन प्रक्रिया आणि विविध शासकीय परवानग्या यासाठी अजून काही कालावधी अपेक्षित आहे.

विमानतळाची उभारणी हा बांधकाम क्षेत्रातील महत्वाचा टप्पा समजला जातो. त्यासाठी कित्येक एकर जमीन, मोठा कालावधी आणि कोट्यावधी रुपयांची गरज असते. अशा प्रकल्पाचे नियोजन अत्यंत काटेकोर पद्धतीने करावे लागते. प्रकल्प कालावधी लांबला तर खर्च वाढू शकतो. त्याचप्रमाणे प्रकल्प उभारणी करताना गुणवत्ता आणि सुरक्षितता यामध्ये कोणतेही तडजोड करता येत नाही.

पर्यावरणपूरक संकल्पना

भावी विमानतळ पर्यावरणाशी बांधिलकी राखून ग्रीन संकल्पनेवर आधारित असावा अशी अपेक्षा आहे . ग्रीन संकल्पनेमध्ये पर्यावरणाचे रक्षण, ऊर्जेची आणि पाण्याची बचत , पुनर्वापर आणि पुनर्प्रक्रियेद्वारे बनवलेल्या बांधकाम साहित्यांचा वापर , अंतर्गत वातावरण निर्मिती आणि दर्जा , नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर, नैसर्गिक साधन संपत्तीची जपणूक , वेस्टेजवर नियंत्रण या गोष्टींचा समावेश असतो. कोणत्याही बांधकाम प्रकल्पामध्ये बांधकाम साहित्य , मशिनरी आणि मनुष्यबळ याची एकत्र सांगड घालावी लागते. बांधकाम साहित्याची निवड करताना पर्यावरण पूरक बांधकाम साहित्य आपण निवडू शकतो . काँक्रीट मध्ये फ्लाय अॅश आणि पुनर्प्रक्रिया केलेले स्टील वापरता येते. अंतर्गत भिंतींसाठी जलद गतीने भिंती उभारणारे ड्राय वॉल तंत्रज्ञान उपलब्ध आहे. भिंतींसाठी कमी वजनाचे प्लास्टर जिप्सम बोर्ड आणि फॉल सीलिंग करण्यासाठी मिनरल फायबर सिलिंग टाइल्स वापरता येतात. खिडक्यांसाठी उच्च दर्जाची काचेची तावदाने आणि सुशोभीकरणासाठी ॲल्युमिनियम कॉम्पोझिट पॅनलचा वापर करणे योग्य ठरते. विमानतळावरील कार्पेट सुद्धा पर्यावरण पूरक पद्धतीचे करता येते.

विमानतळाची रचना

विमानतळाची रचना करताना अंतर्गत भागात जास्तीत जास्त खेळता सूर्यप्रकाश असल्यास विजेची बचत होते. आजूबाजूच्या परिसरातील जैवविविधता जपणे, जमिनीची धूप कमी करणे यासाठी धुळीचे नियंत्रण करणारे स्प्रिंकलर्स बसवता येतात. संपूर्ण परिसराचे लँडस्केपद्वारे सुशोभीकरण करता येते. विविध प्रकारची झाडे लावून ती जगवण्यासाठी भूजल आणि पुनर्प्रक्रियेतील पाणी वापरता येते. भूजलाची पातळी वाढवण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग हा उत्तम पर्याय दिल्ली विमानतळावर केला आहे. त्याचप्रमाणे मैला शुद्धीकरण प्रकल्पाद्वारे कित्येक कोटी लिटर पाण्याचे शुद्धीकरण करून त्याचा पुनर्वापर करता येतो. हेच पाणी, लँडस्केप, टॉयलेट फ्लशिंग यासाठी वापरता येते. प्रदूषणाचे पातळी नियंत्रण करण्यासाठी बॅटरी व नैसर्गिक वायूवर चालणाऱ्या वाहनांचा उपयोग विमानतळावर करता येईल. वीज आणि पाणी यांची बचत करणारी उपकरणे सर्वत्र बसवता येतील. कचऱ्याची पुनर्प्रक्रिया आणि पर्यावरण पूरक पद्धतीने विल्हेवाट करता येईल.

अंतर्गत रचना करताना सुरक्षा तपासणी कक्ष, परदेश गमन आणि आसन कक्ष, शॉपिंग मॉल, तारांकित हॉटेल, सामानाची हाताळणी करणारा कक्ष, बॅगांची वाहतूक करणारे लांब सरकते पट्टे याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. त्याचप्रमाणे प्लंबिंग, विद्युत, अग्निशामक, बॉम्बशोधक, सुरक्षा कॅमेरे, एक्स-रे मशीन, वातानुकूलन, अलार्म, रडार, ध्वनी नियंत्रण यंत्रणा सक्षम कराव्या लागतील. काळाची गरज असणारे चारचाकी गाड्यांचे भव्य आणि अद्ययावत स्वयंचलित पार्किंग व्यवस्था विमानतळावर असणे आवश्यक आहे . या सर्व गोष्टींचा समावेश केला तर पुण्याचा भावी विमानतळ महाराष्ट्राच्या नावलौकिकात भर टाकेल हे निश्चित . पुण्याचा सध्याचा विमानतळ संरक्षण विभागाचा असल्याने त्याला जमिनीच्या क्षमतेची मर्यादा असून विमानतळाचा रनवे वाढवता येत नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय विमान सेवा करण्यासाठी लागणारी वाढ करण्यात मर्यादा येत आहेत. नवीन विमानतळ या सर्व त्रुटी भरून काढणारा असेल.

पुरंदर येथील विमानतळावरून आंतरदेशीय आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे वाढणार आहेत. या विमानतळाला एक्सप्रेस वे आणि रेल्वे मार्ग जोडण्याची योजना आहे. पुणे शहरा प्रमाणेच सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर अशा अनेक शहरांसाठी हा विमानतळ जवळचा आणि सोयीचा असणार आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या इतर शहरांसाठी सुद्धा नवीन विमानतळ उपयुक्त असणार आहे. विमानतळ पूर्ण झाल्यानंतर हॉटेल, रिसॉर्ट, पर्यटन सेवा ,लॉजिस्टिक सुविधा यांचा आपोआपच विकास होईल. नवीन विमानतळावर कार्गो हब ची सुविधा असल्याने उद्योग, आयात- निर्यात सेवा, स्थानिक हस्तकला, कृषी , पर्यटन या क्षेत्रांचा विकास होण्यास प्रचंड वाव आहे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading