July 27, 2024
Review of Usawan Laxman Divte Book
Home » खेड्यातील प्रखर वास्तव : ‘ उसवण ‘
मुक्त संवाद

खेड्यातील प्रखर वास्तव : ‘ उसवण ‘

लक्ष्मण दिवटे लिखित ‘ उसवण ‘ या संग्रहातील कथा शेतकरी आणि शेतमजूरांच्या बारोमास कष्ट करीत जगण्याचे भयावह आणि प्रखर वास्तव त्यांच्याच बोली भाषेतून अगदी जिवंतपणे साकारणारी आहे. ही कथा कालबाह्य रुढी, अंधश्रद्धा, परंपरा यांवर आघात करून दलित समाजात घडून येणाऱ्या सामाजिक परिवर्तनाची नोंदही घेणारी आहे.

उमेश मोहिते मो.७६६६१८६९२८

बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील बीडसांगवी या गावचे लेखक लक्ष्मण दिवटे यांचा ‘ उसवण ‘ हा लघुकथा संग्रह आहे. यामध्ये सतरा ग्रामीण लघुकथांचा समावेश असून राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या अनुदानामधून अमरावतीच्या पायगुण प्रकाशनातर्फे प्रकाशित झाला आहे. या कथा वर्तमानकालीन भेदक ग्रामीण वास्तवाचे जिवंत चित्रण करणाऱ्या आहेत. शेतकरी व शेतमजूर यांचे कृषिक्षेत्राशी निगडित जगणे आणि त्यांच्या जगण्यातील विविध ताणे-बाणे, संघर्ष, त्यांची सुख-दुःखे व हर्ष-विमर्ष असा आशयाचा विस्तृत परीघ असलेल्या या कथा कृषिवलांच्या कष्टप्रद जगण्याचा सार्थ वेध घेण्याच्या आशयसूत्राभोवती गुंफल्या आहेत.

दत्तू पाटील जेंव्हा कांदा मार्केटला घेऊन येतो तेव्हा कांद्याचे भाव पडतात आणि त्यामुळे त्याच्या मुलीचे जमलेले लग्न मोडते, याची दर्दभरी कहाणी ‘ ठिगळ ‘ कथेत आली आहे, तर पावसाळी दिवसात पाऊस आल्याने शेतातून परतताना गावच्या ओढ्याला आलेल्या पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्यानं वाहून जाणाऱ्या बळीची कहाणी ‘ आसवांचा पूर ‘ कथेत चितारली आहे. गावात पोळ्याच्या सणानिमित्ताने स्वतःची पाटील म्हणून प्रतिष्ठा वाढावी या हेतूने खिल्लारी बैलं भाड्याने आणणाऱ्या विष्णू पाटलाचे हे गुपित उघडे पडल्यानंतर त्याची होणारी नाचक्की ‘ बेगड ‘ कथेत नेमकी वर्णिली आहे, तर लक्ष्मी आईच्या नवसानं मूल झाले म्हणून पोतराज बनलेला मरीबा डोक्याचे केस कापून आणि आभरान त्यागून शिक्षणाची कास धरतो, असा आशय असलेली ‘ खीळ ‘ ही कथा अंधश्रध्देवर प्रहार करते.

कलाकेन्द्रातल्या चंपाबाईच्या नादी लागून भिकेला लागलेल्या मोहनराव सावकाराची डोळ्यात अंजन घालणारी कहाणी ‘ रुतलेला काटा ‘ कथेत आली असून ही कथा चंगळवादी मानसिकतेची लागण आज ग्रामीण भागालाही कशी झाली आहे,याची चुणूक दर्शवते. ‘ आईचं घर ‘ आणि ‘ जोडवं ‘ या कथांतूनही शहरी संस्कृतीच्या प्रभावामुळे पोटी मुलं असुनदेखील कष्ट करून जगण्याची पाळी आलेल्या वृद्धांच्या जगण्याचे मनाला चटका लावणारे चित्र साकारले आहे.

गरीब ऊसतोड मजूरांचे मुकादमांकडून होणारे मानसिक, आर्थिक व शारीरिक शोषणाचे चित्रण ‘ उसवण ‘ या शीर्षक कथेत रेखाटले असून ही कथा ऊसतोडमजूरांचे कष्टमय जीवन उजागर करते, तर ‘ वंशाला मुलगाच हवा ‘ या मानसिकतेतून उद्भवणाऱ्या स्त्रीभ्रूण हत्येसारख्या गंभीर समस्येवर प्रकाशझोत टाकणारी ‘ हीच माझी मुलं ‘ ही कथा आहे. सततच्या अस्मानी आणि सुल्तानी अरिष्टांमुळे आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू पाहणाऱ्या हरिला त्याची छोटी मुलं कशी आत्महत्येपासून रोखतात, याचे वाचक मनाला दिलासा देणारे चित्रण ‘ आपण सारे जगूया ‘ या कथेत आले आहे, तर ‘ थोरली बहीण ‘ आणि ‘ आई ‘ या कुटुंबकथा घरोघरच्या अंतर्गत कलहाचे दर्शन घडवतात.

गावातल्या धनिक पाटलाच्या विरोधामध्ये रणशिंग फुंकत गावकीची पारंपरिक गलिच्छ कामं नाकारणाऱ्या मातंग समाजातील परिवर्तनाचे चित्र ‘ गावकी ‘ कथेत उमटले आहे, तर उन्मत्त आणि अहंकारी माणसाचे गर्वहरण कधीतरी होतच असते, असा मौलिक संदेश ‘ मातीचं इमान ‘ या कथेतून दिला आहे. गावाच्या शीवेवर आलेला मरीआईचा गाडा स्वप्नात पाहिल्याच्या लक्षूदादाच्या अंधश्रध्देवर प्रहार ‘ शीवंवरचा गाडा ‘ कथेत केला आहे, तर एकतारी वाजवत भजन गाऊन पोट भरणाऱ्या गरीब तुकादादाची करुण कहाणी ‘ गोधडी ‘ या कथेत रंगवली आहे.

लक्ष्मण दिवटे लिखित ‘ उसवण ‘ या संग्रहातील कथा शेतकरी आणि शेतमजूरांच्या बारोमास कष्ट करीत जगण्याचे भयावह आणि प्रखर वास्तव त्यांच्याच बोली भाषेतून अगदी जिवंतपणे साकारणारी आहे. ही कथा कालबाह्य रुढी, अंधश्रद्धा, परंपरा यांवर आघात करून दलित समाजात घडून येणाऱ्या सामाजिक परिवर्तनाची नोंदही घेणारी आहे. सशक्त आशय, नेटके प्रसंग आणि ओघवत्या निवेदन शैलीमुळे ही कथा मनाचा ठाव घेते.पण असे असले तरी एक-दोन उणिवा मात्र जाणवतात. ‘पाचर ‘ व ‘ आपण सारे जगूया ‘ या दोन कथांतील पात्रे अकृत्रिम न वाटता रचलेली वाटतात आणि या दोन्ही कथांचा घाटही काहिसा विसविशीत झाला आहे.

या कथासंग्रहातून अस्सल ग्राम जीवनाची जाण आणि भान सामर्थ्यानिशी प्रकट झालेले आहे.

लेखक विलास सिंदगीकर

पुस्तकाचे नाव – उसवण ( कथासंग्रह )
लेखक – लक्ष्मण दिवटे
प्रकाशक – पायगुण प्रकाशन,अमरावती ( मो.९०११३९४९०५ )
पृष्ठे – १५६
मूल्य – ७२ रुपये
मुखपृष्ठ – सरदार जाधव


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

आत्मज्ञान प्राप्तीसाठी करावा दृढसंकल्प

स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी केली तर शेतकऱ्यांच्या समस्या सुटतील का ?

चांगले विचार हे पेरावे लागतात

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading