July 27, 2024
Karneshwar Kirnoushav article by J D Paradkar
Home » कर्णेश्वरांचा किरणोत्सव !
पर्यटन

कर्णेश्वरांचा किरणोत्सव !

कर्णेश्वर मंदिराच्या आतील आणि बाहेरील प्रत्येक शिल्प म्हणजे अभ्यासाचा आणि प्रबंधाचा विषय आहे . या प्रत्येक शिल्पात दडलेला अर्थ आणि याचे महत्व जाणून घेणे ही अभ्यासकांसाठी एक पर्वणीच असते. कर्णेश्वर या विषयावर जेवढे लिहीले जाईल तेवढे थोडेच आहे . मात्र यावर अभ्यासात्मक लिहावे एवढा माझा आवाका नसल्याने अनुभव आणि महत्व एवढ्यावरच मर्यादित लिहिण्याचा मी प्रयत्न करत असतो.

जे . डी . पराडकर 9890086086
jdparadkar@gmail.com

उत्सव आणि कोकण यांचे नाते अतूट आणि भावनाप्रधान असे आहे. उत्सव हे परंपरा पाळण्यासाठी आणि प्रथा जपण्यासाठी संपन्न होत असतात . ऐतिहासिक गाव अशी ओळख असणाऱ्या कसबा या गावात संपन्न होणारे वर्षभरातील सारे उत्सव म्हणजे आमच्या शालेय जीवनात आम्हाला मोठी पर्वणीच असायची. १९८० च्या दशकात आकाशवाणी तसेच उत्सवानिमित्त संपन्न होणारी स्थानिक कलाकारांची नाटके, कीर्तन, भजन या व्यतिरिक्त करमणुकीची साधने उपलब्ध नसल्याने यासाठी परिसरातून मोठी गर्दी व्हायची. उत्सवाच्या निमित्ताने भेटीगाठी होत आणि साहजिकच विचारांची देवाणघेवाण केली जाई. उत्सवात अंगमेहनत करण्यासाठी शेकडो हात पुढे येत त्यामुळे उत्सव उत्साहात आणि पूर्वीच्या प्रथा परंपरेनुसार संपन्न होत.

कसबा या ऐतिहासिक गावाची ओळख राज्यासह अन्यत्र मंदिरांचे गाव अशी आहे. याबरोबरच छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या दीर्घकालीन वास्तव्यामुळे या भागाला इतिहासातही मानाचे स्थान प्राप्त झालेले आहे. कसबा येथील कर्णेश्वर मंदिर म्हणजे शिल्पकलेचा अद्भुत आविष्कार असून ११ व्या शतकात चालुक्य राजांनी या मंदिरासह परिसरातील अन्य मंदिरांची उभारणी केली. या मंदिराचा कालावधी आणि उभारणी करणारे राजे यांच्याबद्दलची माहिती उपलब्ध असली तरी उभारणी करताना लागलेला एकूण कालावधी, कलाकार, वापरण्यात आलेले तंत्र याविषयी ठोस माहिती पुढे आलेली नाही. बालपणी आणि कसबा येथील आमच्या वास्तव्यात आम्हाला जो अद्भुत प्रसंग पहायला मिळाला नाही अथवा दिसला असला तरी त्याचे महत्व समजले नाही असा कर्णेश्वर मंदिरात पिंडीवर होणारा सोनेरी किरणांचा अभिषेक म्हणजेच किरणोत्सव हा एक जबरदस्त ताकदीचा सोहळा म्हटला पाहिजे. एखाद्या तपस्व्याला साक्षात भगवंताने दर्शन दिले तर , समोरील तेजाने जसे नेत्र दिपून जातात अगदी तशीच अनुभूती कर्णेश्वरच्या किरणोत्सवा दरम्यान येथील गाभाऱ्यात येत असते.

या मंदिराच्या आतील आणि बाहेरील प्रत्येक शिल्प म्हणजे अभ्यासाचा आणि प्रबंधाचा विषय आहे . या प्रत्येक शिल्पात दडलेला अर्थ आणि याचे महत्व जाणून घेणे ही अभ्यासकांसाठी एक पर्वणीच असते. कर्णेश्वर या विषयावर जेवढे लिहीले जाईल तेवढे थोडेच आहे . मात्र यावर अभ्यासात्मक लिहावे एवढा माझा आवाका नसल्याने अनुभव आणि महत्व एवढ्यावरच मर्यादित लिहिण्याचा मी प्रयत्न करत असतो.

आमच्या बालपणात कर्णेश्वर हा नेहमीच सर्व सवंगड्यांचा आधारस्तंभ म्हणून गणला गेला आहे . कोणतेही धाडस कर्णेश्वरांचे समोर नतमस्तक झाल्याशिवाय कधीही कोणी केले नाही . शाळेतील परीक्षा असोत अथवा अन्य कोणत्याही स्पर्धा , प्रथम कर्णेश्वरांसमोर नतमस्तक होऊनच पुढे जाण्याची प्रत्येकाची पध्दत होती . कर्णेश्वर मंदिरात संपन्न होणाऱ्या महाशिवरात्रीच्या उत्सवाचे वेध आम्हाला किमान १५ दिवस आधी लागायचे . महाशिवरात्र हा जरी कर्णेश्वर मंदिरात संपन्न होणारा उत्सव असला तरी आम्हा मुलांसह ग्रामस्थांसाठी देखील हा आनंदोत्सव ठरायचा . जसजशी यात्रा जवळ यायची तसा उत्साह वाढत वाढत जायचा . महाशिवरात्र म्हणजे गावातील प्रत्येकाला आपल्या घरातील सण – उत्सव असल्याचा आनंद आणि उत्साह असायचा . माहेरवाशीणींना हक्काने माहेरी यायला आणि चार दिवस रहायला महाशिवरात्र उत्सव कारणीभूत ठरत असे .

कसबा संगमेश्वर म्हणजे प्राचीन आणि स्थापत्य शैलीच्या अजोड नमुना असलेल्या मंदिरांचे गाव . कर्णेश्वर मंदिराची निर्मिती अकराव्या शतकात झाली . या मंदिरात प्रवेश करण्यासाठी तीन दरवाजे आहेत . पूर्वाभिमुखी मुख्य प्रवेशद्वारावर शिवपंचायतन सुबक पध्दतीने कोरलेले आहे . डाव्या बाजूच्या दरवाजावर नरकासुर आणि उजव्या बाजूच्या दरवाजावर किर्तीसूर मूर्ती कोरलेल्या आहेत . मुख्य मंडपात भव्य असे भगवान शंकरांचे वाहन नंदी आहे. याच मंडपात डाव्या बाजूस श्री महालक्ष्मीची मूर्ती आणि उजव्या बाजूस शेषशाही विष्णूची मूर्ती आहे. कर्णेश्वर मंदिरात देवदानव , नृत्यांगना, किन्नर, यक्षयक्षिणी आदिंच्या सुंदर मूर्ती जागोजागी दृष्टीस पडतात. अनेक शतकांपूर्वी हिंदुस्तानातील स्थापत्यशास्त्र किती प्रगत होते याची साक्ष देणाऱ्या अनेक वास्तू यापैकी कर्णेश्वर मंदिर हे एक उदाहरण होय. मंदिराच्या बाहेरील उत्तर बाजूस सूर्यमूर्ती आणि समोर प्रेक्षणीय गणेश मंदिर आहे.

मूर्तीशास्त्राचा अभ्यास करणाऱ्यांसाठी माहितीचा खजिना असलेला कसबा संगमेश्वरचे शिल्प वैभव नेहमीच स्वागतास सज्ज आहे . मंदिराच्या निर्मिती मध्ये योगशास्त्रासह , भूगोल , भौतिक , गणित , भूमिती आदि शास्त्रे वैज्ञानिक तत्वे तसेच गुरुत्वाकर्षण व इतर नियमांचा वापर केलेला आहे . सूर्यकिरणांनुसार रचना हे अनेक मंदिरांचे वैशिष्ट्य आहे . काही मंदिरातील मूर्तीवर एका ठराविक दिवशीच सूर्योदयाची पहिली किरणे पडतील अशी वास्तू रचना केलेली दिसते . अनेक मंदिरांसमोर लहानलहान झरोके असतात . यातून कोणत्याही ऋतूत सूर्याची पहिली किरणे मूर्तीवर पडतात . कोणार्कचे सूर्यमंदिर , अजिंठा वेरुळ , पुण्याजवळील यवत टेकडीवरील शिवमंदिर , करवीर निवासिनी अंबाबाई , ज्योतिबा डोंगरावरील मंदिरासह आता कर्णेश्वर मंदिरातही किरणोत्सव दरवर्षी पहायला मिळणार आहे . वास्तू उभारणी करताना पृथ्वीच्या गतीचा बारकाईने अभ्यास करून सूर्याच्या दक्षिणायन आणि उत्तरायण याचा अचूक अभ्यास केला जातो . सूर्याच्या दक्षिणायन आणि उत्तरायण प्रारंभाच्या वेळी होणारा किरणोत्सव हा पुरातन काळातील प्रगत स्थापत्य आणि खगोलशास्त्राचा एक अभूतपूर्व असा सुरेख संगमच आहे .

कसबा गावात वास्तव्याला असताना माझ्या दृष्टीला किरणोत्सव आलेला नाही. एखाद्या वेळी जर सूर्यकिरण पिंडीवर पडले आहेत असे दृश्य पाहिले असले तरी, त्याला किरणोत्सव म्हणतात याची कल्पना नसल्याने वेगळ्या दृष्टीने हे दृश्य पहाणे एवढे ज्ञान नव्हते. कर्णेश्वर मंदिराचे पुजारी असलेल्या लिंगायत यांच्या कुटुंबातील अनेकांनी शिवपिंडीवर पडणाऱ्या सूर्यकिरणांचे दृश्य पाहिले होते. मात्र पूर्वी मोबाईल अथवा अन्य सोशल मिडीया उपलब्ध नसल्याने अशी गोष्ट पसरवणे शक्य नव्हते. याबरोबरच हा प्रसंग अद्भुत आहे असेही वाटले नसावे.

१५ मार्च २०१० साली आमचे छायाचित्रकार मित्र मकरंद सुर्वे यांनी प्रथम मला कर्णेश्वर मंदिरातील शिवपिंडीवर सोनेरी सूर्यकिरणे पडलेले सुंदर छायाचित्र दिले होते. छायाचित्रातील नयनरम्य दृश्य पाहून मनात प्रसन्न वातावरण निर्माण झाले. या छायाचित्राने मला लेखन करण्यास भाग पाडले. ” कसब्याच्या कर्णेश्वरावर सोनेरी किरणांचा अभिषेक ” अशा शीर्षकाचे वृत्त मी सामना आणि लोकसत्ता मध्ये १६ मार्च २०१० रोजी छापले होते . यानंतर या घटनेचा शास्त्रीय अभ्यास तसेच कुतूहल म्हणून अधिक माहिती घेणे राहून गेले .

गतवर्षी कसबा येथील रहिवासी आणि व्यावसायिक गजेंद्र शिवाजी देशमुख यांना कर्णेश्वर मंदिरात मार्च महिन्यातच शिवपिंडीवर सूर्यकिरणे पडल्याचे अद्भुत दृश्य पहायला मिळाले आणि त्यांनी याची अनेक छायाचित्रे घेऊन ती मित्रमंडळींना पाठवली . यावर्षी देखील गजेंद्र देशमुख या किरणोत्सवावर बारीक लक्ष ठेवून होते.

सकाळच्या प्रसन्न वेळी चालायला बाहेर पडणे हा गजेंद्र यांचा नित्यनियम आहे. काही ठराविक अंतर चालून झाले की घरी परतताना ते कर्णेश्वरांचे दर्शन घेऊनच जातात हा गेली बारा वर्षे त्यांचा नेम सुरु आहे. सकाळच्या वेळी दर्शनाला जाण्याची वेळ मागेपुढे होत असल्याने त्यांना शिवपिंडीवर सूर्यकिरणे दिसण्याचा योग आला नव्हता. गतवर्षी मात्र त्यांना हे अद्भुत दृश्य दिसले आणि त्यांनी वर्षभर वाट पहायची ठरवली . यावर्षी मार्च महिना सुरु होताच अगदी पहिल्या दिवसापासून सूर्योदय झाल्यानंतर गजेंद्र कर्णेश्वर मंदिरात थांबू लागले. त्यांनी केलेल्या प्रतिक्षेचे फळ त्यांना प्रथम १२ मार्च रोजी याची देही – याची डोळा पहायला मिळाले. मंदिराच्या प्रवेशद्वारातून पहिल्यांदा १२ मार्च रोजी सूर्यकिरणे आतमध्ये येण्यास सुरुवात झाली. मुख्य प्रवेशद्वारातून सभामंडपाच्या प्रवेशद्वारात , त्यानंतर हळूहळू शंभू महादेवांचे वाहन असलेल्या नंदीवर जेंव्हा सूर्यकिरणे पोहचली त्यावेळी पहायला मिळालेले दृश्य हे अक्षरशः भाग्यवंतालाच पहायला मिळते असे होते. नंदीवर सूर्यकिरण पडल्यानंतर नंदीची सावली मोठी झाली आणि तो जागेवरुन उठून शिवपिंडीवर नतमस्तक होण्यासाठी गेल्याचा नयनरम्य सोहळा समोर दिसत होता . या लेखासोबत गजेंद्र देशमुख यांनी काढलेली जी छायाचित्रे आहेत त्यामध्ये नंदीच्या उंच सावलीचे एक छायाचित्र आहे . छायाप्रकाशाचा हा खेळ म्हणजे मंदिर स्थापत्यशास्त्राच्या कल्पकतेचा आणि अभ्यासाचा अद्वितीय आविष्कार म्हटला पाहिजे .

गजेंद्र देशमुख यांनी मला ही नेत्रदीपक छायाचित्र पाठविल्यानंतर यावेळी देखील याबाबतचे वृत्त प्रसिध्द केले होते . मात्र ही छायाचित्र पाहिल्यानंतर आणि याबाबत थोडा बारकाईने विचार केल्यावर कसबा डायरीत ” कर्णेश्वरचा किरणोत्सव ” हा विषय विस्तृतपणे यायला हवा असे वाटले म्हणून हा लेखनप्रपंच . गजेंद्र यांच्याकडून त्यांना आलेले अनुभव विचारले , छायाचित्रे पाहिली आणि दरवर्षी होणारा हा सोहळा पहाण्यासाठी भाविकांनी यावे , या घटनेचा प्रसार व्हावा या उद्देशाने लेखन करण्याचा प्रयत्न केला आहे . करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरातील किरणोत्सव जगभर पोहचला आहे. तद्वत कर्णेश्वर मंदिरातील किरणोत्सव जगभर पोहचवण्याचा हा प्रयत्न आहे . मार्च महिन्यातील १२ तारखेला सुरु झालेला हा किरणोत्सव २५ मार्च पर्यंत म्हणजे जवळपास १४ दिवस सुरु होता . सूर्यकिरणे उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकत असल्याचे दिसून येत होते . १५ ते १७ मार्च या दरम्यान शिवपिंडीवर पूर्णतः सूर्यकिरणे पडलेली पहायला मिळाली . यातील १७ मार्च हा दिवस गजेंद्र देशमुख यांना किरणोत्सवाचा मुख्य दिवस असल्याचे जाणवले . काहीसा तांबूस आणि सोनेरी प्रकाश ज्यावेळी शिवपिंडीवर पूर्णतः पडला त्यावेळी उपस्थित सारे आपोआपच शंभूमहादेवांसमोर नतमस्तक झाले . हे दृश्य नजरेत आणि हृदयात कायमस्वरूपी साठवून ठेवण्यासारखे होते . एखाद्या तपस्व्याला साक्षात भगवंताने आपल्या दिव्य रुपात दर्शन दिल्यानंतर निर्माण होणारा दिव्य आणि प्रखर प्रकाश नेत्रांना सहन करणे कठीण होते तशीच स्थिती कर्णेश्वर मंदिरात पहायला मिळाली .

डोळे दीपणे म्हणजे काय , याची अनुभूती या किरणोत्सवाच्यावेळी आली . या सूर्यकिरणांनी शिवपिंडीवर जणू सोनेरी अभिषेक केल्यासारखे वाटत होते . शंभूमहादेवांचा गाभारा या दिव्य आणि सोनेरी प्रकाशाने उजळून निघाला आणि सारे वातावरण कमालीचे प्रसन्न झाले . या मनमोहक दृश्यामुळे निर्माण झालेल्या शांतेतून सूर्यकिरणांच्या हालचाली नजरेला स्पष्ट दिसून आल्या . सूर्यदेव साक्षात शिवपिंडीवर आपल्या किरणांचा अभिषेक करत असल्याची ही अनुभूती पहायला मिळणे देखील भाग्याचे म्हटले पाहिजे . सकाळी ०७ वाजून ०५ मिनिटे ते ०७ वाजून २५ मिनिटांपर्यंत असा एकूण २० मिनिटे हा किरणोत्सवाचा कालावधी असल्याचे दिसून आले . या १४ दिवसात एकच दिवस १८ मार्च रोजी वातावरण ढगाळ असल्याने किरणोत्सव झाला नाही . अन्य १३ दिवस मात्र हा नयनरम्य सोहळा सुरुच होता . या सर्व दिवशी अचूक वेळी गजेंद्र देशमुख कर्णेश्वर मंदिरात हजर रहात होते . पूर्वाभिमुख मंदिराची उभारणी करण्यापूर्वी कर्णेश्वर मंदिराच्या स्थापत्यविशारदांनी केलेला अभ्यास , त्यानंतरची रचना हे सारे त्याकाळातही किती प्रगत शास्त्र होते याची अनुभूती येते . मंदिर उभारणी आधी या सूर्यकिरणांचा अभ्यास केला गेला असणार यात शंका नाही . मंदिराचा पाया किती उंच असावा , प्रवेशद्वाराची उंची किती असावी , नंदीची उंची आणि शिवपिंडीची रचना या साऱ्या रचनेचा बारकाईने आणि कल्पकतेने झालेला अभ्यास आता सहज लक्षात येतो . कसबा येथील कर्णेश्वर मंदिरात मार्च महिन्यात संपन्न होणारा हा किरणोत्सवाचा सोहळा पुढील वर्षी अधिक भव्य स्वरूपात व्हावा , अनेक भक्तगणांनी येथे येऊन शिवपिंडीवरील सोनेरी किरणांचा अभिषेक पहावा हीच कर्णेश्वरांच्या चरणी नम्र प्रार्थना .

( सर्व छायाचित्रे : गजेंद्र देशमुख कसबा )


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

ओवी मोक्षपटाची…

ज्ञानेश्वरीसह गीता तत्त्वज्ञान नित्य नुतन

दाहक वैश्विक वास्तवाचा वेध घेणारी कादंबरी कडेलूट

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading