कळंबस्ते येथील एक गानू नामक व्यक्ती मध्यप्रदेशला अहिल्याबाई होळकर यांच्या संस्थानात सेवेत होती. अहिल्याबाई या शिवभक्त असल्याने त्यांनी काही शिवधन या गानूंच्या हाती सोपवून त्यांच्या गावात शिवमंदिर उभारायला सांगितले. त्यानुसार या मंदिराची उभारणी झाली . मंदिरात असणाऱ्या सर्व मूर्ती या त्याकाळात घोड्यावरुन कळंबस्ते येथे आणण्यात आल्या .
जे . डी . पराडकर,
jdparadkar@gmail.com 9890086086
कोकणात मंदिरांची काही कमी नाही . निसर्गसंपन्न कोकण भागात चालुक्य राजवटीत सर्वाधिक मंदिरे उभारली गेली. चालुक्य राजे शिवाचे उपासक असल्याने त्यांनी उभारलेली मंदिरे ही अर्थातच शिवाचीच आहेत . ज्या भागात जो पाषाण उपलब्ध होइल , त्या पाषाणामध्ये ही शिवमंदिरे उभारली गेली . या मंदिरांचे वैशिष्ट्य म्हणजे उत्कृष्ट स्थापत्य शास्त्रा बरोबरच त्यातील अलौकिक कोरीवकाम अचंबित करणारे ठरते . संगमेश्वर तालुक्यामधील कसबा गावात चालुक्यकालीन शिवमंदिरे त्यावेळच्या स्थापत्यशास्त्राचा अद्भूत आविष्कार दाखवत आजही उभी आहेत . मंदिर अथवा परिसरातील शिल्पांमध्ये दाखवण्यात आलेले प्रसंग पाहिले की , थक्क व्हायला होते . एक एक शिल्प म्हणजे, अर्थाची उकल झाल्यानंतर प्रबंध लिहावा अशी आहेत. देश विदेशातील शिल्प अभ्यासकांनाही आश्चर्य वाटावे अशी ही शिल्पकला म्हणजे या परिसराचे भूषणच म्हटले पाहिजे. शिल्प , स्तंभ , विरगळ अशा अनेक शिल्पाकृती या परिसरात असून पर्यटन दृष्टीने या भागाचा अपेक्षित विकास होवू शकला नाही . येथील शिव मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज अभिषेक करत असत , असा इतिहास आहे. या शिव मंदिरांव्यतिरिक्त नजीकच्या कळंबस्ते गावांत ‘ रामेश्वर पंचायतन ‘ मंदिर आहे . आजही फारसे कोणाला माहित नसलेले हे मंदिर म्हणजे अत्यंत पवित्र असे ठिकाण असून येथील शिवलिंग आणि मूर्ती पाहिल्यानंतर जाणकाराला त्यातील तेज आणि वेगळेपण नक्कीच दिसून येइल . ‘ पंचायतन ‘ म्हणजे पाच देवांचे एकत्रित ठिकाण . पंचायतन हे सर्रास सर्वत्र आढळत नाही . काही भक्तांच्या घरी देव्हाऱ्यात पंचायतन असते . कळंबस्ते येथे तर साक्षात पंचायतनचे मंदिर आहे . प्रत्येकाने आवर्जून भेट द्यावी आणि नतमस्तक व्हावे असे हे ठिकाण सर्वांगसुंदर बनवण्यात मोठा वाटा आहे , तो येथील स्थानिक ग्रामस्थांचा .
जिद्द आणि चिकाटी अंगी असली की , अशक्य ते शक्य करता येतं . हे दाखवून दिलंय ते कळंबस्ते साटलेवाडी आणि परिसरातील ग्रामस्थांनी . रामेश्वर पंचायतन मंदिर परिसर म्हणजे भग्नावस्थेत असलेले घुमट आणि अधिक दुर्लक्ष झाल्यास कोणत्याही क्षणी कोसळतील अशा मुख्य मंदिराच्या आवारातील चार छोटी मंदिरे . सभामंडप कोसळलेला आणि त्याच स्थितीत अनेक वर्षे जागेवरच असलेल्या स्थितीत . मंदिरात जायचे म्हणजे सर्वत्र वेली आणि जाळ्यांनी वेढलेले असल्याने वाट काढतच जायचे . सर्व घुमटांवर मोठी झुडपे तयार होवून त्यांचा विस्तार झालेला . सारं दृष्य म्हणजे लवकरच पंचायतन परिसर भग्न होणार अशा स्वरुपाचे . फणसवणे येथील आमचे पत्रकार मित्र सत्यवान विचारे यांनी या मंदिराची महती एक दिवशी कथन केली आणि यासाठी काहीतरी केलं पाहिजे असा आग्रह देखील धरला . एक दिवस ठरवून पत्रकार सत्यवान विचारे , पत्रकार दीपक भोसले यांच्या सोबत आम्ही कळंबस्ते साटलेवाडीत पोहचलो . जातांना नारळ उदबत्ती घ्यायला विसरलो नाही . साटलेवाडीत गेल्यानंतर मंदिराच्या पूजाऱ्यांना घेऊन आम्ही मंदिर परिसरात पोहचलो , तर समोरील भग्नावस्था आणि वेली – जाळ्या पाहून मन हेलावले . असामान्य महत्व असणाऱ्या या ठिकाणाची अशी अवस्था का बरं झाली असेल ? असा पहिला प्रश्न पडला .
सभामंडपाच्या पायऱ्या चढून आम्ही वर आलो , तर काय मोडलेल्या सभामंडपात सर्वत्र वेली , जाळ्या आणि झुडपं वाढलेली . अशा स्थितीत एका अलंकृत आणि रुबाबदार नंदिने आमचे लक्ष वेधले . पत्रकारीता करतांना काहीतरी वेगळं वाचायला द्यायचे या उद्देशाने मी रत्नागिरी जिल्हा फिरलोय , मात्र पंचायतन मंदिराच्या सभामंडपात असणारा नंदि मी अन्यत्र कोठेही पाहिलेला नाही . अलंकृत असणारा हा नंदि एका बाजूला रेलल्यासारखा भासतो . नंदिवर एवढे बारीक अलंकरण केलेले मी प्रथमच पहात होतो . त्याचा आकारही तुलनेत भव्य असल्याचे जाणवले . आता गाभाऱ्यात जाण्यासाठी आम्ही पाऊल घातले खरे , मात्र आमची चाहूल लागताच शेकडो वटवाघळे बाहेर पडू लागली . आत जावून पाहिले , तर तेवढीच वटवाघळे मंदिराच्या घुमटाला लटकत होती . गाभाऱ्यात सर्वत्र कुबट वास येत होता . तेवढ्यात नजर गेली ती , येथील शिवलिंगावर . अचानक काय घडलं माहित नाही , या शिवलिंगाची लकाकी माझ्या डोळ्यात भरली . या प्रसंगातून योग्य ते अंजन माझ्या नेत्रात पडले होते . अशा प्रकारचे शिवलिंग मी प्रथमच पहात होतो . शिवलिंगाच्या बरोबर पाठीमागे संगमरवरातील अष्टदुर्गेची मूर्ती विराजमान आहे . एवढी सुबक मूर्ती मी प्रथमच पहात असल्याने काही केल्या या मूर्तीवरुन नजर हटत नव्हती . एवढ्यातच मंदिराचे पूजारी चला बाहेरची छोटी मंदिरे पाहूया ! असे म्हणाले आणि मन भानावर आले . बाहेर जाण्यापूर्वी सोबत आणलेले श्रीफळ भगवान शंकरासमोर ठेवून आम्ही लवकरात लवकर या मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा म्हणून आणि त्यामध्ये आमच्या हातून काही सेवा घडावी म्हणून प्रार्थना केली .
जांभ्या दगडात उभारण्यात आलेले हे मंदिर भग्न स्थितीत आणि वेली – जाळ्या वाढलेल्या असतांनाही रेखीव असल्याचे भासत होते. मंदिराला असणारी तटबंदी एका रेषेत आणि मजबूत असल्याचे दिसत होते. मंदिराच्या प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर दोन्ही बाजूला उंच दीपमाळा आहेत . मध्यभागी शिवमंदिर आणि चार कोपऱ्यात गणपती , अष्टदूर्गा , सुर्यनारायण आणि विष्णूच्या मूर्ती असणारी छोटी मंदिरे असे मिळून रामेश्वर पंचायतन तयार झाले आहे. येथील गणपती उजव्या सोंडेचा आहे . विशेष म्हणजे चार कोपऱ्यात असणाऱ्या देवतांच्या मूर्ती आकाराने सारख्याच आहेत . याबरोबरच मंदिरांची उंची देखील एकसारखीच आहे . या मंदिरांवरही वेली आणि जाळ्या वाढलेल्या होत्या . पंचायतनातील सर्व मूर्ती या अप्रतिम संगमरवरात कोरलेल्या असल्याने त्यांचे एक वेगळेच तेज जाणवत होते . अशा प्रकारचे पवित्र ठिकाण जवळपास नसल्याने आपण काहीतरी प्रयत्न करायचे असा मंदिराच्या प्रांगणात परत एकदा चंग बांधला . मंदिराच्या मागे एक सुंदर तळी असून तीचे देखील चारही बाजूने जांभ्या दगडात बांधकाम केलेले आहे . एकूणच सारा परिसर अनन्यसाधारण असल्याने याचा जीर्णोद्धार होण्याच्या दृष्टीने आपली लेखणी उपयुक्त ठरली पाहिजे याची मनाशी खूणगाठ बांधली आणि परत एकदा मनोमन नतमस्तक झालो .
प्रथम मंदिर उभारणीचा इतिहास जाणून घेणं महत्वाचे होते . इतिहास जाणतांना जी माहिती मिळाली , ती मोठी रंजक होती . कळंबस्ते येथील एक गानू नामक व्यक्ती मध्यप्रदेशला अहिल्याबाई होळकर यांच्या संस्थानात सेवेत होती. अहिल्याबाई या शिवभक्त असल्याने त्यांनी काही शिवधन या गानूंच्या हाती सोपवून त्यांच्या गावात शिवमंदिर उभारायला सांगितले. त्यानुसार या मंदिराची उभारणी झाली . मंदिरात असणाऱ्या सर्व मूर्ती या त्याकाळात घोड्यावरुन कळंबस्ते येथे आणण्यात आल्या . एवढा जबरदस्त आणि ताकदवान इतिहास या मंदिरामागे असल्याने जीर्णोद्धार लवकरात लवकर व्हावा याबाबत एक नवी उर्जा मिळाली . एकतर पंचायतनचे पवित्र ठिकाण परिसरात जवळपास नाही आणि दुसरे म्हणजे अप्रतिम कोरीवकाम आणि लकाकी असलेल्या मूर्ती . मंदिराजवळ निगडित काही मंडळींजवळ संपर्क केला . त्यांच्या सोबत बैठकाही पार पडल्या . याबाबत वृत्तपत्रातून सविस्तर लेखनही केले . मंदिराचे महत्व ओळखून देश विदेशातून मदत देण्यासाठी इच्छूक असल्याचे फोन आले . मात्र यासाठी आवश्यक असणारा पुढाकार घ्यायचा कोणी ? या प्रश्नावरुन जीर्णोध्दार कामाला काही गती येत नव्हती. अखेरीस कळंबस्ते साटलेवाडी येथील स्थानिक ग्रामस्थ , मुंबईकर मंडळी , गानू मंडळी यांनी एक बैठक घेऊन मंदिर जीर्णोध्दार करण्याचा जणू चंगच बांधला. वाडीतील प्रत्येक घरामागे वर्गणी काढून , प्रत्यक्ष मंदिर जीर्णोध्दार कामाला सुरुवात झाली.
विशेष म्हणजे साटलेवाडीतील माहेरवाशीणी , वाडीतील ग्रामस्थांचे नातेवाईक आणि विशेष म्हणजे मुंबईकर कार्यकर्ते यांनी जणू चंग बांधला आणि वर्षभरातच मंदिर परिसराला नजर लागेल असा जीर्णोध्दार करुन दाखवला . या मंदिराला जी नवी झळाळी मिळाली आणि आणखी एक पवित्र वास्तू जमिनदोस्त होण्यापासून वाचवली , ती साटलेवाडीतील ग्रामस्थांच्या एकजुटीनेच . या शिवमंदिरात आता महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न होवू लागलाय . जीर्णोध्दार करतांना हाती फारसा निधी नसतांना कोठेही काटकसर केली नाही हे निश्चितच कौतूकास्पद म्हटले पाहिजे . केल्याने होत आहे रे , आधी केलेची पाहिजे ही म्हण साटलेवाडीतील ग्रामस्थांनी सत्यात उतरवून दाखवली . पत्रकार म्हणून आम्ही केवळ निमित्तमात्र होतो . पंचायतनाचे हे ठिकाण खूप स्थानमाहात्म्य असणारे आहे . याबरोबरच येथे पोहचल्यानंतर वातावरणातील पावित्र्यही जाणकारांना सहज लक्षात येते . ज्यांना शक्य आहे त्यांनी लॉकडाऊन उठल्यानंतर आवर्जून या मंदिराला भेट द्यावी . संगमेश्वर ते कसबा येथून पुढे फणसवणे येथे गेल्यानंतर डावीकडील पूलाकडे न जाता सरळ उमरे मार्गावर जायचे . तेथून कळंबस्ते हायस्कूल जवळून पुढे गेल्यानंतर एक छोटा पूल लागतो त्याच्या पुढे उजव्या हाताला वळल्यानंतर तो रस्ता साटलेवाडी येथील रामेश्वर पंचायतन मंदिराकडे जातो . रस्त्यावरुन थोडेसे अंतर चालावे लागते . मात्र कोणाला त्रास होवू नये म्हणून ग्रामस्थांनी छान पायवाट बांधली आहे . छायाचित्र पाहिल्यानंतर जिल्ह्यातील भाविक तर नक्कीच या मंदिरात जातील , पण कोकणात पर्यटनासाठी येणाऱ्या भाविकांनीही पंचायतन मंदिर पहावे आणि शक्य झाल्यास बाजूच्या उर्वरित मंदिराच्या जीर्णोध्दारासाठी यथाशक्ती देणगी द्यावी आणि हा पूरातन ठेवा जपण्याच्या कामातील एक साक्षीदार बनण्याचा आनंद घ्यावा .
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.