सद्गुरु हे शिष्यावर असेच प्रेम करत असतात. त्यांच्या प्रेमामुळेच शिष्याची आध्यात्मिक प्रगती होत असते. सद्गुरुंच्या बोलण्यातून प्रेम ओसंडून वाहात असते. सद्गुरुंचे प्रेम हे माते सारखेच असते. त्यामुळे त्यांचा सहवास नित्य हवाहवासा वाटतो.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – ९०११०८७४०६
वत्स घालयाही परी । धेनु न वचावी दुरी ।
अनन्य प्रीतीची परी । ऐसीच आहे ।। ७८ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा
ओवीचा अर्थ – वासरूं तृप्त झाल्यावर देखील गाय आपल्यापासून दूर जाऊ नये असे त्या वासराला वाटते. एकनिष्ठ प्रीतीचा प्रकार असाच आहे.
मातेचे प्रेम हे मुलावर अनेक संस्कार करते. मुलाच्या सर्वांगीण विकासामध्ये आईचे प्रेम हे महत्त्वाची भूमिका बजावते. लहान वयात आईचे प्रेम, माया मुलाला मिळाली नाही, तर त्या मुलांच्या मानसिकतेवर विपरित परिणाम होतो. अशी मुले आक्रमक, हट्टी होतात. वेळीच यावर उपाय योजले नाहीत तर अशी मुले भविष्यात गुन्हेगारी क्षेत्रातही ओढली जाऊ शकतात. स्वतःवर आघात करण्याकडेही अशा मुलांचा कल असतो. इतका विपरित परिणाम अशा मुलांवर होऊ शकतो. विशेषतः लहान वयातच आई गमावलेल्या मुलांमध्ये हा प्रकार पाहायला मिळतो. यासाठी अशा मुलांचे योग्य संगोपन होणे गरजेचे असते.
आईचे प्रेम हे यासाठी गरजेचे असते. तिची माया, आपुलकी, आंतरिक ओढ, प्रेमभाव त्या मुलावर विविध संस्कार करत असते. हे फक्त मानवामध्येच नव्हे तर प्राण्यांमध्येही पाहायला मिळते. गाय आणि वासरू यांचे प्रेम माणसांच्या मनामध्येही आपुलकी, जिव्हाळा उत्पन्न करते. गायीजवळ वासरु दुध पिण्यासाठी येते. त्या दुधाने ते तृप्त होते. पण ते त्या गायीपासून दूर जाण्याचा कधीही प्रयत्न करत नाही. कारण त्या गायीची माया त्याला तसे करणार परावृत्त करते. गायीसोबतच आपण राहावे अशी त्या वासराची नित्य इच्छा असते. हाच तर एकनिष्ठ प्रेमाचा संस्कार आहे.
आईच्या प्रेमामध्ये महान व्यक्तीमत्वे घडवण्याचे सामर्थ्य असते. ती आई जन्माने त्या मुलाची आई नसेलही. मात्र तिच्या प्रेमाचा त्या मुलावर झालेला संस्कार इतका महान असू शकतो. प्रेमातून मिळालेल्या सुखातूनच मुलावर हा उत्तम संस्कार घडतो. भगवान कृष्ण हे देवकीच्या पोटी जन्माला आले पण यशोदेने त्यांचे संगोपन केले. यशोदाही जन्म देणारी आई नव्हती पण तिच्या प्रेमाचा उत्तम संस्कार कृष्णावर झाला. कृष्ण घडवण्यात यशोदेचे योगदान हे तितकेच महत्त्वाचे आहे.
प्रेमाचा पदर, मायेची छाया, आपुलकी, आंतरिक ओढ, प्रेमभाव, प्रेमाचे चार शब्द माणसाच्या मनावर फार मोठा परिणाम करतात. प्रेमातील सौजन्य हा संस्कार माणसाच्या मनात परिवर्तन घडवू शकतो. अहिंसेची चळवळ, सत्याग्रह या अशा अनमोल वृत्तीमुळेच क्रुर, उद्धट इंग्रजावर विजय मिळवता आला. असे हे सौजन्य अनेक आध्यात्मिक केंद्रातही पाहायला मिळते. कोणी चुकीचे वागले तरी ते येऊन प्रेमाने त्याला नमस्कार करतात व त्याची चुक सुधारण्याची विनंती करतात. तेही काहीही न बोलता केवळ हातवारे करून ते ही गोष्ट नम्रपणे सांगतात. माणसामध्ये माणूसकी उत्पन्न करण्याचे सामर्थ्य त्यामध्ये आहे. अशा या प्रेमाच्या वागण्यातूनच मोठ मोठाले संस्कार घडत असतात. सद्गुरु हे शिष्यावर असेच प्रेम करत असतात. त्यांच्या प्रेमामुळेच शिष्याची आध्यात्मिक प्रगती होत असते. सद्गुरुंच्या बोलण्यातून प्रेम ओसंडून वाहात असते. सद्गुरुंचे प्रेम हे माते सारखेच असते. त्यामुळे त्यांचा सहवास नित्य हवाहवासा वाटतो. त्यांच्या सहवासानेच आत्मज्ञानाची गोडी लागते. या एकनिष्ठ प्रीतीतूनच ब्रह्मज्ञानाचा लाभ शिष्याला होतो. अन् शिष्यमध्येही प्रेमाचा सागर निर्माण होतो.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.