March 19, 2024
Samaj Sahitya Pratisthan Sindhudurg award announced
Home » समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे पुरस्कार जाहीर
काय चाललयं अवतीभवती

समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे पुरस्कार जाहीर

  • समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गचा समाज साहित्य कथा पुरस्कार विवेक कडू यांना
  • भूमी काव्य पुरस्कार कवी प्रा.एकनाथ पाटील यांना जाहीर
  • इतिहासकार कृष्णराव अर्जुन केळुसकर पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते सुबोध मोरे यांना

कणकवली – समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गतर्फे देण्यात येणाऱ्या काशीराम आत्माराम साटम स्मृती समाज साहित्य कथा पुरस्कारासाठी शब्द पब्लिकेशनने प्रसिद्ध केलेल्या प्रा. विवेक कडू (पालघर) यांच्या ‘चार चपटे मासे’ या कथासंग्रहाची निवड करण्यात आली आहे. तर प्रकाश रामचंद्र रसाळ स्मृती भूमी काव्य पुरस्कारासाठी लोकवांड:मय गृहने प्रसिद्ध केलेल्या कवी प्रा.एकनाथ पाटील (इस्लामपूर) यांच्या ‘आरपार झुंजार’ या दीर्घ काव्यसंग्रहाची निवड करण्यात आली आहे. अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधुकर मातोंडकर आणि कार्यवाह वैभव साटम यांनी दिली.

दहा हजार रुपये, स्मृतीचिन्ह, शाल आणि ग्रंथ असे पुरस्काराचे स्वरूप असून पुरस्कार योजनेचे परीक्षक ज्येष्ठ कादंबरीकार राजन गवस, समीक्षक नितीन रिंढे, रणधीर शिंदे, कादंबरीकार प्रवीण बांदेकर यांनी सदर संग्रहांची या पुरस्कारांसाठी निवड केली आहे. जानेवारी मध्ये सावंतवाडी येथे होणाऱ्या कार्यक्रमात दोन्ही पुरस्कार विजेत्यांना पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात येणार आहे.प्रा. विवेक कडू हे आजचे मराठीतील महत्त्वाचे कथाकार असून प्रा.कडू यांच्या सर्वच कथेत
पाण्याचा संदर्भ आहे.

खोलवर विरघळून गेलेल्या माणसांचे अंत:स्तर शोधून व्यापक जीवनानुभव आविष्कृत केला आहे. गोष्ट सांगण्याची ओघवती शैली, आठवणी, स्वप्ने, पात्रांच्या सूक्ष्म हालचाली, त्या हालचालीतून उभी राहिलेल्या जीवंत व्यक्तिरेखा, व्यामिश्र आणि संपन्न अनुभवाची सरमिसळ, बोलीभाषेतील संवाद या सर्व पातळ्यावर विवेक कडू यांची कथा यशस्वी झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून कथा वाचताना एक दृश्यमालिका डोळ्यासमोर उभी राहते. तर तत्वांची बांधिलकी आणि नैतिकता या गुणांच्या बळावर प्रा.एन.डी.पाटील यांनी परिघाबाहेरच्या उपेक्षित, वंचित माणसांच्या हक्कांचे अनेक लढे प्राणपणाने लढविले. परिणामांची तमा न बाळगता नाही रे वर्गांच्या बाजूने ते ठामपणाने उभा राहिले. त्यांचा हा तत्वप्रधान संघर्ष कवी एकनाथ पाटील यांनी ‘आरपार झुंजार’ या दीर्घकवितासंग्रहात नेमकेपणाने पकडला आहे. सामाजिक चळवळी क्षीण होत निघाल्याच्या आजच्या मूल्यऱ्हासाच्या काळात विचारांची बांधिलकी सांगणारी ही कविता खूप महत्त्वाची आहे.त्यामुळेच या दोन्ही ग्रंथांची समाज साहित्य कथा आणि भूमी काव्यपुरस्करासाठी निवड करण्यात आली असल्याचा अभिप्राय परीक्षकांनी नोंदवला आहे.

इतिहासकार कृष्णराव अर्जुन केळुसकर पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते सुबोध मोरे यांना जाहीर

समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गतर्फे देण्यात येणारा इतिहासकार गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळुसकर ( वेंगुर्ले -केळुस) पुरस्कारासाठी यावर्षी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुबोध मोरे (मुंबई) यांची निवड करण्यात आली आहे. दहा हजार रुपये, स्मृतीचिन्ह, शाल आणि ग्रंथ असे पुरस्काराचे स्वरूप असून ज्येष्ठ कादंबरीकार राजन गवस, समीक्षक नीतीन रिंढे, रणधीर शिंदे आणि कादंबरीकार प्रवीण बांदेकर यांच्या निवड समितीने सदर पुरस्कारासाठी सुबोध मोरे यांची निवड केली असल्याची माहिती समाज साहित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधुकर मातोंडकर आणि कार्यवाह साठम यांनी दिली.

प्रसिद्धीपासून दूर राहून सतत कार्यरत राहणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये सुबोध मोरे यांचे अग्रक्रमाने नाव घ्यावे लागते. दलित पॅंथरला पन्नास वर्षेपूर्ण झाल्याच्या निमित्ताने महाराष्ट्रात विविध कार्यक्रम आयोजित करण्यासाठी श्री मोरे यांनी पुढाकार घेतला होता. “चळवळीवरची निष्ठा आणि नाही रे वर्गाबद्दलची आस्था” याच्या केंद्रस्थानी राहून सुबोध मोरे कार्यरत असल्यामुळे त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

सिंधुदुर्ग समाज साहित्य प्रतिष्ठान अलीकडल्या काही वर्षात सातत्याने साहित्यिक उपक्रम राबवत असून या उपक्रमांबरोबरच थोर इतिहासकार सिंधुदुर्ग सुपुत्र गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळुसकर यांच्या नावाचा पुरस्कार प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी सामाजिक किंवा साहित्यिक क्षेत्रातील मान्यवर व्यक्तीला दिला जातो. गेल्यावर्षी हा पुरस्कार सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांना देण्यात आला होता. त्यानंतर यावर्षी या पुरस्कारासाठी सुबोध मोरे यांची एकमताने निवड करण्यात आली. इतिहासकार केळुसकर यांनीच प्रथम शिवाजी महाराजांचे चरित्र लिहिले आणि गौतम बुद्धाचेही चरित्र लिहिले. ही दोन्ही चरित्र त्यांचे विद्यार्थी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सत्काराच्या वेळी त्यांना केळुस्कर यांनी दिल्यावर बाबासाहेब बुद्ध विचाराकडे वळले. हे त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान लक्षात घेऊन केळुस्कर यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो. या पुरस्काराचे वितरण जानेवारी 2023 मध्ये केले जाणार असल्याची ही माहिती श्री मातोंडकर आणि श्री साटम यांनी दिली.

Related posts

ऊसाचा नवीन वाण : फुले ऊस १३००७

खरे समाधान कशात ? हे ओळखायला हवे…

कोरोनामुक्तीत अध्यात्माचे महत्त्व…

Leave a Comment