आदरणीय रमेश वरखेडे सरांनी आपले गुरू म. सु. पाटील यांच्याशी अमेरिकेतून पत्ररूपाने केलेला हा संवाद प्रत्येकाने ऐकावा असा आहे.
– नंदकुमार मोरे, कोल्हापूर
गुरूशिष्य हे मानवी जीवनातील अनेक सुंदर नात्यांपैकी एक नाते आहे. ते गुरूशिष्य मिळून गोड करत नेतात. या नात्याला परस्परांच्या सहवासाने अनेक पालव्या फुटतात. त्यामध्ये आदर, निष्ठा, प्रेम आणि मैत्र असे सारेच रंग मिसळून जातात. अशा अलौकिक नात्याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणून हा संवाद ऐकता येईल. हा संवाद म्हणजे शिष्याचे गुरूजवळ कथन केलेले हृद्गत आहे. आदरणीय रमेश वरखेडे सरांनी आपले गुरू म. सु. पाटील यांच्याशी अमेरिकेतून पत्ररूपाने केलेला हा संवाद प्रत्येकाने ऐकावा असा आहे. वास्तविक हे पत्र म्हणावे, की एखादा नितांत सुंदर ललित लेख हेच प्रथम लक्षात येत नाही.
बऱ्याचदा एखाद्या अनवट अनुभवानंतर आपले मन हरकून जाते. अशा वेळी आलेला अनुभव आपल्या जवळच्या व्यक्तीजवळ कधी एकदा कथन करतो, असे होते. आजच्या जमाण्यात तर तो तात्काळ सांगायला व्हाट्सअप आहे. काही दिवसांपूर्वीपर्यंत प्रत्यक्ष भेट अन्यथा पत्र हेच हाती असलेले माध्यम. अशा पत्रांमधूनच माणूस खऱ्या अर्थाने व्यक्त होत असे. परस्परांमधील नाते त्यातून समजत असे. हे असेच एक पत्र आहे. ज्यातून या दोघांमधले नाते कळते.
या पत्रात बऱ्याच गोष्टी आहेत. अमेरिकेत पडलेल्या एका स्वप्नाचे कथन आहे. हे स्वप्न म्हणजे अमेरिका-भारत (नाशिक) असा एक धागा आहे. तेथील सियाटलजवळ वसवलेल्या बिल गेट्सच्या गावाचे वर्णन आहे. हे वर्णन वाचून कोकणातील चढउतारावच्या कौलारू घरांची आठवण होते. आपण जोडलेली नाती आणि नात्यांमधले बंध येथे आहेत. आपल्या मुलाचे वर्णन आहे. तो सियाटलसारख्या नितांत सुंदर गावातही अद्याप न रमल्याचे वर्तमान आहे. तो येथे अद्यापही हरवलेला आहे, कारण त्याला स्वत:ला रमण्याची जागा अजून सापडलेली नाही.
सियाटल हे तळ्यामळ्यांचं गाव. फिरायला मौज येणारं. तेथील झाडे ऋतुमानानुसार रंग बदलतात. त्यांना नवी फुलं आणि फळ येतात. या झाडांवर पक्षांची रेलचेल आहे. या पत्रात तेथील पक्षांचे निरीक्षण आणि त्यांनी घातलेली शिळही आहे. तेथील रानवाटेवरची वर्णने आहेत. तळूतळी विसावलेलं एका हरणाचे कुटुंब आहे. जे झापड पडल्यानंरच्या फिरण्यात दिसते. या सियाटल शहराला मॉडर्न आर्टचे वेड आहे. या पत्रात तेथील मॉडर्न आर्ट आहे. तेथील हवामान, दिनक्रम आणि भरभरून केलेले निसर्गाचे वर्णन आहे.
याशिवाय या पत्रात बरेच काही आहे. देरीदाचे तत्त्वज्ञान आहे. त्याच्यावरच्या व्हिडीओपटाची गोष्ट आहे. त्यातील देरीदाची आई आहे. देरीदाच्या शोधात पुस्तकांच्या दुकानातून फिरल्यानंतरचे आणि अबोली रंगाचे वर्णन आहे. झाडीपट्टीतील पक्षांची किलबिलाट आणि त्याची रागधूनही आहे. विशेष म्हणजे तेथील एका हरवलेल्या पोपटाची गोष्ट आहे. या गोष्टीत पोपटाच्या मालकाची पोपट हरवल्यानंतरची भावव्याकुळता आहे. त्यातून माणसाची गुंतणूक लक्षात येते. तेथे हरवलेल्या पोपटाची जाहिरात पाहून नाशिकमधील मित्राच्या घरच्या पोपटाची आठवण आलेली आहे. शेवटी माणूस कशा कशात गुंतून जातो आणि आपण विणलेल्या जाळ्यात कोळी अडकावा तसा अडकत जातो, याचाच प्रत्यक्ष पुरावा म्हणजे हे पत्र आहे. या पत्राचा शेवट आपल्या गुरूला ‘आय एम यु’ असे म्हणत आणि असे म्हटल्यावर तुम्ही मला ‘आय एम यु अलसो’ म्हणाल, अशा शब्दांमध्ये आहे. हे पत्र ऐकणे हा खरोखरच एक अभिजात अनुभव आहे, केवळ आनंददायी.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.